आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर देविका गेली...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका सकाळी साधारण नऊच्या सुमारास २२-२३ वर्षांची अतिशय सुंदर दिसणारी मुलगी आमच्याकडे आली. सोबत एक मठाचे महाराज, एक उद्योगपती आणि एक ज्येष्ठ पत्रकार. चहा-पाणी झाले. मी विचारले, कसे काय येणे केले? मग प्रश्न-उत्तरांचा तास चालू झाला.
तिचे नाव देविका (नाव बदलले आहे.) पाच-सहा दिवसांपूर्वी महाराजांच्या दृष्टीस पडली. कोण, कुठली, सर्व माहिती विचारताच तिने प्रामाणिकपणे सर्व सांगितलं. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. नव-याने-सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढलं आहे. जीवच द्यायचा तर पांडुरंगाच्या दारात जाऊन देऊ, म्हणून मी पंढरपूरला आले...
मी त्या मुलीला आत बोलावले, ‘तू आमच्या इथे राहणार का?’ असे विचारले. मुलगी खूपच उदास व निराश होती. तिने नुसतीच होकारार्थी मान डोलावली. सगळंच नीरस आणि यंत्रवत. जेवण नको, बोलणं तर अजिबातच नको. गप्प गप्प बसायची. कामाला पण हात लावायची नाही. एकदा तिला खूपच ताप आला. दवाखान्यात दाखवून आणलं. हिचा निग्रह औषध न घेण्याचा. नुसतीच झोपून राहायची. त्या दिवशी तिने सकाळपासून चहा घेतला नाही, म्हणून मी तिला चहा घेऊन गेले. तिला उठवून बसवलं. बशीत चहा ओतून तिच्या तोंडाजवळ नेला. खूप विनवून तो बशीभर चहा पाजला. तशी ती ढसाढसा रडू लागली. मी तिचे डोके मांडीवर घेतले. थोपटत राहिले. काही त्रास होतो का, विचारलं तर तिने मानेनेच नकार दिला. खूप खोदून-खोदून विचारलं, तेव्हा जी हकीगत पुढे आली, ती नुसतीच भयानक नव्हती, तर माणुसकीला काळिमा फासणारी आणि आईपणावरचा विश्वास उडणारी होती.
देविका विदर्भातली. एका लग्नात सास-यांनी तिला पाहिली. घराणं प्रतिष्ठित आणि श्रीमंत. वडिलांनी लगेचच होकार दिला. आठच दिवसांत लग्नही झाले. सहा महिने बरे गेले. नवरा एकसारखा आजारी पडू लागला. कसल्या तरी गोळ्या घेऊ लागला. देविका सातवी झालेली. तिला गोळीचे नावही वाचता यायचे नाही. नंतर तिलाही खूप ताप येऊ लागला. दवाखान्यात नेले. रक्त तपासले, तर निदान झाले, एचआयव्ही पॉझिटिव्ह. ती घरी आली. रात्री नव-याला विचारले. नव-याने तिलाच बेदम मारले. घराबाहेर काढले. तुझ्यामुळेच मला एचआयव्ही झाला, असा कांगावा केला. ती त्याच रात्री पळून माहेरी आली.
पण आईने तिला घराबाहेर थांबायला सांगितलं. ती सांगत होती, आई मला खूप तहान लागली आहे, भूक पण लागली आहे. आईने घराबाहेरच एका पत्रावळीवर जेवण वाढून दिले. वडील बाहेरगावी गेलेले. दोन भाऊ लहान घरात होते; पण सत्ता सर्व आईच्याच हातात. ती म्हणेल, तेच घरात होत असे. त्यामुळे वडील व भाऊ येऊनसुद्धा आता आपल्याला या घरात थारा नाही, हे तिने ओळखले. मारतेवेळी नव-याने धमकी दिली होती, बाहेर काही बोललीस तर तुला जिवंत ठेवणार नाही. तू कुठेही गेलीस तरी मी तुझ्या अंगावर अॅसिड फेकीन. ती खूपच घाबरली. नैराश्याच्या भरात तिने ठरवले की, आता पांडुरंगाच्या दारात जाऊन आयुष्य संपवायचे...
त्या पार्श्वभूमीवर तिला चहा पाजणे, मनाला अतीव समाधान देऊन गेले. जीवन संपवायला निघालेली देविका हळूहळू फुलू लागली. खूप हसू लागली. पण एक दिवस तिने अचानक घरी फोन केला. तब्बल चार वर्षांनी बापाचा आवाज ऐकला तसा तिचा बांध फुटला. तिला एक इच्छा होती की, आईने घरी ये म्हणावे. सगळ्या माणसांना भेटावे. एका आठवड्याने मोठी गाडी करून १०-१५ जण तिला भेटायला आले. तिची नवीन लग्न झालेली भावजय देविकाशी खूप छान बोलली. तिला मिठीत घेतले. प्रेमाने समजावले. पण आई आणि भाऊ गाडीतून खालीच उतरायला तयार नव्हते. भावजयीने विनवल्यावर आई आली. आई चार वर्षांनी दिसली म्हणून देविकाने पटकन मिठी मारली. पण आईने मिठीत तर घेतले नाहीच, पण ‘तू मला शिवलंस. आता मला एड्स झाला तर मी काय करू?’ म्हणून आकांडतांडव केले. भाऊसुद्धा तिला भेटले नाहीत. त्या भेटीचा एकूण परिणाम फार भयंकर झाला. देविका डिप्रेशनमध्ये गेली. औषध घ्यायचं नाकारू लागली. पर्यायाने जगणंच नाकारू लागली.
चार वर्षं फुलवलेलं आयुष्य एकाएकी कोमेजलं. अखेरचे सहा महिने देविका मानसिक रुग्ण म्हणून जगली. शेवटी शेवटी तर तिला कपड्यांची पण शुद्ध राहिली नाही. अखेर देविका गेली... बाकीच्यांचे सोडून द्या, पण एका आईने तरी सर्व गुणदोषांसहित निदान अशा कठीण परिस्थितीत देविकाला आधार द्यायला नको होता का? यातून समाज म्हणून आपण काही धडा शिकणार का? आदी प्रश्नांनी नंतर किती तरी दिवस माझी झोप उडवली...

dimple@palawi.org