आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Increasing Attack On Freedom Of Expression By Sanjay Pawar

लेखक मेला! कुणी नाही पाहिला!!!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्माला येणारा माणूस मरणार, हे शरीरविज्ञान सांगते. मरणार हे निश्चित. कधी? कसं? कुठे? हा सस्पेन्सचा भाग. इथे देव, नियती वगैरे लोकांची एंट्री होते. जगण्यापेक्षा मरण लांबविणे यात माणूस अधिक ‘जगतो’ खरं तर.
पण या माणसांतच, एकाच आयुष्यात अनेक आयुष्ये जगणारे काही जण असतात. त्यांत लेखक, चित्रकार, नट, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अशा पद्धतीचे लोक मोडतात. हे प्रतिसृष्टी तयार करतात. असेच वरच्या दर्जाचे साहित्य व हे कलाप्रकार मूठभरांच्या हातात होते, तेव्हा या जमातीला मान होता. त्यानंतर या सृष्टीत सुष्ट, दुष्ट, अन्यायी, विषम, भेद दाखवणारे रोजच्या जगण्यातलं लिहू लागणारे सर्वस्तरीय लोक निपजले, तेव्हापासून कल्पनाविलासाचे पतंग कापून, लेखन जमिनीवर आलं.

लेखन जमिनीवर आल्यावर मग समाजात क्रिया-प्रतिक्रिया उमटू लागल्या. धर्म, रीतिरिवाज, परंपरा, संस्कृती, लिंगभाव, विषमता, यावरची चिकित्सा या सर्व गोष्टींत ज्यांचे हितसंबंध गुंतलेत, त्यांना ते अडचणीचे ठरू लागले. त्यात हा देश ‘जंक्शन’ स्टेशनसारखा. कुठून तरी आलेले, कुठे तरी जाणारे जंक्शनवर भेटतात, थांबतात, वाटा बदलतात, तसे अनेक धर्म, पंथ, समुदाय जाती, जमाती, भाषा, परंपरा इ. इ. असलेला हा देश. पायाखालचा भूभाग सोडला तर वरती सगळं वेगळं, संमिश्र, विरोधी. पायाखालच्या भूभागावरूनही इथे वरचं वाटप होतं.
या भूमीचा इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र जे जे म्हणून काही इथे आहे, ते एकही विशुद्ध स्वरूपात नाही. एका अर्थाने ही संकराचीच भूमी आहे! कुठल्याही पद्धतीचं संकर इथे चांगलं निपजतं. पण शुद्धतेच्या आग्रहात रमणारे, ही वस्तुस्थिती जाणून न घेता बिनपुराव्याची शुद्धिपत्रं वाटत असतात.

हा देश हिंदूंचा आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, म्हणून काही लोक बेंबीच्या देठापासून ओरडत असतात. पण त्यांना आपली नाळ हीच खरी नाळ, असं सांगण्यात गर्व असतो, जो या संकटाच्या भूमीत विपरीत ठरतो. या देशाने विसाव्या शतकात जगरहाटीप्रमाणे स्वराज्य, स्वातंत्र्य मिळवून हा देश सीमांकित केला, त्याला संसदीय लोकशाही व्यवस्था दिली, ज्यात सर्वांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मूलभूत हक्कात दिले. कारण, विविधतेतून एकता हाच या भूभागाचा नैसर्गिक धर्म आहे.
गेली पन्नास-साठ वर्षे हा देश तसाच चालला. पण २०१४च्या मेमध्ये मोदी सरकार नावाची गोष्ट सत्तेवर आली आणि हा देश उलट्या पायाने चालू लागला! मंगळावर यान सोडलं तरी विज्ञानाऐवजी अज्ञान, शरीर, भौतिक, पदार्थविज्ञानापेक्षा चमत्कार, दंतकथा, पुराणकथा यांना अचानक ऊत आला! त्यातून जगात आज जे काही प्रगत आहे ते आपलंच होतं, आपणच ते जगाला दिलं, असं ‘सुपर कम्प्युटर’ही बोलू लागले, तेव्हा हा तथाकथित हिंदू व्हायरस किती प्रखर आहे, हे कळून चुकलं!

आम्ही म्हणू ती संस्कृती, आम्ही म्हणू तो इतिहास, आम्ही मान्य करू ती कला, आम्हाला पचेल तेच लेखन, आम्हाला रुचेल तेच नाटक-सिनेमा, अशी एक झुंडशाही सुरू झाली.
अशा या झुंडशाहीने तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांचा जीव घेतला! जीव घेतला म्हणजे, जीव की प्राण असलेली लेखकाची लेखनकलाच झुंडीने जाळून टाकली. आपल्या प्रतिभेचं कलेवर पाहून उद्विग्न झालेल्या पेरुमल यांनी देहातला ‘लेखक’ मारून टाकला. लेखणी मोडली. कवचकुंडलं काढून घेतलेल्या कर्णासारखा तो नि:शस्त्र झाला.

आता आपल्या समाजात थोर थोर लोक प्रत्यक्ष मूत्यू पावले तरी त्याची दखल समाज घेतोच, असे नाही. तिथे पेरुमलांची उच्च कोटीची मृत्युवार्ता किती लहर उमटवणार? कारण आधीच आमचा समाज स्थितिशील, परंपरावादी, कलेविषयी प्रचंड अनास्था असलेला आणि कायम पराभूत न्यूनगंडात राहिलेला, तुकड्या-तुकड्यात विभागलेला, तिथे एका कोप-यात एक लेखक काही प्रतीकात्मक कृती करतो त्याची दखल बातमीच्या शोधातली माध्यमं वगळता कुणी घेतली? आपल्या अमृताते वगैरे पैजा जिंकणा-या मराठी साहित्यिकांनी तरी त्याची दखल घेतली का? कशी घेणार? कारण राजकारणी साहित्यिकांना ‘बैल’ म्हणोत की अनुदानासाठी ताटकळत ठेवोत, बिनकण्याचे साहित्यिक ‘बिनकण्यालाच’ सर्वसमावेशक लवचिक म्हणून गौरवतात. आनंद यादव यांचाही असाच पेरुमल झाला होता. त्यांच्या पुस्तकावर आक्षेप घेतला, संमेलन उधळायची धमकी संतसंप्रदायी वारक-यांनी दिली. यादव झुकले, माफी मागितली, पुस्तक मागे घेतले, तरीही संमेलन रिकाम्या खुर्चीने झाले! पेरुमलांच्या आधीच वधस्तंभावर नेऊन लेखकाची महाराष्ट्रात हत्या झाली होती. पण सर्व व्यवहारासोबत, साहित्य व्यवहारही चालू राहिले.
यादवांचीच शाळा घेण्यात आली!
जिथे यादवांचं साहित्यिक मरण साजरं केलं गेलं, तिथे पेरुमलला कोण श्रद्धांजली वाहणार? उलट मराठी साहित्यासह समाज, माध्यमं, प्रशासन, यातल्या ‘हिंदू राष्ट्र’वाल्यांना आतून आनंदच होतोय!! संमेलनं भरताहेत, अध्यक्ष निवडले जाताहेत. ‘आविष्कार स्वातंत्र्याची’ प्रत्येकाची स्वत:ची अशी रेसिपी बनवली जातेय!
यादवांनी ‘संत तुकारामांबद्दल’ वावदूक लिहिलं, हा आरोप; तर पेरुमल यांचा गुन्हा, त्यांनी त्यांच्या ‘मधोरुबगन’ कादंबरीत देवस्थानाच्या उत्सवात ‘बीज’ दुस-या पुरुषाकडून घ्यायला तयार होणा-या अपत्यहीन स्त्रीची कहाणी रचली, हा. अलीकडच्या भाषेत ‘वन नाइट स्टँड!’ आता या संकराच्या भूमीत लैंगिक वैचित्र्यांच्या गोष्टींचा महापूर आहे. काही वर्षापूर्वी अनाहत नावाचा अमोल पालेकरांचा सिनेमा साधारण, याच कथानकाशी समांतर होता, जो एका हिंदी नाटकाचाही आशय होता.

हिंदू पुराण, इतिहास, देव, देवता यांच्या कहाण्यांत अशा लैंगिकतेचे विविध प्रकार आढळतात. आता महाभारतात द्रौपदी पाच पतींसोबत राहत होतीच ना? मग आज एखाद्या लेखिकेने/लेखकाने पाच पतींसह राहणारी स्त्री दाखवली, तर काय करणार आपण? कृष्णाची राधा, मीरा, इंद्राची वेषांतरे, कुंतीचा ‘सूर्य’पुत्र, हनुमानाच्या घामातून अपत्यप्राप्ती अशा विविध गोष्टी आहेत. प्रसंगी त्या चावट आहेत. भारतीय लघुचित्रात तर पोर्नोग्राफीच चितारलीय. वात्स्यायन, खजुराहो हे सगळं काय आहे? बरं हे सगळं विरोधात नेण्याचं काम कोण तर साधू, बैरागी करणार! हे ब्रह्मचारी चार, दहा मुलं पैदा करा, असा आदेश देणार. आता या ‘मेक इन इंडिया’साठी किती स्किल्ड लेबर लागेल, याची मोदींनाही कल्पना असायची शक्यता नाही!
साक्षर लोकांचा निरक्षर लोकांनी असा झुंडीने पराभव करणे यासारखी शरमेची गोष्ट नाही. उन्माद माणसाला किती व्यभिचारी बनवतो! पण व्यभिचार फक्त लैंगिकतेशी जोडणा-या समाजात आणखी दुसरं काय होणार?
पेरुमलच्या मागोमाग ‘मेसेंजर ऑफ गोड’च्या निमित्ताने केंद्र शासनाने सेन्सॉर बोर्ड अध्यक्षा लीला सॅमसन यांना राजीनामा देण्यास भाग पाडून, त्वरित तिथे भाजप, हिंदू राष्ट्र ‘समर्थक’ कलावंतांची(?) वर्णी लावून टाकली! नवे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी डेव्हिड धवन, गोविंदासह, ‘सरकाइलो
खटिया जाडा लगे’ टाइपातले गीत सिनेमात टाकून दहा/बारा वर्षांपूर्वीच ‘हम दो हमारे दस’ हा संदेश दिला होता! त्यामुळे इथून पुढे सिनेमात पाया पडणे व अष्टपुत्र सौभाग्यवती भव, कंपल्सरी होऊ शकते. हिंदू स्त्रियांनी आपली जननक्षमता वाढवण्यासाठी पतंजलीकडे विशेष जडीबुटी मागावी. मात्र होणा-या मुलांना लवचिक कणा, अधू दृष्टी, स्मरणरंजन, परंपरा अभिनिवेश असे गुण असतील हे बघावे. अन्यथा पेरुमल, यादव यांचा पुनर्जन्म व्हायचा! जेनेरिक बियाण्यांना विरोध करणा-यांनी इथे त्याचा वापर करून आपल्याला हवे तसे ‘वाण’ तयार करून घ्यावे.
काहींना बदल मातीतून कळतो, तर काहींना हवेतून! पेरुमलच्या मृत्यूनंतर घुमानला ‘घुमं’ संमेलन होईल, पण आता बेळगावी होणा-या नाट्यसंमेलनात ‘बाळासाहेब ठाकरे’ नगरी उभारून त्यात हे संमेलन होणार. साहित्यिकांना बैल म्हणणारे व मनगटशाहीने नाटकं बंद पाडणा-या वा स्वत:च्या फतव्याने चालू ठेवणा-या बाळासाहेबांचा सन्मान हीच आमची पेरुमलला श्रद्धांजली!

writingwala@gmail.com