आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Health Education By Dr. Amol Annadate, Rasik, Divya Marathi

इन्हें भी देश की फ‍िक्र है !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कधी कधी मनापासून मांडलेली एखादी गोष्ट गाजते; पण वाजत नाही. म्हणजेच धोरणात्मक पातळीवर त्यातून काही निष्पन्न होत नाही; पण कॉर्डब्लड बँकिंगविषयी असे झाले नाही. त्यातच भर पडली नुकत्याच जाहीर झालेल्या कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (आय.सी.एम.आर.)च्या स्टेम सेल्सच्या वापराविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांची.


या लेखाच्या संदर्भात विशेष नोंद घ्यावी, अशी पहिली प्रतिक्रिया आहे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांची. कॉर्डब्लड व स्टेम सेल बँकिंग ही योग्य व वैद्यकीय नीतिमूल्यांना धरूनच चालावी, यासाठी व केंद्र शासनाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखावीत, यासाठी झगडे यांनी एक प्रस्ताव, सेंट्रल ड्रग अ‍ॅडव्हायझरी कमिटी (केंद्रीय औषध सल्लागार समिती)कडे पाठवली. ते त्याचा आग्रहाने पाठपुरावाही करत आहेत. झगडे यांच्यासारख्या कर्तव्यतत्पर अधिका-याला असे वाटते की, या बँका सर्वसामान्य रुग्णांना डोळ्यांसमोर ठेवून चालवल्या जाव्यात, तसेच ज्या परिस्थितीत हे कॉर्डब्लड साठवले जाते आहे, त्यातूनच खरंच 10 ते 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ, या पेशी नक्की जिवंत व स्टेम सेल ट्रान्सप्लांटसाठी उपयुक्त राहतील का? या गोष्टींची नीट चाचपणी होणे गरजेचे आहे.


या लेखाची दखल घेऊन कॉलेज ऑफ फिजिशियन्स अँड सर्जन्सचे अध्यक्ष डॉ. गिरीश मईंदरकर यांनी संस्थेतील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल, असे सांगितले. तसे डॉ. मईंदरकर हे महाराष्ट्रातून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियासाठी संभाव्य उमेदवार असल्याने कौन्सिलवर निवडून आल्यावर हा मुद्दा आपण मेडिकल कौन्सिलमध्ये उपस्थित करणार असल्याची ग्वाही त्यांनी लेख वाचल्यानंतर दिली. 2015मध्ये होणा-या सोलापूर येथील बालरोगतज्ज्ञांच्या राज्यस्तरीय परिषदेत हा विषय प्राधान्याने चर्चेला घेण्याची मनीषा या परिषदेचे आयोजक व महाराष्ट्र बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष होऊ घातलेले डॉ. कुंदन चोपडे यांनी व्यक्त केली. सटाण्याच्या डॉ. अमित सूर्यवंशी या उत्साही बालरोग तज्ज्ञांनी तर चक्क लेखाच्या झेरॉक्स रुग्णालयातील प्रत्येक गरोदर स्त्रीला देण्याचाच धडाका लावला.
अनेक वाचकांनी ई-मेलच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले व आपला निर्णय स्थगित केल्याचेही आवर्जून कळवले. एका वाचकाने तर चक्क कॉर्डब्लड बँकेचा नंबर देऊन भरलेला पहिला हप्ता परत मिळावा म्हणून तुम्हीच बँकेशी बोला, असा हट्ट माझ्याजवळ धरला. वाचकांचा हाच विश्वास आणि जवळीक संवेदनशील गोष्टी निर्भयतेने मांडण्याची हिंमत देत असतात.
स्टेम सेल बँकिंगविषयीच्या माहितीची पुढची पायरी म्हणजे, कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याविषयी नव्याने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे. स्टेम सेल्सचा वापर यापुढे फक्त संशोधनासाठी करता येईल व उपचार असे त्याचे स्वरूप असू शकणार नाही. यापुढे स्टेम सेलचा वापर हा केवळ मान्यताप्राप्त केंद्रांमध्येच करता येणार असून सध्या माहितीपत्रके देऊन व जाहिराती करून स्टेम सेल साठवण्याचे आवाहन करणा-या बँका अवैध ठरणार आहेत. तसेच साठवलेल्या या पेशी उपचाराच्या नावाखाली वापरता येणार नाहीत, असे नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.


मुळात स्टेम सेल उपचार पद्धत ही अजून संशोधनात्मक पातळीवर असल्याने व त्यांची उपयुक्तता सिद्ध झाली नसल्याने, ‘उपचार’ हा शब्द वापरणेच चुकीचे आहे. तसेच या उपचारांची हमी पालकांना देणे, ही तर वैद्यकीय नीतिमूल्यांची पायमल्लीच आहे. ‘उपचार’ हा शब्द वापरून पालकांना भुलवणे व ते शक्य न झाल्यास, म्युच्युअल फंड विकत घेताना ‘म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क’ ही फाइन प्रिंट दाखवण्यासारखे आहे.


या सर्व प्रकारातून एक गोष्ट लक्षात येते व आवर्जून सांगावीशी वाटते. आरोग्यक्षेत्राशी निगडित ‘काही तरी नवे, काही तरी असाध्य आजार बरे करणारे’ असे जाहिरातीतून मांडले की, आम्ही त्याला लगेच भुलतो. तसेच आपल्या मुलांना ‘खूप हुशार, खूप उंच, खूप छान’ बनवणारे अमृत, अशी काही जाहिरात दिसली की ते ‘हेल्थ ड्रिंक’ आम्ही आमच्या मुलांना बळजबरी पाजतो. या जाहिराती यशस्वी होण्यामागे आपल्या मनात असलेली भीती असते. ती भीती झुगारून टाकली की, फक्त भीतिपोटी नाळेचा तुकडा बँकेत ठेवण्याची गरज आपल्याला भासणार नाही. टीव्ही, फ्रिज, मोबाइल, गाड्यांच्या बाबतीत जाहिरातींना भुललो, तर फारसे बिघणार नाही; पण आरोग्याच्या बाबतीत आपल्या आयुष्यात जाहिराती बाजूला ठेवून हृदयाने नव्हे, मेंदूने विचार करणे गरजेचे आहे.
मुळात, स्टेम सेल्स हे भारतातील संशोधनाचे एक नवे दालन आहे. योग्य नैतिक व वैचारिक बैठकीतून हे संशोधन उद्या आपल्याला नक्कीच उपयुक्त ठरेल; पण त्यासाठी या पेशींची व्यावसायिक विक्री बंद करून ‘आरोग्यभान’ दाखवण्याची गरज आहे.


amolaannadate@yahoo.co.in