आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम करताना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वेळेस घरून निघताना रानड्यांकडून आलेल्या आल्याच्या वड्याही घेऊन गेले. अमराठी मित्रमंडळात हा प्रकार फारच ‘पापिलवार’ झाला. साहित्य माहीत होतं, पण प्रमाण आणि कृतीबद्दल शंका होती. अलम दुनियेची माहिती असणा-या विकीपीडियावर पाककृती नसतात याची खात्री करून घेतली. तिथे हे काही मिळणार नाही, हे माहीत असायला खरंतर विकीविदुषी असण्याची गरज नाही, पण एकदा हे नाव मला पडल्यामुळे शोधून घेतलंच. मग म्यां अडल्या गाढवाने रानडेंकडे फोन केला. साक्षात नारायणानेच फोन उचलला. ‘नाना, आज आपल्या गप्पा आपण नंतर मारूया. मला आधी काकूची, आल्याच्या वड्यांची पाककृती हवीय.’ मी स्वयंपाकघरात घुसले याचा नानांना झालेला आनंद त्यांनी बोलूनच दाखवला. मी, ‘नाही हो, अमराठी मित्रमंडळाला पाककृती हवी आहे,’ असं म्हणून त्यातल्या त्यात प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला.
‘काकू कामात आहे आणि तुझी आजीसुद्धा वैतागलेली आहे. त्यांना फार त्रास देऊ नकोस,’ असं म्हणून नानांनी फोन काकूच्या हातात दिला. काकूने सगळी पाककृती सांगितली. तिच्या अनुभवातून छोट्याछोट्या, ब-याच उपयुक्त टिपा दिल्या. मग तिला विचारलं, ‘काकू, तुझा आवाज का असा दमलेला? ऑफिसात काही गडबड झाली का?’ तेव्हा काय ते रामायण समजलं. मोलकरीण आजारपणामुळे रजेवर गेली होती आणि मग ती हळूच आवाजात म्हणाली, ‘दोन दिवस फक्त आमटी-भात खा, असं म्हणता येत नाही. असो. नानांशी बोल.’ नानाच फोनवर आले. त्यांनी घाईघाईत तपकीर नाकात घुसवल्याचा आवाज आला.
‘काय नाना, काय म्हणता?’ ते वाटच पाहत होते. धबधबा सुरू झाला. ‘न सांगता मोलकरीण गेली रजेवर. म्हणे तिच्या पाठीचं काही तरी झालंय. चाळिशी नाही आली हिची आणि कमरेचं काही तरी झालंय म्हणते. माझी पंचाहत्तरी उलटली तरी मला अजून काही होत नाही. नाटकं सगळी. तर ती रजेवर म्हणून मी मदत करतो म्हटलं. मग बाजारात जाऊन मीच भाजी आणली. तेवढंच तुझ्या काकूचं काम कमी केलं, तर भाजी आणल्यावर ही चिडली, आजी गं तुझी. म्हणे, गवार आणि शेपू काय आणता? आधीच घरची कामं काय कमी आहेत का? नेहमी ताराबाई कामं करते ही. बाजारात चांगली गवार आली आणि ताराबाईला नेमकं तेव्हाच आजारी पडायचं होतं!’
‘नाना, माणूस आजारी पडणार नाही तर कोण? आमची यंत्रंसुद्धा आजारी पडतात.’ माझं बोलणं पूर्ण होण्याआतच नाना सुरू झाले, ‘आमच्या सूनबाईचं पाहा. घरच्या अडचणींमुळे एखादा दिवस ऑफिस बुडवलं तरी तिचे फोन सुरू असतात. नोकरी म्हटल्यावर जबाबदारी नको समजायला? पण ताराबाईला कोण शिकवणार? आम्ही काय नोक-या केल्या नाही का? सिक-लीव्ह म्हटल्यावर आम्हाला किती कागदी घोडे नाचवायला लागायचे. तुला हे समजलंच असेल आता.’ नाना बराच वेळ बोलत राहिले असते, पण मगाचची तपकीर आता काम करायला लागली होती. नाना जोरदार शिंकत होते. ‘नाना, मी काय म्हणते? काकूची नोकरी जबाबदारीची आहे, तिने तिचं काम चुकवलं तर कंपनीचं बरंच नुकसान होईल. ताराबाईचं काम थोडीच जबाबदारीचं आहे? तिचं काम खरं तर आपण कोणीही करू शकतो. तिच्या बाबतीत भा. रा. तांबेंची कविता फिट्ट आहे पाहा... मी जाता राहील कार्य काय?’ मी तेवढ्यात काव्य-शास्त्र-विनोदाचा प्रयत्न केला. नानांचा अजिबात मूड नव्हता. ‘तुझा टवाळपणा आत्ता नको सांगूस. या दोघींना काम पडतंय आणि तुला विनोद सुचताहेत.’
‘पण नाना, मी काय करू सांगा? तेवढाच तुमचा मूड सुधारायचा प्रयत्न केला. फोनवर मी काम करू शकत नाही आणि तुम्ही तसेही...’ आणि जीभ चावली. नाना घरात काम करणार नाहीत हे त्यांच्या तोंडावर कशाला बोलायला पाहिजे. हे ऐकल्यावर त्यांनी थोडी पडच खाल्ली. पण ते दाखवायचं कसं असा प्रश्न आला असावा. त्यांनी घाईघाईत फोन ठेवून दिला.
मी बाबांना फोन केला. ताराबाई आमच्याकडेही कामाला येतेच. बाबांनी उचलला, ‘हा कॉर्डलेस फोन बरा आहे. एकीकडे केर काढताना तुझ्याशी बोलता येतंय.’ बाबा केर काढताना कसे मजेशीर दिसत असतील याचं चित्र डोळ्यासमोर आलं. ‘बाबा, तुम्ही केर काढायला वाकलात की तुमच्या लुंगीनेच सगळी खोली साफ होईल.’ बाबा आधी मनापासून हसले. ‘तू फार जोक करू नकोस. ताराबाईची तब्येत सुधारत्ये, पण परिस्थिती फार बरी नाही. अद्वैत काल येतायेता तिच्याकडे जाऊन आला. डॉक्टरांनी तिला वाकून काहीही काम करायला मनाई केली आहे. निदान दोन महिने. स्पाँडिलायटिसची सुरुवात आहे. आता ती काम करणार काय आणि खाणार काय याचा विचार कर. या बायका तरुण वयात झेपतं म्हणून कामं करतात. दुसरा पर्याय त्यांच्याकडे नसतो. आपणही त्यांच्या तब्येतीचा विचार करत नाही. रोज एवढे जिने चढायचे, वाकून कपडे, भांडी, केर-लादी करायचं. मी मॉप वापरतोय, पण ताराबाईला पायपुसण्यानेच लादी पुसायला लागते.’ ‘आणि आता ती आजारी पडल्ये तर तिला ना आरोग्य-विमा, ना तिला सिक-लीव्ह. अद्वैत तिला थोडे पैसे देऊन आलाय; पण बाकीच्या घरून तिच्या नावाने शंखच सुरू आहे. रोज खुर्चीवर बसून, चांगलंचुंगलं खाऊनही आपण आजारी पडतो. अद्वैतला डेंग्यू झाला होता तेव्हा घरूनही काम करवत नव्हतं त्याला. सरळ पंधरवडाभर आराम केला, वर पुन्हा पगार सुरूच.
ताराबाईचं असं नाही. दांडी झाली की लोक पगार कापतात. पण तिचा मुलगा तसा बरा आहे. त्याच्या कुरिअर कंपनीतले लोकही मदत करत आहेत. आणि आपल्या बिल्डिंगमधले लोक भेटले की ‘या बाया अशाच’च्या पलीकडे काही नाहीच. माणूस आजारी आहे तर जरा सहानुभूती दाखवतील!’
बाबा एकदम सीरियसच झाले. मी म्हटलं, ‘तुम्ही दोघं घरी पार्टी का करत नाही? बाहेरून खायला आणा, चांगल्या चवीचं खाल्लंत की तुमचा मूड सुधारेल. अद्वैतच्या हातचं खाऊन तुम्ही किती पकाऊ झाला आहात पाहा.’ बाबांना अद्वैतच्या पाककलेबद्दल यथार्थ अभिमान आहे. ‘त्याला काही बोलू नकोस. काल नाना रानडेंनाही त्याच्या हातचा उपमा आवडला. उपमा खात खात पुन्हा ताराबाईला नावं ठेवत होते ते!’ बरोबरच आहे.
जिभेला हाड नाही तर स्पाँडिलायटिसचा त्रास कसा समजणार?
314aditi@gmail.com