भारतात ज्या काही अनावश्यक शस्त्रक्रिया होतात त्यात गर्भाशयाची पिशवी काढणे म्हणजेच ‘हिस्टेरेक्टॉमी’ ही सर्वात जास्त प्रमाणात केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. आपल्याकडे पोट दुखले की आंत्रपृच्छ म्हणजेच अपेंडिक्स काढण्याची शस्त्रक्रिया करणे हा एक प्रघातच झाला आहे. त्याचप्रमाणे स्त्रीचे ओटीपोट दुखू लागले की गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे असा घातक नियमच वैद्यकीय क्षेत्रात व रुग्णांमध्ये रुजू पाहतोय. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, अपेंडिक्स हा मानवी उत्क्रांती प्रक्रियेत हळूहळू लुप्त पावत चाललेल्या अवयवांपैकी आहे. यालाच वैद्यकीय भाषेत ‘वेस्टिजियल ऑरगन’ असे संबोधतात. त्यामुळे अपेंडिक्स काढल्याने फारसा फरक पडत नाही, पण हाच नियम गर्भाशयाला लावता येणार नाही. कारण गर्भाशय हा काही वेस्टिजियल ऑरगन म्हणजेच लुप्त होणारा अवयव नाही. किं बहुना वंध्यत्वाचे वाढते प्रमाण पाहता, गर्भाशय हा काढून टाकण्याचा नव्हे तर संवर्धन करण्याचा अवयव आहे.
मानवी शरीराचे दैनंदिन कार्य योग्य चालण्यासाठी गरज असलेल्या अवयवांचे महत्त्व लक्षात न आल्याने सध्या वैद्यकीय क्षेत्रात ‘हिस्टेरेक्टॉमी’ या अनावश्यक शस्त्रक्रियेची साथ आल्याचे चित्र आहे. त्यातच ही गरज स्त्री शरीराशी संबंधित असल्याने या अविचारात अजूनच भर पडते व नातेवाइकांकडून या शस्त्रक्रियेला फारसा विरोध होताना दिसत नाही. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियांपैकी जवळपास 80% शस्त्रक्रिया या अनावश्यक असतात. त्यामुळे सर्वप्रथम कुठल्या कारणासाठी गर्भाशय काढणे गरजेचे नाही व कधी गर्भाशय काढावे लागते, हे समजून घेणे गरजेचे आहे. ब-याचदा मध्यम वयानंतर स्त्रिया गर्भाशयाचा काही भाग बाहेर येण्याची समस्या घेऊन येतात, याला ‘प्रोलॅप्स’असे म्हटले जाते. खरे तर या समस्येसाठी गर्भाशयाला दोन्ही बाजूंनी आधार देऊन उभे करण्याची शस्त्रक्रिया आवश्यक असते. जुन्या पिढीतील स्त्रीरोगतज्ज्ञ अशा प्रकारच्या स्लिंगसर्जरीमध्ये पारंगत होते. पण आज या शस्त्रक्रियेचे कौशल्य कमी झाल्याने थेट गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सोपा मार्ग अवलंबिला जातो. पण यामुळे रुग्णांच्या समस्या सुटण्यापेक्षा त्यात भरच पडते कारण अवयवांमध्ये अजून जागा निर्माण होते व बाहेर येणा-या गर्भाशयाची जागा आता मूत्राशय व गुद साठवणारे रेक्टम घेते. त्यामुळे लघवीवर नियंत्रण न राहणे व इतर मूत्राशयाच्या समस्यांमुळे स्त्रीचे आयुष्य खूपच दु:खदायक होऊ न जाते.
अनावश्यक गर्भाशय काढण्यासाठीचे अजून एक कारण म्हणजे, पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, सहसा मुलं होईपर्यंत स्त्री या समस्या सहन करते व एकदा कुटुंब पूर्ण झाले क ी वारंवार या समस्येसाठी डॉक्टरांकडे फे-या मारून कंटाळलेला नवरा -‘काढून टाका एकदाचे गर्भाशय, आता त्याचा काय उपयोग?’ असा डॉक्टरांकडे हट्ट करतो. डॉक्टरही अशा हट्टाला फारसा विरोध करताना दिसत नाहीत. मुळात अशा समस्येसाठी फार फार तर गर्भाशयाची पिशवी स्वच्छ करून त्यातील तुकडा कॅन्सर नसल्याची तपासणी करून रुग्णाला गर्भनिरोधक गोळ्यांचा कोर्स दिल्यास बराच फरक पडतो, तसेच त्याशिवायही इतर औषधोपचार असतातच. पण पुन्हा गर्भाशयाची पिशवी काढण्याचा शॉर्टकट आम्हाला जास्त सोपा वाटतो. ब-याचदा गर्भाशयातील गाठी काढण्यासाठी गर्भाशयच काढले जाते, पण या गाठी छोट्या असल्यास फक्त या गाठी काढता येतात. ब-याचदा ओटीपोट दुखण्याचे कारण हे गर्भाशय व आजूबाजंूच्या अवयवांना झालेला जंतुसंसर्ग, पाळीच्या काळात स्वच्छता न ठेवल्याने हा जंतुसंसर्ग बळावत जातो. यासाठी प्रतिजैविके पुरेशी असताना, जंतुसंसर्गाचा ही राग गर्भाशयावर काढला जातो.
मुळात या सगळ्या गोष्टींमागे एक गैरसमज म्हणजे मूल झाल्यावर गर्भाशयाची गरजच नाही व त्यामुळे गर्भाशय काढण्याकडे संतती नियमनाच्या दृष्टिकोनातूनही पाहिले जाते. पण खरे तर मूल झाल्यावर गर्भाशय कात टाकते व स्त्रीच्या आयुष्याला उभारी देण्यास नव्याने सज्ज होते. अंडाशय हे गर्भाशयाच्या साथीने शरीरात संप्रेरके स्रवण्याचे कार्य करते, ज्यामुळे हाडे व हृदय बळकट होतात व त्वचेचा तजेलपणाही टिकून राहतो. या गोष्टीचा विसर पडल्यामुळे तिशी व चाळिशीत गर्भाशय काढून टाकल्याने अनेक स्त्रिया अकाली वार्धक्याकडे झुकलेल्या दिसतात. या स्त्रियांमध्ये हृदयरोग, हाडे ठिसूळ होणे व संप्रेरकांच्या कमतरतेमुळे मानसिक समस्याही आढळून येतात. अनावश्यक गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेमुळे आपल्याला आवश्यक कारणांची माहिती असावी -अंडाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरची पूर्वस्थिती असल्यास गर्भाशय काढावेच लागते. पण एकीकडे अनावश्यक कारणांचा अतिरेक होतो, तर दुसरीकडे आवश्यक कारणांकडे कानाडोळाही होताना दिसतो.
एकीकडे वाढणारे वय हे आजच्या युगातील स्त्रीला अधिक प्रगल्भ बनवताना दिसते, पण दुसरीकडे अनावश्यक गर्भाशय काढणा-या शस्रक्रियांसारखे प्रघात तिला मागे खेचताना दिसतात. म्हणूनच ‘लाइफ बिगिन्स अॅट फॉर्टी’चा नारा देणा-या स्त्रियांनी घरोघरी ‘गर्भाशय वाचवा मोहीम’ राबवणे आवश्यक आहे.
amolaanadate@yahoo.co.in