आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिम प्रेरणांचा शब्दपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेन्री मिलर हा धीट शारीरिक वर्णन करणारा विसाव्या शतकातला पहिला लेखक. डी. एच. लॉरेन्सचं काय? असा प्रश्न यावर कुणीही विचारू शकतं. कारण, लॉरेन्सने ‘लेडी चॅटर्लीज लव्हर’मध्ये मोकळेपणाने स्त्री-पुरुष संबंधांचे वर्णन केलेले आहे. पण हेन्री मिलरच्या विशेषत: ‘सेक्सस’, ‘नेक्सस’, ‘प्लेक्सस’ या तिन्ही कादंब-या केवळ स्त्री-पुरुष संबंधांची वर्णनं करून थांबत नाहीत, तर एका बोहेमियन आणि मुक्त जीवनप्रणालीचा परिचय करून देतात. ‘सेक्सस’मध्ये नायक मित्राच्या पत्नीबरोबर बाथटबमध्ये शरीरसुखाचा आनंद घेत असताना तिला विचारतो की, ‘एवढ्यात जर का तुझा नवरा आला, तर तो काय म्हणेल?’ त्यावर ती म्हणते, ‘त्याला वाटेल, आपण गंमत करण्यासाठी असं बसलो आहोत.’ डी. एच. लॉरेन्सच्या ‘लेडी चॅटर्लीज लव्हर’वर बंदी घालण्यात आली. याचं कारण, ही कादंबरी दोन पूर्णत: वेगवेगळ्या वर्गातील स्त्री-पुरुष संबंधाचं चित्रण करते आणि त्याचा धक्का वाचकांना जास्त बसला होता. मिलरच्या साहित्यात असा धक्का सुरुवातीला बसतो. पण नंतर वाटतं, त्याचं जगणं असंच आहे, त्यात हे असंच घडणार. साध्या-साध्या गोष्टींवर मिलर कमालीची साधी भाषा वापरतो. अर्थात, असा साधेपणा अनेकदा चकवणारा असतो. ‘ती आपलं गुप्तांग अशा रीतीने नाचवत होती की, जणू काही ते कॅमेरा असून फोटो घ्यायला उत्सुक आहे.’ अशा तऱ्हेचं वाक्य वाचल्यावर धक्का बसतोच. पण पुढे त्या उघड्यावाघड्या भाषेची सवयही होऊन जाते.

मिलरची पात्रं अधिक हाडामांसाची वाटतात. याचं कारण, मिलरचं लेखन आत्मचरित्रात्मकच आहे. वेश्यांकडे जाणं, संभोगातील रुटीनपणा टाळण्यासाठी शरीर, मनाचे वेगवेगळे प्रयोग करणं, हे सारं परत परत त्याच्या लेखनात येतं. मुख्य म्हणजे, असा सगळा उघडावाघडापणा असूनही त्याचं लेखन कधीही ललित साहित्याचा दर्जा सोडत नाही. त्यामुळेच जॉर्ज ऑरवेलसारखा जगप्रसिद्ध निबंधकार आणि साहित्यिक, मिलरची थोरवी सांगणारा ‘इनसाइड द व्हेल’ म्हणजे, ‘देवमाशाच्या पोटात’ असा लेख लिहितो. काही लेखक काळाच्या ओघात आपोआप जुनेच भासतात. मिलरचं तसं होत नाही. ‘क्वाएट डेज इन क्लिची’सारख्या छोटेखानी कादंबरीतही त्याची शैली आणि सौंदर्य याचा प्रत्यय येत राहतो.

अॅनायिस नीन बरोबरची त्याची मैत्री, दोघांचा पत्रव्यवहार आणि दोघांचे एकमेकांशी असलेले शारीरिक पातळीवरचे नाते याची चर्चा बरीच झाली आहे. पण दोघांनीही एकमेकांना इरॉटिक साहित्याच्या लेखनात मदत केली, आणि तो प्रभाव दोन्ही प्रकरणांत दिसतो. ‘सेक्सस’चा नायक, मॉड या आपल्या बायकोला सोडून चालला आहे. तो एका तरुण नर्तकीच्या प्रेमात पडला आहे. तो तिला म्हणतो, ‘मी गेल्यावर तुला छान मोकळं वाटेल. आठवडाभरात मी निघून जाईन. आणि तू कशी शांत होशील, या विचारात मी आहे.’ ‘तू मला सोडून जाणार नाहीस ना?’ ती म्हणत होती. मग तो म्हणतो, ‘अचानक तिचं शरीर ताठ झालं आणि तिने दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले. तीव्र आवेगाने आपले भुकेले खारट ओठ माझ्या ओठांवर टेकवले. अत्यंत वेडावून, आसुसून ती माझं चुंबन घेऊ लागली. असं वेड मी आजवर अनुभवलं नव्हतं... मी तिला उचललं, बिछान्यावर टाकलं आणि बाजूला अगदी प्रेतासारखा पडलो.’

यानंतर मिलर आपल्या कामक्रीडेचं अगदी तपशिलाने वर्णन करतो. अशा वर्णनांत माणसाची आदिम भूक आणि प्रसंगी लैंगिक क्रियेत त्याची श्वापदाप्रमाणे तळ गाठण्याची वृत्ती, याचं चित्रण तो सतत करत राहतो. कामक्रीडेमध्ये माणसाला स्वत:चा आणि सभोवतालच्या अस्तित्वाचा विसर पडतो. तो तृप्तीचा क्षण एखाद्या मृत्यूच्या क्षणासारखा अनुभवतो. हा अनुभव वर्णनातून वाचकापर्यंत पोहोचवायचा मिलरचा आटोकाट प्रयत्न दिसतो. दोन किंवा अधिक स्त्रियांशी एका वेळी रत होणे, दोन पुरुष, दोन स्त्रिया या प्रकारची वर्णनं अर्थातच वाचकाला धक्का देतात. पण आधी पॅरिस आणि नंतर अमेरिकन मुक्त वातावरणातील ३०-४०च्या दशकातील पार्श्वभूमी इथे लक्षात घ्यायला हवी.

अर्थातच, नैतिकतेच्या कुठल्याच कल्पना मिलर जुमानत नाही. त्याची भाषा अनेकदा ज्वालामुखीच्या उद्रेकासारखी सनातन व वासनांचं रूप दाखवत अलंकृत होते. सेक्सच्या वर उल्लेखलेल्या वर्णनातच अचानक तो बायबलमधील अब्राहम आणि साराच्या संबंधाचा संदर्भ देतो. साहजिकच, धर्ममार्तंड आणि नीतिमत्तेच्या रखवालदारांना त्या काळात हे लेखन खूप आक्षेपार्ह वाटले. ‘सेक्सस’ ही रोझी क्रुसेसफिक्शन या मालिकेतील पहिली कादंबरी आहे. उरलेल्या दोन कादंब-या म्हणजे, ‘प्लेक्सस’ आणि ‘नेक्सस’ या होत. मिलरच्या तिन्ही पुस्तकांवर अमेरिकेत बंदी आली.

दुस-या लग्नानंतर त्याला अपराधी वाटू लागतं आणि पुन:पुन्हा त्याचं मन पहिल्या बायकोकडे म्हणजेच मॉडकडे धाव घेतं. तिच्याबद्दल एक प्रकारचं ऑब्सेशन त्याच्या मनात तयार होतं. हे ऑब्सेशन अनेकदा कलावंतांच्या कलानिर्मितीचा गाभा असतं. सर्वसामान्य माणूस आणि कलावंत यात वागण्या-बोलण्याचे जे फरक आढळतात, त्यामागे कलावंताचं एखाद्या विषयाशी असलेलं गुरफटलेपणाचं नातं असतं. त्यामुळेच मिलरच्या लेखनाकडे रूपकात्मक पद्धतीने पाहता येतं. या कादंब-यांमध्ये कहाणी म्हणून किंवा कथासूत्र म्हणून तसं काहीच नाही.
लेखक आणि त्याचे मित्र, मैत्रिणी किंवा मित्रांच्या बायका, त्यांच्याशी गप्पा, त्यातून आलेल्या छोट्यामोठ्या उपकहाण्या हेच काय ते कथानक. मग कधी मॅग्रेगरसारख्या संपादकाने केलेली साहित्य चर्चा असेल, तर कधी शेल्डनसारख्या पोलंडच्या घेट्टोमध्ये वाढलेल्या आणि आईवडील व बहिणीची हत्या झालेली पाहिलेल्या मित्राची कहाणी असेल, किंवा घोष आडनावाच्या भारतीय माणसाने केलेलं भारताचं वर्णन असेल; या सा-यातून कथानक पुढे जात राहतं. पण मिलरची वर्णनं खिळवून ठेवतात. माणसामाणसाच्या संबंधांची, भूतकाळाची आणि संवेदनांची. रोज रात्री झोपताना बिल इडाच्या पार्श्वभागाचा मुका घेतो; आपण तिचे दास आहोत, हे सांगण्यासाठी, असं वर्णन मिलर करतो. या सा-या पात्रांच्या धूम्रपान, मद्यपान, क्वचित ड्रग्ज, उठताबसता कधीही वासनेला मोकळीक देणारी भाषा आणि वर्णनं यामुळे वाचक पुढेपुढे वाचत राहतो. कादंबरी म्हणून अंतिमत: त्याच्या पदरात काय पडतं, हे नेमकं सांगणं मात्र कठीण आहे. मिलरचं वाचन हा एक प्रवास आहे. त्याला अंतिम स्थान नाही, एवढं नक्की...

shashibooks@gmail.com
बातम्या आणखी आहेत...