आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Industralist Ingvar Kamprad By Sudhir Jogalekar

ब्रॅण्डबाजा: व्हॉट अॅन 'आयकिया'!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुकान म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर कल्पना येते, ती दोन-पाच हजार चौरस फुटांच्या मॉलवजा इमारतीची. पण ‘आयकिया’ची दुकानं ही मॉलसारखी बहुमजली नसूनही जगभरातली सर्वाधिक मोठ्या क्षेत्रफळाची दुकानं ठरावी, अशा क्षमतेची आहेत. गमतीची गोष्ट अशी की, तुमच्या घरातली प्रत्येक वस्तू जागच्या जागी लावण्यासाठीची, ठेवली जाण्यासाठीची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतं, ते ‘आयकिया’. ‘आयकिया’च्या जगभरातल्या दोन सर्वाधिक मोठ्या दुकानांची क्षेत्रफळं नुसती नजरेखालून घातली, तरी डोळे विस्फारल्यावाचून राहणार नाहीत. दक्षिण कोरियातलं सेऊलचं ‘आयकिया’ स्टोअर आहे ६,४०,००० चौरस फुटांवर पसरलेलं! स्वीडनमधलं स्टॉकहोमचं स्टोअर आहे ५,९४,००० चौरस फूट जागा व्यापणारं. भारतातलं ‘आयकिया’चं पहिलं दुकान सुरू होतं आहे, ते हैदराबादेत; परंतु त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे, ती जेमतेम साडेतीन लाख चौरस फूट इतकीच.

इंगवार काम्प्राडचा जन्म स्वीडनमधल्या ऑगनार्ड नामक खेड्याजवळच्या एलिमटार्ड नामक फार्मवरचा. ३० मार्च १९२६ ही त्याची जन्मतारीख. स्टॉकहोममधून आगपेट्या आणायच्या आणि त्या अल्प फायद्यात विकायच्या, इथून त्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली. पैसा मिळतो, नफा होतो, हे कळल्यानंतर इंगवारनं मासे-बियाणं-ख्रिस्मस ट्रीची सजावट-पेनं-पेन्सिली असं काहीही आणून विकायला सुरुवात केली. मुलाचं यश पाहून वडील भारावले नसते, तरच नवल होतं. शालेय शिक्षण सुरू असतानाच वयाच्या १७व्या वर्षी वडलांनी काम्प्राडला मोठं बक्षीस दिलं. काम्प्राडनं त्यातनं स्थापन केलं, ते ‘आयकिया’.

अपेक्षेप्रमाणे धंदा वाढतच होता. येणा-या प्रत्येक ग्राहकाला इंगवार नावानं ओळखत होता. ग्राहकांची संख्या जेव्हा ठरावीक मर्यादेच्या पलीकडे जाऊ लागली, आणि प्रत्येकाला नावानं ओळखणं अवघड होत जातंय हे इंगवारच्या लक्षात यायला लागलं, तेव्हा इंगवारनं घरपोच माल देणारी मेल-ऑर्डर पद्धती सुरू केली. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या कंपन्यांची मुळं त्यात रुजलेली होती. इंगवारकडे माल पोहोचवण्यासाठी वाहनं नव्हती. त्यानं दुधाच्या गाड्यांचं साहाय्य घ्यायचं ठरवलं आणि दूध वितरण झाल्यानंतर आपापल्या गावी परतणा-या दुधाच्या गाड्या इंगवारचा माल घेऊन गावोगावी-घरोघरी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू लागल्या.

१९४७मध्ये इंगवारनं आपल्या विक्री वस्तूंमध्ये फर्निचरचा समावेश केला. स्थानिक सुतारांची मदत घेऊन बनवलेलं साधंसुंदर, नावीन्यपूर्ण डिझाइनचं, घरच्या घरी जोडणी करता येईल असं, हे फर्निचर लोकांना पसंत पडायला लागलं. चारच वर्षांत इंगवारनं बाकीचा धंदा गुंडाळून सारं लक्ष केवळ फर्निचरवर केंद्रित केलं. १९५३मध्ये ‘आयकिया’नं आपली पहिली शोरूम सुरू केली. स्पर्धा तुल्यबळ होतीच; परंतु दुकानात या, वस्तू पाहा, हाताळा, त्यांचा अनुभव घ्या आणि मगच त्या घरी घेऊन जा, हे तंत्र अवलंबल्यानं ‘आयकिया’चा हात धरणारं कुणी होऊ शकलं नाही. ‘आयकिया’चं फर्निचर जोडणीला सोपं आणि सपाट खोक्यात बांधता येईल, असं असतं. त्यामुळे ते सहज घरी नेता येतं आणि कॅटलॉगमध्ये दाखवल्याप्रमाणे सुटे भाग जोडून उभंही करता येतं. बरं, सुटे भाग जोडण्यासाठी आवश्यक असलेले खिळे, नटबोल्ट सगळं सगळं त्या सपाट खोक्यात असतंच.

स्वीडनमधल्या अनेक हॉटेल्समध्ये टेबलाच्या खणात बायबलच्या जोडीने ‘आयकिया’चा कॅटलॉगही ठेवलेला असतो. युरोपातल्या अनेक देशांत बायबलपेक्षा ‘आयकिया’चा कॅटलॉग अधिक वाचला जातो, असं जे म्हटलं जातं त्यात अतिशयोक्तीपूर्ण असं काहीही नाही. एक फार गमतीची आकडेवारी ‘आयकिया’च्या लोकप्रियतेचा परिचय करून देण्यासाठी दिली जाते. सबंध युरोपातील दर दहापैकी एका जोडप्याने ‘आयकिया’च्या पलंगावर शयनसुख उपभोगत गर्भधारणा घडवून आणली आहे, तर तेवढ्याच मुलांनी आपलं बालपण ‘आयकिया’च्या पलंगावर घालवलं आहे...

घरातल्या बहुसंख्य वस्तू जागच्या जागी ठेवल्या जाव्यात, अशी शिस्त निर्माण करणारं फर्निचर ‘आयकिया’ बनवतं. म्हणजे त्यात पुस्तकांपासून सीडीजपर्यंत, स्टेशनरी वस्तूंपासून शूजपर्यंत, स्वयंपाकघरातल्या सामानापासून प्रकाशयोजनेपर्यंत, खुर्ची-टेबल-कोचांपासून सोफ्यांपर्यंत आणि सिंगल-डबल बेडपासून ड्रेपरीपर्यंत सगळं सगळं ‘आयकिया’त उपलब्ध असतं. जगभरातले सव्वा लाखांहून अधिक कामगार फर्निचर बनवण्याचं काम देशोदेशी करतात. ज्या कॅटलॉगचा उल्लेख वर झाला, तो प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली, १९५१ सालापासून. जगभरातल्या २२ भाषांमधून २०० दशलक्ष इतक्या संख्येत हे कॅटलॉग प्रसिद्ध होतात.

इंगवारच्या साधेपणाचा उल्लेख अगदी पहिल्या परिच्छेदात येऊन गेला. आज इंगवार नव्वदीत आहे. त्याच्या पहिल्या आणि दुस-या अशा दोन्ही बायकांचं यापूर्वीच निधन झालं आहे. अतिशय साधेपणानं राहणं, मेजवान्या किंवा समारंभ टाळणं तो पसंत करतो. जगभरातल्या ‘आयकिया’च्या दुकानांना भेटी देण्यासाठी त्यानं गेलंच पाहिजे, अशी स्थिती आता राहिलेली नाही. त्याच्या विश्वासातली शेकडो माणसं त्याच्या अवतीभोवती असतात. स्वत:चं विमान ठेवून जग धुंडाळणं, इंगवारला काहीही कठीण नाही. पण इंगवार इकॉनॉमी क्लासनं प्रवास करतो. त्याची ब-याच वर्षांपासूनची मोटार जुनी आणि वापरण्यास अयोग्य झाल्यानंतर, त्यानं बसनं किंवा ट्रेननं प्रवास करणं सुरू केलं. त्यानं स्थापन केलेलं इंगका फाऊंडेशन ‘आयकिया’चा सारा कारभार चालवतं. ‘आयकिया’चा कार्यालयीन सेटअप साधा असतो. ना पॉश मोटारी, ना देखणे गणवेश. पर्यावरणाचं भान सांभाळत ‘आयकिया’ उत्पादनं बनवतं. सुमारे ४० अब्ज डॉलर्सची इंगका फाऊंडेशनची संपत्ती आहे. इंगका संपत्ती कमावतं, तशीच ती समाजोपयोगी कामांसाठी खर्चही करतं. २००४मध्ये त्सुनामी, २००५चा काश्मीरमधला भूकंप या वेळी तर ‘आयकिया’नं भरघोस मदत केलीच; ‘युनिसेफ’लाही ‘आयकिया’ पैसा देतं, आणि बालमजुरीला आळा बसेल, असंही पाहतं. ‘आयकिया’ ही थेट विदेशी गुंतवणूक करणारी पहिली कंपनी ठरली आहे. भारतात बनवलेलं फर्निचरच भारतात विकून मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ला हातभार लावण्यातही ती अग्रेसर आहे, ही तर तिची खास जमेची बाजू आहे...

sumajo51@gmail.com