आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Everest Trekking By Sameer Paranjape, Divya Marathi

एव्हरेस्ट मोहिमांचा जीवघेणा धंदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एव्हरेस्ट. हिमालयाच्या कुशीत विसावलेले जगातील सर्वोच्च उंचीचे (8,848 मी.) शिखर. जगातील गिर्यारोहकांनी एव्हरेस्टचा माथा सर करण्याचे, 19व्या शतकापासून पाहिलेले स्वप्न अखेर 29 मे 1953 रोजी पूर्ण झाले. त्या दिवशी एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले. या घटनेला येत्या 29 मे रोजी 61 वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत जगभरातील असंख्य निष्णात गिर्यारोहक, साहसी वृत्तीचे निष्णात गिर्यारोहक व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले पर्यटक यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यात विविध वयोगटांच्या स्त्री-पुरुष गिर्यारोहकांचा समावेश आहे. याउपर दरवर्षी एव्हरेस्टच्या मोहिमांदरम्यान विविध प्रकारचे विक्रमही नोंदविले जातात. एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी एप्रिल ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अनेक चढाई मोहिमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सहभागी होणा-या गिर्यारोहकांची सरासरी संख्या दरवर्षी 300 ते 400 इतकी असते. त्यातील काही जणांच्या हाती यश किंवा अपयश लागते. काही जणांचा चढाईदरम्यान अपघातात मृत्यू ओढवतो. मात्र, एव्हरेस्टचा माथा सर करायचाच, ही जिद्द अनेकांच्या मनात अभंग उरते.

यंदाच्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमांचा हंगाम सुरू होण्याच्या प्रारंभीच गेल्या 18 एप्रिल रोजी या शिखराच्या पश्चिम धारेवरील एक मोठा हिमनग कोसळून या शिखराच्या कॅम्प-1 खाली खुंबू हिमनदीत हिमप्रपात झाला. त्यामुळे बर्फाखाली गाडले जाऊन 16 शेर्पा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. हे शेर्पा यंदाच्या एव्हरेस्ट चढाई हंगामाच्या रूट ओपनिंगसाठी सर्वात आधी शिखरावर रवाना झाले होते. हा रूट ओपन झाल्यावर गिर्यारोहकांच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमांना सुरुवात होणार होती. मात्र, त्या आधीच झालेल्या या दुर्घटनेमुळे यंदाच्या वर्षी नेपाळमार्गे एव्हरेस्ट मोहिमांमध्ये सहभागी होण्यास शेर्पांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे अनेक गिर्यारोहक अत्यंत निराश भावनेने माघारी फिरले. तसे पाहता 1990च्या दशकाच्या मध्यापासून एव्हरेस्ट चढाई मोहिमांचे मोठ्या प्रमाणावर व्यापारीकरण होत गेले. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा अनेक गिर्यारोहण संस्था आहेत, ज्या एखाद्या गिर्यारोहकाकडून हजारो डॉलर मानधनाच्या रूपात घेऊन एव्हरेस्ट मोहिमेची संपूर्ण तयारी करून देतात. ही आखणी करून देण्यामध्ये नेपाळमधील गिर्यारोहण संस्था वा एखादी व्यक्ती मध्यस्थ म्हणून भूमिका बजावतात. एव्हरेस्टवर चढाई करणा-या प्रत्येक गिर्यारोहकाकडून नेपाळ सरकार दहा हजार डॉलर इतकी रॉयल्टी आकारते. मात्र, 18 एप्रिल रोजी झालेल्या अपघातात मरण पावलेल्या शेर्पांच्या अंत्यविधीसाठी नेपाळ सरकारने प्रत्येकी फक्त 400 डॉलर इतकी तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहीर केल्याने शेर्पा समुदाय संतप्त झाला होता. दरवर्षी एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर मदतनीस व मार्गदर्शकाच्या रूपाने सहभागी होणा-या शेर्पांना दर हंगामात प्रत्येकी सरासरी दोन ते आठ हजार डॉलर इतकी कमाई होत असते. एव्हरेस्टवरील दुर्घटनेनंतर या शिखराच्या बेसकॅम्पला सुमारे 400 शेर्पांनी जमून यंदा एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी न होण्याचा निर्णय एकमताने जाहीर केला. एव्हरेस्ट मोहिमांच्या होत चाललेल्या व्यापारीकरणामुळे ही सारी परिस्थिती ओढवली आहे.
एव्हरेस्ट शिखरावर गेल्या दोन वर्षांपासून साऊथ कोलच्या मार्गे चढाई होणा-या सर्व मोहिमांचे आयोजन नेपाळमधील एजन्सी एकत्रितरीत्याच करतात. त्यामुळे या मार्गावर कोणीही स्वतंत्रपणे आरोहण करत नाही. स्वतंत्रपणे आरोहण करू इच्छिणा-यांची शेर्पांनी अडवणूक केल्याच्या काही घटनाही घडल्या आहेत. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहीम मार्गदर्शक कंपन्या गिर्यारोहकांकडे ‘क्लायंट’ या दृष्टीनेच बघत असतात. एखाद्या एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर किती शेर्पा व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत, त्यानुसार प्रत्येक गिर्यारोहकामागे सरासरी 40 ते 90 हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातही भेद असा की, स्थानिक शेर्पा मार्गदर्शकांपेक्षा पाश्चिमात्य मार्गदर्शकांचे शुल्क अधिक असते. एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकाबरोबर सहभागी होण्यासाठी पाश्चिमात्य मार्गदर्शक 10 ते 35 हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारतो. एव्हरेस्टवर चढाई करणा-या व्यक्तीने गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असणे अत्यावश्यक आहे. मात्र, हाती आलेले गि-हाईक सहजासहजी सोडायचे नाही, या धंदेवाईक हेतूने एव्हरेस्ट मोहिमेची आखणी करणा-यांपैकी काही कंपन्या पर्वतारोहणाचा फारसा अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी करून घेतात. तसेच एव्हरेस्टवर जाऊ इच्छिणा-यांपैकी काही लोक आपण प्रशिक्षित गिर्यारोहक असल्याचे खोटे दाखले नेपाळ सरकारकडे सादर करतात.

एव्हरेस्ट मोहीम आखणी कंपन्या व नेपाळमधील मध्यस्थ संस्था यांच्यामध्ये चढाई मोहिमेसंदर्भात होणा-या करारनाम्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत, याकडे ब-याच गिर्यारोहकांचेही लक्ष नसते.
पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहीम आखणी कंपन्या गिर्यारोहकांकडून 50 हजार डॉलर इतके शुल्क घेत असतील, तर त्यातील 35 हजार डॉलर इतकीच रक्कम नेपाळमधील मोहीम आखणी करणा-या मध्यस्थाला दिली जाते. प्रत्यक्ष मोहिमांत सहभागी होणा-या शेर्पांना मिळणारा मोबदला नाममात्र असल्यानेच, काही शेर्पांनीच नेपाळमध्ये मध्यस्थी करणा-या कंपन्याही सुरू केल्या आहेत. या कंपन्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी प्रत्येक गिर्यारोहकाकडून सुमारे 37000 डॉलर मोबदला घेतात. त्यात या गिर्यारोहकाला मोहिमेत आपल्या बरोबर दोन शेर्पा मदतनीस घेऊन जाण्याची सुविधा असते. या कंपन्यांना या व्यवहारात प्रत्येक गिर्यारोहकामागे किमान 2 ते 3 हजार डॉलर इतका नफा मिळतो. यात एव्हरेस्टचा माथा सर करु पाहणा-या, नवख्या गिर्यारोहकांची मानसिकताही काही वेळेस समस्या निर्माण करते. अशा वेळी एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी आपण जेवढे जास्त पैसे मोजू तितकी आपली मोहीम यशस्वी, असे मानणा-या नवख्या गिर्यारोहकांमुळे या मोहिमांना अधिकाधिक बाजारू स्वरूप येत जाते. नेपाळमधील पर्यटन व्यवसायातून मिळणा-या एकूण उत्पन्नामध्ये गिर्यारोहणातून मिळणा-या महसुलाचा वाटा चार टक्के आहे. एव्हरेस्टवरील चढाई मोहिमा आयोजित करून देणा-या संस्था नेपाळमधील मध्यस्थ संस्थांकडे मोबदला कमी करण्यासाठी तगादा लावतात. जो मध्यस्थ कमी मोबदल्यावर मोहीम न्यायला तयार होईल, त्याच्याकडे आपले क्लायंट पाठवण्याकडे एव्हरेस्ट मोहीम आखणी कंपन्यांचा कल असतो. या घासाघीशीच्या प्रवृत्तीमुळे प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणा-या शेर्पांनाही कमी मोबदला मिळतो. मधल्या काळात या व्यवहारात नेपाळमधील काही स्थानिक उद्योजक गडगंज श्रीमंत झाले. त्यांनी पर्यटकांसाठी हॉटेल उघडली. काहींनी विमाने विकत घेऊन ती गिर्यारोहकांसाठी उपलब्ध करून दिली. मात्र शेर्पांमधील बहुसंख्य जण मात्र अपु-या उत्पन्नामुळे उपेक्षितच राहिले. यंदाच्या वर्षी एव्हरेस्टच्या माथ्यावर जाण्यासाठी 334 गिर्यारोहकांनी नेपाळ सरकारकडे नोंदणी केली होती. त्यांच्याकडून रॉयल्टीच्या रूपात नेपाळ सरकारने तब्बल 3.3 दशलक्ष डॉलरचा महसूल यंदा मिळविला. त्या रकमेतील 30 टक्के भाग हा एव्हरेस्ट परिसराच्या विकासासाठी नेपाळ सरकार खर्च करणार आहे. अर्थात, एव्हरेस्ट मोहिमांचा फळफळलेला व्यवसाय हा नेपाळ सरकारला दुभत्या गायीसारखा वाटतो. मात्र त्या व्यवसायात गुंतलेल्या शेर्पांच्या कल्याणासाठी काही उत्तम योजना राबवाव्यात, असे तेथील सरकारला वाटत नाही, ही खंत शेर्पांच्या मनात आहे. यंदा नेपाळमार्गे एव्हरेस्टसाठी मोहिमा जरी गेल्याच नाहीत तरी चीनच्या तिबेट भागातून जाणा-या मार्गांद्वारे एव्हरेस्टचा माथा सर करण्याचा पर्याय गिर्यारोहकांसाठी खुला आहेच. नजीकच्या काळात नेपाळमधून निघणा-या एव्हरेस्ट मोहिमांवर शेर्पांनी घातलेला बहिष्कार तसाच कायम राहिला वा मागे घेतला गेला, तरी गेल्या तीन आठवड्यांतील घडामोडींचा विपरीत परिणाम या गिर्यारोहणाच्या व्यवसायावर होणार, हे नक्की. एव्हरेस्ट मोहिमांसाठी आकारण्यात येणा-या शुल्कातही भविष्यात मोठी वाढ होण्याचा संभव आहेच. एकूणच धंदेवाईक वृत्तीच्या तावडीत एव्हरेस्ट मोहिमा सापडल्या आहेत. त्यातून एव्हरेस्टची सुटका करणे हे या घडीचे सगळ्यांत मोठे आव्हान ठरले आहे.

शेर्पांचाच बळी!
नेपाळच्या पूर्व भागात राहणारे शेर्पा हे एव्हरेस्ट मोहिमांमधील महत्त्वाचा घटक असतात. एव्हरेस्टवर चढाई करणाºया गिर्यारोहकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे सामान वाहून नेणे, विविध चढ-उतारांवर दोर बांधणे, शिड्या रोवणे ही सर्व कामे शेर्पा करतात. चढाईदरम्यान गिर्यारोहणाची साधने व अन्य सामान एका छावणीतून पुढच्या छावणीमध्ये नेण्यासाठी त्या दरम्यान शेर्पांना अनेक फेºया माराव्या लागतात. हे लक्षात घेता गिर्यारोहकापेक्षा शेर्पांच्याच जिवाला अधिक धोका असतो. एव्हरेस्टवरील खुंबू हिमनदीतून मार्ग काढत असताना तर संकटे दत्त म्हणून उभी ठाकतात. त्यात अनेकदा पहिला बळी जातो शेर्पांचाच. या सगळ्या अडचणींतून मार्ग काढून मोहीम यशस्वी झाल्यास त्यातून शेर्पांना प्रत्येकी 2 ते 8 हजार डॉलर इतकीच कमाई होते...

sameer.p@dainikbhaskargroup.com