आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Havells India And Kimatrai Gupta By Sudhir Joglekar

'हॅवेल'चा 'हवेलीराम'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतमजुराच्याघरी जन्माला आलेला, शिकण्यापेक्षा जगण्याचंच आव्हान मोठं असल्यानं सायकलवरून तेल विकण्याचं काम करीत पोट भरणारा, पंजाबातल्या मालेरकोटचा पोरसवदा तरुण विसाव्या शतकाच्या मध्यास दिल्लीत येतो काय, दिल्लीतल्या भगीरथ प्लेस नावाच्या परिसरात विजेचं सामान विकण्याचं दुकान काढतो काय, आणि ज्याची उत्पादनं इतके दिवस विकली त्याचीच कंपनी विकत घेऊन धंद्यातलं पहिलं भक्कम पाऊल टाकतो काय... सारंच अचंबित करणारं. उद्योग विकसनातल्या अचंबिततेची ही कहाणी इथेच थांबत नाही, उलट ती इथून सुरू होते आणि सा-या जगाला तोंडात बोटं घालायला लावून थांबते.

२००८ हे वर्ष जागतिक मंदीचं. विजेच्या उपकरणांच्या निर्मितीत नावाजलेल्या कंपन्या मंदीमुळे कंबरडं मोडल्याच्या अवस्थेत असताना हा तरुण काही कोटी रुपये मोजून ती कंपनी विकत घेतो काय आणि त्याच्या दुप्पट रक्कम केवळ उद्योगाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी खर्च करून आपल्या कंपनीचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन पोहोचवतो काय, हे तर त्या अचंबिततेच्याही पुढे जाणारं. २०१४च्या सरत्या महिन्यात, ७७ वर्षं वयाच्या त्या कर्तृत्ववान तरुणाचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आणि एका बहुराष्ट्रीय ब्रँडच्या निर्मात्याला उद्योगविश्व मुकलं.

तो तरुण, तो उद्योजक, तो ब्रँडनिर्माता किमतराय गुप्ता नावाचा आणि ‘हॅवेल्स इंडिया लिमिटेड’ हे त्याच्या उद्योगाचं नाव. या ‘हॅवेल्स’ची कहाणी तशी सुरू होते १९५८ सालापासून. तेलविक्रीतून मिळालेल्या दहा हजार रु.च्या भांडवलावर हा तरुण दिल्लीत येतो. कुणीतरी सांगितलं म्हणून दुकान काढतो. सगळ्यांनीच का किराणा विकायचा, असं म्हणत विजेचं सामान विकायला सुरुवात करतो आणि ज्याच्या कंपनीची उत्पादनं विकतो आहोत, त्याचीच कंपनी विकत घेऊन विजेच्या उत्पादनांच्या निर्मितीत पाऊल रोवतो. नुसत्याच स्विचगिअरनं भागणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पंखे-गीझर्स-केबल्स असं बरंच काही बनवू लागतो आणि कृतज्ञतेच्या भावनेतून ज्याच्याकडून कंपनी विकत घेतली त्याचंच नाव कंपनीला देऊन उत्पादनांचा ब्रँडही त्याच नावानं बाजारात आणतो. स्वत:चं नाव पुसलं जाईल, याची कल्पना असतानाही हा ‘हॅवेल्स’ नावाचा ब्रँड त्या तरुणानं विकत घेतला १९७१मध्ये आणि पहिलं रिवायरेबल स्विचेसचं तसंच चेंजओव्हर स्विचेसचं स्व-उत्पादन सुरू केलं ते दिल्लीतल्या टिळकनगरात नवीन जागा विकत घेऊन. त्यानंतर मग मात्र, अपवादाचं एक वर्ष वगळता, त्या तरुणानं मागं वळून पाहिलंच नाही. मग नवनवी उत्पादनं जशी निघू लागली, तसतशी ती उत्पादित करण्यासाठी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात ‘हॅवेल्स’चे कारखाने उभे राहू लागले.
पहिला आंतरराष्ट्रीय करार जर्मनीच्या उत्पादकाबरोबर झाला. आणि मग जसजशी करारांची संख्या वाढत राहिली, तसतशी देशांचीही संख्या वाढत राहिली. ‘हॅवेल्स’ ख-या अर्थानं बहुराष्ट्रीय बनत गेली. १९९९ मध्ये ‘हॅवेल्स’नं लंडनमध्ये पहिलं ऑफिस थाटलं. आजमितीस देशभरात १२ ठिकाणी आणि जगभरात युरोप, लॅटिन अमेरिका, आफ्रिका, जर्मनी, तुर्की, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि चीन या देशांमध्ये ‘हॅवेल्स’चे कारखाने सुरू आहेत. ‘हॅवेल्स’ तर आता आंतरराष्ट्रीय ब्रँड बनलेला आहेच; परंतु ‘क्रॅबट्री सिल्व्हानिया’, ‘कॉँकॉर्ड’, ‘ल्युमिनन्स’ आणि ‘स्टॅँडर्ड’ हे जागतिक ब्रँड‌्सही आता ‘हॅवेल्स’च्या पंखाखाली आले आहेत. ५० देशांमध्ये झालेला विस्तार, ९१ कार्यालयं, ६५००हून अधिक तज्ज्ञ व्यावसायिकांची टीम, आणि २० हजारांहून अधिक वितरकांचं जागतिक जाळं हे आहे ‘हॅवेल्स’चं सध्याचं स्वरूप. ‘हॅवेल्स’ची वार्षिक उलाढाल आता पोहोचली आहे ११ हजार कोटी रु.च्या घरात. बिल्डिंग सर्किट प्रोटेक्शन, मिनिएचर सर्किट ब्रेकर, इंडस्ट्रियल सर्किट प्रोटेक्शन, मोटर्स, फूट कम फ्लेंज मोटर, प्रोफेशनल अँड कन्झ्युमर ल्युमिनरीज, स्मॉल डोमेस्टिक अप्लायन्सेस, कपॅसिटर्स, एचपीएफ ग्रीन सीएफएल, सीलिंग फॅन्स, वॉटर हीटर, जोमेस्टिक वॉटर पम्प्स ही त्यांची उत्पादने चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. ‘हॅवेल्स’ची ७० टक्के उत्पादने ही ऊर्जाबचतीच्या श्रेणीत मोडणारी आहेत.
जगभरातील २० हजार वितरकांच्या जोडीला ‘हॅवेल्स’नं देशभरात मिळून सुमारे अडीचशे ‘हॅवेल्स गॅलक्सीज’ सुरू केल्या आहेत. त्या आहेत त्यांच्या एक्स्क्लुझिव्ह शोरूम्स. ‘हॅवेल्स कनेक्ट’ ही तर त्यांची दारोदार सेवा पुरवणारी आणखी एक फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रिकल गुड‌्स कंपनी. १९५८मध्ये किमतराय यांनी सुरू केलेल्या या उद्योगात त्यांचे चिरंजीव दाखल झाले ते तब्बल ३४ वर्षांनी, १९९२मध्ये. अनिल यांनी पाहता पाहता ‘हॅवेल्स’ला इंडस्ट्रियल प्रॉडक्ट‌्स कंपनीबरोबरच कन्झ्युमर प्रॉडक्ट कंपनीही बनवलं. एका अर्थानं ‘हॅवेल्स’ हा फॅमिली ब्रँड न राहता ग्लोबल ब्रँड बनला, त्याचं सारं श्रेय अनिलनाच जातं. अनिलच्या कल्पकतेनं आणि दूरदृष्टीनं जागतिक आर्थिक मंदीवरही मात केली. ‘हॅवेल्स’नं अनेक जागतिक स्पर्धक कंपन्या खरेदी करण्याचा सपाटा लावला तो २००७ नंतर. २००८मध्ये सिल्व्हेनियाचं दिवाळं निघालं होतं, ती विकायला काढली होती. तरी तिची किंमत होती २२ कोटी २७ लाख रु. किमतराय यांनी त्याही किमतीत ती घेतली. परंतु त्यानंतरचा काही काळ ओढगस्तीतच गेला.
किमतराय यांनी मुलांना कार्यशैली बदलण्याचा आणि अधिक जोमानं कार्यरत होण्याचा सल्ला दिला. प्रतिमा उजळण्यासाठी चार पैसे जास्त खर्च करून पाहण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि तो उपयोगी ठरला.

आपल्या उत्पादनांची माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मार्केटिंगचं अद्ययावत तंत्र वापरण्यात ‘हॅवेल्स’नं काहीही कमी पडू दिलं नाही. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपासून आयपीएलच्या दोन सीझन्सपर्यंत, चॅम्पियन्स लीगपासून चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत अनेक क्रिकेट इव्हेंट‌्सना हॅवेल्सची ब्रँड स्पॉन्सरशिप लाभली. सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून अनिल गुप्तांनी हाती घेतलेला महत्त्वाचा उपक्रम मध्यान्ह भोजनाचा. राजस्थानातील अलवार जिल्ह्यातील ५० हजार शालेय विद्यार्थ्यांना उत्तम मध्यान्ह भोजन देण्यासाठी त्यांनी सुरू केलेली दर्जेदार स्वयंपाकगृहं आणि त्याचबरोबर बिहारमधला पूर, त्सुनामी, कारगिलसारख्या राष्ट्रीय आपत्ती यात त्यांनी देऊ केलेली मदत विशेष उल्लेखनीय. आश्चर्यवत वाटावं इतकं सारं उद्योगासाठी आणि समाजासाठी करूनही किमतराय फारसे कुणाला ठाऊक नव्हते. त्यांचा तो स्वभावही नव्हता. ते ना कधी प्रसिद्धीच्या झोतात राहिले, ना त्यांनी कधी प्रसिद्धीचे फूटलाइट‌्स आपल्या अंगावर पडू दिले. परंतु तरीही एक हेवा वाटावा असा ब्रँड मात्र त्यांनी भारतीय उद्योगविश्वाला देऊ केला.

sumajo51@gmail.com