आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Examination Countdown By Smita Kelkar

एज्यु कॉर्नर: परीक्षेचे काउंटडाऊन सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्याच्यासाठी आपण वर्षभर अविश्रांत मेहनत धडपड, अपार कष्ट घेत आहात ती वेळ दारात येऊन ठेपलेली आहे. उसंत घेऊन १०-१२वीचे विद्यार्थी ताजेतवाने झाले असतील परंतु आता वेळ आहे ती कसोटीची. दिवसागणिक तुम्ही व तुमची परीक्षा यातील अंतर कमी कमी होत जाणार आहे. म्हणजेच एक प्रकारे हे काऊंटडाऊन आहे. या काऊंटडाऊनची जाणीव करून देण्यासाठी हा लेख आहे.

पूर्वनियोजित पद्धतीने कसा अभ्यास कराल, परीक्षेकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कसा असेल यावर परीक्षेचा निकाल मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल. कुठलाही सैनिक योग्य प्रशिक्षण व सरावाशिवाय रणांगणावर उतरत नाही. प्रशिक्षण घेऊन त्यात तो तरबेज झाला की युद्धात उतरण्यापूर्वी त्याच्या नेत्याकडून त्याला काही टिप्स दिल्या जातात. त्या टिप्स व प्रशिक्षण यांच्या आधारे तो शत्रूवर विजय मिळवत असतो. त्याचप्रमाणे तुम्हीही परीक्षेत म्हणजे रणांगणावर उतरण्यापूर्वी जवळजवळ वर्षभर प्रशिक्षण मिळवत आहे व त्यात तरबेजही झाला असाल. आता आवश्यकता आहे ती परीक्षेपूर्वीच्या काही महत्त्वाच्या टिप्स समजून घेऊन त्या कठोरपणे पाळण्याची की जेणेकरून तुम्ही ज्ञान व टिप्सच्या आधारे रणांगणावर भरघोस यश मिळवाल.आता इथून पुढे सुरू होणारे दिवस हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये असणा-या slog overs सारखे आहेत. Slog overs मध्ये खेळाडूंना कमीतकमी कालावधीत उत्तम दर्जाचा खेळ खेळायचा असतो. कारण त्या Slog over मधील खेळावरच सामन्याचे भवितव्य अवलंबून असते. त्या कालावधीत नियोजनपूर्वक, भावनाप्रधान न होता खेळ खेळला जातो. आता तुमच्याही Slog overs सुरू झाल्या आहेत, तुम्हीही त्याच पद्धतीने अभ्यास कराल, तर तुम्हीही one day match अगदी सहजपणे जिंकू शकाल.

चिंतामुक्त व्हा : चिंतामुक्त व्हा. चिंतामुक्त मनाने केलेले काम अधिक परिणामकारकरीत्या होत असते. अभ्यासाचा संबंध हा रसग्रहणाशी असतो. उत्तम रसग्रहण झाल्यास तुम्हाला त्या विषयाचा उत्तम आकलन होऊ शकते आणि ज्याचे आकलन उत्तम झाले आहे त्या विषयासंबंधित कोणत्याही गहन प्रश्नांचा तुम्ही नीट सामना करू शकता म्हणूनच चिंतामुक्त होऊन अभ्यासावर जोड देणे ख-या अर्थाने महत्त्वाचे.

सकारात्मक आशावाद : मी विजय मिळवणारच. हा दृष्टिकोन बाळगा. सकारात्मक विचारच क्रियाशील मेहनत घेण्यास तुम्हाला उत्स्फूर्त करतील आणि तुम्ही वेळेचा योग्यरीत्या उपयोग करून घेऊ शकाल.

संवाद साधा : दहावी, बारावीत चांगले यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधा. त्यांचे अनुभव, प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या संकल्पना, मुद्देसूद उत्तर लिहिण्याच्या पद्धती याविषयी चर्चा करा. या चर्चेतून नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची योग्य दिशा सापडू शकते. तुम्हाला तुमच्यामधील उणीवांची जाणीव होऊ शकते. एकदा का तुम्हाला तुमच्यातील उणिवांची जाणीव झाली की त्यातून तुम्ही स्वत:साठी मार्ग शोधू शकाल.

दिवसाचे वेळापत्रक : अभ्यास अधिक परिणामकारकरीत्या हवा, यासाठी प्रत्येक दिवसाच्या वेळापत्रकाची आखणी करणे अत्यंत गरजेचे आहे. असे वेळापत्रक आखल्यामुळे प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित वेळ देऊन अभ्यास क्रियाशील पद्धतीने होतो. त्यामुळे तुम्ही सर्व विषयांकडे समान लक्ष देऊ शकता. तुमच्या या वेळापत्रकात झोप, विश्रांती यालाही अनुकूल वेळ द्या.

सराव : सरावाला जास्त महत्त्व देणे आवश्यक आहे. वेळेत प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा. कमीतकमी वेळात मुद्देसूद उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरेचसे विद्यार्थी अतिशय जिद्दीने अभ्यास करतात. मात्र प्रश्नपत्रिका वेळेत सोडवण्याच्या सरावाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे परीक्षेत उत्तरे येत असूनही वेळेअभावी प्रश्न न सोडवल्याने नाराज होतात. तेव्हा कमीतकमी वेळात जास्तीतजास्त उत्तरे कशी लिहिता येतात याकडे लक्ष केंद्रित करा.