Home »Magazine »Rasik» Article On Egypt Revolution

इजिप्तमधील क्रांतीचे अपहरण

गोविंद तळवलकर | Jan 05, 2013, 21:14 PM IST

  • इजिप्तमधील क्रांतीचे अपहरण

इजिप्तमधील कैरो, अलेक्झांड्रा अशा मोठ्या शहरांत मुबारकविरोधी लोकांच्या झुंडीच्या झुंडी फिरत होत्या. अखेरीस मुबारकने सत्तात्याग केला, त्याच्यावर खटला भरला गेला. यामुळे इजिप्त आता आधुनिक, धर्मातीत लोकशाही देश होणार, अशी स्वप्ने रंगवली गेली. ती आता फोल ठरली आहेत. निदर्शने करणा-यांनी प्रचंड गर्दी केली, वाहतूक बंद पाडली; सर्व व्यवहार बंद झाले. मग काही काळ पोलिस किंवा लष्कर यांनी गोळीबार केल्यामुळे मनुष्यहानी झाली. पण उठाव करणा-यांनी धरणे सोडले नाही. यामुळे त्यांच्यासंबंधी अनेक अपेक्षा निर्माण झाल्या. त्या निष्फळ ठरल्या.
हे असे होणार हे दिसू लागले होते. प्रथम इजिप्तच्या लष्कराने कारभार ताब्यात घेतला. तेव्हा लष्कराबद्दल लोकांनी विश्वास बाळगला होता. कारण, मुबारकच्या राजवटीत लोक पोलिसांचे अत्याचार सहन करत होते, तर लष्कर दूर होते; पण मुबारकच्या सत्तेचा खरा आधार पोलिस नव्हे, तर लष्कर हा होता. लष्कराने कारभार हाती घेतला. लष्कराच्याच मदतीने मग निवडणूक झाली. मुबारक असताना मुस्लिम ब्रदरहूड या संघटनेला पायबंद घालण्यात लष्कर आघाडीवर होते, पण मुबारकच्या पदच्युतीनंतर लष्कराने इस्लामी संघटनेशी देवाणघेवाण केली.
निवडणुकीत मतदान झाले, तेव्हा मुस्लिम ब्रदरहूडने ‘सलाफी’ या अधिक कडव्या जात्यंध संघटनेशी हातमिळवणी करून भरघोस यश मिळवले. उठाव करणारे शिकलेले आहेत; फेसबुकपासून आधुनिक साधने त्यांना वापरता येतात. जगभर प्रसिद्धीही त्यांनी मिळवली. या अशांततेच्या काळात काहींनी अमेरिकेचा आश्रय घेतला; पण निवडणूक जिंकण्यासाठी इतके पुरे पडणार नाही, याचे कोणास भान नव्हते, ते मुस्लिम ब्रदरहूडला होते. म्हणून तिने आपली संघटनाशक्ती उपयोगात आणली. नुसती चळवळ उपयोगाची नाही, तिला संघटनेची जोड लागते. या फेसबुकवाल्यांना हा प्राथमिक धडा अवगत नव्हता. संसदेत बहुमत मिळवले ते ब्रदरहूडने. उठाव करणारे मागे पडले. महंमद मोर्सी हे ब्रदरहूडचेच प्रतिनिधी अध्यक्षपदावर आले. त्यांनी प्रथम समझोत्याचा आव आणला; पण ब्रदरहूड व लष्कर यांच्यात समझोता झाला आणि दोघांनी एकमेकांच्या सोयीची घटना घाईने तयार केली. ती संमत करून घेतली. मोर्सी यात पुढे होते.
घाईने घटना तयार झाली, तिचे खरे स्वरूप लोकांपुढे येऊन जाहीर चर्चा करण्यास सवड दिली गेली नाही. ती दिली असती तर घटनेची कलमे चलाखीने लिहिली गेल्याचे दिसले असते व लोकांना चर्चा करता आली असती. घटना धर्मस्वातंत्र्य देते, पण दुस-याच कलमात प्रेषित महंमदाची बदनामी झाल्यास शिक्षा फर्मावते. पण बदनामीची व्याख्या केलेली नसल्यामुळे कोणीही उठून बदनामीचा खटला करण्यास मोकळा राहतो. शरिया कायद्याचाच अंमल इजिप्तमध्ये घटनेप्रमाणे चालणार आहे. याच संदर्भातील कलम सांगते की, शरिया कायद्यास धरून काय आहे व काय नाही, हे न्यायालये किंवा संसद ठरवू शकणार नाही. तो अधिकार आहे अल् अझर या इस्लामी विद्यापीठाच्या विद्वानांना. या रीतीने न्यायपीठे व संसद यांच्या डोक्यावर या धार्मिक विद्यापीठाच्या विद्वानांना बसवण्यात आले आहे.
कामगारांना संघटन स्वातंत्र्य दिले असले तरी एका धंद्यात एकच कामगार संघटना राहील. यापुढचे प्रांताचे गव्हर्नर कोणी नेमायचे की निवडणुकीने यायचे, याबद्दल घटना मौन पाळते. यामुळे अध्यक्ष आपल्या हाती तो अधिकार ठेवू शकतात. लष्करास अनेक अधिकार दिले आहेत. लष्कराचा प्रमुख हा लष्करी अधिकारी असला तर ते आक्षेपार्ह नाही; पण तोच संरक्षणमंत्री असेल हे आक्षेपार्ह आहे. कारण यामुळे लष्करी अधिकारी हा मंत्री होतो. लष्कर प्रमुखास कोणत्याही नागरिकास स्थानबद्ध करण्याचा व शिक्षा देण्याचा अधिकार दिला आहे. लष्कराच्या अर्थसंकल्पावर लष्कराचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे. यामुळे लष्करी अर्थसंकल्पावर संसदेस चर्चा करण्याचा व त्यावर मतदान करण्याचा काही अधिकार राहत नाही. थोडक्यात, धर्मवाद आणि लष्करवाद यांची सांगड घातली गेली आहे. मतदान घेऊन घटना संमत करून घेण्यात आल्यामुळे लोकशाहीचे नाटक पूर्ण झाले. सार्वमत झाले असले तरी मतदानाचे प्रमाण तीसएक टक्केच आहे. यामुळे बहुसंख्य लोक मतदान न करता घरीच बसले, हे स्पष्ट होते; पण अधिकार मागणा-यांना या अल्पसंख्य लोकांतही बहुमत मिळवता आले नाही, हे अधिकच खटकल्याशिवाय राहत नाही. घटनेवर सार्वमत घेण्यात आले ते संघटनेच्या जोरावर पार पडले.
मतदानात अनेक गैरव्यवहार झाल्याचे सांगितले जाते. पण झाले ते झाले; दंगल, अशांतता नको, असा सर्वसाधारण सूर असल्याचे सांगितले जाते. यानंतर दोनएक महिन्यांनी नव्या घटनेखाली संसदेची निवडणूक होणार आहे. त्याही वेळी इस्लामवादी आणि लष्कर यांची हातमिळवणी झालेली असणार, उरतात ते स्वत:ला धर्मातीत म्हणवणारे गट ते देशातल्या शिकल्या सवरलेल्यांत वावरतात. शहरी भागांत राहतात. शहरांतही पाश्चात्त्य संस्कार झालेल्यांतच यांचा वावर आहे. पाश्चात्त्य देशांतील प्रसारमाध्यमांशी त्यांचा संबंध आहे. त्याचबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे, काही फार मोठ्या समूहास जवळ करण्याचे कसब त्यांच्यापाशी नाही.
त्याचबरोबर व्यक्तिवाद अतोनात बोकाळला असल्यामुळे विरोधी म्हणून किती संघटना असाव्यात, याला मर्यादा नाही. यामुळे विरोधी संघटित होऊ शकत नाहीत. सर्वसामान्य लोक यामुळे गोंधळात पडतात. आंतरराष्‍ट्रीय अण्वस्त्र मंडळाचे प्रमुख म्हणून काम केलेल्या इजिप्शियन गृहस्थांना मान असला तरी सामान्य लोकांना राजकीयदृष्ट्या त्यांच्यासंबंधी काही प्रेम नाही. एक-दोन घटक आता यशस्वी झालेल्यांच्या विरुद्ध जाण्याचा संभव काहींना दिसतो. एक म्हणजे, निवडणूक होऊन बहुमत मिळाले तरी ब्रदरहूडच्या आजच्या नेत्यांना देशाचा गाडा चालवणे तितके सोपे जाणार नाही. असे सांगितले जाते की, आताच ब्रदरहूडमध्ये मध्यममार्गी व अतिरेकी असे गट आहेत. सत्ता आली की ही दुफळी अधिक बळकट होण्याचा संभव आहे. तसे झाल्यास सत्तेवर अधिक पकड बसवण्यासाठी अतिरेकी कडक भूमिका घेऊ शकतील, त्यामुळे अगोदरच आर्थिक समस्यांनी बेजार झालेल्या देशाच्या नाकी नऊ येतील.
सर्वांना बरोबर घेऊन जाईल, असा नेता नाही वा पक्ष नाही. यामुळे काहीही होऊ शकते. कधी काळी फरुक राजाला पदच्युत करून नगीब-नासेर हे लष्करी अधिकारी सत्तेवर आले. त्यांच्याकडून नागरी राजवट येण्याची शक्यता नव्हती. यामुळे लष्करी राजवटच बळकट होत गेली. कम्युनिस्ट सत्तेला प्रतिबंध घालण्यासाठी या लष्करशहांचा उपयोग करून घेण्यात आला; पण याचा कधी फेरविचार करावासा वाटला नाही. ते सर्व अमेरिकेच्या अंगाशी येत आहे. इंग्लंड-अमेरिका या देशातले पुढारी व प्रसारमाध्यमे इजिप्तसंबंधी संदिग्ध भूमिका घेतात. त्यांना मुस्लिम ब्रदरहूड मान्य नाही, पण आता त्या संघटनेचा विजय झाला आहे तर राज्य चालवले तर बरे, असा सूर काही काढतात. काहींनी मात्र सुचवले आहे की, इजिप्त पाश्चात्त्य देशांकडून मिळणा-या आर्थिक मदतीवर अवलंबून असल्यामुळे लष्कर व धर्मवादी यांच्या युतीच्या सरकारला मदत थांबवून काही अटी घालाव्यात आणि त्या पु-या झाल्या नाहीत तर मदत थांबवावी. जर्मनी यास तयार आहे. कसोटी आहे ती अमेरिकेची.

Next Article

Recommended