आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Human Relationship By Dr.Vrushali Kinhalkar, Divya Marathi

अनौरस सुखाची आशादायी गोष्‍ट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘दाराशी पोरकं गोजिरं बाळ रडत असावं;
तसं अनौरस सुख अनेकदा येतं आयुष्यात.
उचलावं; तर ते आपलं नसल्याचं भय
अन्
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत अडकलेला आपला पदर.’’
संजीवनी बोकिल या मैत्रिणीची ही कविता.
‘अनौरस सुख’ या शब्दाशी अडखळायला होतं; पण कविता शंभर टक्के पटून, आवडून जाते. अलीकडेच सहजपणानं पाहिलेला, ‘कभी अलविदा ना कहना’ चित्रपट आठवतो. अनौरस सुखाचा प्रतिध्वनी मनात उमटून जातो. विवाहबंधनाच्या पलीकडचं नातं. हिंदी चित्रपटांमधून हा विषय आलेला आणि मला साधारणत: तीन चित्रपट आठवले. ‘गुमराह’ 1963चा, ‘सिलसिला’ 1981चा आणि ‘कभी अलविदा ना कहना’ 2003चा.
मला जाणवलं ते असं की, अशा नात्यांबद्दलचं आकर्षण तसं सर्वपरिचित आणि त्रिकालाबाधित. या नात्यांमध्ये गुंतली जाणारी सगळी माणसं तीच अन् तशीच- परिणाम तसेच, पण लख्खपणे लक्षात आलं ते असं की, या तिस-या चित्रपटानं काही गोष्टी फार लक्षणीय आणि कौतुकास्पद दाखवल्या आहेत.
बाईचं सक्षम, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं, परिस्थितीला नवं रूप देत आहे अन् हे फारच आशादायी वाटलं. बंधनं तोडू पाहणा-या नात्यांमध्ये गुंतणारी माणसं तीच; पण त्यांच्या भोवतालची, नजीकची माणसं बदलत आहेत. 1963मध्ये आलेल्या ‘गुमराह’मध्ये मृत बहिणीच्या नव-याशी लग्न करणारी नायिका स्वत:च्या प्रेमाचा त्याग करते, त्याचं कारण भाच्यांना सावत्र आई त्रास देईल, ही भीती. भाऊजीचं रूपांतर नव-यात झालं की, तो प्रचंड हक्क दाखवू लागतोच. पत्नीवर पाळत ठेवण्यापर्यंत ही मजल जाते आणि नायिका मात्र प्रेमाचा त्याग करूनही आरोपीच्या पिंज-यात! पुरुषाची स्वामित्वाची भावना अन् स्त्रीचा अंगभूत सोशिकपणा यात चित्रपट संपतो. नायिकेचा प्रियकर अविवाहित असल्यामुळे दुस-या संसारातली बाजू या चित्रपटाला नाही.
1981च्या ‘सिलसिला’मध्ये विवाहापूर्वीच गर्भवती राहिलेली नायिका, प्रियकराच्या आकस्मिक निधनानंतर प्रियकराच्या भावाला स्वत:शी लग्न करायला भाग पाडते. मृत भावाचा अंश तिच्या उदरात वाढतोय, या नाजूक भावनेला बळी पडून भावाच्या अनपेक्षित मृत्यूने नीट न सावरलेला हा माणूस स्वत:च्या प्रेमाचा त्याग करून तिच्याशी लग्न करतो. ज्या गर्भाप्रीत्यर्थ हे लग्न होतं, तो गर्भच अपघातामुळे खुडला जातो. खरं तर या विचित्र लग्नाचं प्रयोजन इथेच संपतं; पण विवाहबंधन उरतं. पुढे प्रेयसी भेटल्यामुळे पुन्हा हा नायक बिथरतो. हे प्रेमी जीव भेटतात, ओढ कायमच असते; पण आता एकमेकांना भेटताना दोघांनाही अपराधी भावनेचं अस्तर जाणवू लागतं. विवाहबंधन तोडावं, तर मित्र नातेवाईक, प्रतिष्ठा या सा-यांपासून दूर जावं लागणार, हेही लक्षात येतं.
प्रेयसीच्या पतीचा अपघात आणि पत्नीच्या पोटातला नवा गर्भ या अनौरस सुखाला पूर्णविराम देण्यास कारणीभूत ठरून चित्रपट संपतो. या चित्रपटातील पत्नीची भूमिका मात्र खटकत राहते. ती स्वत: प्रेम अनुभवलेली बाई. विवाहापूर्वीच गर्भवती राहण्याइतकी आधुनिक. अकस्मात प्रियकराचं निधन होतं आणि ज्या दिराने आपल्याशी स्वत:च्या प्रेमाचा त्याग करून लग्न केलं, त्याच दिराचं विवाहपूर्व प्रेम, ती ओढ, ते आकर्षण ती का समजू शकत नाही? स्वत:कडे प्रचंड सहानुभूतीने सर्वांनी बघावं, ही तिची अपेक्षा जरा अवास्तव वाटते. ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटानं मात्र ब-याच नव्या भूमिका मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
इथं दोन घरं आहेत. सुस्थित खेळाडू नायक, निराशेच्या गर्तेत अडकलेला. बायको यशस्वी उद्योजिका. दुस-या घरात मूल न झालेली नायिका अन् यशस्वी उद्योजक नवरा. हे सगळे अतिश्रीमंत अन् परदेशात राहणारे भारतीय लोक. मूल नसणारी नायिका अन् तो खेळाडू नायक समान निराशेच्या भावनेतून एकत्र येतात. या नायकाची आई अन् नायिकेचा सासरा, त्यांना एकत्र पाहतात. सास-यांना हृदयविकाराचा झटका. मृत्यू आसपास घोटाळत असताना नायिका सास-यांची माफी मागते. इथला संवाद फार लक्षणीय आहे. सासरे म्हणतात, ‘दोष तुम्हारा नही है। मौत और मोहब्बत दोनो बिनबुलाये मेहमान होते है। तुम मेरे बेटे को छोडकर जाओ क्यूँकि तुम उससे प्रेम नही करती हो। बिना प्रेम के साथ रहना ठीक नही।’ इकडे नायक पत्नीला सत्य सांगतो, तेव्हा ती शांतपणे उत्तरते- तुला हे घर सोडावं लागेल. अन् खाड्कन त्याच्या मुस्कटात मारते.
मी हा चित्रपट पाहिला तेव्हा या प्रसंगाला खूपच टाळ्या मिळाल्या, हे आवर्जून नोंद करण्यासारखे! पुढे अजून एक नवी गोष्ट हा चित्रपट दाखवतो. नायकाची आई सुनेला म्हणते की, माझ्या मुलाने असं विवाहबाह्य नातं जोडताना मला विचारलं नाही. तूदेखील त्याला घराबाहेर काढताना मला विचारलं नाहीस; परंतु माझा जीव माझ्या नातवामध्ये अडकलाय. मला इथे राहण्याची तू परवानगी देशील का? अन् सून सासूला मिठीत घेते! जगभरातील बाईच्या जगण्यात मला हा खूप महत्त्वाचा टप्पा वाटला. चित्रपट आवडला तो केवळ याकरिताच!
विवाहबाह्य नात्यात अडकलेल्या मुलाचा अपराध कानाआड करून जगणा-या सासवा खूप पाहिल्या. ख-या जगण्यात त्या दिसल्याच; पण कथा-कादंबरी-चित्रपटांतदेखील दिसल्या. आजवर अशी स्त्री मात्र कुणी दाखवली नव्हती. हे सासू - सुनेचं नातं - माझ्या आतल्या स्त्रीला सुखावून गेलं. आश्वस्त करून गेलं. सासू जर अशी भक्कमपणानं पाठीशी उभी राहिली, तर नव-याचं परस्त्रीमध्ये गुंतणं सहन करण्याची केवढी शक्ती बाईला मिळेल! एरवीदेखील शतकानुशतके प्रत्येक काशीबाईनं तिच्या बाजीरावाची मस्तानी सहनच केलेली आहे. पण, हे सहन करणं कसं, तर स्वत:मध्ये एक न्यूनगंड पोसून; माझ्यातच काही कमतरता आहे म्हणून मस्तानीकडे त्याचं मन ओढ घेतं, ही भावना. पण ‘कभी अलविदा’मध्ये ती यशस्वी उद्योजिका कुठलाही न्यूनगंड न रुजू देता, स्वत:च्या मुलासोबत व सासूसोबत नव्या छान आयुष्याकडे पाहते. आपल्या पतीसह नवं आयुष्य जगू पाहणा-या त्या परस्त्रीला ती म्हणते, शिक्षा तर तुला आता मिळेल, जेव्हा तू या माझ्या नव-यासह आयुष्य जगशील.
स्त्रीचं नवं रूप दाखवणारा हा चित्रपट मग केवळ चित्रपट उरत नाही. स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होऊन राहतो. या तिन्ही चित्रपटांचा पुनश्च विचार केल्यावर जाणवलं की, अनौरस सुख शोधणा-या या नात्यांमध्ये गुंतणारे जीव तेच अन् तसेच असले, तरी त्यांचा भोवताल बदलतोय. आणि मला वाटतं, हे खूप आशादायक चित्र आहे.


vrushaleekinhalkar@yahoo.com