आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Education By Smita Kelkar, Divya Marathi

एज्यु कॉर्नर: पळपुटे होऊ नका...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा हा म्हणता दहावीचा निकाल लागलासुद्धा. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, शिक्षक, नातेवाईक या सर्वांकडून कौतुक झाले आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा सुटकेचा श्वास सोडून पुढील योजना आखायला सुरुवात केली. पण अशाच वेळी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कोणी विचार केला? उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बरेच जण पुढाकार घेतात. पण अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे फारच कमी आढळून येतात. म्हणतात ना, ''Success has many friends, but failure is an Orphan.'' ब-याच विद्यार्थ्यांच्या पदरी कमी टक्के पडल्यामुळे तेही हताश झाले असतील.

मित्रांनो, ही वेळ निराश होण्याची नाही, तर मिळालेल्या अपयशातून धडा घेऊन यशाच्या दिशेने वाटचाल करण्याची आहे. लक्षात ठेवा, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ जरी ही परीक्षा करिअरच्या टप्प्यातली महत्त्वाची असली तरी ही आयुष्यातली शेवटची परीक्षा नव्हे.
अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यासच केलेला नसतो, मेहनतच घेतलेली नसते, असा सर्वसाधारण समज असतो. परंतु ही वस्तुस्थिती नसते, बरेचसे विद्यार्थी असेही असतात, ज्यांनी बरीच मेहनत घेऊनही ते अनुत्तीर्ण झालेले असतात. अशांनी निराश होण्याची गरज नाही. आपण कुठे चुकलो याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. आपण केलेल्या चुकांची एक यादी बनवा व या चुका सुधारण्याकरिता व पुन्हा होऊ नये याकरिता त्यावर उपाय शोधून काढा व ते त्यापुढे लिहा. लिहून याकरिता काढाव्यात की त्या ठामपणे तुमच्या लक्षात राहतील व तुमच्या हातून पुन्हा घडणारच नाहीत.

त्याचबरोबर आपण कोणत्या योग्य गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे होता याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ज्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळाले आहे, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांनी अवलंबलेल्या अभ्यासाच्या पद्धती जाणून त्या अमलात आणण्याचा प्रयत्न करा. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. पण हे ध्यानी असू द्या की स्वत:ला चांगले ओळखणारे केवळ आपण स्वत:च असतो. जेव्हा सर्वांशी सल्लामसलत करून, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला, स्वभावाला, शारीरिक क्षमतेला अनुकूल अशाच अभ्यासाच्या पद्धतींचा अवलंब करा. आंधळेपणाने दुस-यांचे अनुकरण करू नका. जे विषय कच्चे आहेत त्याला प्राधान्य द्या. तो विषय पक्का कसा करता येईल याविषयीचे मार्गदर्शन शिक्षकांकडून मिळवा. या सर्व गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच पण सर्वात महत्त्वाची आहे ती सकारात्मकता. ‘मी विजय मिळवणारच’ हा विचार मनाशी सदैव बाळगा आणि मग बघा कस यश सहजच तुमच्या पदरी पडेल. नापास झालो म्हणून खचणारे किती असतील? अनेक! पण त्यातून शिकून अधिक उमेदीने यशाच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी स्वत:ला खंबीर बनवणारे हातावर मोजण्याइतकेसुद्धा नसतील.
बरेचसे विद्यार्थी असेही असतील ज्यांना कमी टक्के मिळाल्यामुळे हव्या असलेल्या शाखेत प्रवेश मिळाला नसेल. परंतु हताश न होता, त्यातला त्यात जो सर्वोत्तम, पर्याय आहे तो निवडा आणि त्यात सर्वोत्तम यश संपादन करण्याचा निश्चय मनाशी बाळगा. कधीकधी आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नाही व निराश होऊन आपण दुस-या पर्यायाचा स्वीकार करतो आणि कालांतराने आपल्या निदर्शनास येते की तो दुसरा पर्यायच आपल्यासाठी सर्वोत्तम ठरलेला आहे. सुरुवातीपासून शैक्षणिक क्षेत्रात उत्तम असलेलेच यशस्वी होतात, असे नव्हे. ब-याचशा यशस्वी व्यक्तींनी आपल्या जिद्दीच्या मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त केलेले आहे.

गणितात कच्च्या असलेल्या एका विद्यार्थ्याला शिक्षक म्हणाला, ‘तू कधीच आयुष्यात काहीही होऊ शकणार नाहीस.’ परंतु स्वत:च्या जिद्दीवर तो आइकडून गणित शिकला आणि तो पुढे बनला अल्बर्ट आइन्स्टाइन. गरीब कुटुंबात जन्मलेल्या, अभ्यासात सर्वसाधारण असलेल्या मुलाने भारतात रॉकेट आर्किटेक्चर उभारले आणि पुढे तो राष्ट्रपतिपदाचा मानकरी झाला... डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. अतिशय प्रसिद्ध व्यक्तींची ही उदाहरणे. या व्यक्तींना कधीच अपयश आले असे नाही. पण आपल्या जिद्दीच्या जोरावर अपयशावर मात करून हे लोक उच्चपदावर पोहोचले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि स्वत:ला घडवा.

तुम्ही अपयशी झालात तर काय झाले? हा आयुष्याचा शेवट आहे का? नाही... ही वेळ आहे तुमचा स्वत:वर असलेला विश्वास मजबूत करण्याची. मनाशी पक्का निर्धार करण्याची की मी काहीतरी बनून दाखवणारच. आपल्यात असलेल्या उणिवांना खतपाणी घालण्यापेक्षा त्या मुळासकट कशा उपटून काढता येतील याकडे लक्ष पुरवा. धैर्याने, जिद्दीने यशस्वी होऊन जगायचे की हार पत्करून अयशस्वी व्हायचे याचा निर्णय सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. तुम्हाला घडविणारे तुम्हीच आहात!