आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंतुमय पदार्थांवर भर का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या आधुनिक काळामध्ये आम्ही भारतीय पाश्चिमात्त्य पद्धतीच्या आहाराचे अनुकरण करतो आहोत. आधुनिक वैद्यक प्रणालीसुद्धा आहाराकडे संकुचित दृष्टिकोनातून पाहते. आधुनिक पद्धतीने विचार केल्यास आहाराकडे पाहताना त्यातील उष्मांक, त्यातील स्निग्ध तत्त्वे, पोषक मूल्यांक, जीवनसत्त्वे अशा असंख्य पैलूंचा विचार करण्यात आला आहे. मात्र, हा आहार सेवन करणारी व्यक्ती, तिची पचनशक्ती, प्रकृती, अग्नी, तिची भूक, ती राहत असलेला प्रदेश, तिचे वय आणि त्या व्यक्तीची मानसिक अवस्था या बाबींचा विचार केलेला दिसून येत नाही.

साधारणपणे आहार हा विषय लोकांकडून फक्त वजन कमी करणे वा वाढवणे या अनुषंगानेच हाताळला जातो. भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये वेदकालापासून अलीकडील सोळाव्या ते सतराव्या शतकापर्यंत वैद्यक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आहाराला खूप महत्त्व दिलेले आहे. आयुर्वेदाने चुकीचा आहार हे अनारोग्याचे एक महत्त्वाचे कारण मानले आहे.

भारतीय आहाराकडे बघत असताना सध्याची प्रचिलत आहार पद्धती आणि आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येणारी आहारपद्धती यात खूप विरोधाभास जाणवतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास, खूप फळे, सूप्स, कच्च्या भाज्या खाणे, तंतुमय पदार्थांचे सेवन, अशा प्रकारच्या आहाराचा सल्ला या तज्ज्ञांकडून दिला जातो. मुळात भारतीय आहार हा प्रांतानुसार वेगळा आहे. देशातील विविध भागात आहाराबाबत विविधता दिसून येते. संबंधित ठिकाणच्या लोकांची जीवनशैली आणि वातावरण यावर ही विविधता अवलंबून आहे. त्याचप्रमाणे भारतीय आहार सरळ सोप्या प्रक्रियांचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे. तेच जर आपण आधुनिक आहाराकडे पाहिले तर त्या पदार्थांमध्ये तयार करतांना अत्यंत क्लिष्टता दिसून येते. पदार्थावर तो तयार करतानाच्या क्लिष्ट प्रक्रियामुळे त्या पदार्थामधील पोषकत्व कमी होत जाते. शिवाय अशा आहारामध्ये कालावधीही खूप लागत असल्याने अनावश्यक तत्त्वे तयार होत जातात. कमीत कमी प्रक्रिया केलेला आहार हा पचण्यास सुलभ असतो. त्याचा आरोग्यावरही चांगला परिणाम दिसून येतो. आपल्या आहारात तंतुमय पदार्थ असावेत असा एक प्रचार सध्या मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. त्यानुसार बरीच मंडळी आपल्या आहाराचे नियोजनही करताना दिसतात. वास्तविक पाहिल्यास भारतीय आहार हा असा एकमेव आहार आहे ज्यामध्ये एकदल आणि द्विदल धान्ये एकत्रित केलेली आहेत. ज्यामुळे आपल्याला मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ मिळत असतात. म्हणून भारतीयांना तंतुमय पदार्थ वेगळे असे खाण्याची आवश्यकता नाही. याच्या विरुद्ध पाश्चिमात्त्य देशात मांसाहाराचे प्रमाण अधिक असून तंतुमय पदार्थ अत्यल्प असतात, म्हणून अशा लोकांना तंतुमय पदार्थ वेगळे खाण्याची आवश्यकता असते. यावरूनच आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश असावा ही तिकडची संकल्पना आपल्याकडे जशीच्या तशी आली. सर्वसाधारणपणे वैद्यक क्षेत्रातील मंडळींचा असा समज आहे की, तंतुमय पदार्थांमधून काहीही पोषक तत्त्वे मिळत नाहीत त्यामुळे ते जास्त सेवन केल्यास विपरीत परिणाम होत नाही. तंतुमय पदार्थांचे पृथक्करण केल्यास, हे पदार्थ कर्बादकांपासून तयार झालेले असतात. हे पदार्थ द्राव्य आणि अद्राव्य अशा स्वरूपात असून जास्त उष्मांक मिळत नाहीत असाही एक समज आहे. आधुनिक संशोधनाद्वारे असे लक्षात आले आहे की चयापचयात्मक व्याधींमध्ये, आतड्यातील उपयुक्त जीवाणंूमध्ये आमूलाग्र बदल दिसून येतो. उपयुक्त जीवाणूंच्या समूहाच्या गुणधर्मांमध्ये बदल होत असल्याने, हे जीवाणू तंतुमय पदार्थांमधूनही उष्मांकांची निर्मिती करत असतात. परिणामी चयापचयात्मक व्याधींमध्ये वाढ होते. ही बाब अत्यंत महत्त्वाची असून आहारतज्ज्ञांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भारतीय आहारशास्त्रामध्ये अधिक तंतुमय पदार्थ खाण्याचा सल्ला दिलेला नाही हे विशेष. क्रमश: