आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्ग साहित्‍य संमेलनातील मंथन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध दिवंगत साहित्यिक गोपाळ नीळकंठ दांडेकर अर्थात ‘गोनीदा’ यांना अवघा महाराष्ट्र दुर्गप्रेमी म्हणून ओळखतो. महाराष्ट्रातील बहुतांश दुर्ग त्यांनी सर केले. त्यावर अप्रतिम साहित्यरचनाही केली. एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे, ‘हे दुर्ग म्हणजे डोंगर चढणे आहे, रान तुडवणे आहे. तिथे असतो भरार वारा. असते कळाकळा तापणारे ऊन. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असते जिद्दीला, पुरुषार्थाला! ध्यानात घ्या, तिथे आपले पराक्रमी पूर्वज काहीएक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला न् कित्येकदा पराभवही. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाचे स्मरण आहे या दुर्गभ्रमंतीचा उद्देश!’ गोनीदांच्या या विचारांनी प्रेरित होऊन ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची’ स्थापना करण्यात आली. या मंडळातर्फे निरनिराळे उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांपैकी एक भाग म्हणजे, ‘दुर्ग साहित्य संमेलन’ होय.

2009 मध्ये गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या दुर्ग साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दर दोन वर्षांनी विविध किल्ल्यांवर हे संमेलन भरवले जाते. 2009 मध्ये राजमाचीवर तर 2011 मध्ये कर्नाळा किल्ल्यावर तर 2013 मध्ये विजयदुर्गवर हे संमेलन घेण्यात आले. विशेष म्हणजे, हे तिन्ही किल्ले अनुक्रमे गिरिदुर्ग, भुईकोट व जलदुर्ग या प्रकारात मोडतात. त्यातील विजयदुर्ग हा जलदुर्ग होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे केंद्र असणारा हा किल्ला. 11व्या शतकाच्या शेवटी शिलाहार घराण्यातील मोन राजाने या किल्ल्याची बांधणी केली होती. शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये हा किल्ला जिंकला. या किल्ल्याने इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि जंजिºयाच्या सिद्दींचा पराभव पाहिला. याच किल्ल्यावर यंदा 25 ते 27 जानेवारी 2013 दरम्यान तिसरे दुर्ग साहित्य संमेलन भरवले गेले.

भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अ‍ॅडमिरल मनोहर आवटी हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राघोजी आंग्रे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. साहित्याद्वारे दुर्गांची ओळख सामान्य जनांना व्हावी, हा या संमेलनामागील मुख्य उद्देश होता. महाराष्ट्रात साहित्यप्रेमींची तशी कमतरता नाही, पण दुर्ग साहित्यप्रेमी किती आहेत? या प्रश्नाचे उत्तर शोधणे मात्र महत्त्वाचे ठरते. त्याकरिता अशी संमेलने नेहमीच उपयोगी ठरत असतात.
दुर्ग साहित्य संमेलनात बोलताना अ‍ॅडमिरल मनोहर आवटी म्हणाले की सर्वसाधारणपणे भारतीयांना इतिहासात रुची नाही. ते इतिहासातून काही शिकत नाहीत. दुर्दैवाने आपले राजकारणीही इतिहासापासून चार हात लांब राहिले आहेत. त्यामुळे परराष्ट्र धोरणात व विशेषत: पाकिस्तानच्या बाबतीत आपण कायम फसलो आहोत. अ‍ॅडमिरल आवटींची भावना ही खरे तर अनेक दुर्गप्रेमींची भावना होती. अर्थात, इतिहास हा शिकण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी असतो. इतिहास व भूगोल हे शास्त्राचे एकसमान अंग आहे, हे फक्त दुर्गप्रेमीच ओळखू शकतात. इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय एखाद्याला भूगोल कळत नाही आणि भूगोल समजावून घेतल्याशिवाय इतिहासाचे सर्वंकष भान येत नाही, हे सांगून परदेशी नागरिक व भारतीय यांच्यातील फरकावरही अ‍ॅडमिरल आवटींनी या प्रसंगी अचूक बोट ठेवले. परदेशात प्रत्येक मुलाला त्यांच्या इतिहासाबद्दल साद्यंत माहिती असते. मग ते पहिले महायुद्ध असो वा एखादी ऐतिहासिक वास्तू असो. इथे असणारे दुर्ग परदेशात असले असते तर पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा कायापालट झाला असता. पण, इथे या वारशाकडे आपले लक्ष नाही, अशी खंतही आवटी यांनी या प्रसंगी बोलून दाखवली.

सार्वजनिक पातळीवर दुर्ग संवर्धनाबाबत अनास्थेचे दर्शन घडत असले तरीही महाराष्ट्रातील अनेक दुर्गप्रेमी संस्था अडीअडचणींवर मात करत दुर्गसंवर्धनासाठी (दुर्गवीर प्रतिष्ठान तसेच शिवदुर्ग संवर्धन यासारख्या संस्था यास ‘शिवकार्य’असे संबोधतात.) आजही तळमळीने कार्य करत असल्याचे संमेलनाच्या निमित्ताने दिसून आले. संमेलनात पुरातत्त्व खात्यातर्फे किल्ले व लेण्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले गेले. पुरातत्त्व खात्याचे हे कार्य उल्लेखनीय खरे, परंतु अशा चित्र व माहिती प्रदर्शनाची खरी गरज शहरी भागात आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची ही ऐतिहासिक संपत्ती शहरी इतिहासप्रेमींना निदान छायाचित्रांतून तरी न्याहाळता येईल, असा सूरही या वेळी उपस्थितांत उमटला. एरवी, अनेक किल्ल्यांवर व पुरातन वास्तूंच्या परिसरात केवळ पुरातत्त्व खात्याचे फलक दिसून येतात. त्यांनी संवर्धनासाठी नक्की कोणते कार्य केले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. अशा वेळी पुरातत्त्व खात्याच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व कैकपटीने वाढलेले असते. असो. पुरातत्त्व खात्याबरोबरच गोवा राज्यातील 47 किल्ल्यांचे प्रदर्शन व कोकणातील गड व पर्यटनाचे चित्रदर्शनही संमेलनात उल्लेखनीय ठरले.


समस्त शिवप्रेमी शिवरायांना दैवत व महाराष्ट्रातील दुर्गांना आपली मंदिरे मानतो. या दुर्गमंदिरांच्या माहितीचा साठा असलेले दुर्ग साहित्य सुरुवातीला मुख्यत: पारशी व इंग्रजी भाषेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. 1860मध्ये ‘गव्हर्नमेंट लिस्ट आॅफ सिव्हिल फोटर््स’ या इंग्रजी पुस्तकात सर्वप्रथम देशातील किल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाली. यात दिलेल्या 485 किल्ल्यांपैकी 289 किल्ले हे एकट्या महाराष्ट्रात होते. तोवर मराठीत किल्ल्यांवर फारशी पुस्तके लिहिली गेली नाहीत.

मात्र, विसाव्या शतकाच्या प्रारंभी चिंतामण गोगटे यांनी प्रथमच ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ हे पुस्तक लिहिले. त्या वेळी दोन भागांत हे पुस्तक प्रकाशित झाले होते. नंतरच्या काळात य. न. केळकर यांचे ‘चित्रमय शिवाजी’, कृ. वा. पुरंदरे यांचे ‘किल्ले पुरंदर’, शि. म. परांजपे यांचे ‘मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास’, ग. ह. खरे यांचे ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आणि दुर्गसाहित्य तसेच पर्यटनास टप्प्याटप्प्याने चालना मिळत गेली. आज मराठी मातीला दुर्गसाहित्याच्या माध्यमातून गड-किल्ल्यांचा इतिहास नव्याने सांगावा लागत असला, तरीही या प्रेरणादायी इतिहासाचा प्रचार आणि प्रसार दुर्ग साहित्य संमेलनातून होणे, ही निश्चितच सुखावह बाब आहे.