आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Human Relation By Swati Dharmadhikari

प्रेम देऊ, प्रेम घेऊ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य, बेट नसतोच
त्यात असतं दडलेलं विश्व
आणि विश्वाच्या प्रत्येक कणाशी असतं
आपलंही अस्तित्व निगडित...
एखादं मातीचं ढेकूळ असो की
असो कठीण कातळ कपार...
किंवा असो एखादं शेत तुमचं...
किंवा तुमच्या मित्राचं...
असतोच आपणही जुळलेले.
प्रत्येक मनुष्याचं, मानवतेचं संपणं-
खचवत जातं मलाही...
कारण त्याच्यातही असतोच ना ‘मी’ गुंतलेला
म्हणून मित्रांनो... नकाच विचारू-
कुणाच्या सर्वनाशाचा हा घंटानाद ते,
कुणाचाही मृत्यू... आपल्याच अंशाचा मृत्यू असतो...
ती घंटा आपल्यासाठीच तर असते वाजत!

जॉन डोंने या प्रसिद्ध कवीच्या कवितेचा हा भावानुवाद. ही कविता आठवायला निमित्त झालं जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेला आत्महत्येसंबंधीचा पहिलावहिला अहवाल, तोही १० सप्टेंबर २०१४ रोजी. हा दिवस ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून पाळला जातो. याच कारणासाठी एक संघटना स्थापन झालीय, जिचं नाव आहे ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध संघटना.’ या दोन्ही संघटनांनी जे वास्तव समोर आणलंय ते भयानक आहे. मानवाच्या सर्वाधिक उत्पादक वयोगटात जर मृत्यूची कारणं तपासली तर लक्षात येतं की आत्महत्या हे अशा वयातील मृत्यूचं दुसरं महत्त्वाचं, सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं कारण आहे. वयाच्या १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान सर्वात जास्त आत्मघाताचे निर्णय घेतले जातात.
एकूण आत्महत्या जरी पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळत असल्या तरीही आत्महत्या करून बघण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये प्रचंड जास्त आहे.
मुळात या विषयावर का बोलायचं? ‘चैतन्याच्या खाणी’मध्ये असलं काही गंभीर किंवा नकारात्मक का लिहायचं? याचं सरळ साधं उत्तर म्हणजे आयुष्यातलं चैतन्य हरवू नये म्हणून ते का आणि कसं हरवू शकतं याचा विचार करायला हवाच. पटतंय ना?
महाराष्ट्रात २०१३ मध्ये १६,१२२ आत्महत्या घडल्या. या आत्महत्या का घडल्या याचा आढावा घेतला तर सहज लक्षात येतं की नात्यांमधली पोकळी, एकटेपणा, नाती तुटणं याचबरोबर घरच्या कर्त्या व्यक्तीची व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार किंवा मानसिक शारीरिक छळ, दुर्धर आजार, मानसिक आजार, शेतक-यांच्या आत्महत्या अशी बरीच कारणं आहेत.
आत्महत्या खरं तर थांबवता किंवा टाळता येतात. वेळीच जर निराशा, औदासीन्य घरच्यांच्या लक्षात आलं तर ताबडतोब त्यावर उपचार घ्यायला हवेत. मुळात आपल्याकडे मानसिक आजार किंवा औदासीन्याकडेदेखील अजून पाहिजे तितक्या मोकळेपणानं बघितलं जात नाहीच. आधी हे सारं नाकारलं जातं. छे असं काही नाहीय, ‘ऑल इज वेल’ हेच आपण सांगत राहतो स्वतःलादेखील आणि इतरांनादेखील. जसा सर्दी-खोकला होतो तितकं मानसिक औदासीन्य हे सर्वच जणांना अनुभवायला येतं हे आपण मान्यच करत नाही. ताप आल्यावर जशी वैद्यकीय मदत सहज घेतली जाते तितक्या सहजपणे मानसिक आजारांसाठी डॉक्टरकडे जाणं घडत नाही, आणि याला कारण आपल्या चुकीच्या धारणा, अंधश्रद्धा. शिवाय घरच्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत यासाठी महिलांच्या डोक्यावर जे जबाबदारीचं भूत आहे, त्यामुळे तर कोणत्याही मानसिक समस्या असोत किंवा कौटुंबिक हिंसाचार, बाईने निमूट सहनच केले पाहिजे हा समज पिढ्यान््पिढ्या गांजत राहतोय! हे दडपण का? याबद्दल बोलायचं नाहीच का?
बोलते व्हा! हे म्हटल्याबरोबर पटकन मनात आलं असेल की महिलावर्ग तर बडबड करण्यात वस्ताद मानला जातो. पुरुष कमी बोलतात, त्यांनी भावना व्यक्त करणं म्हणजे बाईसारखं वागणं या संस्कारांमुळेच पुरुष व्यक्त होण्यात अडचण निर्माण होत असते आणि पुरुषांमध्ये मग हृदयरोग आणि आत्महत्यांचं प्रमाण जास्त आढळतं. अर्थात महिलांच्या आत्महत्या करण्याचे प्रयत्न दुर्लक्ष करण्यासारखे नाहीतच. नुसती बडबड करणं वेगळं आणि मनातली आंदोलनं स्पष्टपणे मांडणं, त्यावर उपाय शोधणं वेगळं.
आपल्या कुटुंब रचनांमध्ये झालेल्या बदलांमुळे म्हणा, शहरीकरणामुळे म्हणा, आणि एकूणच धावत्या जीवनशैलीमुळे असेल, प्रत्येक जण एका बेटासारखा अलग अलग होऊ लागलाय! आपल्याला कुणाची मदत नाहीय, आपण पृथक जगतोय हा विचार मनात एकटेपणाची भावना सतत जागृत ठेवतो. यातूनच औदासीन्य निर्माण होतं. आपल्यात आणि आपल्या भोवतालच्या लोकांमध्ये जर तारा जुळलेल्या असतील तर सौहार्द आणि आनंद निर्माण होत राहतो. मात्र काही जण असा मनसे संवाद करू शकत नाहीत किंवा मुद्दाम टाळतात. साधी विचारपूस करणं, कुणाशी दोन मिनिटं बोलत थबकणं मनावरचा ताण हलका करतात.
एकेकटे होत आपले ताण, घरातल्या समस्या बंद ओठांनी निमूटपणे सहन करणं अपरिहार्य नाही, हे ज्या दिवशी आपल्या सर्व सोय-यांना कळेल तो सुदिन. कारण समस्या हाताळून संपवायच्या त्या चिघळत ठेवण्यात काहीच हशील नसतं.
जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील मानवी नात्यांना आणि एकमेकाला आधार देत जगण्याला म्हणूनच महत्त्वाचं मानलं आहे. सुदैवाने आज संपर्कसाधनं आहेत, फेसबुकसारखं, व्हॉट्सअॅपसारखं माध्यम आपल्याला उपलब्ध आहे तेव्हा... ‘गेट कनेक्टेड’ एकाकी जगत, निराशा जोपासण्यापेक्षा व्यक्त होऊया, बोलूया. मनातल्या कुंठा, मनातले झाकोळ, काळोखतज्ज्ञांशी चर्चा करून दूर करायला हरकत नसावीच, त्याचबरोबर सख्ख्या मैत्रिणी-मित्रदेखील अशासाठी हक्काचे समजायला हवेत. नात्यांमध्ये असा मैत्रीपूर्ण मोकळेपणा आणू शकलो तर त्यासारखं सुख नाही. आपल्या भोवतालच्या विश्वात आपण होऊन जोडून घेणं, समरस होणं खूप मदत करतं एकाकीपणा कमी करायला! प्रेम देऊ, प्रेम घेऊ! सुरुवात आपल्यापासूनच करू! कारण हा घंटानाद आपल्याचसाठी आहे!