आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

... आणि द्वेषाची बीजे जोराने अंकुरली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू-मुस्लिम दंग्यांना खूप जुना इतिहास आहे, त्यात वाईट कसले वाटून घ्यायचे, अशी मल्लिनाथी करून विद्वेषाच्या कृतीचे अप्रत्यक्ष समर्थन करण्याची समाजाच्या एका वर्गात प्रथा पडत चालली आहे. मात्र, ही द्वेषाची बीजे रोवली कुणी? उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर दंगलीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांतील मंडळींना आत्मपरीक्षण करायला लावणार्‍या घटनांचा इतिहासाच्या पानांतून घेतलेला हा मागोवा...
शुद्धी आणि संघटन विरुद्ध तबलीस और तनझीम अशी नावे असलेल्या दोन संस्था भारतात सुरू झाल्या. त्या परस्परविरोधी दोन ध्रुवांसारख्या होत्या. या दोन्ही संस्थांमुळे स्वातंत्र्य चळवळीची चांगलीच पीछेहाट झाली. या संघटनांमागे मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा या उभ्या राहून त्यांच्या पुढार्‍यांना पाठिंबा देत होत्या. ब्रिटिश सरकारला या गोष्टींचा आनंदच होता. प्रतिगामी शक्ती जोराने पुढे सरकत होत्या. देशातील राष्ट्रीय चळवळ मात्र अंदाजाप्रमाणे पुढे जाऊ शकत नव्हती.
मुस्लिम आणि हिंदू संप्रदायवादी आपली जाळी पसरीत होते. सामान्य जनता गोंधळून गेली होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध चाललेल्या चळवळीचा सामान्य जनांचा ओघ अनेक दिशांमध्ये विभागला गेला. ‘फोडा आणि राज्य करा’ हे ब्रिटिशांचे धोरण सहज अमलात आणले गेले. दोन्हीही संघटनांच्या पुढार्‍यांना ब्रिटिश सत्तेने भरपूर उत्तेजन आणि मदत दिली.
हिंदूंचे संघटन करण्याच्या नावाखाली, तसेच मुस्लिमांची संघटना करण्याच्या नावाने दोन्हीही संघटनांनी जातीय विष पसरवण्यास सुरुवात केली. लवकरच त्याची फळे मिळाली. भारतात दंगे सुरू झाले. या संघटनांनी पेरलेली द्वेषाची बीजे जोराने अंकुरली आणि स्वातंत्र्य चळवळीत साधलेली एकजूट अल्प काळात नाश पावली.
भारत हा एक धार्मिक दंग्यांचा देश बनला
1857च्या स्वातंत्र्ययुद्धात भारतभर हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये संपूर्ण एकोपा होता. उठाव दडपला गेला आणि ब्रिटिश सत्तेचे दोन्ही जमातींतील तेढ वाढवण्याचे धोरण जरी चालू राहिले, तरी 1905 पर्यंत (बंगालची फाळणी) हा जातीय बंधुभाव कायम टिकला. बिहारमधील मुस्लिम बंगालच्या फाळणीला अनुकूल होते. याच सुमारास मुस्लिम लीगची स्थापना झाली. अलिगड चळवळीने चांगलेच बाळसे धरले होते आणि ही चळवळ मुस्लिमांना ब्रिटिश सत्तेच्या मागे उभी करीत होती. दोन्ही जमातींतील एकजुटीला हादरे बसू लागले. भारतात अनेक हिंदू-मुस्लिम दंगे झाले. भोहट येथे 1922मध्ये, अलाहाबादला 1925मध्ये आणि मुलतान, बरेली आणि नागपूर येथे 1927मध्ये भयंकर दंगली उसळल्या. 1930 सालापर्यंत भारतात आणखी अनेक हिंदू-मुस्लिम दंगे झाले.
1930 ते 1940 हा ब्रिटिश सत्तेविरुद्ध प्रचंड उठावाचा काळ होता. तरीही 20 जुलै 1935 रोजी लाहोरला दंगा झाला. 3 मुस्लिम मारले गेले आणि 88 जखमी झाले. 29 नोव्हेंबर 1936 रोजी मुंबईला दंगा झाला. त्यात 3 मुसलमान आणि 1 हिंदू मारला गेला. 12 फेब्रुवारी 1939रोजी कानपूरला भयानक दंगा झाला. त्यात 20 लोक ठार झाले आणि 200 जखमी झाले. या काळात आणखी इतरही दंगे झाले.
1940 ते 1946 या काळातदेखील भारतभर दंगे होत होते. 1941मध्ये अहमदाबादला भयंकर दंगा झाला. अनेक हिंदू आणि मुस्लिम मारले गेले. हा दंगा ब्रिटिश मुत्सद्द्यांनी घडवून आणला होता. पाटणा आणि अमेठी येथे आगी लागल्या. हिंदूंची देवळे पाडण्यात आली. गुलबर्गा, सहारणपूर, आग्रा, अजमेर, पालिवाल या ठिकाणच्या दंग्यांत आगी लावण्यात आल्या. 1920 ते 1938 या काळात हैदराबाद संस्थानातही अनेक दंगे झाले. 1938चा दंगा भयंकर होता.
फाळणीच्या अगोदर आणि फाळणीच्या काळात मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृतीचा कार्यक्रम हाती घेतला होता, याचा परिणाम म्हणून कलकत्ता, नौखाली, टिपेरा या ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगे सुरू झाले. मुस्लिमांनी हजारो हिंदूंना ठार केले. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात मुस्लिमांनी शस्त्रांचा वापर केला. पाकिस्तानची मागणी हिंदूंनी मान्य करावी, यासाठी त्यांच्यावर मुस्लिम लीगला दडपण आणायचे होते.
क्रिया आणि प्रतिक्रिया या नेहमी समान आणि परस्परविरुद्ध असतात. हिंदू बहुसंख्य असलेल्या प्रदेशात मुस्लिमांना नष्ट करण्यासाठी हिंदूंनीही तयारी केली. पंजाबात शिखांनी मुस्लिमांना ठार मारले.
स्वातंत्र्य जाहीर होऊन दोन वेगळी राज्ये तयार झाली. त्यानंतरही दिल्लीत अनेक दंगे झाले. (उदाहरणार्थ, करोलबाग, लोधी कॉलनी, सब्जी मंडी, सदर बाजार आणि इतर अनेक ठिकाणी). तरीही अनेक ठिकाणी हिंदूंनी आपल्या भागातील मुस्लिमांना आश्रय आणि संरक्षण दिले. तसेच अनेक ठिकाणी मुसलमानांनी हिंदूंना संरक्षण दिले.
जातीय पायावर आधारलेल्या संघटना
जातीय पायावर आधारलेल्या जात्यंध संघटना स्थापन करण्याची हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. अशा नव्या संस्थांना ब्रिटिश मुत्सद्द्यांनी सर्व प्रकारचे उत्तेजन आणि साहाय्य दिले.
1906मध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांची स्थापना झाली. मुस्लिमांचे संघटन करून त्यांना हिरव्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे मुस्लिम लीगचे उद्दिष्ट होते. हिंदूंची संघटना करून त्यांना भगव्या झेंड्याखाली जमा करण्याचे हिंदू महासभेचे ध्येय होते. मुस्लिम गार्ड (मुस्लिम रक्षक) नावाची एक युवकांची संघटना तयार झाली. इत्तेहाद-उल्-मुसलमीन हे मुस्लिम लीगचे एक पिल्लू होते. ही संस्था मुस्लिम लीगला कार्यकर्ते पुरवत असे. 1928मध्ये हैदराबादेत ही संघटना स्थापन झाली. 1925मध्ये रा. स्व. संघ जन्माला आला आणि हिंदू महासभेला कार्यकर्ते पुरवू लागला. ही एक निमलष्करी संघटना होती. हैदराबादेत रझाकार संघटना सुरू झाली. संस्थानातील हिंदूंवर वर्चस्व गाजवण्यासाठी एक सुलतानशाही निर्माण करणे, हे रझाकारांचे उद्दिष्ट होते. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक मुसलमान हा राज्यकर्ता आहे आणि त्यांच्या मार्गात येणार्‍या कोणत्याही संकटापासून संस्थानाचे रक्षण करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य आहे. रझाकार संघटना हीदेखील इस्लामचे रक्षण करण्यासाठी उभी राहिलेली एक निमलष्करी संघटना होती.
भारतातील धार्मिक एकोप्याचे वातावरण या संस्थांनी प्रदूषित करून टाकले. एकमेकांवर दोषारोप करून जातीय दंगे घडवून आणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. आपली सत्ता सुरक्षित आणि सुलभ व्हावी यासाठी ब्रिटिशांनी या संघटनांची झपाट्याने वाढ होऊ दिली. काही संघटनांनी आपण राजकीय चळवळीत पडणार नाही, असे जाहीर केले. या संस्थादेखील जातीय द्वेषाचे वातावरण निर्माण करीत. प्रत्येक संघटना इतर संघटनांवर मर्यादा ओलांडण्याचे आरोप करीत होती. दोन्ही धर्मांचे लोक एकमेकांविरुद्ध ठाकले होते. या वातावरणाचा ब्रिटिश सत्तेला फार मोठा फायदा झाला.

(जी. डी. चिटणीस लिखित, वसंत गोविंद लिमये अनुवादित आणि लोकवाङ्मयगृह प्रकाशित ‘भारतीय चळवळीतील मुस्लिमांचा कार्यभाग’ या ग्रंथातून साभार.)