आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिहादी भावनेची धुम्मस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोपमधील जर्मनी हा एक प्रबळ देश. २००८च्या आर्थिक मंदीनंतर युरोपीय समुदायातील अनेक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहिले, त्या वेळी त्यांना आधार देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सबळ जर्मनी पुढे आला. पहिले, दुसरे महायुद्ध जर्मनीसाठी विध्वंसकारी ठरले. त्या देशाचे पूर्व व पश्चिम जर्मनी असे दोन ओरखडे जगाच्या नकाशावर उमटले. जखम कालांतराने भरते व तिचा व्रणही निघून जातो, अगदी त्याच पद्धतीने पूर्व व पश्चिम जर्मनी यांच्या पुन:एकीकरणाच्या प्रक्रियेस १९८९मध्ये प्रारंभ झाला.
पूर्व जर्मनीने आपल्या नागरिकांना पश्चिम जर्मनीत जाण्यावर घातलेली बंदी उठविल्याचे ९ नोव्हेंबर १९८९ रोजी जाहीर केले. त्या दिवशी पूर्व जर्मनीतल्या शेकडो नागरिकांनी दोन्ही देशांना विभागणारी बर्लिनची भिंत जल्लोषाच्या वातावरणात ओलांडून पश्चिम जर्मनीत प्रवेश केला. या घटनेला येत्या ९ नोव्हेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण होतील. त्यानंतर काही आठवड्यांतच पूर्व व पश्चिम जर्मनीतील नागरिकांनी स्वत:च उत्स्फूर्तपणे मिळतील त्या हत्यारांचा वापर करून ही भिंत तोडायला सुरुवात केली. अखेर एकसंध जर्मनी सरकारने अवजड यंत्रसामुग्रीचा वापर करून बर्लिनची भिंत ३ ऑक्टोबर १९९० रोजी संपूर्णपणे पाडून टाकली.

या ऐतिहासिक घटनेनंतर एकसंध जर्मनीसमोर असलेल्या काही उग्र समस्या हळूहळू निवळू लागल्या, तसतशा नवीन समस्याही डोके वर काढू लागल्या. फरीबा नावा या मूळच्या अफगाणिस्तानी महिलेने अलीकडेच ‘न्यूजवीक’ साप्ताहिकामध्ये लिहिलेल्या प्रदीर्घ लेखामध्ये जर्मनीतील एका नव्या समस्येबद्दल लिहिले आहे.

१९८०च्या दशकामध्ये सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. त्या वेळी अफगाणिस्तानमधील सुमारे ६० लाख लोकांनी दुस-या देशांत स्थलांतर केले. त्यातील सुमारे दीड लाख अफगाणिस्तानी त्या वेळी जर्मनीमध्ये स्थायिक झाले. त्यांच्यात फरीबा व तिच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. लहानपणी पायाला लागलेले हे चक्र पुढे विवाह झाल्यानंतर तिला अमेरिकेत घेऊन गेले. त्यानंतर ती अनेक वर्षांनी जर्मनीतील आपल्या सगळ्या नातेवाइकांना भेटायला आली. जर्मनीत वर्षानुवर्षे राहिलेल्या अफगाणिस्तानींच्या युवा पिढीमध्ये तिला दिसला काही प्रमाणात धार्मिक उन्माद. आयसिस ही दहशतवादी संघटना इराक, सिरियामध्ये जिहादच्या नावाखाली हिंसाचार घडवत आहे. या धार्मिक युद्धात सहभागी होण्यासाठी जर्मनीसह अनेक युरोपीय देशांतून काही इस्लामी युवक सिरियामध्ये जात आहेत. आधी हे युवक अल काईदा या संघटनेच्या विषारी प्रचारामध्ये गुंतले व गुंगले गेले होते. अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खात्मा केल्यानंतर आता अल काईदाची हवा जरा कमी झाली आहे. आता इस्लामी जगतामध्ये बोलबाला आहे तो आयसिसचा. या संघटनेतर्फे इस्लामी युवकांना दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येते. पाकिस्तानमधील वझिरिस्तान भागात ही दहशतवाद प्रशिक्षण शिबिरे चालतात.

फरीबा नावा हिच्या जर्मनीतील नातेवाइकांपैकी काही युवक अल काईदा व आयसीसच्या विळख्यात सापडले. त्यातीलच एक मक्सूद लोदीन. जर्मन तालिबान मुजाहिदीन या बंदी असलेल्या संघटनेचा संस्थापक. २००९मध्ये मक्सूद जर्मनीतून गायब झाला. अल काईदाच्या पाकिस्तानमधील छावण्यांमध्ये त्याने घातपाताचे शिक्षण घेतले.
अल काईदाच्या कारवायांकरिता पैसा व माणसे मिळविण्यासाठी मक्सूद पुन्हा जर्मनीत आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. सुमारे पावणेसात वर्षांची कारावासाची शिक्षा तो आता भोगत आहे. फरीबाचा अजून एक नातेवाईक म्हणजे हकीम हादेखील आयसिसच्या जाळ्यात ओढला गेला. अशा एक ना अनेक कथा... जर्मनीतील अफगाणिस्तानी तसेच इस्लामी धर्मीयांमध्ये ऐकायला मिळतात. अनुभवता येतात. गेल्या दोन वर्षांत जर्मनीतील सुमारे ४५० अफगाणिस्तानी युवक-युवतींनी आयसिसच्या जिहादमध्ये सामील होण्यासाठी हा देश सोडला. मूळ जर्मन नागरिक असलेल्या काही जणांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. त्यातलेही काही जण आयसिसच्या प्रवाहात सामील झाले आहेत. आयसिसची विचारसरणी प्रमाण मानणारे जर्मनीतील पाठीराखे आता या संघटनेच्या समर्थनार्थ त्या देशामध्ये शक्तिप्रदर्शनही करू लागले आहेत. इस्राएलने गाझा पट्टीवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ गेल्या १२ जुलै रोजी बर्लिन शहरामध्ये तेथील मुस्लिमांनी एक मोर्चा काढला होता. सुमारे दीड हजार लोक त्यात सामील झाले होते.

इराकमधील याझिदी या अल्पसंख्याकांवर आयसिस भयंकर अत्याचार करीत आहे. त्या देशातून स्थलांतरित होऊन सुमारे ६० हजार याझिदी लोक जर्मनीच्या लोअर सॅक्सोनी व नॉर्थ -हाईन वेस्टफालिया या भागात स्थायिक झालेले आहेत. तेथील हेरफोर्ड येथे ७ ऑगस्टला एका याझिदीच्या मालकीच्या हॉटेलमध्ये आयसिस समर्थकांनी सशस्त्र हल्ला केला. त्या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सुमारे ३०० याझिदी लोकांनी हेरफोर्डमध्ये एक मोर्चा काढला. यामुळे निर्माण झालेला तणाव कमी करताना जर्मन पोलिसांची खूपच तारांबळ उडाली. आयसिसचे समर्थक जर्मनीमध्ये नजरेत भरतील, इतके दिसू लागले आहेत. हे लोक काही घातपाती कारवायाही घडवतील, ही शक्यता लक्षात घेऊन जर्मन पोलिस खूपच सतर्कतेने त्या देशातील मुस्लिमधर्मीयांवर बारीक नजर ठेवून आहेत. डिसेंबर २०१२मध्ये बॉन रेल्वे स्थानकामध्ये एक बॉम्ब ठेवण्यात आला होता. सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही व मोठी दुर्घटना टळली. त्या प्रकरणी मुस्लिम धर्म स्वीकारलेला एक जर्मन युवक व त्याच्या तीन सहका-यांना अटक करण्यात आली. अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन जर्मनीने आपल्या देशातील काही इस्लामी गटांवर बंदी घातली आहे. तसेच आयसिस समर्थकांची संख्या आणखी वाढू नये, म्हणूनही जर्मनीने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.