आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Educational Poems By Heramb Kulkarni, Divya Education

कविता शिक्षणाची: यंदा निकाल 75 टक्के ....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेच्या पोरांचं यंदा भलं होणारं
गुरुजी बी खुश होणार
मुलचं काय
त्यांचे बापं भी खुश होणारं
अन् माझा बी सत्कार होणार
मोठ्ठे साहेब म्हणाले मीटिंगात
‘‘10 वी 12 वी निकाल
चांगला लावण्यासाठी प्रयत्न करा’’
मी ‘‘लावण्यासाठी’’ फक्त धरून ठेवलं
बाकीच सारं सोडून दिलं
डोक्यावरचे अँटेना उभे केले
केंद्राच्या गुरुजीला एस.एम.एस. केला
‘‘तुमचं भी भलं होईल
आमच्या पोरांचा निकाल पडू देऊ नका’’
केंद्राचे गुरुजी काय समजायचे ते समजले
मग मी...
मोठ्या सायबाले लगेच फोनवर सांगितलं
‘‘लावून टाकू निकाल 75 टक्के’’
तयारी केली
फिटिंग केली
म्हणून म्हणतो सांगू नका कोणाले
यंदा निकाल 75 टक्के नक्की
वरपासून खालपर्यंत सारं मॅनेज केलंय
पुढे हे बी सांगतो
असेच राहिले आशीर्वाद
आणि
असेच राहिले असेच आपले सुगीचे दिवस
तर 75 चं काय 100 टक्के निकाल लावून
गिनीज बुकात जावू
पेरसापेन की जय
बुढालपेन की जय
पहाडी कोंपा लिंगो की जय
भिवसन की जय
सारा आदिवासी की जय
‘निकाल’लावणा-या सायबा
तुमचा बी जय...
- प्रभू राजगडकर
(प्रभू राजगडकर हे आदिवासींच्या प्रश्नावर लिहिणारे प्रसिद्ध कवी व गडचिरोलीत प्रशासकीय अधिकारी आहेत)
सध्या सर्वत्र 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेच्या बातम्यांमध्ये कॉपीच्या बातम्या प्रमुख असतात. चॅनलमुळे थेट परीक्षेचा उडालेला बोजवारा अत्यंत स्पष्ट दिसतो. आजच्या शिक्षणाची गुणवत्ता जाण्याची जी प्रमुख कारणे आहेत त्यात कॉपी हे महत्त्वाचे कारण आहे. याचे कारण कॉपीच्या भरवशामुळे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत. शिक्षक पूर्ण क्षमतेने मुलांची तयारी करून घेत नाही. मुलांची शिक्षणावर श्रद्धाच निर्माण होत नाही. पुन्हा कॉपीने पुढे
सरकलेली पिढी पदव्या मिळवते, पण कोणतीच कौशल्ये त्यांच्या हातात नसतात. नीट अर्जही लिहू न शकणारे तरुणांचे तांडे निर्माण होण्यात कॉपीचे ‘योगदान’ मोठे आहे...
एक विसंगती कुणालाच खटकत नाही. ‘प्रथम’ संस्था दरवर्षी गुणवत्तेचा पंचनामा करणारा अहवाल काढते. त्यात 8 वी पर्यंतची मुले नीट वाचत नाहीत. त्यांना गणिते येत नाहीत. मध्यंतरी 9 वीचे सर्वेक्षणात 64 टक्के मुलांना भाषा, गणित नीट येत नाहीत, असे आढळले, परंतु हीच मुले 10 वीत गेली की महाराष्‍ट्राचा बोर्ड निकाल हा 75 टक्केपेक्षा जास्त लागतो ही काय भानगड आहे हा प्रश्न कुणालाच कसा पडत नाही.
नांदेडला कॉपीमुक्ती अभियान राबविल्यावर निकाल एकदम 20 टक्केने कमी लागतो याचे कारणच हे आहे की, कॉपीने हे सारे निकाल फुगवलेत. 8 वीपर्यंत नापास करायचे नाही...9 वीतून 10 वीत ढकलायचे व 10 वीत मासकॉपी... असे आपले शिक्षणात पुढारलेले राज्य आहे. या कवितेत कवीने आमशाळांतील व हायस्कूलमधील शिक्षणाचा हा खेळखंडोबा उपहासगर्भरीतीने मांडला आहे. सारी यंत्रणा कशी सराईत बनेल झाली आहे हे कवीने अतिशय नाट्यमयरीतीने मांडले आहे.
संस्था, शाळा आपले अपयश झाकायला, अकार्यक्षमता लपवायला, अनुदान मिळायला मुलांना खोटेपणा करायला शिकवतात. यात ते पासही होतात पण आपलेच शिक्षक यात सामील बघून या मुलांचा आयुष्यातील मांगल्य, सचोटी, प्रामाणिकपणा, भाबडेपणा यावरचा विश्वासच उडून जातो व ती शिक्षणातली शिकलेली मूल्ये सोडून देतात. कॉपीचा हा मला सर्वात भीषण परिणाम वाटतो. मुलांच्या मनातील आदर्शवाद, निरागसता व शिक्षकाविषयीचा आदर कॉपी 3 तासांत संपवते ही सामाजिक हानी खूप मोठी व क्लेशदायक आहे.

herambrk@rediffmail.com