आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Increasing Influence Of Hindi By Dr.Sunilkumar Lawate

‘हिंदी ’ हैं हम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांच्या प्रवासानंतर मागे वळून पाहताना लक्षात येते, की व्यवहार, वापर, उपयुक्तता, अनुवाद अशा अनेक अंगांनी हिंदी केवळ ‘आंतरभारती’ नव्हे तर विश्वभारती भाषा होऊ पाहात आहे.

हिंदी भारताची राष्ट्रभाषा व्हावी, असं महात्मा गांधींना मनापासून वाटायचं. त्यामुळे भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्यांना स्वातंत्र्याचा आनंद होता खरा; पण देशाची राष्ट्रभाषा आपण हिंदी करू शकलो नाही, याचं शल्य नक्कीच त्यांच्या मनात होतं. म्हणून ते स्वातंत्र्यानंतर एकदा म्हणाले होते की, ‘राष्ट्रभाषा के बिना मेरा देश गँुगा (मुका) है’... रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन स्थापन केलं, तेव्हा डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी यांची हिंदी शिक्षक म्हणून निवड करून या भाषेविषयीचं ममत्व व महत्त्व स्पष्ट केलं होतं. साने गुरुजींनाही असं वाटायचं की, या देशाची राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी हिंदी ही एकमेव भाषा आहे. भारत स्वतंत्र झाला. नंतर आपण देशाची घटना बनवली. राष्ट्रभाषा ठरविण्याचा प्रश्न आला तेव्हा उत्तर भारत आिण दक्षिण भारतातील भाषिक अंतर लक्षात घेऊन आपण हिंदीस राजभाषा बनवून देश संपर्काची भाषा म्हणून निवडली. आज स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांच्या प्रवासानंतर मागे वळून पाहताना लक्षात येते, की व्यवहार, वापर, उपयुक्तता, अनुवाद अशा अनेक अंगांनी हिंदी या देशाची ‘आंतरभारती’ भाषा मात्र नक्कीच झाली आहे.
सन २०११च्या जनगणनेनुसार या देशात सुमारे ४४ कोटी लोक हिंदी भाषी आहेत. याचा अर्थ, देशातील ४४% लोकांची ‘प्रथम भाषा’ हिंदी आहे. अंदमान, निकोबारसारखे केंद्रशासित प्रदेश आणि दिल्ली, बिहार, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांची ‘प्रादेशिक भाषा’ हिंदीच आहे. अन्य प्रांतात हिंदी बोलणारे, अभ्यास करणारे, शिकणारे, समजणारे अशा अनेक अंगांनी पाहू लागू तर हिंदी या देशातील जवळजवळ सर्वांना येणारी, समजणारी भाषा बनली आहे. सिनेमा, दूरदर्शन, रेडिओ चॅनेल्स, वृत्तपत्रे यांच्या वाचक, दर्शक, श्रोता संख्येवरूनही ते सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होतं.

आपल्या देशांची सर्वोच्च सभा असलेल्या संसद आिण राज्यसभेतील अधिकांश चर्चा, ठराव, संवाद हिंदीतूनच होत असतात. शिक्षणाचे माध्यम म्हणून हिंदीचा वापर कमी होतो आहे. आंतरभारतीय हिंदीपुढचे ते आव्हान आहे. हिंदी ज्ञानभाषा बनवणे, तिचा सर्व स्तरावर अधिक वापर करणे यातूनच तिचे आंतरभारती रूप टिकवता येईल. आजही आपल्या देशातील सर्वाधिक खपाची दैनिके ‘जागरण’, ‘हिंदुस्तान’ आणि ‘भास्कर’ असून ती हिंदी दैनिके होत. केंद्र व राज्य शासनाचा एकमेकांशी होणारा पत्रव्यवहार जसा हिंदीतून हाेतो, तसाच ताे देशोदेशींच्या राजदुतावासांशी होणारा संपर्क ‌व्यवहार हिंदीतूनच होतो. तसा करणे घटनेनुसार बंधनकारकही आहे. जगात हिंदी हीच ‘भारताची भाषा’ म्हणून मान्यता पावली आहे. जगातील सुमारे १२५ देशांतील (अमेरिकेतील अधिकांश विद्यापीठांतून हिंदी शिकवली जाते.) विद्यापीठांतून भारतीय भाषा म्हणून हिंदीचेच अध्ययन, अध्यापन होत असते.

हिंदी भाषा आिण सािहत्याचं वर्तमान विकसित रूपही हिंदी हीच ‘आंतरभारती भाषा’ असल्याचं ठासून सांगतं. भारतीय ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, केंद्रीय वा प्रदेशीय विद्यापीठे, राष्ट्रीय बँका, जीवन बीमा निगम, भारतीय भाषा संस्थान यांतून हिंदी भाषेच्या माध्यमातून हा देश अखंड व एकसंध ठेवण्याचं मोठं कार्य होत आहे. राजकीय मतभेद असताना विविध भाषा, लिपी, संस्कृती, परंपरा, जाती, धर्म असलेला हा देश राष्ट्रीय एकात्म भावनेनं एकवटून विकसित होतो. याला जोडणारे एकमात्र ‘आंतरभारती सूत्र’ हिंदीत आहे. दोन भिन्न भाषी राज्यांत हिंदीच एकमेकांना संवादाने जोडते. दक्षिण भारतातील अधिकांश नागरिकांना सिनेमा, दूरदर्शनमुळे हिंदी समजते. तोडके-मोडके हिंदी ते बोलू शकतातच.

हिंदी भाषा आणि साहित्याचा सेतू म्हणून कार्य करणारी ‘भारतीय ज्ञानपीठ’ ही संस्था. ती भारतातील श्रेष्ठ साहित्य, साहित्यकार निवडते. त्या निवडीचे माध्यम हिंदीच असते. प्रादेशिक भाषांतील श्रेष्ठ साहित्य हिंदीत आल्याशिवाय त्याला राष्ट्रीय मान्यता मिळत नाही. प्रादेशिक भाषेतील साहित्य कृती वा साहित्यकार ‘आंतरभारती’ झाल्याशिवाय म्हणजे, त्याचं साहित्य हिंदीत वा अन्य प्रादेशित भाषांत गेल्याशिवाय तो ‘आंतरभारती साहित्यिक’ होत नाहीत. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे दहा साहित्यकार हिंदीचे आहेत. भारतीय ज्ञानपीठ मिळालं की ती कृती वा साहित्यकाराचं साहित्य मोठ्या प्रमाणात हिंदीत येतं. आज अधिकांश ज्ञानपीठ विजेत्या साहित्यकारांच्या प्रसिद्ध सािहत्यकृती हिंदीत उपलब्ध आहेत. तीच गोष्ट साहित्य अकादमीची. ही संस्था सर्व भारतीय भाषांतील श्रेष्ठ साहित्यकार व साहित्यकृतीची दरवर्षी निवड करते व त्या साहित्यकृतीची भाषांतरे अन्य भारतीय भाषांतून करून घेते. त्यात प्राधान्यक्रमाने भाषांतर होते ते हिंदीतूनच. भारतीय ज्ञानपीठ मिळवणारे मल्याळम साहित्यिक जी. शंकर कुरूप यांचे ‘ओटक्कंुषल’(काव्य), बंगाली कथाकार ताराशंकर बंदोपाध्याय यांची ‘गणदेवता’(कादंबरी), कन्नड कवी डॉ. कु. वें. पुट्टप यांचे ‘श्री रामायण दर्शनम्’(महाकाव्य), उमाशंकर जोशी या गुजराती कवीचे ‘बिशीथ’ काव्य, फिराख गोरखपुरींचं उर्दू काव्य ‘गुल-ए-नग्मा’, तेलुगू कवी विश्वनाथ सत्यनारायण यांचे ‘रामायण कल्पवृक्षम्’, बंगाली कवी विष्णू डे यांची कविता ‘स्मृति सत्ता भविष्यत्’ अशा कृती वा त्यांचे काही अंश आपण हिंदीत वाचू शकतो. नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाने तर ‘आंतरभारती पुस्तकमाला’ हिंदीत प्रकाशित केली असून त्यात ‘आधुनिक तामिल कहानियाँ’, ‘इक्कीस बांग्ला कहानियाँ’ अशा सर्व भाषांतील कथा हिंदीतून वाचता येतात. ‘कोसला’, ‘ययाति’, ‘मृत्युंजय’, माहिम की खाडी’ या मूळ मराठीत गाजलेल्या कादंबऱ्या, विजय तेंडुलकरांची अनेक नाटके, कुसुमाग्रजांचे ‘नटसम्राट’, शिवाय ‘भारतीय साहित्यमाला’, ‘भारतीय साहित्य निधी’मधून कितीतरी मोठे सर्व भाषी साहित्य हिंदीत उपलब्ध आहे. तसेच हिंदीतील कितीतरी श्रेष्ठ साहित्य अन्य भारतीय भाषांत उपलब्ध आहे. तसेच हिंदीतील कितीतरी श्रेष्ठ साहित्य अन्य भारतीय भाषांत उपलब्ध आहे. मराठीतच पाहायचे तर श्रेष्ठ हिंदी कथा, कादंबऱ्या, काव्य, नाटक सर्वपरिचित आहे ते भाषांतरांमुळे.
हिंदीत भारतीय भाषा कोश मोठ्या संख्येने प्रकाशित झाले आहेत. उर्दू, मराठी, कन्नड, आसामी, गुजराती, तेलुगू, तामिळ, मल्याळम, काश्मिरी, पंजाबी शब्द पाहायचे, समजून घ्यायचे तर त्या भाषांचे हिंदी कोश उपलब्ध आहेत. संगणकाच्या या युगात तर कोणत्याही भाषा, लिपीतील साहित्य एका क्लिकद्वारे आपणास हिंदीत उपलब्ध करून देणारी सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाली आहेत. गुगलवर तर सर्व भाषांतील ज्ञानसामग्री आपणास युनिकोडमुळे हिंदीत उपलब्ध झाली आहे. इंग्रजीचा अनुवाद सॉफ्टवेअरमुळे हाताचा मळ झाला आहे.

महाराष्ट्रातील वर्धा इथे स्थापन झालेले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ जगभरच्या लोकांना हिंदी शिकवण्यास सज्ज आहे. मॉरिशस इथे भारत-मॉरिशस सहकार्यातून ‘आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय’ विकसित झाले असून त्या द्वारे हिंदी आता केवळ ‘आंतरभारती’ न राहता ‘विश्वभारती भाषा’ बनण्याकडे कूच करत आहे. तिच्या माध्यमातून यापूर्वी भारत, मॉिरशसशिवाय अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, सूरिनाम, त्रिनिदाद, टोबॅगो इथे ‘विश्व हिंदी संमेलने’ संपन्न झाली आहेत. या सचिवालयामार्फत ‘विश्व हिंदी पत्रिका’ दरवर्षी प्रकाशित होत असते. तिच्या माध्यमातून जगभर हिंदीच्या प्रचार, प्रसार, संशोधन, अध्ययन, अध्यापन, प्रकाशन कार्य नियमितपणे होत असते. चेक, मेंडिरिन, रशियन, फ्रेंच, जर्मन, जपानी भाषांचे हिंदी कोश उपलब्ध असल्याने केवळ हिंदी येत असल्यामुळे जागतिक बाजारात पाय ठेवणे भारतीयांना शक्य होते. आता मोबाइल्समध्ये या वा भारतीय भाषांचे हिंदी कोश उपलब्ध होत आहेत.
हिंदी ‘आंतरभारती’ वा ‘िवश्वभारती’ होण्याचे आणखी एक कारण आहे. आज अनेक विश्वभाषी वा भारतीय भाषांतील साहित्य कृतींवर हिंदी चित्रपट अथ‌वा धारावाहिक मालिका तयार होत असून, त्या जगभर पाहिल्या जात आहेत. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या बंगाली कादंबरी ‘आनंदमठ’ मैक्सिम गॉर्कीच्या ‘माँ’ कादंबरीवरील चित्रपट थॉमस हार्डीच्या कादंबरीवरील ‘कोलाहल से दूर’ कोण विसरेल? रवींद्रनाथांची ‘गोरा’, मिर्झा हादी रुस्वांची ‘उमराव जान’, मिलान कुंदेरांची ‘मजाक’, अंप्टन सिंक्लेयरच्या ‘द जंगल’वर आधारित "जंगल’, लियो टॉलस्ट्रॉयची ‘अॅना कॅरेनिना’, फ्योदोर दोस्तोवस्कीची ‘अपराध आैर दंड’ (क्राइम अँड पनिशमेंट), अर्नेस्ट हेमिंग्वेची ‘ए फेअरवेल टू आर्म्स’ या साऱ्या साहित्यकृती हिंदीत उपलब्ध आहेत. या नि अशा असंख्य साहित्यकृतींचे विश्वभांडार भाषांतराने हिंदीत उपलब्ध असल्यानेच ती घटनेने नसली तरी व्यवहाराने भारताची राष्ट्रभाषाच बनली आहे. कुणाचे काही मतभेद असले तरी हिंदीचे ‘विश्वभारती’,‘आंतरभारती’ रूपच तिला एक दिवस ‘संयुक्त राष्ट्रसंघाची भाषा’ बनवेल. तशी घोषणा आता एक आैपचारिकता बनून राहिली आहे. लोकव्यवहारातून ती केव्हाच भारतीय जनसमूहाची ‘लोकभाषा’ बनली आहे. भाषा तज्ज्ञ आचार्य क्षितिमोहन सेन यांनी हिंदीचे बळ स्पष्ट करताना म्हटलं होतं की, ‘हिंदी विश्व की सरलतम भाषाआें मे से एक है। भाषागत गुण तथा वैज्ञानिकता की दृष्टी से भी हिंदी का स्थान विश्व की प्रथम श्रेणी की भाषाआें में है। इसकी सबसे बडी वैज्ञानिकता यह है कि, वह जैसे बोली जाती है, वैसे ही वह लिखी जाती है।' या निकषावरही हिंदीचं ‘आंतरभारती’त्व, ‘विश्वभारती’त्व आजमावून पाहता येतं.

drsklawate@gmail.com