आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिटलरचे अखेरचे क्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिटलरने वंशश्रेष्ठत्व आणि आक्रमक राष्ट्रवादाने पछाडलेला अडॉल्फ हिटलर जगाच्या विस्मृतीत कधी गेलाच नाही. केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर हुकूमशाही प्रवृत्तीचे टोक गाठलेल्या हिटलरबद्दल आकर्षण असणारे आणि हिटरलबद्दल घृणा असणारे यांच्यात संघर्ष होऊन त्याची प्रतिमा समोर येत राहिली. अलीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी जोडल्या गेलेल्या घटनांना धग मिळाल्यामुळे हिटलर चर्चेत आला, तसा तो शांती भूषण यांनी केजरीवालांना हिटलरची उपमा दिल्यानेही चर्चेत आला. बरोब्बर सत्तर वर्षांपूर्वी ३० एप्रिल १९४५ या दिवशी लाखो ज्यंूची कत्तल घडवून आणणाऱ्या हिटलरने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्या अखेरच्या क्षणांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘दी लास्ट डेज ऑफ हिटलर’ या ह्यू ट्रेव्हर-रोपर लिखित पुस्तकातील हा संक्षिप्त उतारा…
स्वत:ला संपवण्याची तयारी सुरू केली होती. मुसोलिनी मेल्याची दिवसभरातली शेवटची बातमी बंकरपर्यंत पोहोचवण्यात आली होती. फॅसिस्टांचा मेरूमणी असलेला मुसोलिनी हिटलरचा गुन्हेगारी कृत्यांतला साथीदार होता. त्यानेच हिटलरला आधुनिक युरोपात हुकूमशहा बनण्याच्या शक्यतांची जाणीव करून दिली होती. तोच हिटलर आज भ्रमनिरास होऊन परा‌भवाच्या दाट छायेत वावरत होता. उत्तर इटलीत झालेल्या उठावादरम्यान बंडखोरांनी मुसोलिनी आणि त्याची प्रेयसी क्लॅरा पिटासी यांना फाशी देऊन त्यांचे मृतदेह मिलानच्या बाजारात लोकांनी दशादशा करण्यासाठी सोडून दिले होते. अपेक्षेप्रमाणे लोकांनी या हुकूमशहाच्या मृतदेहाची विटंबना केलीच; परंतु त्यांचे मृतदेह भर बाजारात टांगूनही ठेवले होते. हे सर्व तपशील हिटलर आणि इव्हा ब्राऊनला कळले असते, तर त्यांनी काहीही शिल्लक राहू नये यासाठी आपले मृतदेह पूर्णपणे नष्ट करण्यात यावेत, अशा स्वरूपाच्या यापूर्वी दिलेल्या आदेशांची पुनरुक्तीच केली असती. कारण, हिटलरने स्वत:च एकदा फिल्डमार्शलचा मृतदेह मटणाच्या हुकला लटकावला होता. त्यामुळे मरणानंतर आपल्या वाट्याला काय येऊ शकते, याची त्याला पूर्ण कल्पना होती.
दुपारी हिटलरने त्याचा आवडता अल्सेशियन कुत्रा ब्लाँडीला आपला माजी सर्जन प्रोफेसर हसी यांच्या मदतीने संपवलं होतं. प्रोफेसर हसी बर्लिनमधल्या त्यांच्या दवाखान्यात जखमींवर उपचार करण्यात गुंतलेले होते, परंतु हिटलरचा आदेश मिळताच बंकरमध्ये येऊन त्यांनी कुत्र्यावर विषप्रयोग केला होता. सोबत असलेल्या इतर दोन कुत्र्यांना त्यांना आजवर सांभाळलेल्या सार्जंटनेच गोळ्या घातल्या होत्या. हे सगळं झाल्यानंतर हिटलरने आपल्या दोन सेक्रेटरींना विषाच्या कॅप्सूल देऊन ठेवल्या होत्या. अशा पद्धतीने निरोप घेत असल्याबद्दल त्याने सेक्रेटरींची माफीही मागितली होती. त्यांच्या धाडसाचं कौतुकही केलं होतं आणि त्याचे एकनिष्ठ जनरल शेवटपर्यंत विश्वासार्हता जपतील, असा विश्वासही व्यक्त केला होता.

संध्याकाळी नाझी सैनिकांनी फ्युरर बंकरच्या जवळ असलेल्या इतर बंकरमध्ये असलेल्या अधिकारी आणि महिलांना पुढचे आदेश येईपर्यंत तिथून न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सगळ्यांना फोन करून डायनिंग हॉलच्या आवारात एकत्र येण्याविषयी बजावले गेले. अधिकारी आणि महिला मिळून ज‌वळपास २० जण तिथे जमा झाले. खासगी मार्गातून आपला विश्वासू बॉरमन याच्यासोबत हिटलर तिथे आला. तो खूप विस्कटलेला दिसत होता. डोळ्यांत विचित्र ओल दिसत होती. अनेकांना तो ड्रग्जच्या अमलाखाली असल्यासारखा वाटला होता. तो शांतपणे डायनिंग हॉलच्या आवारात आला. प्रत्येक महिलेसोबत त्याने हस्तांदोलन केले. काही महिला त्याच्याशी बोलल्यादेखील; पण तो नि:शब्द राहिला. एका क्षणी तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटला. उपस्थितांमधल्या प्रत्येकाने फ्युररच्या आत्महत्येचा क्षण जवळ आला, हे ओळखले.

सकाळी बंकरमध्ये असलेल्या सगळ्या गार्डना दिवसभराची सगळी साधनसामग्री एकत्र करण्याचे आदेश दिले गेले. दुपारच्या जेवणाच्या आधी हिटलरचा विश्वासू अधिकारी ग्वांशेने २०० लिटर पेट्रोल चान्सेलरी गार्डनमध्ये आणून ठेवण्याचे आदेश दिले. ज्याच्यावर ही जबाबदारी देण्यात आली त्या एरिक केम्पकाने इतक्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल उपलब्ध करून देण्याविषयी असमर्थता दाखवली, परंतु सरतेशेवटी १८० लिटर पेट्रोल चान्सेलरी गार्डनमध्ये पाठवून दिले.
दरम्यान, हिटरलने जेवण संपवले. त्याच्यासोबतचे लोक निघून गेले. बराच वेळ तो आतच राहिला. त्यानंतर तो इव्हा ब्राऊनसह सूटच्या बाहेर आला आणि त्यानंतर पुन्हा एक निरोप समारंभ पार पडला. तिथे बॉरमन आणि गोबेल्स होते आणि बरडॉर्फ, क्रेब्ज, हेवेल हेही अधिकारी होते. हिटलर आणि इव्हा ब्राऊन यांनी या सगळ्यांशी हस्तांदोलन केले आणि लगेचच ते आपल्या सूटकडे परतले. दोघे निघून गेल्यानंतर थोडी पांगापांग झाली, पण जे तिथे रेंगाळले त्यांना गोळी झाडल्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने गेल्यानंतर हिटलर रक्ताच्या थारोळ्यात सोफ्यावर पडलेला त्यांना दिसला. त्याने तोंडात गोळी मारून घेतली होती. इव्हा ब्राऊनदेखील सोफ्यावर मृतावस्थेत पडली होती. तिच्या बाजूला रिव्हॉल्व्हर होते, परंतु ते तिने वापरले नव्हते. त्या वेळी घड्याळात साडेतीन झाले होते.

थोड्या वेळाने हिटलरच्या यूथ विंगचा प्रमुख आर्थर अॅक्समन सूटमध्ये आला, त्याने हिटरलचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला. दुसरा विश्वासू अधिकारी बॉरमन सूटमध्ये आला, त्याने इव्हा ब्राऊनचा मृतदेह गुंडाळला. दोन्ही मृतदेह चान्सेलरी गार्डनपर्यंत नेण्यात आले. शेजारी शेजारी ठेवण्यात आले. सकाळी मागवण्यात आलेले कॅनमध्ये भरलेले पेट्रोल त्यावर ओतण्यात आले. पण त्याच वेळी रशियन सैन्याकडून बॉम्बफेक होऊ लागल्याने तिथे उपस्थितांनी पोर्चचा आसरा घेतला. त्यानंतर ग्वांशेने कापडाचा बोळा पेट्रोलमध्ये बुडवला आणि दोन्ही मृतदेहांवर टाकला. त्या क्षणी भपकन आग भडकली आणि त्या आगीत हिटलर आणि इव्हा ब्राऊनचे मृतदेह जळू लागले. जमलेल्यांनी हिटलरला अखेरचा सॅल्यूट केला आणि सगळे आपापल्या बंकरकडे निघून गेले. ग्वांशे एकटाच हिटलरचा मृतदेह जळताना बघत मागे राहिला. आयुष्यातला सगळ्यात भयानक अनुभव, असे त्याने त्या क्षणांचे वर्णन केले…

(वरील उतारा पॅन बुक्स प्रकाशित ‘दी लास्ट डेज ऑफ हिटलर’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीतल्या ‘दी डेथ ऑफ हिटलर’ या प्रकरणातून घेतला आहे.)
बातम्या आणखी आहेत...