आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Human Organ Donation By Asha Kulkarni, Rasik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोल देहदानाचे !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई, विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘दिलासा’ नावाची हेल्पलाइन व समुपदेशन केंद्र चालवले जाते. केंद्रात देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान या विषयांवर संपूर्ण माहिती आणि ‌विविध फॉर्म पुरवले जातात. तेथे अनुभवलेला प्रसंग- एका व्यक्तीने आपल्या स्वातंत्र्यसैनिक व देशभक्त असलेल्या वडिलांची देहदानाची अंतिम इच्छा पूर्ण करून वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या पित्याचा मृतदेह सोपवला. या घटनेनंतर त्या व्यक्तीच्या सगळ्या नातेवाइकांनी त्याच्याशी संबंध-नाते तोडून टाकले. कारण त्यांच्या मते, त्या व्यक्तीने अधर्माचे कृत्य केले. दोन-तीन वर्षांनंतरही त्यांच्यातील नातेच काय, संवादही संपलेले आहेत. त्या व्यक्तीच्या या दु:खावर हळुवार फुंकर घालून त्यांना दिलासा द्यावा, म्हणून देहदानाच्या विषयावर एक जाहीर कार्यक्रमच आयोजित केला. शरीररचनाशास्त्रातील तज्ज्ञ अधिकारी प्राध्यापकांनाच यावर भाष्य करून शंका निरसन करण्यासाठी निमंत्रित केले. कार्यक्रमाची तयारी झाली. कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून पत्रके वाटली, बोर्ड लावले, वर्तमानपत्रात बातमी दिली. आणि आश्चर्य म्हणजे, अपेक्षेपेक्षा अधिक उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या दिवशी ३१ व्यक्तींनी देहदानाचे फॉर्म घेतले. पुढील तीन-चार महिन्यांत तर ३८ देहदात्यांची नोंदणी झाली व त्यांना नोंदणी कार्डेही जारी झाली...
पाश्चात्त्य मेडिसिनचे जनक समजल्या जाणा-या हिपॉक्रॅटिसच्या काळापासून म्हणजेच ख्रिस्तपूर्व ४२० पासून शरीरशास्त्राच्या अभ्यासाचा इतिहास आहे. १६व्या शतकात मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी कबरस्तानात जाऊन थडग्यातून पुरलेले मृतदेह रात्रीच्या वेळी उकरून काढून त्यावर संशोधन केल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे दधीचि ऋषींना आद्य देहदाता मानले जाते. एकोणिसाव्या शतकात युरोपमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना फासावर चढवल्यावर त्यांचे मृतदेह वैद्यकीय संशोधनासाठी शरीरशास्त्राच्या अभ्यासकांना पुरवले जात. परंतु शरीरशास्त्राच्या विद्यार्थ्यांची संख्या आणि फाशी झालेल्या गुन्हेगारांची संख्या फारच व्यस्त होती. म्हणून मृतदेहांची मागणी पुरवण्यासाठी निरपराध भोळ्या लोकांना फसवून त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह विकण्याचा धंदा नव्हे, गंभीर गुन्हा करणारी टोळीच स्कॉटलंडमध्ये उदयाला आली. रातोरात माणसे नाहीशी होऊ लागल्याने त्यांचा हा गुन्हा प्रकाशात आला. हे प्रकरण त्या काळात फारच गाजले. पुढे १८३२मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये शवविच्छेदनाचा कायदा करण्यात आला. पुढे भारतात स्वातंत्र्यानंतर १९४९मध्ये बॉम्बे अॅनॉटॉमिकल कायदा करण्यात आला. १९७५-७६मध्ये त्यात योग्य सुधारणाही झाल्या. या कायद्यानुसार ज्या व्यक्तीला देहदान करायचे असेल त्या व्यक्तीने लेखी अगर तोंडी इच्छा व्यक्त केली असेल तर किंवा ज्या व्यक्तीच्या ताब्यात कायदेशीरपणे मृतदेह असेल त्या व्यक्तीला स्वत:च्या इच्छेनेही वैद्यकीय संस्थेला मृतदेहाचे ‘दान’ करता येते व असे देहदान अधिकृत वैद्यकीय संस्थेला स्वीकारण्याचा अधिकार असून त्याकरिता न्यायालय अगर पोलिस यांची परवानगी लागत नाही.
वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागात जेथे मृतदेह जतन करण्याची व्यवस्था असते, तेथे मृतदेह स्वीकारले जातात. महाराष्ट्रात नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न एकूण ३४ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. एका वैद्यकीय महाविद्यालयात जेथे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे सव्वाशे ते दीडशे विद्यार्थी शिकतात, तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी सराव करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, सर्जन संशोधन करतात; तेथे दरवर्षी ३० ते ३५ मृतदेहांची गरज भासते. ही गरज पूर्ण झाल्यासच अनुभविक शिक्षण (प्रॅक्टिकल एज्युकेशन) सर्वार्थाने प्रभावी होते. अन्यथा वैद्यकीय विद्यार्थ्यांना मानवी शरीराच्या मॉडेलवर प्रशिक्षण द्यावे लागते. वाढती लोकसंख्या, वैद्यकीय सेवेची वाढती गरज, वैद्यकीय महाविद्यालयांची व विद्यार्थ्यांची वाढती संख्या याचा विचार केल्यास मानवी मृतदेहांची मागणीही त्या प्रमाणात वाढणारच आहे. परंतु प्रत्यक्षात मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त आहे. आज मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या शहरांत देहदानाची चळवळ थोड्याफार प्रमाणात रुजली असल्याने तेथील वैद्यकीय महाविद्यालयांना पुरेसे मृतदेह उपलब्ध होतात. परंतु ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयांना गरजेच्या ३० ते ४० टक्केच मृतदेह उपलब्ध होतात. अशा वेळी मॉडेलवरच काम भागवावे लागते; ज्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या दर्जावर परिणाम होतोच. यासाठी वैद्यकीय शिक्षणासाठी व संशोधनासाठी म्हणजेच पर्यायाने समाजहितासाठी मरणोत्तर देहदान करणे आज अत्यंत गरजेचे झाले आहे.
महानगरात दररोज अनेक लोक अपघात, घातपात, गुन्हेगारी, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू पावतात; परंतु त्यांचे मृतदेह देहदानासाठी योग्य नसतात. तसेच एचआयव्ही/एड्स झालेले, गँगरीन झालेले, क्षयरोग अथवा डेंग्यू झालेल्या रुग्णांच्या देहाचे दान स्वीकारता येत नाही. कायद्यातील तरतुदीनुसार १८ वर्षांवरील कोणीही व्यक्ती स्त्री-पुरुष, तृतीयपंथीदेखील देहदान करू शकतात. ज्या व्यक्तीस देहदान करायचे असेल त्याने तसे इच्छापत्र आपल्या जवळच्या नातेवाइकांच्या ना हरकत सह्यांसह करून द्यायचे असते. मरणोत्तर देहदान करण्याची इच्छा असणा-या व्यक्तीचा मृत्यू नोंदणी करण्याआधीच झाला अथवा नोंदणी न करणारी मृत्यूशय्येवर जर एखाद्या व्यक्तीने मरणोत्तर देहदानाची इच्छा व्यक्त केली, तरी मृत व्यक्तीचे जवळचे नातेवाईक कायदेशीर तरतुदी पूर्ण करून मृताची इच्छा पूर्ण करू शकतात. मृत्यूनंतर मृतदेह लवकरात लवकर म्हणजे किमान सहा तासांच्या आत विभागाकडे सुपूर्द करावा लागतो. त्या वेळेस ओळखपत्र (नोंदणी कार्ड), नोंदणी क्रमांक आणि संबंधित डॉक्टरने दिलेला मृत्यूचा दाखला फॉर्म नं. ४अ ची मूळप्रत (याला cause of death certificate म्हणतात) ही कागदपत्रे बरोबर असावी लागतात. त्याशिवाय मृतदेह स्वीकारला जात नाही.
देहदात्याने जर नेत्रदान, त्वचादानाची इच्छा व्यक्त केली असेल तर मृत्यूनंतर दोन तासांच्या आत नेत्रदान व त्वचादान होणे गरजेचे असते. त्यासाठी ताबडतोब नेत्रपेढीला व त्वचापेढीला सूचना देऊन देहदानापूर्वी नेत्रदान व त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. देहदान झाल्यावर मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करून देह विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी दिला जातो. एका देहावर दहा विद्यार्थ्यांना वर्ष-दीड वर्ष अभ्यासक्रम करता येतो. अर्थात, नुसतेच देहदानाचे इच्छापत्र लिहून त्याची नोंदणी केली की देहदानाची चळवळ संपत नाही, तर खरी चळवळ त्यानंतरच सुरू होते. जवळच्या नातेवाइकांना विश्वासात घेणे, मित्रमंडळींना, शेजा-यापाजा-यांना आपल्या देहदानाच्या अंतिम इच्छेची कल्पना देणे, आपल्या मृत्यूनंतर भावनांच्या आहारी न जाता देहदानाचे कर्तव्य करण्यासाठी संबंधित व्यक्तींची मानसिकता तयार करणे आणि समाजाचे आपणावर असलेले ऋण फेडण्यासाठी मरणोत्तर देहदान करणे किती योग्य गरजेचे आहे, हे पटवून देणे जरी कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही.
antidowry498a@gmail.com