आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्याचे भान... निरंतर प्रक्रिया!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेळ व काळ हा मुळात एक आभास आहे, या आइन्स्टाइनने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाची प्रचिती आज एक वर्ष सुरू असलेला ‘आरोग्यभान’ हा स्तंभ संपवताना येत आहे. अवतीभवती घडणा-या घटना, प्रगतीचा वेग, काळाबरोबर बदलती मानसिकता या सर्वांचे एकत्रित विश्लेषण करता करता एक वर्ष उलटून गेले, याचे ‘भान’, ‘आरोग्यभान’ हा स्तंभ संपवताना स्वत:ला मुद्दामहून द्यावे लागते.
‘आरोग्यभान’ या स्तंभाच्या माध्यमातून वर्षभर वैद्यकीय समुद्रात आपण सर्वांनी असाच एकत्रित प्रवास केला. आपल्याला जाणवत नसले तरी बरेच अंतर आपण कापले आहे. यातून सर्वांना १०० टक्के आरोग्यभान आले, असे मुळीच नाही. पण ते भान येण्यासाठी विचारांची प्रक्रिया मात्र सुरू झाली, एवढे नक्की. स्टेम सेल बँकिंगच्या जाहिरातींना भुलण्याआधी यातले सत्य व या जाहिरातींमधील तथ्य काय आहे? स्त्रियांना कमी वयात पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया गरजेची आहे का? डॉक्टर सिझेरियन सेक्शन मुद्दाम करतात का? अशा आपल्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंध असणा-या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण केला. ब-याचदा अशा वेळी रुग्ण व नातेवाईक डॉक्टरांना ‘तुम्हीच ठरवा’ असे सांगून नातेवाइकांचे मत डॉक्टरांनी ठरवायची सवय लावतात. यात डॉक्टरांना मोठेपणा वाटत असला तरी यामुळे रुग्ण व नातेवाइकांची विचार व निर्णयशक्ती आम्ही मारून टाकतो. हे वैद्यकीय क्षेत्रासाठी नक्कीच घातक आहे. हा ट्रेंड आपण या स्तंभाच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न केला. आपले विचार समाजावर लादून समाजपरिवर्तन घडू शकत नाही. त्या विषयाच्या सर्व बाजू सर्वांसमोर ठेवून आधी विचार सुरू झाला, की पुढे तो आपोआप मूळ धरतो. त्यातच वैद्यकीय क्षेत्रात आमच्याकडून काही चुका होतात. रुग्ण तपासणीसाठी येतो तेव्हा आम्ही त्याच्या आजाराकडे व्यक्तिगत समस्या म्हणून बघतो. तसेच वेळेच्या कमतरतेमुळे व सामाजिक बंधनांच्या ओझ्यामुळे बरेच विषय आम्ही झाकून ठेवतो. म्हणूनच शुक्राणूंची कमी होत चाललेली संख्या या कन्सल्टिंग रूममध्ये एकांतातही चर्चेला अवघड जाणा-या विषयाची चर्चा आपण सर्वांनी जाहीररीत्या केली. या लेखानंतर अनेकांनी आपली तपासणी करून हे रिपोर्ट नॉर्मल असल्याची खातरजमा केली. मुळात हा आपला वैयक्तिक प्रश्न नसून हा मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे केवढे मोठे भान आपल्याला आले. हा लेख वाचून तर अकोल्याच्या स्वप्नाली जहागिरदार यांनी यावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवण्याचा विडा उचलला. चांगल्या विचारांची ठिणगी पडण्याचा अवकाश आहे; परिवर्तनाची आग लागलीच म्हणून समजा, हा मोठा आशावाद मला स्वत:ला या स्तंभातून मिळाला.
कट प्रॅक्टिस, वैद्यकीय शिक्षणातील भ्रष्टाचार अशा विषयांवर भाष्य करताना ब-याचदा नाकातोंडात पाणी जाते. हे भाष्य ब-याचदा वैद्यकीय क्षेत्रातील आप्तस्वकीयांना टोचते. पण मी स्वत:ही डॉक्टरच आहे. हे भाष्य करताना मी पोतराजासारखा स्वत:च्याच देहावर आसूड ओढून आरोग्यभानाचा जोगवा मागतोय, एवढीच या टीकेमागची भावना होती.
वैद्यकीय क्षेत्रातून तरीही या स्तंभाला खूप प्रोत्साहन मिळाले. औरंगाबादचे ज्येष्ठ फिजिशियन डॉ. पी. वाय. मुळे सर, सोलापूरचे ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. बाहुबली दोशी अशा नीतिमत्तेच्या दीपस्तंभांनी वेळोवेळी विचारांनी पुष्टी देत ‘आगे बढो’चा कौल दिल्याने लिखाणाला बळ मिळाले. हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, एवढ्या शुद्ध भावनेतून नांदेडचे डॉ. विजय डोंपले यांनी सोशल मीडियावर लेखांचा भरपूर प्रचार केला, वेळोवेळी नवीन विषयही सुचवले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी वैद्यकीय शिक्षणावर भाष्य करत आरोग्यभान या सदरात आवर्जून सहभाग नोंदविला. अहमदनगरच्या एमबीबीबीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी शौर्यशील खामबोळकर याने अशी प्रतिक्रिया पाठवली की त्यातून सविस्तर लेख तयार होऊ शकेल. एकूण, या स्तंभातून आणि आतापर्यंतच्या आरोग्य विषयावरील लेखनातून एक गोष्ट लक्षात आली, स्टेथोस्कोप लावून लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनने रुग्णाचे आयुष्य बदलते; तसे आरोग्यविषयक स्तंभ हे समाजपरिवर्तनासाठी एक प्रिस्क्रिप्शनच आहे. म्हणून ब-याचदा ‘पेन इज माइटर दॅन स्टेथोस्कोप’ अशी प्रचिती येते.
वाचकांनी भरभरून प्रतिसाद देऊन यशस्वी केलेल्या स्तंभाच्या यशाला कळस चढवण्याचा क्षण येऊन ठेपला आहे. तो कळस म्हणजे स्तंभाला विराम देण्याचा. एका ज्येष्ठ संपादकांना मी खूप पूर्वी विचारले होते- ‘सर, चांगला स्तंभलेखक तुम्ही कशावरून ठरवता?’ त्यांनी उत्तर दिले - ‘जो वेळेत स्तंभ थांबवतो, तो चांगला स्तंभलेखक; व जो वेळेत भाषण संपवतो, तो चांगला वक्ता.’
आयुष्यात, इहलोकात प्रत्येक बाबतीत आपल्याला कधीतरी थांबायचे आहे, या ‘थांबण्याची’ नेट प्रॅक्टिस करण्याची अशी आपल्याला संधी मिळत असते. पण ‘आरोग्यभान’ हा स्तंभ थांबला म्हणून आपल्याला प्रत्येकाला चिकित्सक बुद्धी जागृत ठेवून व्यक्तिगत पातळीवर ‘आरोग्यभान’ ही प्रक्रिया चालूच ठेवायची आहे. ‘Art of Living’ ए‌वढेच ‘Art of Leaving’ महत्त्वाचे. एवढे शेवटचे ‘आरोग्यभान’ देऊन थांबतोय. (समाप्त)
amolaannadate@yahoo.co.in