आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Increasing Right Wing Forces By Kiran Nagarkar

वेळ आवाज बुलंद करण्‍याची आहे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे पुराणकाळात लागलेले बहुविध शोध आणि त्याबद्दलची एकाहून एक स्पष्टीकरणे ऐकून चकित होण्याची वेळ आली आहे. प्रभू रामचंद्र हे विमानातून प्रवास करणारे जगातले पहिले प्रवासी असल्याचे वक्तव्य दीनानाथ बात्रा यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. प्राचीन काळात आपल्या पूर्वजांना मूलपेशी अर्थात, स्टेम सेलवर संशोधन सुरू असल्याचे माहीत होते, असाही त्यांचा दावा होता. मात्र, बात्रा यांच्याही पुढे जात मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करताना, आपल्या पंतप्रधानांनी आणखी एका ‘वैज्ञानिक सत्या’चा उलगडा केला. आजपर्यंत जगातील अब्जावधी लोकांची अशी श्रद्धा होती की, जगातील पहिली व शेवटची कृत्रिम गर्भधारणा (व्हर्जिन बर्थ) ही फक्त कॅथलिक धर्मातच झाली होती; पण मला हिंदू पुरातत्त्ववाद्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते की, त्यांनी महाभारतातील कर्ण हा जगातील कृत्रिम गर्भधारणेचे पहिले उदाहरण होते, असे ठामपणे सांगितले. मला असे वाटते की, आपल्या पंतप्रधानांचे गुरू हे बात्राच आहेत. ज्यांचे पुराणातील संशोधन गुजरातमधील शालेय अभ्यासक्रमात मुलांना शिकवले जात आहे, तेच हे बात्रा आहेत.
काय दैवदुर्विलास आहे पाहा. बात्रा यांच्या संस्थेचे नाव "शिक्षा बचाओ आंदोलन' आहे. आणि जर बात्रा यांचे संशोधन आपण शिकणार असू, तर आपला देश व या देशातील युवकांचे भविष्य अंधकारमय आहे, यात मला तरी शंका वाटत नाही.
या मुद्द्याला जोडून एक दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी (जे त्याच पक्षाचे एक नेते होते) एक लक्षणीय निर्णय घेतला. त्यांनी माहितीच्या अधिकाराच्या गाभ्यालाच लक्ष्य केले. आपल्याकडे माहितीचा अधिकार हा सातत्यपूर्ण राजकीय-सामाजिक संघर्षातून लोकांना मिळालेला मोलाचा कायदेशीर अधिकार आहे.
पण नोकरशाहीकडे येणारे माहितीचे अर्ज जर खोडसाळपणाच्या हेतूने आले असतील, तर ते सरळ नाकारण्याचे अधिकार राज्यपालांनी सरकारी अधिका-यांना दिले. मुद्दा हा की, नोकरशाहीकडे लोकांनी पाठवलेले अर्ज हे खोडसाळपणाच्या उद्देशाने पाठवले आहेत, हे कोण ठरवणार व कसे ठरवणार? लोकशाहीत लोकांची मते दडपण्याची, त्यांच्यापासून वस्तुस्थिती लपवण्याची आणि स्वत:ची मते जनतेवर लादण्याची ही नव्या सरकारची व्यूहरचना आहे. हा सर्व प्रकार म्हणजे, सेन्सॉरशिप आणण्याचा सूत्रबद्ध प्रयत्न आहे. म्हणजे बात्रा-मोदी-संघ परिवाराकडून पुराणातल्या कथा, विज्ञान म्हणून ठसवल्या जात आहेत. या कथा खरा इतिहास व वेदवाक्ये म्हणून सांगितल्या जात आहेत. याचा अर्थ असा की, विज्ञान व इतिहासात आजवर जे व्यापक संशोधन झाले होते, त्याला पद्धतशीरपणे नाकारले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच वेंडी डॉनिंजर व मेघा कुमार यांची इतिहासाची चिकित्सा करणारी पुस्तके वाद उद्भवू नये, म्हणून प्रकाशकांनी मागे घेतली होती. सेन्सॉरशिपचे जुनेपुराणे कायदे, न्यायालयीन लढे आणि त्यापायी मोजावी लागणारी किंमत गळ्याशी येईल, या भीतीने त्यांनी वादग्रस्त पुस्तकांची विक्रीच थांबवण्याचा निर्णय घेतला.
पण अशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप कशी रोखायची? आदर्शवादाच्या चौकटीत असे म्हणता येईल की, अशा हिंदुत्ववादी सेन्सॉरशिपला रोखण्यासाठी जनमत ढवळून काढले पाहिजे, संसदेवर दबाव आणत कायदे बदलले पाहिजेत. पण ही शक्यताही आता मावळली आहे. कारण, भाजपचे लोकसभेत बहुमत आहे. गंभीर बाब अशी की, ज्यांनी मतस्वातंत्र्य व सेन्सॉरशिपच्या विरोधात आपली लेखणी हयातभर झिजवली, असे भाजपमध्ये सामील झालेले अरुण शौरी, एम. जे. अकबर यांच्यासारखे बुद्धिप्रामाण्यवादी मान्यवर आपल्याच पक्षाच्या विरोधात किंवा अशा घटनांवर ‘ब्र’ही काढत नाहीत.
आपण आता समजून घेतलं पाहिजे की ही फक्त सुरुवात आहे. कालौघात ही सेन्सॉरशिप सैतानी विळखा घालत संघ परिवाराचे तत्त्वज्ञान मुक्तपणे पसरण्यास साहाय्यभूत ठरेल. आपल्या सगळ्यांना लक्षात आले असेल की, संघ परिवार व केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याने संपूर्ण शिक्षण पद्धतीच हिंदुत्व विचारधारेवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हे सगळे कारस्थान सुरू असताना एक प्रकारची अस्वस्थता, बेचैनी वाटत राहते. अशा वेळी विचारावेसे वाटते की, आपल्याकडचे बुद्धिप्रामाण्यवादी बेशुद्ध किंवा निश्चेष्ट अवस्थेत गेलेत का? मोदींचे सरकार व त्यांचे विकासाचे मॉडेल यांचा प्रभाव एवढा वाढला आहे का, की या लोकांनी आपली संवेदनशीलता हरवून बसायला हवं? सत्याचा आग्रह धरायचा सोडून असे प्रकार मुलांवर थोपवण्यामुळे त्यांचे नुकसान किती होईल, याचा विचार या मंडळींच्या डोक्यात येत नाही का?
मी स्वत: कायद्याने निश्चित केलेल्या आणि अप्रत्यक्ष सेन्सॉरशिपचा यापूर्वी बळी ठरलोय. माझे ‘बेड टाइम’ हे नाटक वादात अडकले होते. मला त्यामध्ये काही बदल करण्यास सांगण्यात आले होते. मला वाटते की, छोट्या-मोठ्या प्रकाशकांनी सेन्सॉरशिपच्या विरोधात एकत्र येऊन न्यायालयीन लढाईसाठी निर्धाराने निधी जमवला पाहिजे. त्याचबरोबर धर्मांधतेतून आलेली सेन्सॉरशिप हा शाप आहे, असे ज्या लेखकांना वाटते, त्या सर्वांनी सेन्सॉरशिप निधीसाठी दरवर्षी शंभर रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निधी दिला पाहिजे. त्यापुढचे पाऊल म्हणजे, आपण सर्व लेखकांनी एकत्र येऊन शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बोलले पाहिजे. सेन्सॉरशिपमुळे निर्भेळ ज्ञानाच्या प्रकाशाला कसे मुकणार, ते या विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. मूलभूत मानवी हक्कांबाबत, स्वातंत्र्याबाबत त्यांच्यामध्ये जागृती केली पाहिजे. या प्रयत्नांतून कदाचित देशभर चळवळीला वेग येईल. त्यातून नवे बुद्धिमंत, विचारवंत, व्यावसायिक, ज्ञानतपस्वी पुढे या चळवळीत सामील होतील.
उपरोल्लेखित उपायांबरोबर देशव्यापी जनमत तयार करणे, हा परिणामकारक मार्ग आहे. अर्थात, लाखो जणांनी प्रसारमाध्यमे, रेडिओ व इतर माध्यमांतून आवाज उठवावा, असे होणे शक्य नाही. कारण आपल्याकडची माध्यमे सरकारने केव्हाच ताब्यात घेतली आहेत. पण ओबामा व मोदीजींनी त्यांच्या निवडणूक प्रचारात जसा मीडियाचा वापर केला होता, तसे यूट्यूब, ट्विटर, ई-मेल, इंटरनेटसारख्या माध्यमांचा वापर आपण करू शकतो.
मला या संदर्भात अमेरिका, युरोप व ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी प्रयत्न करणा-या तरुण मुलांपुढे काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत?
प्रश्न पहिला – समजा मोदी समर्थक असलेल्या तुमच्या वडिलांनी, भारतात इसवी सन पूर्व सहाव्या शतकात विमाने उडत होती, असे तुमच्या युनिव्हर्सिटीमधील शिक्षकांना सांगितले, तर ते तुम्हाला आवडेल का?
प्रश्न दुसरा - गणपतीचा जन्म पुनर्रोपण शस्त्रक्रियेचा यशस्वी प्रयत्न होता, असे आपल्या पंतप्रधानांचे म्हणणे होते. हे म्हणणे तुम्ही हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश घेताना तेथील प्राध्यापकांना सांगाल का?
आता पालकांसाठी : प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलाने जगातले सर्वोत्कृष्ट शिक्षण घ्यावे, असे वाटत असते. माझा अशा पालकांना प्रश्न आहे की, जेव्हा तुमचा मुलगा हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी एखादा निबंध लिहीत असेल, तर त्या निबंधात त्याने गांधारी ही कौरवांची आई होती, तिचा गर्भपात झाल्यानंतर महर्षी व्यासांनी तो गर्भ शंभर रांजणांत विभागून ठेवला आणि दोन वर्षांनंतर त्या गर्भातून कौरव जन्मास आले, असे उत्तर दिल्यास चालेल का?
मला इतकंच सांगायचं आहे की, तुमच्या मुलांना शिकण्यासारखं, खरंखुरं ज्ञान मिळवण्यासारखं खूप काही आहे.
- (लेखक प्रसिद्ध कादंबरीकार असून त्यांच्या सात सक्कं त्रेचाळीस, रावण अँड एडी, ककोल्ड या कादंब-या गाजल्या आहेत.)
knagarkar@gmail.com