आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छिन्नविच्छिन्न इराक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013मध्ये नाशिकला माझ्या ऑफिसमध्ये आलेला आणि गेली काही वर्षे परिचित असलेला एक अत्यंत कर्तबगार इराकी उद्योजक ‘मी आणि माझ्या कुटुंबीयांना परमेश्वराने इराकमध्ये जन्माला घालण्याऐवजी अन्य कोणत्याही देशात कुत्र्याचा जन्म दिला असता तरी चालले असते’, असे काळजाचा थरकाप उडवणारे विधान करण्याइतका हताश झालेला मी बघितला. सात-आठ वर्षांपूर्वी अतिशय वैभवसंपन्न आणि सुखासीन आयुष्य जगणा-या कुटुंबातला हा इसम. ‘रोज सकाळी उठल्यावर आज दिवसभर सुरक्षित जगायचे, एवढेच आम्ही कुटुंबीय ठरवू शकतो. अमेरिकेला आम्हाला मुक्त करायचे होते. 2003च्या आधी आम्ही मुक्त नसू कदाचित, पण सुरक्षित नक्की होतो. आता मुक्त झालो की नाही माहीत नाही, पण आम्ही सुरक्षित नक्की नाही!’ अमेरिकेने 2003मध्ये युद्ध संपवल्यानंतर गेल्या दहा वर्षांत इराक संपूर्ण उद्ध्वस्त झालंय. खरे तर इराक त्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेलं नाही. युद्धानंतर अमेरिकेने आपल्या ताब्यात ठेवल्यानंतर पूर्णपणे बेचिराख झालंय.
सुमारे 37 हजार इराकी जनता तुरुंगात डांबली गेली आहे. ज्यांच्यावर काय आरोप आहेत, हे माहीत नाही किंवा कित्येक जणांवर काहीच आरोप नाहीत. बगदादच्या पश्चिमेला उभारलेला अबू घरिब इथला तुरुंग तर छळछावणी आहे. इथल्या बंदिवानांवर कुत्री सोडणे, बेदम मारहाण, विवस्त्र अवस्थेत ठेवणे, लैंगिक अत्याचार करणे, असे प्रकार होतात. अमेरिकेचे लष्कर इराकमधून निघाले असले, तरी आजतागायत त्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. बंदिवानांच्या तोंडात प्लास्टिकचा पाइप खोचून मारहाण होत असल्याच्या अघोरी घटना तक्रारीच्या स्वरूपात अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलने आपल्या अहवालात प्रसिद्ध केल्या आहेत. बंदिवानांपैकी अर्ध्या महिला आहेत. त्यांची परिस्थिती आणखी भीषण आहे. हे बंदिवान आहेत कोण? त्यांचा गुन्हा काय? सबाह हसन हुसेन नावाची 41 वर्षांची महिला पत्रकार आपल्या नातेवाइकांची चोरीला गेलेली गाडी परत आणण्यासाठी गेली. तिला 29 फेब्रुवारी 2012रोजी अटक झाली. तिची रवानगी तिक्रीतच्या तुरुंगात केली गेली. सबाहला 23 जानेवारी 2013रोजी निर्दोष ठरवण्यात आले; पण तरीही तिला 28 फेब्रुवारी 2013पर्यंत तुरुंगात ठेवले होते. सबाह बाहेर आली, ती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन. तिच्या शरीरभर सिगरेटने दिलेल्या चटक्यांचे डाग होते. प्रचंड मारहाणीच्या खुणा शरीरभर होत्या. तिला विवस्त्र करून पुरुष पोलिसांसमोर उभे केले जायचे. बर्फाच्या पाण्याचा मारा तिच्यावर व्हायचा.
हे अत्याचार अभ्यासले, तर पद्धतशीर नरसंहार करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसतील. बहुधा इराकच्या मध्यमवर्गाला- जो शिक्षित आहे, बुद्धिवादी आहे आणि व्यावसायिक आहे अशा वर्गाला- नेस्तनाबूत करण्याचे प्रकार इराकमध्ये आजही चालू आहेत. हत्या करण्यात आलेल्या एकूण जनतेत 50% प्राध्यापक, 12% डीन, 2% कुलगुरू वा उपकुलगुरू, 6% अन्यान्य विभाग प्रमुख, 6% सहप्राध्यापक आणि 13% शिक्षण क्षेत्रातील बुद्धिवंत आहेत. शिक्षणक्षेत्रच उद्ध्वस्त करण्याचा कट तेथे शिजत आहे. 2003च्या आधी इराकमधली 100% मुलं शाळेत जायची. 2006पासून 35 लाख मुलांपैकी 30% मुलंच प्राथमिक शाळेत जातात. 2003नंतर सुमारे 700 प्राथमिक शाळा बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केल्या गेल्यात, 2700 शाळा मोडकळीस आलेल्या आहेत, तर 74% शाळांमध्ये पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची जराही सोय नाही.
सध्याची इराकमधली आरोग्य व्यवस्था भयावह आहे. नोंदणीकृत सुमारे 18 हजार डॉक्टरांपैकी सुमारे 25% डॉक्टर गेल्या दहा वर्षांत इराक सोडून निघून गेले आहेत. 250 डॉक्टरांना पळवून नेण्यात आले आहे. ‘अल जझीरा’चा जगप्रसिद्ध पत्रकार दहेर जमाईल याने 15 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात युद्धाने इराकला तहहयात छळणा-या कॅन्सरसारख्या अनेक जीवघेण्या बाबींचा शाप दिला आहे, असे म्हटले आहे. युद्धात प्रचंड मोठ्या प्रमाणात विषारी अस्त्रे वापरली गेली. त्यातही मुख्यत: डिप्लीटेड युरेनियम आणि व्हाइट फॉस्फरस हे अत्यंत विषारी आणि दूरगामी परिणाम करणारे पदार्थ वापरले गेले. त्यांचा परिणाम हिरोशिमा आणि नागासाकीपेक्षा कितीतरी भयानक आहे. इराकच्या फ़ल्लुजह भागात झालेले आणि होणारे जनुकीय नुकसान हे आजवर मानवी जीवनात झालेले सगळ्यात मोठे नुकसान आहे. मिशिगन विद्यापीठात संशोधन करणा-या डॉ. मोहघनबार्इंचे म्हणणे आहे, की इराकमध्ये बॉम्बिंग आणि गोळीबाराचा अति वापर झालाय. या भागात 600 कोटी टन विषारी गोळीबारुद ओतले गेले आहे! त्यामुळे पारा, युरेनियम आणि शिसे या विषारी धातूंचा प्रचंड फैलाव बसरा आणि फ़ल्लुजह येथे झालाय. आज या भागात कॅन्सरचे प्रमाण चाळीस पटीने वाढलंय. महिलांमध्ये गर्भपाताचं प्रमाण वाढलंय. शारीरिक विकृती असलेली संतती जन्माला येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय...
गेल्या दहा वर्षांत जवळपास 15 लाख इराकी मारले गेले. पिण्याचे शुद्ध पाणी, वीज आणि मलनिस्सारण व्यवस्था या बाबी आज स्वप्नवत आहेत. इराकमध्ये सुस्थितीत जगणा-या कुटुंबांना रेशनचे धान्य मिळवण्यासाठी आज मारामारी करावी लागते. नोकरी करणा-यांपेक्षा नोकरी नसलेली जनता जास्त आहे. एकेकाळी बगदादच्या रस्त्यावरून स्वत:च्या गाडीतून फिरणा-या महिलेला पोट भरण्यासाठी आज वेश्या व्यवसाय करावा लागतो.
घटस्फोट आणि बालविवाहांचे प्रमाण प्रचंड वाढलंय. 2008मध्ये बुश साहेबांवर बूट फेकणारा पत्रकार ‘मी हा मारा इराकी विधवांच्या वतीने करतो आहे’, असे ओरडला होता. नोरिया खलफ़ नावाची विधवा काकुळतीने म्हणते, ‘मला काहीही करून लग्न करायचे आहे. मला नवरा हवा आहे आणि माझ्या मुलाला बाप!’
sudhirmutalik@gmail.com