आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रव्यूहातील तरुणाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इतिहासाकडेनजर टाकताना विद्यार्थी चळवळ शक्यतो राष्ट्रवाद, आधुनिकतावाद, वसाहतविरोधी आणि लोकशाही स्थापना अशा वेगवेगळ्या स्वरूपात राहिली आहे. माणूस अथवा इतर कुठल्याही प्रजातीचा ‘तरुण’ हा सशक्त, जोखीम घेणारा आणि संघर्ष करणारा असतो, एका निकोप समाजव्यवस्थेच्या तळाशी त्या व्यवस्थेतल्या तरुणांनी कधीकाळी घेतलेले कष्ट असतात. त्यामागे सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार असेलच असे नाही, त्यामागे सगळी मत-मतांतरे समजावून घेतलेले निर्णय असतीलच असेही नाही आणि तसे असणे तरुण क्रांतीला शक्यही नसते. कारण सर्वांगी विचार करताना वर्तमानकाळ पुढे निघून जातो.
जगभर तरुणाईची चाललेली नानाविध आंदोलने यामुळेच फक्त त्यांच्या वर्तमानकाळाशी संबंधित असतात.

क्रांतीचा असा नेमका काळ शोधताना जगाच्या वर्तमानकाळात डोकावून पाहिले तर आपल्यासमोर परस्परविरोधी चित्रे येतात. विकसित देशांच्या भांडवलशाहीत उच्च शिक्षण घेण्यासाठी घेतलेली कर्जे दशकानुदशके फेडता न आल्याने एका उच्चभ्रू वेठबिगारीत अडकलेले तरुण, अविकसित देशात शिक्षणाच्या मूलभूत सोयीही न मिळणारे तरुण आणि प्रत्यक्ष रस्त्यावर न उतरता व्हॉट्सअ‍ॅपमधून मेसेज फॉरवर्ड करीत क्रांतीची अपेक्षा करणारे विकसनशील देशातले तरुण. उच्च शिक्षण व नोक-या मिळविण्यासाठी वेगवेगळ्या देशांत स्थलांतर करताना यातले काही एकमेकांशी विचारांचे आदानप्रदान तर करतात; पण ‘जागर तरुणाईचा’ हे प्रेरणादायी विधान जागतिक पातळीवर आणता येत नाही. देशोदेशीच्या तरुणांच्या समस्या त्या देशातल्या सामाजिक परिस्थितीवर बेतलेल्या असल्याने त्यांची आंदोलने वैश्विक होण्याची गरज नाही. पण एकूण मानवजातीसमोर असलेले सध्याचे मूलभूत प्रश्न सीमारेषांचे नियम पाळीत नाहीत. चीनमध्ये वाढणा-या प्रदूषणामुळे हिमालयातल्या नद्यांना पूर येऊन भारतात हाहाकार माजतो किंवा कोकणात बेसुमार मासेमारी केल्याने हिंदी महासागरातल्या लॉबस्टरच्या प्रजाती नष्ट होतात आणि या माहितीचा एकमेकांशी असलेला नेमका संबंध राष्ट्रीय माहिती वा विचारांचा भाग असत नाही.

प्रश्न फक्त पर्यावरणाचाच असता तर ते एकवेळ समजू शकले असते; पण ज्ञान मिळविण्याच्या उपजत इच्छेपासूनही देशोदेशींच्या तरुणांमध्ये बरीचशी तफावत दिसून येते. हल्लीचा तरुण बेजबाबदारपणे वागतोय, हे विधान कुठल्याही काळाला लावता यायचं; पण हल्लीच्या तरुणाचा ‘अटेन्शन स्पॅन कमालीचा घटलाय’ हे विधान फक्त सद्य:स्थितीतच लागू पडते. मोबाइलची स्क्रीन पाहिल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर पाच मिनिटांपेक्षा जास्त लक्ष आजच्या भारतीय तरुणांना देता येत नाही. लहान बाळाने झोपी जावे आणि जास्त कटकट करू नये, म्हणून पूर्वी त्यांना अफू चारली जायची. आता तरुणाने व्यवस्थेला प्रश्न विचारू नयेत, म्हणून त्याला मोबाइल फोनमध्ये गुंग ठेवले जाते.

नेटपॅक स्वस्त असावा, मोबाइलचे कव्हरेज सगळीकडे मिळावे, पिझ्झा, बर्गर आणि सिगारेटच्या किमती कमी असाव्यात, महापालिकेने सर्वांना मोफत वायफाय सुविधा द्यावी, हे सध्याच्या तरुणांना भेडसावणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढे उपजीविकेसाठी माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे म्हणून मला पंधरा हजार पगार मिळावा, कामाचे तास कमी असावे, फॉर्मल ड्रेसचा आग्रह नसावा, असल्या उथळ डिमांड‌्समध्येही तरुण अडकतात. करिअरसंदर्भात केलेले संवादही एखाद्या यशस्वी माणसाला विचारण्यापेक्षा आपापसात पिअर टु पिअर पातळीवरच केले जातात. ‘कंपनी’ म्हणजे आपल्याला सेवा देणारी संस्था आणि आपण त्याचे सन्माननीय ग्राहक, या संवादपातळीत मग ते स्वत:ला एखाद्या कंपनीपेक्षा मोठे समजतात, कंपन्याही तसे त्यांना समजू देतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधतेवेळी मग या ग्राहकाच्याच अरेरावीतून कंपन्यांशी जॉबसंदर्भात केलेले संवाद त्यांना नापसंतीच्या एका दुष्टचक्रात अडकवतात. इथं कंपनी ही उपभोक्ता असते आणि नोकरी मागणारा उत्पादक असतो. गरज नेमकी कुणाला आहे, हे व्यवस्थित न समजल्याने तरुण मग वेगवेगळ्या ठिकाणी नाकारला जातो. तो प्रत्यक्ष नाकारला जातो तेव्हा त्याला त्याची चूक समजूही शकते, पण हजारोंनी आलेल्या जॉब अ‍ॅप्लिकेशन्समधून एखादा वारंवार नाकारला जातोय, तेव्हा आपले नेमके काय चुकतेय, हेही त्यांना समजत नाही. भारतात ग्रॅज्युएट होऊन कुठलाही रोजगार नसणा-यांची संख्या जवळजवळ पन्नास लाखांच्या घरात असून त्यात दरवर्षी लाखोंची नव्याने भर पडते आहे. जवळजवळ एक कोटी ग्रॅज्युएट तरुणांकडे असलेल्या नोक-या फार उत्पन्न देणा-या वा भविष्यकाळासाठी मूलभूत ज्ञान वाढविणा-या नाहीत आणि याहीपेक्षा कोट्यवधींचा एक मोठ्ठा आकडा महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे, ज्याला शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेमका कुठला मार्ग नोकरी उपलब्ध करून देईल, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही.

पूर्वी गल्लोगल्ली जाऊन निरनिराळ्या पक्षांचे कार्यकर्ते सामाजिक कामे आणि उपक्रम करून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत. या कार्यकर्त्यांमुळे आपल्याला सत्ता मिळते, म्हणून नेतेही कार्यकर्त्यांना कसला तरी मोबदला देत. भारताचे राजकारण अस्मिताकेंद्री झाल्यापासून थेट संपर्कात राहणा-या कार्यकर्त्यांची गरज संपलीय आणि त्यांच्यासाठी काही करायची नेत्यांची बांधिलकीही संपलीय. व्हॉट‌्सअ‍ॅपवरून चालणा-या नव्या राजकारणात राजकीय पक्षांना केवळ अस्मितेचे खत घालून कुठलाही खर्च न करता कोट्यवधी कार्यकर्ते मोफत वापरायला मिळत आहेत, हे कार्यकर्ते स्वखर्चाने अथवा आईवडिलांशी भांडून घेतलेल्या पैशांचा रिचार्ज मारून अस्मितांच्या प्रचारात हिरिरीने भाग घेतात. या सर्व प्रकारांतून त्यांच्या ज्ञानात कितपत भर पडतेय, हा एक प्रश्न; या चाललेल्या सगळ्या प्रयत्नांतून किती लोकांना चांगला रोजगार मिळणार आहे, हा एक प्रश्न; आणि बेरोजगारी इतकी वाढलेली असतानादेखील तरुणांना एखादी व्यवस्था कशी गुंगवून ठेवू शकली आहे, हे आश्चर्यजनक कुतूहल. भांडवलशाहीतून उद‌्भवणा-या उच्चवर्गीय वेठबिगारीला अमेरिकेतला तरुण आव्हान देतोय, ग्रीसमध्ये बेरोजगारीमुळे चिडून तिथल्या तरुणांनी थेट सत्ताबदल घडवून आणलेत, सामान्यज्ञान सर्वांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ग्रीनलँडमधले अधिकाधिक तरुण विकिपीडियासारख्या उपक्रमांत हिरिरीने भाग घेत आहेत. कँडी क्रशसारखे गेम खेळण्यात भारतीयांनी वाया घालवलेला एकूण वेळ आणि शक्ती भाक्रा नांगलसारख्या चार मोठमोठ्या धरणांची निर्मिती करू शकली असती, व्हॉट‌्सअ‍ॅपवर टुकार मेसेज पाठविण्याच्या एकूण संगणक शक्तीत शेकडो उपग्रह अवकाशात पाठविता आले असते, टेंपल रन गेम खेळण्यात वाया घातलेल्या वेळात देशातल्या खेड्यांचे रस्ते दोन फुटांनी रुंद करता आले असते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर माहिती मिळविण्यासाठी कमी आणि मूलभूत प्रश्न असणा-या लोकसंख्येला गुंगवून ठेवण्यात जास्त होतोय. या व्यसनापासून दूर जात, ज्ञान मिळवीत सत्तेला मूलभूत प्रश्न विचारून क्रांती घडविण्याचा मार्ग भारतातल्या तरुणांना अद्यापही कळलेला नाही, हे या देशाचे दुर्दैव.

rahulbaba@gmail.com