हिमेश रेशमिया हे नाव उच्चारताच त्याचा परिचय देण्याची गरज भासत नाही. बॉलीवूडमध्ये केवळ संगीतकार आणि गायकच नव्हे तर अभिनेता, निर्माता अशा विविध रूपांत त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. अर्थात, त्याचा इथवरचा प्रवास हा अत्यंत कष्टप्रद होता. २३ जून १९७३ रोजी मुंबईत जन्मलेला हिमेश विपिन रेशमिया हा गुजराती कुटुंबातून आलेला... हिमेशचे वडील विपिन यांनी शंकर-जयकिशन, आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आदी गुणी संगीतकारांबरोबर काम केले होते. मात्र मुंबईतील चित्रपटसृष्टीत ते फारसे यश मिळवू शकले नाहीत. गुजराती चित्रपटांचे संगीतकार म्हणून मात्र विपिन रेशमिया यांनी ब-यापैकी नाव मिळविले. पेडर रोड येथील हिल ग्रांज स्कूलमध्ये शिकत असताना हिमेश रेशमिया याची प्रशांत चढ्ढा याच्याशी मैत्री झाली. पुढील काळात हिमेशचा पहिला चित्रपट ‘
आपका सुरूर : द रिअल लव स्टोरी’ याचे दिग्दर्शन याच प्रशांतने केले.
आपल्या जुन्या आठवणी सांगताना हिमेश म्हणतो, ‘मी चित्रपटांत येऊ नये असे वडलांचे मत होते.’ मात्र वयाच्या १६व्या वर्षी हिमेश रेशमियाचा अखेर चित्रपट-मालिकांच्या जगात प्रवेश झाला. घरची बिघडलेली आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी त्याच्या वडलांनी मालिकांचे निर्माते बनण्याचा निर्णय घेतला. हिमेशचा सहभाग असलेली पहिली मालिका अहमदाबाद दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित झाली. त्यानंतर झी टीव्हीचे आगमन झाले. त्यावर अंदाज, आंगन, अमर प्रेम आदी मालिकांची निर्मिती विपिन व हिमेश यांनी केली. या मालिकांची टायटल साँग्ज हिमेशनेच बनविली होती, मात्र ती गायली होती कुमार शानू यांनी...
टीव्ही जगतात भक्कम पाय रोवल्यानंतर हिमेश रेशमियाला हिंदी चित्रपटांना संगीत देण्याची आस लागली. मात्र संधी मिळत नव्हती. हिमेश काम मागण्यासाठी जिथे जायचा तिथे त्याला संगीतक्षेत्रातील पूर्वानुभव काय, याची विचारणा केली जायची. संघर्ष तर सुरूच होता. एक दिवस त्याची
सलमान खानशी भेट झाली. हिमेशने चाल व संगीत दिलेली काही गाणी
सलमान खानने ऐकली. त्यानंतर
सलमान खानने आपल्या कुटुंबीयांची निर्मिती असलेल्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी हिमेशवर सोपविली. त्या चित्रपटातील ‘ओढ ली चुनरिया’ हे गाणे खूप गाजले. या चित्रपटाने हिमेश संगीतकार म्हणून प्रस्थापित झाला.
संगीतकार बनण्याबरोबरच गायकही व्हायचे, ही हिमेशची मनापासून इच्छा होती. मात्र योग्य संधी मिळत नव्हती. संगीतकार अब्बास-मस्तान यांच्याकडे आपण नक्की गाऊ, असे आश्वासन त्यांना हिमेशने दिले होते. त्याच वेळी ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटामध्ये हिमेशने केवळ गाऊ नये तर पडद्यावरही झळकावे, अशी इच्छा चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य दत्तने व्यक्त केली होती. पडद्यावर झळकणे ही हिमेशसाठी रिस्क होती; पण हाही जुगार तो खेळला व जिंकला. त्यानंतर हिमेश रेशमियाने चित्रपटात अभिनयही करावा, अशी गळ रसिक घालू लागले. ती इच्छा प्रमाण मानून हिमेशने ‘आपका सुरूर’ या चित्रपटात सर्वप्रथम अभिनेता म्हणून पदार्पण केले. २००७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी नेमका हिमेशच्या आईचा वाढदिवस होता. त्यानंतर अंगात उत्साह संचारलेल्या हिमेशने पुढे आठ ते नऊ चित्रपटांत आपल्या अभिनयाची करामत दाखविली. कोणालाही यश मिळाले की वादंग त्याचा पाठलाग करत येतातच. या नियमाला हिमेशही अपवाद नाही. हिमेश नाकात गातो, असे लोक म्हणत. त्यावर स्पष्टीकरण देताना त्याने सांगितले की, आर. डी. बर्मनही माझ्यासारखेच नाकात हायपीचमध्ये गात. त्याच्या या उद्गारांमुळे आशा भोसले विलक्षण नाराज झाल्या होत्या. सरतेशेवटी हिमेश आशा भोसलेंची माफी मागून मोकळा झाला. सध्याच्या गायकांमध्ये कुमार शानू हा अधिक प्रतिभाशाली आहे, असे हिमेशला वाटते. मी उत्तम संगीतकार-गायक आहे हे रसिकांसमोर सिद्ध व्हावे, अशी माझ्या वडलांची इच्छा होती. त्या दिशेने मी पुढे चाललो आहे. प्रत्येक माणसाने माझ्यावर प्रेम करावे, असे मला वाटते. त्याचसाठी मी उत्तम संगीत व गायनावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही हिमेश म्हणाला.
dpsingh@dbcorp.in