आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Jackie Shroff By Dharmendra Pratap Singh

जग्गू दादा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकी श्रॉफ यांच्या विनम्र स्वभावाबद्दल मी खूप ऐकून होतो. त्यांची मी घेतलेली पहिली मुलाखत आजही आठवणीत आहे. कमालिस्तान स्टुडिओत तेव्हा शशिरंजन यांच्या ‘दोबारा’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. मुलाखतीची वेळ आधीच ठरवलेली होती, त्यामुळे सेटवर पोहोचताच माझी जॅकीशी भेट झाली. त्यांच्या खास, ‘क्या है भिडू’, स्टाइलमध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि मी रिलॅक्स झालो. चित्रपट आणि इतर अनेक विषयांवर आम्ही बोलत होतो. जाताना तो म्हणाला, माझा मोबाइल नंबर आहे ना तुझ्यापाशी, नसेल तर लिहून घे. मला आश्चर्य वाटलं, कारण त्या काळात इनकमिंग कॉलचेही चार्जेस द्यावे लागायचे आणि दुसरं म्हणजे, कलाकार तेव्हा आपला सेल नंबर देणं सहसा टाळायचे. इथं जॅकी स्वत:च आपला नंबर सांगत होते. एवढंच नाही तर त्याने संवाद अधिक जलद गतीने व्हावा, यासाठी आपला ई-मेल आयडीही दिला.
जॅकीने आपल्या साध्या सरळ वागण्या-बोलण्याने आम्हाला प्रभावित केलं होतं. त्याच्याबाबत नेहमी चर्चा व्हायची की, तो किती साधा सरळ माणूस आहे. तरी पण आमच्यात एक अंतर होतं, ज्यामुळे मी त्याला नेहमी ‘सर’ म्हणूनच हाक मारायचो; पण एकदा आम्ही देव आनंद यांच्या ‘प्राइम मिनिस्टर’ चित्रपटाच्या पार्टीत भेटलो, तेव्हा तो पूर्ण वेळ माझ्या खांद्यावर हात ठेवून ‘देख भिडू’ म्हणत माझ्याशी बोलत राहिला. त्या दरम्यान जेव्हा त्याला कळलं की, पत्रकारितेत येण्याआधी मी ‘सेंच्युरी मिल’मध्ये कामाला होतो, तेव्हा तो अचानक भावूक झाला. कारण, वरळीच्या त्याच मिलमध्ये जॅकीचा मोठा भाऊ हेमंतही कामाला होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळेच जॅकीवर आपल्या कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्याच्या मते, जबाबदारीचे भान आले नसते, तर तो कधीच वाया गेला असता. जाताना जॅकी म्हणाला, तू माझा लहान भाऊ आहेस. आजपासून तू मला फक्त ‘दादा’ म्हणायचं. काही दिवसांनी ‘दैनिक भास्कर’ने एक पॉवर पार्टी आयोजित केली. गुजरातेत ‘दिव्य भास्कर’ला मिळालेल्या यशानिमित्त आयोजित या पार्टीत सर्वच क्षेत्रांतील दिग्गज लोक येणार होते. त्यात तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ‘झी’चे मालक सुभाषचंद्र गोयल, सहाराचे सुब्रतो राय, अभिनेता मनोज वाजपेयी आदी होते. माझ्यावर जॅकीला कार्यक्रमस्थळी घेऊन येण्याची जबाबदारी होती. आजवर ‘दादा, दादा’ म्हटल्यामुळे माझी-त्याची चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे त्याला घेऊन येणं मोठी गोष्ट नव्हती; पण मी जेव्हा त्याला भेटायला गेलो, तेव्हा त्याचा मूड गेलेला होता. तो म्हणाला, ‘पार्टी विसर, हवं तर मी तुझ्या घरी येतो कधी तरी.’ पण मी आग्रहच केल्यावर तो ‘भास्कर’च्या संचालकांशी बोलला आणि ‘धरमने सांगितलंय ना, मग माझी काय हिंमत की मी पार्टीत येणार नाही’, असं म्हणत होकार दिला. पार्टीत येण्याआधी त्यानं मला फोन केला होता, त्यामुळे मी हॉटेलच्या बाहेरच त्याची वाट बघत होतो. तो आला आणि आम्ही दोघं एकत्रच हॉटेलात शिरलो.
आत जाताना बीसीसीआयचे दिवंगत अध्यक्ष राजसिंग डुंगरपूर भेटले. त्यांच्यासोबत ‘भास्कर’चे अनेक मान्यवर अधिकारीही होते. जॅकीने सर्वांना नमस्कार करत हात मिळवणं सुरू केलं. आय अ‍ॅम जॅकी... जॅकी श्रॉफ. त्यावर कोणी तरी म्हणालं, अरे, तुम्हाला कोण नाही ओळखत? त्यावर जॅकीने विनम्र होत म्हटलं, नो नो आय अ‍ॅम जयकिशन श्रॉफ. आम्ही आत पोहोचण्याआधी जॅकीनं मला एका बाजूला घेतलं आणि म्हणाला, ‘देख भिडू, मला त्यांच्याशीच भेटव ज्यांच्यामुळे तुझा फायदा होईल.’ जॅकी गंभीर होता, पण मला हसू येत होतं. मी म्हटलं, ‘असं काही नाही दादा, तुम्ही आलात तेच खूप झालं.’ मी सर्वात आधी त्याची संचालकांशी ओळख करून दिली; मग चेअरमन, एमडी यांच्याकडे घेऊन गेलो. ही औपचारिकता झाल्यावर जॅकी जायचा विचार करत होता; तेव्हा मी त्याला म्हणालो की, दादा, इथे आज खास गुजराती जेवणाची सोय केलेली आहे. जॅकीने कुतूहलाने जेवणाची व्यवस्था पाहिली. मग आगपेटी हातात घेऊन मला एका बाजूला घेऊन गेला. म्हणाला, ‘सा-यांना माहीत आहे की, मी बिडी पितो.’ मी म्हटलं, ‘मग आज काय पिणार नाही का?’ तेव्हा तो म्हणाला, ‘आज सिगार प्यायची इच्छा आहे.’ आणि खळाळून हसायला लागला. थोड्या वेळाने तो जायला निघाला, तेव्हा मी आमच्या संचालकांना बोलावलं. त्यांनी पार्टीत आल्याबद्दल जॅकीचे आभार मानले आणि म्हणाले की, आमच्याकडून काही मदत लागली तर जरूर सांगा. तेव्हा जॅकी म्हणाला, नक्कीच, धरम आहे ना! जग्गू दादाच्या या दिलदारपणाने माझी छाती अभिमानानं फुलून आली...
dpsingh@dainikbhaskar group.com