आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमजोर हाडांसाठी करा व्यायाम अन‌् घ्या स्निग्ध पदार्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्यशरीर निर्माणाची सुरुवात शुक्रयोनीत संयोगापासूनच होते. अर्थात गर्भाशयामध्ये दोष धातू व मल यांच्या संघटनेतून देहाची उत्पत्ती होते. परंतु शरीरामध्ये दैनदिन प्रक्रियेत शरीर घटक सतत जीर्ण शीर्ण होण्याची प्रक्रिया चाललेली असते. हे जीर्ण झालेले घटक लगेच शरीराबाहेर काढून टाकून त्यांची जागा नवीन निर्माण झालेल्या घटकांनी घेणे ही प्रक्रियाही बरोबरीने चालू असते. आज या लेखमालेतून आपण अशाच एका शरीराने धारण केलेल्या अस्थिधातूबद्दल बोलणार आहोत. त्यामध्ये अस्थिक्षय होण्यामागची कारणे काय असतात, अस्थिक्षय होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, अस्थिक्षय असणा-यांनी काय उपचार करावेत हे पाहूया. आयुर्वेदानुसार मनुष्य शरीरनिर्माण करणारे सात धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र हे सर्वच शरीराचे धारण करतात म्हणूनच त्यांना धातू म्हटले आहे.

धारणात धातव
शरीराच्या अवयव व रचनांना आधार देणारा असा हा धातू. अस्यते इति अस्थि म्हणजे शरीराला आकार देणे, कठीणता आणणे, महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करणे, शरीरातील मांसपेशी, धमणी, नाडी इत्यादींना आधार देणे, अस्थीमध्ये होणा-या संधीमुळे शरीराच्या निरनिराळ्या अंगाची हालचाल करण्यास मदत करणे, शरीरामध्ये अस्थी नसती तर शरीर म्हणजे एक मांसाचा गोळाचा झाला असता. देह धारण करणे हे अस्थीचे सर्वप्रमुख कार्य होय. अस्थिधातूची उत्कृष्टावस्था, उत्तमावस्था, बलशीलत्व हे त्यांच्या सार परीक्षणार्थ समजते. ही माणसे चांगली उंचीपुरे, वजनदार, बळकट असतात. त्यांच्या शरीरातील सर्व हाडे, नखे, दंत, स्थूल व मजबूत असतात. अत्यधिक क्रियावान काम कष्ट करणारे दीर्घायुषी असतात. पण जेव्हा हे अस्थिसार लक्षणे अल्पसार होऊ लागतात तेव्हा शरीराला अनेक वेदनांना सामोरे जावे लागते.

अस्थी निर्माण
आपण जो आहार घेतो, त्यावर प्रथम अग्नीचे पचनसंस्कार घडतात. पचनसंस्कार परिपूर्ण झाले तरच उत्तम आहाररस तयार होतो. प्रत्येक धातूमध्ये त्या धातूचा स्वतंत्र अग्नी असतो. त्या अग्नीमुळे त्या धातुसंबंधीचे संपूर्ण पचनकार्य घडून येणार असते. एका धातूपासून पुढचा धातू निर्माण होतो. तो याच अग्नीमुळे धात्वाग्नी आहाररसामधून याेग्य अंश पचवून स्वाग्नीचे त्याचे स्वस्वरूपात परिवर्तन करून घेतात. रसधातूचे निर्माण होऊन सर्वधातूंची क्रमाक्रमाने निर्मिती होऊन अस्थिधातू निर्माण होतो. पण रसाग्नी मांसाग्नीचे कार्य करू शकणार नाही. प्रत्येकांचे सामर्थ्य ठराविक असते. या पचनामुळे शरीर संतुलित राखण्यात येते.

अस्थिक्षयांची दिसणारी लक्षणे
अ- शरीरात कोरडेपणा वाढतो म्हणजे त्वचा, केस, नखे , दंत रुक्ष व फुटीर होतात. दातांना भेगा पडतात (ब) फारसे श्रम झाले नाहीत तरी खूप थकवा जाणवतो (क) शरीरातील सर्व सांधे, हाडे दुखू लागतात. (ड) शरीराला ग्लानी येते. उत्साह वाटत नाही.

सहज साध्य उपाय
- शरीराचे पोषण अर्थातच शरीरधातूंचे पोषण अन्नापासून होते हे आपण जाणून आहोतच. पण, आहाराने आपण केवळ पोट भरणे या गोष्टीकडे लक्ष देतो. पण हाडांनाही ताकद देण्याची आवश्यक असते हे कोण लक्षात घेणार?
- सुरुवातीपासून शरीरपोषण करण्याचे सामर्थ्य व शरीराला स्निग्धता देणा-या वीर्यवान पदार्थाचे सेवन करणे. उदा. दूध, लोणी, तूप, खारीक, खजूर, डिंकाचे मेथीचे लाडू, खसखस, साळीच्या लाह्या, प्रकृतीनुरूप फळांचे रस वगैरे समावेश करणे.
- वात व अग्नीचे संतुलन होण्यासाठी नियमित व्यायाम योगासने व प्राणायाम करणे, नियमित तीळ तेलाने अभ्यंग करणे.

अस्थिक्षीण होण्याची कारणे?
१. कमी खाणे किंवा कडक उपवास करणे (२) धातुक्षय झाल्याने तसेच ऑपरेशन करून एखादा अवयव काढून टाकणे (३) अत्यंत परिश्रम करणे (४) कोणत्याही कारणाने हाडे एकमेकांवर घासले जाणे (५)अस्थिधात्वाग्नी विकृतीमुळे (६) अधिक वातल आहार विहाराचे सेवन (७) अधिक वजन वाढल्याने (८) रजोनिवृत्ती- शरीरामधील अंतर्गत बदल (९) गर्भवतीने योग्य आहार विहार न पाळल्याने आई व बालकामध्ये अस्थिक्षय होऊ शकतो.

अस्थिक्षय झाला असेल तर त्याच्यावरील मुख्य उपचार
>काही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करणे. उदा- लाक्षा, अस्थिशृंखला, अश्वगंधा, प्रवाळ शंख, गुग्गळ पोटातून घेणे. >काही सिद्ध केलेले तूप घेणे >तिक्तरस सिद्ध क्षरिबस्ती घेणे, गुग्गळतिक्त घृत अनुवासन बस्ति घेणे. >गर्भिणींनी मासानुमासिक आहार व औषधी परिचयांचे मार्गदर्शन घेणे. अशा तऱ्हेने आपण हा विषय नीट समजून घेऊन स्वत:च्या शरीराची काळजी घेणे. शरीराकडे नीट लक्ष देणे. नीट आहार-विहार सांभाळणे आवश्यक आहे. जेणेकरून जीवन सुखकारक, आनंदमयी व फायदेशीर ठरेल.