आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्‍मा नावाचा ब्रँड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तामीळनाडूमधील राजकारण कायमच पुरुषकेंद्रित राहिले आहे. अशा वेळी एका महिलेने, तेही
राजकारणाचा वरदहस्त अथवा पाठीराखा नसलेल्या ब्राह्मण महिलेने, येऊन संपूर्ण पक्षावर, राज्यावर पकड मिळवणं हे अभूतपूर्वच. म्हणूनच जयललिताच्या जाण्यानं केवळ तिची अखेर झालेली नाही, तर तामीळनाडूच्या राजकारणामध्ये एक अनोखं आणि विचित्र वळण आलेलं आहे. आता तामीळनाडूच्या राजकीय इतिहासामध्ये एक लखलखतं आणि तेजस्वी पर्व संपून अंधार सुरू झाला आहे, हे निश्चित.
पाच डिसेंबरला एका वादळी व्यक्तिमत्त्वाची अखेर झाली. रूढार्थाने बघायला गेलं तर ती केवळ तिच्या इहलोकीची अखेर ठरणार आहे, कारण जयललिता जयरामन हे व्यक्तिमत्त्व येती अनेक दशकं या ना त्या निमित्ताने तामीळनाडूच्या राजकारणावर राज्य करत राहणारच आहे. भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असतानाही पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारी, एका ब्राह्मण्यविरोधी पक्षाची एकहाती सत्ता चालवणारी ही ब्राह्मण अभिनेत्री काळाच्या उदरामध्ये कदाचित दंतकथा गणली जाईल, इतकी तिची जीवनकहाणी आगळी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तामीळनाडूच्या या राजकारणी महिलेबद्दल माध्यमांमध्ये बरंच काही लिहून आलेलं आहे. तरीही तामीळनाडूच्या चार वर्षांच्या वास्तव्यामध्ये अम्मा जशी आणि जितकी भेटली त्याबद्दल जरा सांगते.

तामीळनाडूच्या राजकारणाची समीकरणे देशाच्या इतर राजकारणापेक्षा कायम भिन्न आहेत. प्रांतिक अस्मिता इथे कायमच जाज्वल्य असते. तामीळ संस्कृती आणि भाषेचा प्रचंड प्रभाव या राजकारणावर पडलेला आहे. पेरीयार या ब्राह्मणविरोधी चळवळीने तिथे कायम पकड ठेवली आहे. मात्र, हे राजकारण कायमच पुरुषकेंद्रित राहिले आहे. अशा वेळी एका महिलेने– तेही राजकारणाचा वरदहस्त अथवा पाठीराखा नसलेल्या ब्राह्मण महिलेने येऊन संपूर्ण पक्षावर, राज्यावर पकड मिळवण्याची ही घटना अभूतपूर्वच म्हणायला हवी.

माझी एक मैत्रीण म्हणाली होती की, तामीळनाडूमध्ये एकंदरीतच बाईकडून आज्ञा घेणे हे कमीपणाचे मानले जाते. ती स्वत: बांधकाम क्षेत्रामध्ये काम करते, आणि तिच्या हाताखाली सात इंजिनिअर्स आहेत. तिच्यापेक्षा अतिशय कमी अनुभव असूनही ही मुले तिचे ऐकत नाहीत, अरेरावीने उत्तरे देतात. अशा वातावरणामध्ये जयललितासारखी बाई पक्षामधल्या मोठमोठ्या नेत्यांना पाय धरायला लावते हा चमत्कारच आहे, असं ती म्हणते. बहुतेक लोकांची अशी समजूत आहे की, ती वस्तू मोफत वाटते म्हणून तिला मते मिळतात. काही अंशी हे खरं असलं तरीही मुळात अशा फ्रीबीज वाटण्याचं काम तामीळनाडूमध्ये आधीपासून सुरू होतं. निवडणुकीमध्ये अशा अनेक ‘फ्री स्कीम’ची बरसात होत असे, तेच तिनं पुढे चालू ठेवलं. फरक असलाच तर असा की, ती केवळ आश्वासने देऊन थांबली नाही तर तिने ती आश्वासने पूर्णदेखील केली. त्याही पुढे जाऊन तिने लोकमानसामध्ये स्वत:ची प्रतिमा बनवली. केवळ फ्री टीव्ही दिला म्हणून लाखोंच्या संख्येने लोक अंत्ययात्रेला रस्त्यावर येत नाहीत आणि तिचे केवळ दर्शन जरी झाले तरी अम्मा म्हणून हंबरडा फोडत नाहीत.

नक्की काय होतं तिच्यात, ज्यामुळे ती इतके दिवस अधिराज्य गाजवू शकली? चित्रपटांमधली तिची इमेज सोज्ज्वळ, पारंपरिक अशी कधीच नव्हती. तामीळ सिनेमामधली स्कर्ट आणि मिनी घालून वावरणारी ही पहिली बिनधास्त नायिका. अभिनेते, मुख्यमंत्री व जयललिता ज्यांना गुरुसमान मानत असे त्या एमजीआरच्या मृत्यूनंतर पक्षावर पकड घेताना तिनं अनेक माणसे जोडून ठेवली, तिच्या विरोधामधली माणसं पक्षामधून दूर केली. ज्या व्यक्तींनी तिला एमजीआरच्या अंत्ययात्रेमध्ये ढकलून खाली उतरवलं होतं, त्याच व्यक्तींनी नंतर तिच्या पुढ्यात लोटांगणं घातली. अण्णाद्रमुक पक्षामध्ये अम्माचा शब्दच शेवटचा शब्द बनला. तामीळनाडूच्या चार वर्षांच्या वास्तव्यामध्ये अम्मा आम्हाला पदोपदी भेटत राहिली. महाराष्ट्रामध्ये नुकतं बाळसं धरलेलं फ्लेक्स कल्चर तिकडे अगदी जोमासोमाने चालू आहे. पावलापावलांवर कार्यकर्त्यांनी लावलेले फ्लेक्स दिसत राहतातच. इथे दोनच पक्ष जोशात. एक करुणानिधीची द्रमुक आणि दुसरी जयललिताची अण्णाद्रमुक. अण्णाद्रमुकच्या प्रत्येक फ्लेक्सवर जयललिता आणि एमजीआर यांचा फोटो असणारच. फोटोशॉपची निरनिराळी किमया वापरून छापलेले हे फोटो चौकाचौकामधून कायम दिसायचे. त्यापैकी काही फ्लेक्स बघून हसूही आलं. २०११च्या निवडणुकीमधल्या विजयानंतर तिचा ‘द ममी रिटर्न्स’ अशी कॅप्शनअसलेला फ्लेक्स होता!
शिवाय सर्व जागतिक नेते तिच्या पाया पडत आहेत, असाही फ्लेक्स काही उत्साही कार्यकर्त्यांनी लावलेला होता. माझी चेन्नईमधली कामवाली अण्णाद्रमुकवाली. तिने मागे कधीतरी नगरसेविकेची निवडणूक पण लढवलेली- अर्थात अण्णाद्रमुकच्या तिकिटावर. राजकारणामध्ये इतकी सक्रिय असलेली कामवाली हे माझ्यासाठी अप्रूप होतं. एरवी कधीही काम न चुकवणारी आमची आयम्मा, पक्षाची रॅली असली की हमखास दांडी मारायची. रोजीरोटी बाद में, पण पक्षाचं काम महत्त्वाचं. तिला अर्थातच जयललिताबद्दल प्रचंड कळवळा. “तुम्हाला स्वस्तात तांदूळ देते म्हणून तुम्ही तिला अम्मा म्हणता की काय?” असं मी आयम्माला एकदा मोडक्यातोडक्या तामीळमध्ये विचारलं. तिनं लगेच उत्तर दिलं, “अम्मा आमची काळजी घेते, गरिबांसाठी खूप झटते.”
आयम्मासारख्या स्त्रियांमध्ये जयललिताबद्दल प्रचंड सहानुभूती आहे. तुम्ही टीव्हीवरही पाहिलं असेल, अनेक मध्यमवयीन गरीब महिला अम्मासाठी धाय मोकलून रडत होत्या. ती सुखरूप राहावी, म्हणून देवाची करुणा भाकत होत्या. या महिलांचे अश्रू सच्चे आहेत, कारण त्यांना अम्माविषयी केवळ आदरच नाही तर मायाही वाटते. एकट्या स्त्रीने इतक्या मोठ्या पक्षावर संपूर्ण ताबा मिळवणं, ही गोष्ट खचितच आश्चर्यजनक असली तरी अशा पद्धतीने सत्ता हातात ठेवूनही जयललिताने जनसामान्यांमध्ये स्वत:ची प्रतिमा कधीही करारी, आक्रस्ताळी स्त्रीची बनवली नाही. ती बनली अम्मा म्हणजेच आई. राजकारणामध्ये शह-काटशहाचे अनेक डावपेच खुबीनं लढवणारी ही स्त्री जनसामान्यांसाठी मात्र वत्सल आणि मायाळू भासत राहिली. तिच्या एकाकी राहण्याचे, मूलबाळ नसतानाही राज्यासाठी प्रशासक बनण्याचे लोकांना खूप कौतुक आहे. पडद्यावरची ग्लॅमरस प्रतिमा मागे ठेवून जयललिता जनमानसांमध्ये अम्मा बनण्यात यशस्वी झाली.

“जयललिता खूप उत्तम नेता आहे,” माझी एक शेजारीण मला केव्हातरी म्हणाली होती. वास्तविक त्यांचं खानदान द्रमुकशी एकनिष्ठ होतं. तरीही तिला जयललिता आवडायची. “तिच्यामध्ये धमक आहे. वेळ आली तर ती राष्ट्रीय नेतृत्वसुद्धा करेल. तामीळनाडूमधला कुठलाही राजकारणी तिची जागा घेऊ शकत नाही,” असा तिला विश्वास होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकीआधी जयललिताच पुढची पंतप्रधान होणार, अशी पोस्टर्स कित्येकांनी लावली होती. ती समीकरणं चुकली तरीही जयललिता राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका निभावतच राहिली. एके काळी तर तिच्या एका मतामुळे अख्ख्या देशावर निवडणुका लादल्या गेल्या होता. ती हट्टी होती, जिद्दी होती, मनस्वी होती, पण गेली काही वर्षं ती खूप शांत बनली होती. २०११मध्ये तामीळनाडूची सत्ता हाती आल्यानंतर तिनं राजकारणाइतकंच लक्ष लोककामांकडे आणि समाजकारणाकडे दिलं. विधानसभेची २०१६ची निवडणूक हरणार, असाच निवडणूकतज्ज्ञांचा अंदाज होता. तोही तिनं दणदणीत विजय घेत पूर्णपणे चुकवून दाखवला. चेन्नई पुराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकांमध्ये प्रत्येक पाहणी तिच्याविरुद्ध जात होती. तरीही अतिशय कमी जाहीर सभा घेऊनही ती जिंकली. याचे मुख्य कारण म्हणजे, तिने स्थापित केलेला स्वत:चा अम्मा हा ब्रँड. आज तामीळनाडू सरकारतर्फे कित्येक योजनांना अम्माचे नाव दिले जाते. अम्मा मिनरल वॉटर, अम्मा कॅन्टीन, अम्मा व्हेजिटेबल शॉप्स यांसारख्या अनेक योजनांना अम्माचे नाव आहे, प्रत्येक प्रिंटेड कम्युनिकेशनमध्ये अम्माचा फोटो त्या वस्तूंवर अथवा दुकानांवर येईल, याची खात्री घेतली जाते. २०१६च्या निवडणुकीमध्ये अम्माने स्कूटी गाडी कमी पैशांत विकत घेण्याची योजना आणली. त्या गाडीवरदेखील अम्माचे चित्र आहे. आम्हाला पूरग्रस्तांना म्हणून काही वस्तू सरकारकडून मिळाल्या त्यावरही अम्मा आहेच. हे मार्केटिंगच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट ब्रँडिंग म्हणून गणलं जाईल. या अशा पॉप्युलिस्ट योजना करत असताना तिने राज्यासाठी अनेक दीर्घकालीन आणि सुयोग्य प्रकल्पदेखील राबवले होते. खारं पाणी गोड करण्याचा प्रकल्प, गरिबांसाठी पक्की घरे, लग्नासाठी गरिबांना स्वस्त हॉल, शालेय मुलींना सायकली, कॉलेज विद्यार्थ्यांना लॅपटॉप अशा अनेक योजना तिने आणल्या आणि पूर्णत्वास नेल्या. महिला आणि बाल सुरक्षा, प्राण्यांचे हक्क आणि पाणीपुरवठा अशा विषयांबद्दल तिला तळमळ होती. तिचा फारसा कुणाच्याही निर्णयक्षमतेवर विश्वास नव्हता, त्यामुळे मंत्रीमंडळाचा प्रत्येक निर्णय तिच्या नजरेखालून गेल्याशिवाय पूर्ण होत नव्हता. परिणामी, कित्येक अडीनडीच्या प्रसंगी सरकारकडून दिरंगाई झाली. जनतेला मात्र तरीही अम्मा पसंत होती.

तिच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले, त्यासाठी ती तुरुंगातही जाऊन आली. अगदी मुख्यमंत्रीपदावर विराजमान असताना तिला अटक झाली होती. सर्वसामान्य जनतेला या भ्रष्टाचाराशी काहीही देणंघेणं नाही. इथला राजकारणाचा विचार पाहता, नेते लोक हे पैसे खाणारच, हे जनतेने मान्य केलेले आहे. त्याबद्दल त्यांचे काही म्हणणे नाही. पण तुम्ही शंभर रुपये खात असताना किमान वीस रुपयांचं काम आमच्यासाठी केलं तरी पुष्कळ, अशी इथली भावना आहे. अम्माने जनतेसाठी प्रचंड काम केलं, याचं म्हणूनच लोकांना कौतुक आहे. मी अम्मा कॅन्टीनमध्ये खाल्लेलं आहे. स्वस्त आहे म्हणून तिथे निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत नाही. अम्मा व्हेजिटेबल शॉपमध्ये भाज्या ताज्या आणि उत्तम दर्जाच्याच असतात.

अम्माचं वैशिष्ट्य म्हणजे ती सुशिक्षित, समाजाच्या अतिशय उच्च स्तरावर असलेल्या लोकांपासून ते झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांपर्यंत सर्वांची आवडती होती. तामीळ अस्मितेची प्रत्येक खूण जपताना तिने तिच्या वैयक्तिक श्रद्धा कधीच जाहीर केल्या नाहीत. लाइमलाइटमध्ये असतानाही ती स्वत:चं आयुष्य वेगळं ठेवण्यात यशस्वी ठरली. ती स्वत: अतिशय धार्मिक आणि श्रद्धाळू होती. शुभ मुहूर्त, नावाचे स्पेलिंग अशा सर्व गोष्टींवर तिचा विश्वास होता. द्राविडीयन पेरीयार चळवळ या सर्व गोष्टींना कडाडून विरोध करते. ती नियमितपणे अनेक देवळांमध्ये जाऊन दर्शन घेत असे, पण तरीही जनतेसमोर तिने आपली द्राविडी ओळख कायम ठेवली. जनतेला ती कधीही परकी वाटली नाही. तिचे बोलणे मुळातच अतिशय शांत आणि संयमित असल्याने तिने आक्रस्ताळेपणाने भाषणं केली नाहीत. पक्षप्रमुख होण्याचं स्वप्न पाहणारी तिची जिवलग मैत्रीण शशिकला मात्र तितकी लोकप्रिय नाही. एकाकी असलेल्या जयललिताची मैत्री शशिकलासोबत झाली आणि नंतर ती तिच्याच घरामध्ये राहू लागली. जयललितावर झालेले भ्रष्टाचाराचे बहुतेक आरोप हे शशिकलाशीदेखील संबंधित आहेत. एकीकडे इतकी हुशार आणि स्वतंत्र असलेली व्यक्ती एका मैत्रिणीच्या हट्टापायी स्वत:चं राजकीय नुकसान करवू पाहते, हे अनाकलनीय आहे. जयललिता एका मुलाखतीमध्ये म्हणते की, माझ्या आयुष्यामध्ये आई कायमच डॉमिनेटिंग राहिली. आई गेल्यावर ती जागा एमजीआरने घेतली आणि नंतर शशिकलाने. कदाचित कुणावर तरी विसंबून राहणं, ही तिची मानसिक गरज बनली असावी.

एमजीअारने आपला राजकीय वारस नेमला नाही म्हणून मला इतका संघर्ष करावा लागला, असं म्हणणाऱ्या जयललिताने स्वत:देखील राजकीय वारस नेमला नाही (की तिला नेमू दिला नाही?). प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकदेखील शेवटाकडे निघाला आहे. करुणानिधींचे वय त्र्याण्णव, तर पुत्र स्टालिन साठीकडे झुकले आहेत. तिथेही बंडखोरीची चिन्हे दिसत आहेत. इतके दिवस तामीळनाडू हे कायम दोनच प्रमुख पक्षांचे राज्य राहिले आहे. पण हे दोन्ही पक्ष आता विस्कळीत झाले आहेत. जयललिताच्या जाण्यानं केवळ तिची अखेर झालेली नाही, तर तामीळनाडूच्या राजकारणामध्ये एक अनोखं आणि विचित्र वळण आलेलं आहे. आता तामीळनाडूच्या राजकीय इतिहासामध्ये एक लखलखतं आणि तेजस्वी पर्व संपून अंधार सुरू झाला आहे, हे निश्चित. अनेक राष्ट्रीय पक्ष या विखुरलेल्या तुकड्यांना टिपण्यासाठी सज्ज बसले आहेत. त्या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या सर्व राजकीय खेळामध्ये तामीळ नागरिक मात्र त्याची अम्मा गेल्याने कायमचा पोरका झाला आहे.
nandini2911@gmail.com
बातम्या आणखी आहेत...