आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Indian Philosophy By Shridhar Tilve, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्योतिषशास्त्र, व्यक्तिरेखा आणि समाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखात ज्योतिष हे विज्ञान नव्हे; असलेच तर ते कदाचित शास्त्र असू शकते, अशा प्रकारच्या मांडणीमुळे काही लोकांचा वैचारिक गोंधळ उडालेला आहे, असे दिसते. हा गोंधळ उडण्याचे कारण, शास्त्र व विज्ञान या दोन शब्दांतला न कळलेला फरक होय. भारतीय परंपरेत शास्त्र म्हणजे, आध्यात्मिक सत्यांना पायाभूत मानून तर्कशास्त्राच्या आधारे केलेली दार्शनिक मांडणी होय. ग्रीक परंपरेतही ‘लॉजी’ हा शब्द लॉजिकली जाणारी मांडणी, या अर्थाने येतो. आता तर्कशास्त्र दोन्ही बाजूंनी चालविता येते. म्हणूनच भारतीय परंपरेत खंडन-मंडनाचा उदय झाला.
एकाने आपला तर्क मांडायचा, त्याचे मंडन करायचे आणि प्रतिपक्षाने त्या तर्काचे खंडन करून ते तर्कशास्त्र उधळून लावायचे, अशी ही खंडन-मंडन पद्धती होती. त्यामुळे भारतातील धर्म मग तो शैव असो की बौद्ध; किंवा जैन असो, यांना खंडन-मंडन मान्य होते, आणि सारे दार्शनिक खंडन-मंडनात हिरिरीने भाग घेत असत. दुर्दैवाने, ज्युडाईट धर्मांचा उदय झाल्यानंतर ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम यांचा सर्वत्र प्रचार झाला. तर्कशास्त्राची जागा श्रद्धेने घेतली. श्रद्धा हीच प्रमाण ठरल्याने तार्किक अन्वेषण थांबले. दुर्दैवाने भारतातील वैष्णव धर्म हादेखील श्रद्धेला बळी पडल्याने त्याने श्रद्धा हीच प्रमाण मानायला सुरुवात केली. पुढे पुढे वैष्णव धर्मच हिंदू धर्म झाल्याने हिंदू लोकांच्यातही श्रद्धेचे अवडंबर माजले. दर्शनशास्त्राची जागा धर्मश्रद्धेने घेतली.
बौद्धिक चिकित्सा थांबल्याने संपूर्ण समाज धार्मिक श्रद्धेच्या आहारी गेला.
सुदैवाने, युरोपमध्ये पुन्हा नव्याने प्रबोधन झाले आणि शास्त्र उदयाला आले. पण युरोपमधील शास्त्रज्ञ हे फक्त तर्कापाठी थांबले नाहीत. त्यांनी प्रत्यक्ष प्रयोग करायला सुरुवात केली. या प्रयोगशाळांत केलेल्या प्रयोगांचे प्रमाण इतके वाढत गेले, की सत्य हे केवळ तर्काच्या आधारे सिद्ध होत नाही; तर ते प्रत्यक्ष प्रयोगशाळेतही सिद्ध झाले पाहिजे, असा आग्रह धरला गेला. त्यातूनच विज्ञानाचा उदय झाला. शास्त्रात फक्त तर्क पुरतो.
विज्ञानात मात्र तर्काबरोबरच ते सत्य प्रयोगशाळेत किंवा प्रयोगात सिद्ध व्हावे लागते. म्हणूनच मी म्हटले की, ज्योतिष हे शास्त्र असू शकते. त्याबाबत दोन्ही बाजूंनी खंडन-मंडन होऊ शकते. पण ते प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून ज्योतिषशास्त्र हे विज्ञान नव्हे. भारतात ज्योतिषशास्त्राचे दोन भाग आहेत. पहिला भाग हा विश्वज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉनॉमी) या नावाने ओळखला जातो, तर दुसरा भाग फलज्योतिष (अ‍ॅस्ट्रॉलॉजी) या नावाने ओळखला जातो. विज्ञानाचा उदय झाल्यानंतर युरोपमध्ये अनेक वैज्ञानिकांनी फलज्योतिष हे सत्य आहे की नाही, याविषयी चिकित्सा करायला सुरुवात केली. यात आयझॅक न्यूटनसारखे वैज्ञानिकही सामील होते. हा अभ्यास करताना फलज्योतिषशास्त्रातल्या गणितीय भागाबद्दल त्यांना शंका नव्हती. त्यामुळेच पंचांगाचा अभ्यास त्यांना मान्य होता. मात्र ग्रहता-यांच्या मानवी जीवनावरच्या परिणामाबद्दल त्यांच्या मनात अनेक शंका होत्या.
पण ज्योतिष हे शेवटपर्यंत विज्ञान म्हणून काही सिद्ध करता आले नाही. साहजिकच ज्योतिषशास्त्राचा उदय झाला, पण ज्योतिषविज्ञानाचा उदय झाला नाही. मात्र ज्योतिषशास्त्राची चर्चा कायमच चालू राहिली. ती आजतागायत चालूच आहे. प्रतिसृष्टीचा उदय झाल्यानंतर तंत्रज्ञानाचे प्रभुत्व वाढत गेले. भूतकाळाचा अभ्यास करायला जर ‘इतिहास’ असेल तर भविष्यकाळाचा विचार एक शास्त्र म्हणून का होऊ नये, हा विचार प्रबळ झाला. मुख्य म्हणजे, भविष्याकडे एक शास्त्रीय शक्यता म्हणून पाहता येणे शक्य आहे का, हा विचार सुरू झाला. त्यातूनच ज्याला आपण भविष्यविज्ञान (फ्युचरॉलॉजी) म्हणतो, ते उदयाला आले.
या दरम्यानच्या काळामध्ये टोळीय समाजातील नियती आणि विश्वीय समाजातील ज्योतिष आणि दैव हे जर माणसाचे भविष्य घडवत नसतील, तर माणसाचे भविष्य घडवते तरी कोण, असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला. या प्रश्नाचे उत्तर ‘परिस्थिती’ असे वैज्ञानिकांनी दिले, तर या काळातील निसर्गशास्त्रज्ञांनी ‘नेचर’ असे दिले. व्यक्तिगत पातळीवर ‘नेचर’ या शब्दाचा अर्थ स्वभाव असा झाला. साहजिकच साहित्यामध्ये स्वभाव आणि परिस्थिती हे भविष्याविषयीचे दोन पर्याय उदयाला आले. साहित्यावर त्याने प्रचंड प्रभाव टाकायला सुरुवात केली. ज्याला आज आपण व्यक्तिरेखा (कॅरेक्टर) आणि चरित्ररेखा म्हणतो, तो या स्वभावाचाच परिणाम होता. साहजिकच साहित्यात व्यक्तिरेखांना महत्त्व देणारा एक वर्ग उदयाला आला.
विल्यम शेक्सपिअर याची नाटके गाजली. कारण, त्याच्या नाटकातल्या व्यक्तिरेखा प्रभावी होत्या. मग तो हॅम्लेट असो (याच्यावर आधारित ‘हैदर’ हा सिनेमा आता येतो आहे.) वा अथेल्लो असो (याच्यावर आधारित ‘ओंकारा’ हा सिनेमा येऊन गेला), की किंग लिअर असो (याच्यावर आधारित वि. वा. शिरवाडकरांनी ‘नटसम्राट’ हे नाटक लिहिले होते.). याउलट परिस्थितीला प्रमाण मानणारा एक वर्ग हळूहळू उदयाला येऊ लागला. समाजशास्त्रज्ञांमुळे सामाजिक परिस्थिती, त्यानंतर अर्थशास्त्रज्ञांमुळे (विशेषत: कार्ल मार्क्स) आर्थिक परिस्थिती या माणसांची भविष्य घडवितात, असा विचार प्रबळ होऊ लागला. आपल्याकडचे सगळे आंबेडकरवादी साहित्य आणि देशीवादी साहित्य हे परिस्थितीला जबाबदार मानते.
युरोपमध्ये बाल्झाक या कादंबरीकाराने सामाजिक परिस्थितीचा तळ उचलून धरला. त्याचा प्रभाव जगभरच्या लेखकांवर पडला. आपल्याकडे हरिभाऊ आपटेंनी व्यापक प्रमाणावर माणसांच्या भविष्यासाठी सामाजिक परिस्थितीला जबाबदार धरायला सुरुवात केली. साहजिकच सामाजिक परिस्थितीचे चित्र मराठी कादंब-यांत विकोपाला गेले. हे सामाजिक परिस्थितीचे चित्रण इतके उथळ होते की, भालचंद्र नेमाडे यांच्या व्यक्तिरेखाप्रधान भविष्य गृहीत धरणा-या पांडुरंग सांगवीकराने एका झपाट्यात या सगळ्या सामाजिक कादंब-या उधळून लावल्या आणि सत्यकथेचा उथळ व्यक्तिवादही मोडीत काढला. पुढे व्यक्तिरेखात्मक अंगाने पुढे जाणारे नेमाडे स्वत:च परिस्थितिवादी बनले आणि शैक्षणिक-सामाजिक परिस्थिती हा त्यांच्या कादबं-यांचा मुख्य आधार बनला. साहजिकच मराठीत व्यक्तिरेखात्मक कादंब-यांचा लोप होत गेला. त्यांना सत्यकथावादी म्हणण्याची फॅशन रूढ झाली. याच काळात दलितांनीही भारतातील सामाजिक परिस्थितीचा पर्दाफाश केला. त्यांनी भारतात व्यक्तीपेक्षा व्यक्तीची जातीय परिस्थिती ही महत्त्वाची ठरते, हे अनेक अंगाने साहित्यात सिद्ध केले.
साहजिकच मराठीत सामाजिकतेचा गवगवा प्रचंड वाढला. आणि संपूर्ण मराठी साहित्य हे सामाजिकतेचे बटीक बनले. यातूनच सामाजिक लिहिले की ते ग्रेट असते, असा एक गैरसमज मराठी साहित्यसंस्कृतीत पसरला आणि सामाजिकतेच्या नावाखाली काहीही खपू लागले. यातून अनेक सामाजिक कंपू तयार झाले. या कंपूशाहीविरोधात आणि उथळ देशीयतेच्या विरोधात आमच्या पिढीला बंड करावे लागले. या बंडाची कथा पुढे कधीतरी..

shridhar.tilve1@gmail.com