आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Film Making In Solapur By Ashwini Tadwalakar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सॉलिवूडची भरारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक कलाकृतीला त्या-त्या संस्कृतीचा, मातीचा अनोखा गंध असतो. मग ती कलाकृती हॉलीवूडची असो की बॉलीवूडची, ती तिथल्या संस्कृतीचा, भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचा ठाव घेणारी असते. असाच ठाव बहुभाषिक सोलापूरचे कलाक्षेत्र सध्या घेत आहे. स्थानिक विषयांना घेऊन एकेक पाऊल टाकत सॉलीवूडची सध्या उभारणी होत आहे.
कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, छायाचित्रण, संगीत, संकलन, कलावंत, कपडेपट, रंगभूषा, पोस्ट प्रॉडक्शन अशा सगळ्याच गोष्टी आता सॉलीवूडचे अवलिये स्वत:च्या बळावर तयार करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाने ‘सब कुछ हम ही’ या एका नव्या संकल्पनेला जन्म दिला आहे. चित्रपटनिर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, मुंबई-पुण्याच्या फे-या हे सगळे आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असल्यानेच कदाचित या मंडळींच्या मनात ही संकल्पना जन्माला आली असावी, महत्त्वाचे म्हणजे, याच सब कुछच्या भावनेमुळेच गेल्या दोन वर्षांत सॉलीवूडने अनेक कलावंत-दिग्दर्शक-लेखक-संगीतकार-गीतकार-गायक तयार केले आहेत.
अस्सल सोलापुरी टच असणा-या या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता सॉलीवूडचे दिग्दर्शक-निर्माते व कलावंत आता याकडे व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. चित्रपट तयार करणे, त्याची डीव्हीडी एखाद्या फ‍िल्म कंपनीला विकणे किंवा तयार केलेला चित्रपट जवळच्याच चित्रपटगृहात प्रदर्शित करणे, असे प्रयोग आता वाढले आहेत. त्यामध्ये यंदाच्या वर्षी पवन बनसोडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘दहावीची ऐशी की तैशी’, बाबुराव माने यांचा ‘भारतीयांनो एक होऊया चला’, सुनील भुमकर यांचा ‘पाऊले चालती तुळजापूरची वाट’, रॉकसन व्हटकर यांचा ‘घे झेप पाखरा रे’ (हा चित्रपट सध्या सोलापूरच्या प्रभात चित्रपटगृहात झळकला असून ११ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.) आदी चित्रपट सोलापूरसह महाराष्ट्राच्या काही निवडक शहरांत झळकले आहेत.
गेल्या दोन वर्षांत सॉलीवूडमध्ये किमान २० चित्रपटांची निर्मिती झाली आहे. येथे खर्च हा निर्मात्याच्या कुवतीनुसार होत असला, तरी उत्तम पैसा असलेल्या मंडळींचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा फारसा बरा नाही किंवा धडपडणा-या या कलावंतांना त्यांनी सढळ हाताने मदतही केलेली नाही, हे खुपणारे वास्तव आहे. अशा वेळी कधी मित्रमंडळी एकत्र येऊन एखादा चित्रपट २० लाखांत तयार करतात, तर एखादा चित्रपट दोन लाखांचाही असतो. एकूणच सॉलीवूडचे आर्थिक समीकरण म्हणावे इतके उत्तम नाही.
मात्र निर्मितीचा आनंद निर्मात्यापासून स्पॉट बॉयपर्यंतचे सगळेच जण मनमुरादपणे घेतात. तसे पाहता १९३१मध्ये सोलापुरात माळगे नावाच्या दिग्दर्शकाने स्वत:चे पैसे खर्च करून ‘दर्यावर्दी तांडेल’ हा चित्रपट तयार केला होता, अशी माहिती ज्येष्ठ कलावंत देतात. त्यानंतर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर असल्याने ‘सिद्धेश्वर माझा पाठीराखा’, ‘बालयोगी सिद्धरामा’, ‘योगी सिद्धरामा’, ‘महिमा प्रभाकर महाराजांची’, आदी धार्मिक चित्रपट दहा-पाच वर्षांच्या अंतराने तयार झाले होते. धार्मिक विषयांबरोबरच ग्रामीण व्यवस्थेवर भाष्य करणा-या ‘आमच्या गावात अन् बाराच्या भावात’ या निर्माता महादेव जाधव व दिग्दर्शक राहुल चौरे यांच्या चित्रपटाने सॉलीवूडला नवे वळण दिले होते.
देवआनंद दीक्षित निर्मित ‘कर्ज काळ्या मातीचे’, सुरेश संबाळ यांचा ‘नाथ अनाथ’, प्रफुल्ल मस्के यांचा ‘शक्ती विजय’, इरण्णा कचेरी यांचा ‘श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर’, बाबुराव माने यांचा देवदासी प्रथेवरचा ‘भोग’ चित्रपट, तसेच हैद्राबादी हिंदीचे रूप दाखवणारा ‘जिसको पटी उसकी’ हा हिंदी विनोदी चित्रपटही सॉलीवूडमध्ये तयार झाला. तर येत्या काळात ‘एम एच १३’ हा नदीजोड प्रकल्पावरील केवळ एकच व्यक्तिरेखा असलेला मूकपट निर्माण करण्याचे धाडस सुरेश संबाल हा युवा दिग्दर्शक करत आहे. राहुल चौरे, सुवर्णा कांबळे, जुनेद चांदा, आल्हाद अंदोरे, अमीर तडवळकर, संतोष कासे, आदी गुणी कलावंत हेसुद्धा सॉलीवूडचे प्रॉडक्ट आहेत. तर हरीश, दिनेश म्याना, सचिन जगताप, श्रीधर मादास ही मंडळी स्थानिक स्तरावर चित्रपटांचे संकलक म्हणून उदयास येऊ लागले आहेत. याचबरोबर पवन सरवदे, शाहिद हरकारे, सुरेश सांबाल, एजाज शेख ही मंडळी चित्रपटाच्या छायाचित्रण व्यवसायाकडे वळली आहेत.
मात्र वेशभूषाकार म्हणून ओमप्रकाश श्रावण हा एकमेव पर्याय सध्या सॉलीवूडमध्ये उपलब्ध आहे. सॉलीवूडच्या आर्थिक गणितात सध्या ‘लायटिंग’ हा महत्त्वाचा घटक बसत नसल्याने नैसर्गिक प्रकाश आणि दिवाबत्तीच्या स्रोतातच चित्रित होऊ शकतील, असेच प्रसंग बहुसंख्य वेळा समाविष्ट करण्याची खबरदारी दिग्दर्शक-लेखक घेत आहेत. सॉलीवूडच्या चित्रपटांचे विषय हे ग्रामीण जातव्यवस्था, सावकारी पाश, विनोदी अशा ढंगाचे असतात. हा सगळा उपद्व्याप आर्थिकदृष्ट्या फारसा फायदेशीर नसला तरीही कलावंत-निर्माता-दिग्दशर्क व त्यांच्याशी जोडलेले प्रेक्षक यांच्या भरवशावर सॉलीवूडचा डोलारा टिकून आहे.

दाहक वास्तवाचे प्रतिबिंब
मुंबई-पुण्याच्या पठडीतल्या विषयांच्या प्रेमात न पडता प्रादेशिक विषयांना, समस्यांना कथेतून फुलवण्याचा प्रयत्न सोलापूरचे चित्रपट करीत आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर सोलापूर वसले असल्याने, कर्नाटकातील काही विषयही येथील चित्रपटांमध्ये डोकावतात. कर्नाटकातील देवदासी प्रथेवरही ‘भोग’ या चित्रपटातून भाष्य केले गेले. देवदासी ही केवळ उपभोग घेण्यासाठी नसून ती शिकू शकते, विविध सामाजिक पातळ्यांवर काम करू शकते, अशा आशयाचा हा चित्रपट होता. ‘कर्ज काळ्या मातीचं’ या चित्रपटात कर्ज घेताना फसवणूक झालेला शेतकरी आत्महत्या न करता सावकाराचा गुन्हा गावासमोर आणतो, असा आशय आहे. सोलापुरातील शेतक-यांची परिस्थिती त्यातून दाखवली गेली होती. एकूणच सॉलीवूडच्या चित्रपटांमधून सोलापूरचा भवताल, भौगोलिकता, सामाजिक- सांस्कृतिक परिस्थिती दाखवून सोलापूरचे चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्नच येथील कलावंत करीत आहेत.

ashwini.t@dbcorp.in