आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिव्यक्तिला आम्ही भुकेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्थ्रोपोलॉजी, अल्टरनेटिव्ह मीडिया, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज, सोशल कॅम्पेन असे भारदस्त शब्द गुजरातच्या छारा समाजाची मुलं जेव्हा सर्रास उच्चारतात, तेव्हा भलतंच अप्रूप वाटायला लागतं. ज्या छारा समाजाची जेमतेम पहिली पिढी आता डिग्री घेऊन बाहेर पडली आहे, ज्या छारा समाजाला आता कुठे समाजाने अंशत: का होईना स्वीकारायला सुरुवात केली आहे, जो छारा समाज आता कुठे चो-यामा-या आणि दारू गाळण्याचा बेकायदेशीर धंदा सोडून मुख्य प्रवाहात सामील होऊ पाहतोय, आणि जो छारा समाज ज्याच्यावर जन्मजात गुन्हेगार असण्याचा ब्रिटिशांच्या काळातील शिक्का अद्याप पूर्णपणे पुसला गेलेला नाहीये, तो छारा समाज सन्मानाने जगण्यासाठी ज्या पद्धतीने आपली वाटचाल करीत आहे, ते पाहून महाराष्ट्रातला भटके विमुक्त समाज अद्याप आहे तिथेच आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाल्याशिवाय राहात नाही.
बंजारा, कोरवो (कैकाडी), ताकारी-भामटा, राजपूत-भामटा, कंजारभाट, बेरड (रामोशी), गारुडी, फासेपारधी, छप्परबंद, काटबु, वडार या जमातींना ब्रिटिशांनी कायद्याने गुन्हेगार ठरवले होते. त्यात नंतर आणखी काही जातींची भर पडली. एकंदरीत महाराष्ट्रात भटक्या विमुक्तांच्या ४२ जमाती आणि त्याच्याही सुमारे साडेतीनशे पोटजाती… महाराष्ट्राला फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामित्वाचा वारसा… महाराष्ट्र हे इतर राज्यांच्या तुलनेतले सर्वाधिक विकसनशील राज्य… मात्र तरीही महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांची स्थिती ही जैसे थे अशीच… गुजरातच्या छारा समाजाची मुलं परदेशवा-या करून आले असताना आपल्याकडच्या या शोषित आणि वंचित भटक्या विमुक्त समाजातल्या अनेकांनी आजपर्यंत तहसिलदार कचेरीची पायरीदेखील ओलांडलेली नाही. आपल्याकडे भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर लढणा-या असंख्य संस्था आणि संघटना आहेत, अनेक नेते आणि पुढारी आहेत, साहित्यिक आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांचे प्रमाण जरी फार नसले तरी दुर्लक्षित करण्याइतके मात्र नक्कीच नाही. परंतु तरीही महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून रेशनकार्ड, मतदार यादी, निवास योजना, राजकीय उपेक्षा, आरक्षण, जात पंचायत, रेणके आयोग याच मुद्द्यांभोवती घुटमळत आहेत. गुजरातच्या छारांनादेखील या समस्यांनी ग्रासलेलं आहे, मात्र तरीही हा समाज त्यात अडकून न बसता वेगळा विचार करू लागला. आपल्याकडे यमगरवाडीचा प्रकल्प वगळता असा वेगळा विचार करताना कोणीच दिसत नाहीये.
‘दिवार’ चित्रपटात छोट्या विजयच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ असे लिहिले जाते आणि तो सल आयुष्यभर लक्षात ठेवून विजय अनेक बेकायदेशीर धंदे करतो. छारानगरमध्ये हे चित्र जरा वेगळ्या पद्धतीने साकार होत आहे. पोटाची आग विझवण्यासाठी समाजाने दुसरा कोणताही पयार्य शिल्लक न ठेवल्याने चोरी करणे हा छारानगरचा पिढ्यान‌्पिढ्या धंदा बनला आहे. इथल्या प्रत्येक मुलांना हे माहितीये की, ‘मेरा बाप चोर है’ परंतु तरीही ते ‘दिवार’च्या विजयप्रमाणे बेकायदेशीर धंद्याकडे वळले नाहीत.
‘छारा’ असल्यामुळे पोलिस आजही आपल्याला गुन्हेगारच समजतात आणि न केलेल्या गुन्ह्यांसाठी अमानुष मारहाण करत तुरुंगात अडकवतात… ‘छारा’ असल्यामुळे पांढरपेशा समाज आपल्यापासून चार हात लांब राहतो… ‘छारा’ असल्यामुळे आपल्याला कोणी नोकरी देत नाही… ‘छारा’ असल्याचे कळल्यावर सोसायटीचे इतर रहिवासी घरातून सामान बाहेर फेकून देतात… ‘छारा’ असल्याचे कळल्यावर कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही… अशा अनेक भेदक वास्तवाला छारानगरची नवीन पिढी सामोरी जात होती. वास्तविक दिसायला देखणे, हातात डिग्री, संगीत आणि नृत्यामध्ये प्रावीण्य, उत्तम सामाजिक भान अशा सर्व आवश्यक असणा-या गोष्टी असताना छारानगरच्या या सुशिक्षित पिढीला आपल्या नावामागील ‘छारा’चा उल्लेख लपवणे सहज शक्य झाले असते.
ब्रिटिशांनी जवळपास ८० वर्षांपर्यंत छारा समाजाला गुजरातमधील अहमदाबाद येथे सेटलमेंटच्या नावाखाली डांबून ठेवले असले तरी समाजसुधारणांचा कार्यक्रम मात्र ते या सेटलमेंटमध्ये चांगल्या पद्धतीने राबवत असत. म्हणूनच की काय, छारानगरमध्ये शिक्षणाचे प्रमाण तसे ब-यापैकी चांगले होते. परंतु डिग्री मिळवूनही नोकरी लागत नसल्यामुळे छारानगरमधील अनेक सुशिक्षित तरुण वकिलीच्या व्यवसायाकडे वळले. एकट्या छारानगरमध्ये किमान दीडशेपेक्षा जास्त वकील आहेत. पात्रता असूनही जातीमुळे डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलिस, अधिकारी होणे शक्य नसल्याने अनेक जण वकिलीच्या व्यवसायात शिरले आहेत. असेही प्रत्येकाच्या घरातला किमान एक सदस्य तरी तुरुंगात असल्यामुळे त्यांची बाजू लढण्यासाठी वकिलाची गरज लागणे हे आवश्यकच होते म्हणा!
बापजाद्यांचा हातभट्टीची दारू गाळण्याचा धंदा कोणत्याही परिस्थितीत करायचा नाही, हा निर्धार आणि चोरी करण्याच्या पिढीजात व्यवसायाला यापुढे कायमची सोडचिठ्ठी यामुळे प्रत्येकाच्या घरची स्थिती ही हलाखीची, दोन वेळच्या अन्नासाठी मोताद… अशा परिस्थितीत फक्त ‘छारा’ हे नाव लपवले असते तर परिस्थितीत नक्कीच सुधारणा झाली असती आणि तसे करण्याचा सल्लाही त्यांना अनेकांनी दिला होता.
मात्र, ‘बुधन थिएटर’ त्यांना तसे करण्यावाचून परावृत्त करत होते. बुधन थिएटरमुळे छारांना एक नवी ओळख मिळाली होती, जगण्याची नवी दिशा सापडली होती. छारानगरचे कलाकार सादर करीत असलेल्या नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत होता. याच ‘बुधन थिएटर’मुळे मग त्यांनी ठरवले की, ज्या ‘छारा’ला बदनाम म्हणून हिणवले जाते; त्याच ‘छारा’ला समाजाकडून सन्मान मिळवून द्यायचा. १९९८मध्ये छारानगरने उचललेला हा प्रयोग आज १५ वर्षांनंतर इतका यशस्वी ठरला आहे की, गुन्हेगार म्हणून ओळखल्या जाणा-या छारानगरच्या कलावंतांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात आहे. त्यांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कधी मोर्चा काढला नाही… शासन त्यांच्या समस्यांवर गंभीर नाही म्हणून त्यांनी सरकारविरुद्ध सतत गळा काढला नाही… अर्ज, निवेदन अशा पत्रकबाजीमध्ये ते फारसे अडकून पडले नाहीत… राजकीय पक्षांच्या दावणीला त्यांनी कधी स्वत:ला बांधले नाही…
बुधन थिएटरमुळे त्यांना अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळाले होते. पथनाट्य ही त्याची सुरुवात होती. पोलिसांच्या अन्यायाविरुद्ध, भटक्या विमुक्तांच्या वेगवेगळ्या समस्यांविरुद्धची त्यांची पथनाट्य चळवळ जोर धरू लागली आणि मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाजासमोर येण्याचा सपाटाच लावला. नाट्यचळवळ, बुधन स्कूल ऑफ थिएटर आर्ट‌्स अँड जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज, प्रसारमाध्यमे, वृत्तवाहिन्या, माहितीपट, वेबसाइट, ब्लॉग्ज, फेसबुक पेज, यूट्यूब, आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सेमिनार… छारानगरच्या बुधन थिएटरचा आलेख वाढतच होता. इथल्या व्यवस्थेशी लढण्यासाठी अशा अहिंसात्मक परंतु परिणामकारक आयुधांचा वापर करण्याचे बुधन थिएटरने ठरवले
...एका मुलाला दोन्ही हात वर करून बाकावर उभे केलेले असते. तो गोंडस मुलगा म्हणतो, मॅम, मी पेन्सिलबॉक्स चोरलेला नाही, मग मला का शिक्षा करता? मी तर खेळायला मैदानात गेलो होतो. खेळताना चिंचा खाल्ल्या, म्हणून पीटीच्या सरांनी मला मारलंदेखील. मॅम, इतर मुलांची पण बॅग चेक करा ना…
मॅमचा आवाज… इतर मुलांमध्ये कोणी ‘छारा’ नाहीये ना!
स्क्रीनवर अक्षरे टाईप होतात. ‘कॅच द थिफ… नॉट द कम्युनिटी.’
{{{{{{
… चहाच्या टपरीवरचा एक पोरगा म्हणतो, तुम्ही अगदी माझ्या आजीसारख्या दिसता… तुम्ही माझ्याशी रोज गप्पा मारता. माझ्या हातचा चहा पिता. आज तुम्ही मला माझे नाव विचारले. पण मी ‘छारा’ असल्याचे सांगितल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलणे का बरं बंद केले…
स्क्रीनवर अक्षरे टाईप होतात… समानता तुमच्यापासून
सुरू करा.
काळजाला भिडणा-या अवघ्या ६० सेकंदांच्या अशा प्रकारच्या जाहिराती यूट्यूबवर टाकून बुधन थिएटरने अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतले आहे. बुधन बोलता है, मुझे मत मारो साब, पिन्या हरी काले की मौत, मजहब हमे सिखाता आपस में बैर रखना अशा वास्तववादी शीर्षकांचा वापर करून पथनाट्यांची व्यापक मोहीम ते सबंध भारतात राबवत आहेत. छारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर माहितीपट तयार करून विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांत ते आपली छाप पाडत आहेत.
दक्षिण बजरंगे, रॉक्सी गागडेकरआणि त्याची पत्नी कल्पना गागडेकर हे या सांस्कृतिक चळवळीचे ख-या अर्थाने नायक. छारानगरमधील या बदलत्या प्रवाहाला दोघांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवले. यासाठी त्यांना साथ मिळाली ती डॉ. गणेश देवी यांच्यासारख्या ख्यातनाम विचारवंताची. गणेश देवी हे बुधन थिएटरचे सच्चे मार्गदर्शक बनले. त्यांच्या बोलीभाषा केंद्राच्या राष्ट्रीय अधिवेशनात जगभरातले विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते हजेरी लावतात. अशा दिग्गजांसमोर गणेश देवींनी बुधन थिएटरला पुढे केले. परिणामत: आज बुधन थिएटरशी भारतातलेच नव्हे, तर जगभरातले नावाजलेले लेखक, सामाजिक कार्यकर्ते, चित्रपट दिग्दर्शक, छायाचित्रकार, पत्रकार, अभिनेते, विचारवंत, प्राध्यापक जोडले गेले आहेत.
रॉक्सी हा सध्या दोन वर्षांसाठी अमेरिकेला रवाना झालाय. पत्रकारितेमध्ये आपली छाप पाडल्यानंतर ‘इमर्जिंग मीडिया’ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी त्याला अमेरिकेने निमंत्रित केले आहे. छारानगर ते अमेरिका व्हाया बुधन थिएटर हा रॉक्सीचा प्रवास थक्क करणारा असला तरी त्यासाठी त्याला प्रचंड खस्ता खायला लागल्या आहेत. बुधन थिएटरमध्ये अभिनय करता करता रॉक्सीने पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. काही दिवस हैदराबादमध्ये ई-टीव्हीत नोकरी केली आणि मग अहमदाबादमध्येच गुजरात समाचार या वर्तमानपत्रात त्याला क्राइम रिपोर्टरची नोकरी मिळाली. जोपर्यंत पोलिसांना रॉक्सीची जात माहीत नसायची, तोपर्यंत पोलिस त्याला मदत करायचे; परंतु एकदा का जात माहीत झाली की पोलिस रॉक्सीला चार हात लांबच ठेवत. एका इंग्रजी वर्तमानपत्रात केवळ छारा असल्याचे कळल्यानंतर मुलाखतीच्या अंतिम टप्प्यात रॉक्सीला नोकरी देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले होते. रॉक्सीची पत्नी कल्पना गागडेकर अतिशय उत्तम अभिनेत्री. बुधन सबरच्या पत्नीची म्हणजे श्यामली सबरची भूमिका साकारताना ती प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणते. कल्पनाची सासू तिला वेगवेगळ्या लग्नसमारंभात घेऊन जायची, कारण कल्पना नृत्यात तरबेज होती. लग्नसमारंभात नाचले की शे-पाचशे रुपये मिळायचे. बुधन थिएटरमध्ये कल्पना दाखल झाली, तेव्हा सासूने बराच आरडाओरडा केला; परंतु रॉक्सी कल्पनाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला.
छारानगर ही काही हजारांच्या संख्येने असलेली वस्ती आणि त्यात बुधन थिएटरशी जोडले गेलेल्यांची संख्या त्या तुलनेत अगदीच तुरळक. मात्र तरीही बुधन थिएटरने सबंध छारा समाजाकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडले आहे. आज बुधन थिएटरशी जोडले जावे, यासाठी छारानगरातील प्रत्येक मुलगा हा प्रसंगी घरच्यांशी भांडण करून या सांस्कृतिक चळवळीत सहभागी होण्याचा प्रयत्न करतोय. या नाटकामुळे त्यांना टिकून राहण्याची, उभे राहण्याची, संघर्ष करण्याची प्रेरणा मिळतेय. दक्षिण बजरंगेचे एक वाक्य या निमित्ताने नेहमी लक्षात राहते. तो म्हणतो की, छारानगरमधून चोरी आणि दारू हे शब्द आम्हाला कायमचे हद्दपार करायचे आहेत. या शब्दांचे अर्थ काय, हेच आमच्या मुलांना कळता कामा नयेत. आम्ही अभिव्यक्त होण्याचे भुकेलो आहोत. बस्स, बाकी काही नाही! shivaprash@gmail.com