आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Historical Wells By Dr. Mahesh Sarode, Divya Marathi

सातमजली विह‍िरीचा जागतिक वारसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भीमदेव सोलंकी यांची पत्नी रानी उद्यमतीने इ.स. 1022-61 या काळात एक विहीर बांधली, परंतु काळाच्या ओघात सरस्वती नदीच्या पुरामुळे काही भाग वगळता ती भरलेलीच राहिली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या वडोदरा (बडोदा) मंडळाने 1970-2000पर्यंत ती पूर्णपणे खोदून काढली. यामध्ये काही काळ मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगावचे पुरातत्त्व अधीक्षक विलास जाधव हेही सहभागी झाले होते. ‘रानी की बाव’ म्हणून ओळखल्या जाणा-या या वास्तूच्या मुख्य भागामध्ये मुख्यत: विहीर, त्याच्यापुढे कुंड व मंडप आहेत. हा मंडप जवळजवळ सातमजली आहे. याच्या आतील भिंतीवर हिंदू धर्मातील विविध संप्रदायाच्या अनेक प्रकारच्या मूर्र्ती कोनाड्यामध्ये बसवल्या आहेत. बाव पूर्व-पश्चिम असून पूर्वेकडून उतरण्यासाठी पाय-या आहेत. त्या कुंडापर्यंत जातात. संपूर्ण बाव 64 मीटर लांब, 28 मीटर रुंद व 27 मीटर खोल आहे.

पूर्वेकडून आपण जेव्हा विहिरीकडे जातो, तेव्हा पहिल्या मंडपाखाली येतो व दोन्ही बाजूस पाहिल्यास मुख्यत: विष्णूच्या दशावताराच्या मूर्ती आहेत. यामध्ये पहिले दोन अवतार मत्स्य व कुर्म नाहीत.दशावतार पॅनेलमध्ये उजवीकडे सोळा हाताचा भैरव, तर डावीकडे सोळा हाताची महिषासूरमर्दिनी आहे. विहिरीकडे तोंड केल्यास, उजव्या बाजूच्या भिंतीवर दशावतारामधल्या वामन व वराह यांच्यामध्ये एक नग्न विषकन्या उभी आहे. तिच्या उजव्या हातात मासा तर डावा हात डोक्यावर व त्यावर तीन घुबडे, डाव्या मांडीवर नाग, तर पायाच्या मागे मोर आहे. याचा अर्र्थ ती मोरासारखी सुंदर, माशासारखी चपळ, नागासारखी विषारी, तर घुबडासारखी दिवसा न दिसणारी आहे. याचबरोबर दशावतारामधील वामन, राम, परशुराम, बलराम, बुद्ध व कलियुगात अवतार घेणारा कल्की यांच्या सुबक लक्षवेधी मूर्ती येथे आहेत.

या मंडपातून समोर कुंडाच्या वर आडव्या भिंतीकडे पाहिल्यास डाव्या बाजूस ब्रह्मा, विष्णू, महेश, तर उजव्या बाजूस गणेश, कुबेर आपल्या पत्नींबरोबर, तर मध्ये महालक्ष्मी आहे. कुंडाच्या वरील बाजूस अनेक अप्सरा विविध मुद्रांमध्ये उभ्या आहेत. तर त्यांच्या वरच्या बाजूला विष्णूच्या 24 विविध रूपांच्या मूर्ती आहेत. त्यात डाव्या बाजूस पार्वती, हरी, अनिरुद्ध, नारायण, संकर्षण, श्रीधर, हरी, विष्णू केशव; तर उजव्या बाजूस अनिरुद्ध, विष्णू, हरी, नारायण, पुरुषोत्तम, गोंविद, श्रीधर आहेत. यावरच्या पॅनेलमध्ये अशाच सुबक मूर्ती आहेत, तर याच्यामध्ये विविध प्रकारच्या अप्सरांच्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत.

मुख्यत: विहीर ही सात मजली म्हणजे तिचे सात टप्पे आहेत. पुराणामध्ये पाताळाची सात नावे दिली आहेत, त्याचे स्वरूप ही विहीर आहे. त्यामध्ये तल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल व पाताळ दाखविले आहेत. विहिरीच्या सर्वात खाली आठ वसू व आठ भैरव यांच्या मूर्ती आहेत. यांच्या डोक्यावर नागाचा फणा आहे. तर मध्यभागी शेषशायी विष्णूच्या तीन मूर्ती वेगवेगळ्या टप्प्यावर बसवलेल्या आहेत. याचा अर्थ, विहिरीत जर पाणी आले तर प्रत्येक टप्प्यावरून त्याचे दर्शन होईल. विहिरीच्या आतील बाजूसही विष्णूची 24 विविध रूपे आहेत. एका अर्थाने जागतिक पुरातन वारसा श्रेणीत समाविष्ट झालेली रानी की बाव (वाव) हे एक खुले समृद्ध संग्रहालयच आहे. यामध्ये लहानमोठ्या जवळजवळ चारशे मूर्ती आहेत. असे बोलले जाते की, राणी उद्यमतीने पतीच्या स्मरणार्थ ही बाव(वाव) बांधली. हा कलेचा वारसा युनेस्कोने 22 जून 2014रोजी जागतिक स्मारक म्हणून जाहीर करणे, ही सर्वार्थाने अभिमानाची बाब ठरली आहे.

maaheshsarode@gmail.com