आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Hearing By Dr. Amol Annadate, Divya Marathi

श्रवणशक्तीचे माहात्म्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अनेक वर्षांपूर्वी गाजलेल्या ‘कोशिश’ या हिंदी चित्रपटात संजीव कुमार आणि जया बच्चन हे नायक-नायिका जन्मत: मूक-बधिर असतात. आपले बाळ खुळखुळा वाजवला तरी प्रतिक्रिया देत नाही, हे पाहून घाबरतात. घाईघाईने बाळाला डॉक्टरकडे नेल्यावर मात्र डॉक्टर खुळखुळा उघडून पाहतो तो रिकामा असल्याने वाजत नसतो; बाळाची ऐकण्याची क्षमता नॉर्मल असते. आईवडील आनंदात घरी परततात... चित्रपट हे सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असल्याचे आपण म्हणतो. प्रत्यक्षात मात्र बाळाला ऐकू येत नाही, म्हणून लवकरात लवकर रुग्णालयात येणारे पालक आम्हा डॉक्टरांना अभावानेच भेटतात. ‘कोशिश’ चित्रपटातील आईवडिलांनी बहिरेपणाची व्यथा आयुष्यभर सोसली, म्हणून कदाचित त्यांना बाळाच्या ऐकण्याविषयी एवढा कळवळा असतो. पण प्रत्येक आईवडिलांनी अशी जागरूकता दाखवल्यास ब-याच प्रमाणात बहिरेपणा टळू शकतो.
बहिरेपणाबद्दल एवढ्या कळकळीने सांगण्याचे कारण म्हणजे, ऐकणे ही देवाने दिलेली अशी एक विशेष देणगी आहे, जी आपण गमावली तर परत मिळवणे कठीण जाते. यावर आता प्रभावी उपचार नक्कीच आहेत. पण, उपचारांपेक्षा बहिरेपणा येऊच नये, यासाठीच्या प्रयत्नांना प्राधान्य असले पाहिजे. यशस्वी उपचारांसाठी बहिरेपणाचे निदान लवकरात लवकर होणे गरजेचे असते. साधारणत: मेंदूची वाढ पाच वर्षांपर्यंत होत असते आणि वयाच्या पहिल्या तीन वर्षांपर्यंत जर बहिरेपणाचे निदान झाले नाही तर पुढील दोन वर्षांत मेंदूच्या ऐकण्यासाठी नियुक्त केलेल्या जागेवर दृष्टीसाठी ठरवून दिलेली जागा अतिक्रमण करते. म्हणून पाच वर्षांनंतर उपचार अवघड होऊन जातात. म्हणून पहिल्या वाढदिवसाला आपले बाळ स्वत:च्या नावाला प्रतिसाद देत नसेल व एक ते दोन अर्थपूर्ण शब्द बोलत नसेल, तर बालरोगतज्ज्ञ तसेच कान, नाक, घसा तज्ज्ञांचा जरूर सल्ला घेतला जावा.
या विषयावर अधिक प्रकाश टाकताना औरंगाबाद येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. प्रवीण सोनवतीकर सांगतात की, नवजात शिशू, अतिदक्षता विभागातील नऊ महिन्यांअगोदर जन्माला आलेली कमी वजनाची बाळे, मेंदूज्वर झालेली बाळे व झटके आलेल्या नवजात शिशूंची एक महिन्यातच बहिरेपणासाठी तपासणी होणे गरजेचे आहे. मूल बोलत नसेल तर वेळेत त्याची तपासणी करण्याविषयी पालक टाळाटाळ करतात; पण बोलता न येणे, हे बहिरेपणाचे लक्षण असल्याचे आपण विसरतो.
कान फुटणे व कानातून पू येणे हे बहिरेपणाचे एक प्रमुख कारण आहे. याविषयी डॉ. सोनवतीकर सांगतात की, ही समस्या इतकी कॉमन आहे की, ग्रामीण भागात कान फुटणे ही नित्याची बाब समजली जाते व दोन वर्षांपर्यंत कान फुटला नाही, तर आश्चर्य व्यक्त केलं जातं. भारतात सहसा दोन वर्षांपर्यंत प्रत्येक बाळाला या समस्येतून जावं लागतं, त्यावर त्वरित उपचार न केल्यास त्याचे रूपांतर दीर्घकालीन वाहणा-या कानात होते. थोडक्यात, वाहणा-या कानाकडे दुर्लक्ष म्हणजे, बहिरेपणाला आमंत्रणच ठरते...जाहिरातींमुळे आपल्याकडे इअर बड्सचा सर्रास वापर केला जातो. पण आपल्या कानाच्या आतील आकार हा इअर बड्स घालण्यास सुसंगत नसतो. इअर बड्सचा वापर कोणीही व कधीही करू नये, असा मोलाचा सल्ला सोनवतीकर देतात. खरे तर कानातील मळ आवर्जून काढण्याची काही गरज नसते. कारण बहुतांश वेळा तो हालचालींमुळे आपोआप बाहेर ढकलला जातो. कानातील मळाविषयी शंका वाटत असल्यास तो कान-नाक-घसा तज्ज्ञांकडूनच काढून घ्यावा, तसेच कानात तेल किंवा इतर कुठलीही गोष्ट टाकू नये. बहिरेपणाचा एक प्रकार असा आहे, जो पहिल्या 25 ते 48 तासांत उपचार मिळाल्यास पूर्ण बरा होतो; पण त्यानंतर त्याचे उपचार अवघड होतात. हा प्रकार म्हणजे दीर्घकाळ डीजे किंवा इअर प्लग्समधून मोठ्या आवाजात कर्कश संगीत ऐकल्यामुळे किंवा इतर कारणांनी अचानक ऐकू न येणे, कानांमध्ये बारीक आवाज येणे व कान गच्च झाल्यासारखा वाटणे आदी समस्या जाणवतात. अशा वेळी तातडीने 24 तासांत योग्य उपचार घेतल्यास बहिरेपणा टळू शकतो.
दीर्घकालीन बहिरेपणासाठी हिअरिंग एड्चा बराच उपयोग होतो. पण समाजात अजूनही कानाची मशीन लावणा-यांकडे तुच्छतेने बघितले जाते. जसे दृष्टी कमी झाली की लोक सहज चष्मा वापरायला तयार होतात, तसे कानाचे यंत्र वापरायला सहज तयार होत नाहीत. पण चष्म्यासारखीच कानाच्या यंत्रालाही समाजमान्यता मिळायला हवी. त्यामुळे बहिरेपणामुळे बोलता न येणा-यांना ‘स्पीच थेरपी’ देऊन त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडून येईल. तरुण पिढीमधील मोबाइल फोन व आयपॉडवर सातत्याने संगीत ऐकण्याच्या वेडामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मोबाइलमुळे कानाला इजा टाळण्यासाठी तो पूर्ण चार्ज असतानाच वापरावा व चांगले सिग्नल येतात तेथून बोलावे, असा सल्ला
डॉ. सोनवतीकर देतात. तसेच दीर्घकाळ आयपॉडवर संगीत ऐकणे टाळावे. एकूणच आपल्याला मिळालेल्या श्रवणशक्तीची गांभीर्याने जपणूक केल्यास मोठी इजा टळू शकते.

dranand5@yahoo.co.in