आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Educational Poem By Heramb Kulkarni, Divya Marathi

कविता शिक्षणाची : चार भिंतीबाहेरची शाळा…

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार भिंतीबाहेरची शाळा…
एक दोन तीन चार
भारनियमनाला आकड्याचा आधार
बे एके बे बे दुने चार
शाळेत बॉम्बस्फोट आणि पोरच ठार
कमल घर बघ शरद बघ नळ
त्यो कोरडाच हाय टँकर आलाय पळ
चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले
काय सांगू बाबा माझा बालपणीच माझा वनियभंग झाला
हैबत गैबत चारा खातात
अन् दुष्काळात छावणीत राहतात
बालपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा
मोबाइल व्हॉट्सॅपचा सर्वांनाच चाळा
ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा
नोकरीसाठी बेकारांचा थवा
शिकलेली आई घरादाराला पुढे नेई
बापाला घाबरून पुन्हा माजघरात जाई
आम्ही मुले देवाघरची फुले
कुपोषणाची फुले विकास वेलीवर डुले।।
आवडतेही मज मनापासूनी शाळा
कविता न कोमला।। पैसा हवा काळा…
उमेश घेवरीकर
(कवी उमेश घेवरीकर हे शेवगाव, जि. नगर येथे माध्यमिक शिक्षक आहेत. ते नाट्यकलावंत असून अनेक कल्पक फ‍िल्म तयार केल्या आहेत..)
या कवितेला काही जण कविताच समजणार नाही... एकापुढे एक असंबद्ध ओळी लिहिलेल्या काहींना वाटतील...काहींना हे निव्वळ गद्य वाटेल पण हे एका शिक्षकाने लिहिल्यामुळे त्याला एक अर्थ आहे... वरवर वेडगळ वाटणारी ही बडबड एक अस्वस्थता आहे.. एक कैफियत आहे. या अस्वस्थतेच्या मुळाशी एक संवेदनशील मन आहे. हॅम्लेट नाटकाबाबत असे म्हटले जाते की हॅम्लेटच्या वेडेपणातही एक शिस्त होती.. तसे या कवितेच्या असंबद्धतेतही एक संबंद्धता आहे. अव्यवस्थेतही एक व्यवस्था आहे. समाजजीवन व शाळा यातच मुळात विसंवाद
निर्माण झाल्यामुळे अर्थातच कवितेचा सूर विसंवादी आहे. कवितेची रचनाही मोठी छान आहे. लहानपणापासून नेहमी पाठ्यपुस्तकात येणारी चमकदार वाक्ये शासकीय घोषणा पहिलीच्या पुस्तकातली केवळ वेलांटी काना शिकवायला वापरली जाणारी निर्बुद्ध अर्थहीन वाक्ये एकत्र
करून त्या वाक्यांशी समाजवास्तव जोडले आहे. याचा अनेक पद्धतीने अर्थ लागतो. १ली, २ रीच्या वयातील ही निरागस वयात शिकायच्या वाक्यांना थेट समाजातील भीषण वास्तव जोडले आहे. ते वाचताना एखादी जनि्याची पायरी चुकल्यावर वाटावे तसे वाटते आणि त्याचवेळी शाळेच्या निरागस भिंतीला खेटून किती भयावह जग उभे आहे. याची जाणीव होते, अशा वातावरणात एक मूलभूत प्रश्न पुढे येतो की शाळेबाहेर इतके भीषण वास्तव
असताना आमच्या या निरागस बाळबोध शिक्षणाचा नेमका काय उपयोग होणार आहे…या बाळबोध जगाला जर इतक्या भीषण अनुभवाला तोंड द्यायचे असेल तर मग कमल नळ बघ असली बालीश अर्थहीन शिकवणी केवळ पुरेशी आहे का… या वास्तवाला तोंड द्यायला आम्ही मुलांची मने घडवायला नेमके काय करतो आहोत... ते समुपदेशन आम्ही मुलांचे करणार नसू... मानसिक सक्षमीकरण जर करणार नसू तर मग या निव्वळ शब्दाला शब्द जोडणाऱ्या या वास्तवाचा उपयोग मग काय राहिला…इतके अनेक अर्थ ही कविता आपल्याला सांगते. शाळेतले आणि समाजाचे हे वास्तव असताना मग शिक्षकाची भूमिका काय असावी... शिक्षणक्षेत्राची भूमिका काय असावी हे प्रश्न अनुत्तरित राहतील. ती उत्तरे देण्याचे काम कवितेचे नक्कीच नाही. प्रश्न निर्माण करणे हे कवीचे काम असते. सोडविणे नव्हे. म्हणूनच कविता आणि सरकारमध्ये फरक असतो…एक घुसमट आणि चार भिंतीच्या आतली शाळा आणि चार भिंतीच्या बाहेरचे जग उलगडून दाखवणारी कविता आहे... वाळूत एखादे चित्र काढावे आणि समुद्राच्या लाटांनी ते पुसून टाकावे अशी स्थिती समाज आणि शिक्षणात आज असल्याची गर्द
जाणीव करून देणारी ही कविता आहे...