आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नऊवारी’ म्हणाली ‘थ्री फोर्थ’ला...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आस्था, संस्कार आदी चॅनलवरचे बाप्पू, महाराजांचे प्रवचन, सत्संगादी धूपारत्यांचे कार्यक्रम ‘संस्कृती’ पाहत बसली होती. अलीकडे तसं ‘संस्कृती’ला कामच उरलेलं नव्हतं. तिच्याकडे कोणाचं लक्षच जात नव्हतं. ती अडगळीतच पडली होती म्हणा ना. टीव्ही पाहता पाहता तिचं लक्ष भिंतीवरच्या ‘कालनिर्णय’कडे गेलं. 14 फेब्रुवारी ही तारीख पाहून तिला काहीतरी आठवलं. तिच्या डोळ्यात चमक आली. मेंदूत लख्ख प्रकाश पडला. ती ताडकन उठली. टीव्ही बंद केला. वेणीफणी उरकली, कपाळावर आर. आर. आबांच्या गोल चेह-याएवढं गुबगुबीत कुंकू लावलं, नऊवारी नेसली आणि ती ‘थ्री फोर्थ’च्या घरी जाऊन पोहोचली. ‘थ्री फोर्थ’ अजून बेडमध्येच होती. रात्री मैत्रिणीच्या घरी पार्टी होती. पार्टीत जरा जास्तच झाल्याने ‘थ्री फोर्थ’चं अंग अजून जडावलेलंच होतं. मोबाइल बराच वेळ वाजत राहिल्याने तिची झोप मोडली. दीर्घ जांभई देत तिने बेडशेजारच्या टेबलावर पडलेलं सिगारेटचं पाकीट उचललं. सटकन त्यातली एक सिगारेट शिलगावली. दोन-चार ‘कॅश इन’ केल्यावर ती जराशी शुद्धीत आली. तेवढ्यात तिला नऊवारी नेसलेली ‘संस्कृती’ समोर उभी दिसली. ‘थ्री फोर्थ’ने तिला ओळखणे शक्यच नव्हते. पण क्षणाचाही विलंब न करता संस्कृती पटकन पुढे सरसावली आणि तिने ‘थ्री फोर्थ’च्या हातात गुलाबाचा बुके दिला.

‘तू मला ओळखलं नसशीलच. खरं तर तू मला कधी पाहिलंच नाहीस. माझं नाव ‘संस्कृती’. अलीकडे मराठी लोक मला ‘कल्चर’ नावानेही ओळखतात. आज 14 फेब्रुवारी आहे ना, म्हणून तुला भेटायला आले. ‘संस्कृती’नं थोडक्यात प्रास्ताविक केलं. ‘अहो, पण तुमचा-माझा संबंधच काय?’ बुके पाहून ‘थ्री फोर्थ’च्या डोक्यात केमिकल लोच्या झाला. तिला कसलीच टोटल लागेनाशी झाली.

‘तुझा आणि माझा खूप जवळचा संबंध आहे.’ ‘संस्कृती’नं संयमानं समजावलं. ‘म्हणजे?’ ‘थ्री फोर्थ’ला आणखी चक्रावल्यासारखं झालं. ‘हे बघ, तुझ्याचमुळे आणि तुझ्या मिडी, टाइट जीन्स, टी शर्ट अशा भावंडांमुळेच आज मला खरी ‘किंमत’ आहे. आस्था, संस्कारसारखे चॅनल तुमच्या रूपाकडे पाहूनच माझी आठवण काढतात. नाही तर मला कोण विचारतं? म्हणूनच तुम्ही लोक मला खूप खूप आवडता. तुमच्यावरचं प्रेम व्यक्त करायला म्हणून मी आलेय.’ संस्कृती सगळं खरं खरं सांगून टाकते. ‘थ्री फोर्थ’च्या डोक्यातला गोंधळ कमी होण्याऐवजी दुपटीने वाढतो. ‘तुझ्या डोक्यात अजून काही शिरलेलं दिसत नाही बहुतेक. अगं हे बघ, सचिन तेंडुलकरला का किंमत आहे तर त्याच्यासारखं कोणीच खेळत नाही म्हणून. सेहवाग, गंभीर, युवराज सगळेच सचिनसारखे खेळू लागले तर सचिनचं कौतुक कुणाला? नाही ना? तसंच आजकालच्या सगळ्या मुली नऊवारी नेसू लागल्या, ‘सातच्या आत घरात’ येऊ लागल्या तर ‘संस्कृती’ म्हणजे माझं महत्त्व कुणाला पटेल का? नाही ना?’ म्हणून तुम्हा सगळ्यांना माझे ‘नऊवारी’ धन्यवाद. हॅप्पी ‘व्हॅलेंटाईन डे!’ ‘संस्कृती’ने भावनेच्या भरात ‘थ्री फोर्थ’चे हात हातात घेतले. तिच्या बोलण्याने ‘थ्री फोर्थ’ची पार्टीची धुंदी उतरली आणि ‘वरच्या मजल्या’वर लख्ख प्रकाशही पडला...!
cm.dedhakka@gmail.com