आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिरड्यांचे रोग म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरड्यांचे विकार गंभीर अशा हार्ट अ‍ॅटॅक, पक्षाघात अशा रोगांचे कारण

डॉक्टर, मी ब्रश वापरला की हिरड्यांतून रक्त येते. त्यामुळे मी ब्रश वापरायचे सोडून दिले आहे, असे सांगणारे अनेक रुग्ण मला रोज भेटत असतात. पण त्यांना हे माहीत नसते की, आपल्या हिरड्या रोगग्रस्त झाल्या आहेत. बोटाने दात घासून आपण हिरड्यांचे विकार कमी न करता उलट वाढवत आहोत. कारण दातांची स्वच्छता ब्रशच व्यवस्थित करू शकतो. भारतात सुमारे 70 ते 80 टक्के लोक हिरड्यांच्या विकाराने कमीअधिक प्रमाणात ग्रस्त आहेत. तथापि, आता सर्वसामान्य नागरिकांना फारसे गांभीर्य नसलेले हिरड्यांचे विकार गंभीर अशा हार्ट अ‍ॅटॅक, पक्षाघात अशा रोगांचे कारण असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे.

अमेरिकेत 55 वर्षे वयापुढील निम्म्या व्यक्ती हिरड्यांच्या विकारांनी ग्रस्त
अलीकडेच अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरने 55 व त्यावरील वयाच्या 600 प्रौढांचे मुखाचे आरोग्य तपासले व काही निष्कर्ष काढले. अमेरिकेत 55 वर्षे वयापुढील निम्म्या व्यक्ती हिरड्यांच्या विकारांनी ग्रस्त असल्याचे अमेरिकन अकॅडमी ऑफ पेरिओडोन्टॉलॉजी (हिरडी रोगतज्ज्ञांची अमेरिकन संघटना)चे ठाम मत आहे. या मेडिकल सेंटरमधील डॉ. मॉइस यांच्या मते, काही विशिष्ट जिवाणू हिरड्यांचे विकार निर्माण करतात व तेच जिवाणू मानेतून मेंदूकडे जाणा-या (कॅरोटिड) रक्तवाहिन्यांचे काठिण्य निर्माण करण्यास कारणीभूत असतात. त्यांच्या मते, धूम्रपानासह उच्च रक्तदाब, मधुमेह, रोगट हिरड्यासुद्धा हृदयविकारास आमंत्रण देतात व हे एक महत्त्वाचे आणि दुर्लक्षित असे कारण आहे.

हे कसे होते, याबद्दल दोन विचारप्रवाह आहेत. पहिला असा की, रोगट हिरड्या असणा-या रुग्णांच्या रक्तात विशिष्ट जिवाणू जास्त प्रमाणात वाढीस लागतात. हे जिवाणू रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस जमा होणा-या चरबीला चिकटू लागतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांत गाठ निर्माण होऊन रक्तपुरवठ्यात अवरोध निर्माण होतो. परिणामी हृदयविकाराचा झटका येतो किंवा पक्षाघात (पॅरालिसिस) होतो.

दुसरा मतप्रवाह असा की, ब-याचदा हिरड्यांतून रक्त वा पू निघत आहे हे कित्येक रुग्णांना माहीतदेखील नसते. तसेच बरेच लोक माहिती असूनही दुर्लक्ष करतात. या सतत दीर्घकाळ रेंगाळणा-या जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे शरीरातील प्रतिकार यंत्रणा जास्त कार्यान्वित होते. त्यामुळे सीआरपी नावाचे प्रोटीन रक्तात जास्त प्रमाणात वाढू लागते. डॉ. मॉइस यांच्या मते, हे प्रोटीन हृदयविकार व पक्षाघातास कारणीभूत ठरते.

दात व हिरड्यांच्या अनारोग्यामुळे शरीरातील विविध अवयवांचे रोग विशेषत: सबअ‍ॅक्यूट बॅक्टेरिअल एंडोकाडॉयटीजसारखा हृदयरोग होऊ शकतो. हे ब-याच वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रालाही मान्य आहे. परंतु या नवीन संशोधनाचे वैशिष्ट्य असे की, प्रथमच असे काही जिवाणू सापडले आहेत की, जे हृदयविकार आधी की हिरड्यांचे रोग आधी? हा प्रश्न म्हणजे कोंबडी आधी की अंडे, असे तूर्तास शास्त्रज्ञांना वाटत आहे. तथापि, दंत व मुखाच्या आरोग्याबद्दल दुर्लक्ष, अज्ञान हे हृदयविकार वा पक्षाघाताचे कारण बनता कामा नये, एवढे लक्षात घेतले तरी खूप झाले.