आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Freedom Of Expression And Press By Gajoo Tayade

कार्टुनिष्‍ठाचं मरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यंगचित्रकारानं व्यंगचित्र काढून संपवलं तेव्हां रात्रीचे दहा वाजले होते. गेल्या अर्ध्या तासात उपसंपादकाचे तीन फोन येऊन गेले. पान अडलंय, म्हणून तो वैतागला होता. व्यंगचित्रकारही सलग चार-पाच तास बसून आखडला होता. आता चित्र स्कॅन करणं, मेल करणं वगैरेचा त्याला कंटाळा आला होता. एवढ्यात डोळ्यांत झोप दाटलेली त्याची बायको किचनमधून बेडरूममध्ये जायला निघाली.
‘हे एवढं कार्टून स्कॅन करून मेल करतेस का? मी जरा पाय मोकळे करून येतो.’ व्यंगचित्रकार म्हणाला. पेंगुळलेली बायको कॉम्प्युटरशी बसली. व्यंगचित्रकारानं दरवाजा उघडला तसा वा-याचा एक झोत घरात शिरला आणि टेबलवर ठेवलेलं व्यंगचित्र उडून कोप-यात जाऊन पडलं.
बायकोचं तिकडे लक्ष नव्हतं. तिला काम संपवून पटकन् झोपायचं होतं. भल्या पहाटे उठून मुलांचे डबे भरायचे असतात तिला. तिनं हात लांबवला आणि टेबलवरच्या चळतीतला सर्वात वरचा कागद स्कॅन करून लगेच मेल केला आणि ती बेडरूममध्ये गेली.
‘कार्टून आलंय्...’ पेज-मेकप आर्टिस्ट ओरडून उपसंपादकाला म्हणाला.
‘अरे मग टाक पेजवर आणि पॅक-अप कर!’
‘पण काय काढलंय् ते काहीच कळत नाही, बघाच तुम्ही. शिवाय कॅप्शन पण नाही...’
‘अरे, ‘कॅप्शनलेस् कार्टून’ म्हणतात त्याला. आणि त्याची कार्टून्स भल्याभल्यांना कळत नाहीत. मला बघून काय करायचंय्? पटकन् सोड प्रिंटिंगला!’
‘ठीक! मला काय?’ आर्टिस्टनं खांदे उडवले.
दुस-या दिवशी पेपर बाहेर येताच त्या व्यंगचित्रावरून एकच गोंधळ उडाला. संपादकांना निषेधाचे फोनवर फोन येऊ लागले. जो तो व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचं सांगत होता. संपादक सहसा व्यंगचित्राकडे लक्ष देत नसत, पण आता त्यांनी मुद्दाम ते निरखून पाहिलं आणि घरी झोपलेल्या उपसंपादकाला ऑफिसात बोलावून घेतलं.
‘हे काय आहे? तुम्हाला कळतंय का काही?’ व्यंगचित्राचं पान नाचवत संपादकांनी उपसंपादकाला विचारलं. व्यंगचित्रात फक्त काही फटकारे, शिंतोडे आणि डाग दिसत होते. उपसंपादक बुचकळ्यात पडला.
‘हे... हे... काही तरी अमूर्त असणार... अॅब्स्ट्रॅक्ट!’ उपसंपादक.
‘अॅब्स्ट्रॅक्ट?!! लोकांचे फोन येताहेत. प्रचंड भडकलेत लोक! धार्मिक भावना दुखावल्यात म्हणे त्यांच्या.’
‘क-कोणत्या धर्माचे लोक?’
‘कोणत्या काय? सगळ्याच धर्मांचे! ‘सनातनी समागम’, ‘मंझिल-ए-दीन’, ‘पंचशील संघटना’, ‘डेरा अच्छा सौदा’, ‘प्रभूचे वचन’ सगळे ओरडताहेत. आमच्या धर्मातल्या थोर विभूतींचं असं विकृतीकरण खपवून घेणार नाही, म्हणताहेत. सोशल मीडियावरही व्हायरल झालंय हे व्यंगचित्र!’
डोळे ताणताणून आणि डोकं खाजखाजवूनही उपसंपादकाला त्या चित्रात कोणतीच थोर विभूती दिसेना. एकदा त्याला चित्रात शेपूची भाजी, दुस-यांदा आजारी लांडोर आणि तिस-यांदा फाटका पायजमा दिसला, पण विभूतीचा पत्ताच नाही! शेवटी तातडीनं व्यंगचित्रकाराला बोलावण्यात आलं.
चित्र पाहताच व्यंगचित्रकार तीन ताड् उडाला.
‘हे... हे व्यंगचित्र आहे?’ तो म्हणाला.
‘तुम्हीच सांगा काय आहे ते!’
संपादक वैतागले.
‘पण मी...! हां, आलं लक्षात. मी चित्र काढण्याआधी ब्रशची एका कागदावर ट्रायल घेत असतो. तोच बरबटलेला कागद काल बायकोनं स्कॅन करून पाठवलेला दिसतोय्.’
‘पण आता ही भानगड निस्तरायची कशी? असू देत. उद्याच्या अंकात खुलासा आणि माफीनामा छापून टाकूया. यापुढे काळजी घेत चला. या आता.’ संपादक तसे समजूतदार होते.
व्यंगचित्रकार घरी आला आणि समोरचं दृश्य पाहून पुरता हबकला. घराला उद्ध्वस्त रणभूमीची कळा आली होती. त्याच्या ड्रॉइंग टेबलच्या चिरफळ्या उडाल्या होत्या. कॉम्प्युटरचे भाग मोडक्या अवस्थेत विखरून पडले होते. व्यंगचित्रांच्या कागदांचे फाडून टाकलेले कपटे इतस्ततः तरंगत होते. अगदी ब्रशेस, पेन्सिलींचे पण तुकडे-तुकडे करून टाकण्यात आले होते. काही पोलिस हातात मोजण्याची टेप घेऊन कसलीशी मापं घेत होते. मुसमुसत बसलेल्या बायकोला एक पोलिस अधिकारी प्रश्न विचारीत वहीत नोंदी घेत होता. किचनमध्ये शेजारच्या काळे काकू भेदरून गेलेल्या मुलांना पोटाशी घेऊन त्यांना समजावत बसल्या होत्या.
पोलिस निघून गेल्यावर त्याला सगळी हकीगत कळली. दुपारच्या सुमारास दहा-बारा धटिंगण हॉकी स्टिक्स, चॉपर्स वगैरे घेऊन घरात घुसले. त्यांनी चेह-यांवर फडकी बांधली होती. आत येताच त्यांनी व्यंगचित्रकाराच्या नावानं शिवीगाळ करीत तोडफोड सुरू केली. बायको प्रचंड घाबरली. मुलांना घेऊन शेजारच्या घरात पळाली. काही मिनिटांतच यथेच्छ धुडगूस घालून ते टोळकं पसार झालं.
‘नशीब तुम्ही घरी नव्हता, नाही तर त्यांनी ठारदेखील केलं असतं तुम्हाला.’ रात्री बायको म्हणाली. व्यंगचित्रकार अंतर्यामी हादरून गेला होता. ब्रशेस आणि पेन्सिलींचे तुकडे झालेले पाहिल्यानंतर ‘कोणत्याही शस्त्राहून कुंचला अधिक धारदार असतो’ वगैरेछाप उक्तींवरचा त्याचा विश्वास पुरता उडून गेला होता.
‘ठारच केलंय त्यांनी मला! मी आजपासून व्यंगचित्रकार म्हणून मेलोय्!!’ तो उद्विग्नपणे बोलला.
‘आणि मग दुसरं काय करणार आता या वयात?’ व्यंगचित्रं काढणं सोडलं तर आपल्या नव-याला दुसरं काहीही करण्याची अक्कल नाही, याची तिला पुरती खात्री होती.
‘बघू. वडापावाची गाडी लावीन, नाही तर पानाची टपरी टाकीन. पण हा व्यंगचित्रकाराचा धंदा नकोच!’
व्यंगचित्रकारानं पानाची टपरी टाकून आता बरेच दिवस झाले होते. चौकातच एका इमारतीच्या कंपाउंड-वॉलला लागून मोक्याची जागा मिळाली होती. व्यंगचित्रं काढून मिळायचे त्यापेक्षा किती तरी जास्त पैसे या धंद्यात मिळत होते. लोकांना त्यानं लावलेलं पान आवडायचं. पान खाऊन तृप्त झालेले लोक बाजूच्याच भिंतीवर लालभडक प्रसन्न पिंका मारीत असत. एक दिवस चार-पाच शाळकरी पोरं रस्त्यानं जाता-जाता टपरीसमोर थबकली आणि लालभडक पिंकांनी रंगलेल्या भिंतीला निरखून पाहू लागली.
‘ए विल्या, तो हत्ती बघ हत्ती!’ त्या बरबटलेल्या भिंतीवरच्या पिंकांमध्ये एका पोराला हत्ती दिसू लागला.
‘श्या:! हत्ती नाई काई, गुलाबाचं फूल आहे ते!’ दुस-याचा वेगळाच दृष्टिकोन होता. ‘मला तर कॉलीफ्लॉवर दिसतोय्!’ तिसरा.
हळूहळू त्यांच्या खेळात मोठी माणसं पण सामील झाली. प्रत्येकाला भिंतीवर निराळंच चित्र दिसू लागलं. त्यांचं बोलणं ऐकता-ऐकता पानवाला उर्फ माजी व्यंगचित्रकार चरकला. लोकांची कल्पनाशक्ती कोणतं वळण घेईल कुणी सांगावं? त्याला आपलं ‘ते’ कुप्रसिद्ध व्यंगचित्र आठवून घाम फुटला. कशीबशी त्यानं टपरी बंद केली आणि तो तिथून धूम पळाला.
सध्या व्यंगचित्रकार एखाद्या निरुपद्रवी धंद्याच्या शोधात आहे.

gajootayde@gmail.com