आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉर्मोन थेरपी: अविरत संशोधनाचे फलित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूत्रपिंडात तयार झालेले मूत्र मूत्रवाहिन्यांतून युरेटर्स-ओटीपोटात असलेल्या मूत्राशयात (युरिनरी ब्लॅडर) येते. मूत्राशयातून हे मूत्र मूत्रनलिकेतून (युरेथ्रा) बाहेर टाकले जाते. मूत्रनलिका जेथे मूत्रपिंडाला जोडली जाते, तेथे प्रॉस्टेट ग्रंथी असते. मूत्रनलिका प्रॉस्टेट ग्रंथीतून जाते. वाढत्या वयाबरोबर प्रॉस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो. मूत्रनलिका दाबली जाते. ज्येष्ठ पुरुषांना या वयात लघवी करताना त्रास होण्याची शक्यता असते. प्रॉस्टेटचा कर्करोग समजून घेण्याआधी ही माहिती जरुरीची ठरते.

प्रत्येक प्रकारच्या कर्करोगावर किमोथेरपी हाच उपचार आहे, असे विज्ञानाला वाटत होते. पण प्रस्थापित विचारापलीकडे जाऊन विचार करणारे ते वैज्ञानिक असतात. १९२०च्या दशकात डॉ. चार्ल हगिन्स हे अमेरिकन युरॉलॉजिस्ट असा विचार करत होते. स्त्रियांची हॉर्मोन्स संप्रेरके बीजांडावर तसेच स्तनावर परिणाम करतात. प्रॉस्टेट फक्त पुरुषांमध्ये असते, तेव्हा पुरुषांचे हॉर्मोन टेस्टोस्टिरॉन हे प्रॉस्टेटच्या वाढीवर परिणाम करत असणार, असा विचार त्यांनी केला. हा विचार १७५३मध्ये जॉन हंटर या शल्यचिकित्सकाने केला होता. पण त्याने तो प्रयोगाने सिद्ध केला नव्हता. आज दिसणारे विज्ञान हे शतकांच्या प्रवाही संशोधनाचे फळ आहे, हे समजण्यासाठी ही सनावळी दिली आहे.

डॉ. हगिन्स यांनी कुत्र्याचे टेस्टिस (वृषण) शस्त्रक्रियेने काढले. टेस्टिस टेस्टोस्टिरॉन तयार करते. या शस्त्रक्रियेमुळे कुत्र्याच्या रक्तातील टेस्टोस्टिरॉनचे प्रमाण एकदम कमी झाले. याचा परिणाम होऊन कुत्र्याची प्रॉस्टेट आक्रसली. याचा अर्थ, प्रॉस्टेटच्या नॉर्मल पेशी वाढीसाठी टेस्टोस्टिरॉनवर अवलंबून असणार. असे जर असेल, तर प्रॉस्टेटच्या कर्कपेशीसुद्धा वाढीसाठी टेस्टोस्टिरॉनवर अवलंबून असल्या पाहिजेत, असा डॉ. हगिन्सचा कयास होता. प्रॉस्टेटचा कर्करोग हा माणूस, कुत्रा व सिंह या प्राण्यांना होतो, असे आढळले आहे. डॉ. हगिन्स यांनी प्रॉस्टेटचा कर्करोग झालेल्या कुत्र्यावर प्रयोग केले. अशा कुत्र्याचे टेस्टिस काढून टाकल्यावर त्या कुत्र्याच्या प्रॉस्टेटच्या कर्करोगाची वाढ थांबली.

डॉ. हगिन्स यांनी आणखी एक मौलिक विचार केला. प्रॉस्टेटचा कर्करोग असलेल्या व्यक्तीला जर स्त्रियांचे हॉर्मोन इस्ट्रोजेन जास्त मात्रेत दिले, तर त्या व्यक्तीच्या रक्तातील टेस्टोस्टिरॉनचे प्रमाण कमी होईल व प्रॉस्टेटचा कर्करोग बरा होईल. पुरुषांना जास्त मात्रेत इस्ट्रोजेन देणे, याला ‘मेडिकल कॅस्ट्रेशन’ (वैद्यकीय खच्चीकरण) म्हणतात. याचे प्रयोग प्रॉस्टेटच्या कर्करोगाच्या रुग्णांवर झाले. त्याचा काही प्रमाणात चांगला उपयोग झाला. पण अशा हाॅर्मोन उपचारामुळे सगळे रुग्ण बरे झाले, असे घडले नाही. काही रुग्ण बरे झाले, तर काही रुग्णांमध्ये काही काळानंतर प्रॉस्टेटचा कर्करोग पुन्हा उपटला. संशोधन पुढे चालू राहिले.

शरीरात जी सेक्स हॉर्मोन्स तयार होतात, त्यांचे नियंत्रण मेंदूत असते. या नियंत्रण करणा-या हॉर्मोन्सवरचे संशोधन डॉ. अँड्रू स्कॅली यांनी अमेरिकेत केले. या हॉर्मोन्सवर प्रभाव पाडणा-या औषधांचा शोध त्यांनी लावला. या संशोधनाबद्दल डॉ. स्कॅली यांना १९७७चे वैद्यक नोबेल मिळाले. प्रॉस्टेटच्या कर्करोगावरच्या औषधात नव्या औषधांची भर पडली.

डॉ. पॅट्रिक वॅल्श यांनी कर्करोगाने ग्रस्त झालेली प्रॉस्टेट ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया विकसित केली. डॉ. मालकम बॅगशॉ यांनी प्रॉस्टेटच्या कर्करोगावरच्या क्ष-किरण उपचाराचे नवे मार्ग शोधले. प्रॉस्टेटचे काही कर्करोग हॉर्मोन्सवर अवलंबून नसतात; अशा कर्करोगांवर किमोथेरपी हा उपाय असतो. डॉ. जेराल्ड यांनी अशी िकमोथेरपी विकसित केली. हे अमेरिकन वैज्ञानिकांचे संशोधन कर्तृत्व आहे.
ऑर्किडेक्टॉमी टेस्टिस काढण्याच्या शस्त्रक्रियेला ‘ऑर्किडेक्टॉमी’ म्हणतात. प्रॉस्टेटच्या कर्करोगाच्या काही रुग्णांसाठी या शस्त्रक्रियेचा पर्याय तज्ज्ञ रुग्णापुढे ठेवतात. या शस्त्रक्रियेमुळे रक्तातील टेस्टोस्टिरॉनचे प्रमाण कमी होते. शरीरात पसरलेल्या या कर्करोगावर हा महत्त्वाचा उपाय ठरतो. नपुंसकत्व येणे, लैंगिक भावना नष्ट होणे, स्तन वाढणे असे या शस्त्रक्रियेचे उपप्रभाव आहेत. ही शस्त्रक्रिया ‘पॅलिएटिव’ म्हणजे कर्करोगाचा त्रास कमी करणारी असते; यामुळे कर्करोग पूर्ण बरा होतोच, असे नाही. म्हणून रुग्णाचे समुपदेशन केल्याशिवाय ही शस्त्रक्रिया तज्ज्ञ करत नाहीत. आज ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढती आहे. प्रॉस्टेटचा कर्करोग हा वाढत्या वयाचा कर्करोग आहे. त्यामुळे ही माहिती समाजात सर्वदूर पसरणे जरुरीचे ठरते.

dranand5@yahoo.co.in