आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ऐतिहासिक नगरीची ‘अद्भुत’ कहाणी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायमंड प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘जेरुसलेम’ या पुस्तकात राजा डेव्हिडपासून ते बराक ओबामांपर्यंत; आणि ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांच्या जन्मापासून ते इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षापर्यंतचा तब्बल तीन हजार वर्षांचा भव्य इतिहास आपल्यासमोर उलगडत जातो. श्रद्धा, कत्तली, धर्मांधता आणि सहिष्णुतेने व्यापलेला असा हा इतिहास आहे.
खादं मोठ्ठं शहर, महानगर वा जगप्रसिद्ध शहर म्हटलं की कटू-गोड, बरं-वाईट, शुभ-अशुभ, सुष्ट-दुष्ट, सज्जन-दुर्जन अशा सगळ्यांनाच तिथे स्थान असतं. तिथे त्यांचा थोडाबहुत उपयोगही असतो. फक्त तो प्रसंगानुसार, तारतम्याने आणि सावधपणाने करून घेणं यालाच व्यवहारचातुर्य म्हणतात. पण तसं घडलं नाही आणि ‘हम करे सो कायदा’ म्हणत जर ‘त्या’ शहरावर राज्य करणाऱ्यांनी मनमानी कारभार केला, तर ‘त्या’ शहराची अवस्था एका ‘वैश्विक नगरीसारखी’ म्हणजे जेरुसलेमसारखी होते.
डायमंड प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या सविता दामले अनुवादित ‘जेरुसलेम’ या पुस्तकात राजा डेव्हिडपासून ते बराक ओबामांपर्यंत आणि ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांच्या जन्मापासून ते इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षापर्यंतचा तब्बल तीन हजार वर्षांचा भव्य इतिहास आपल्यासमोर उलगडत जातो. श्रद्धा, कत्तली, धर्मांधता आणि सहिष्णुतेने व्यापलेला असा हा इतिहास आहे. महत्त्वाचे म्हणजे, लेखक सायमन सीबग मांटफिऑरी यांनी अफाट मेहनतीने तो मांडला आहे.
केंब्रिज विद्यापीठातून इतिहासाचे शिक्षण घेतलेले, ‘स्टॅलिन : द कोर्ट ऑफ द रेड’साठी सर्वोत्तम इतिहासविषयक ग्रंथ पुरस्कार मिळवणारे मांटफिऑरी हे कादंबरीकार आणि इतिहासतज्ज्ञ आहेत. या इतिहासतज्ज्ञाने जगाचं केंद्रस्थान असलेल्या ‘जेरुसलेम’ या शहराचं जवळपास ७८० पानांमध्ये (विविध टिपांसह, वाचनीय माहितीसह) लिहिलेलं चरित्र खरोखरच अद्भुत, गुंतवून ठेवणारं आहे.
‘ही (जेरुसलेम) नगरी अनेकदा उद्ध्वस्त झाली आहे आणि अनेकदा तिची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. जेरुसलेमनगरी एका वय झालेल्या कामोत्सुक स्त्रीसारखी आहे. ती तिच्या प्रियकरांचा एका पाठोपाठ जीव घेते आणि कंटाळ्याची जांभई देऊन त्यांना झिडकारून टाकते. ती जोडीदाराशी संभोग सुरू असतानाच त्याला खाऊन टाकणाऱ्या एका ‘ब्लॅक विडो’ कोळ्यासारखी आहे’, असं जेव्हा अ‍ॅमोस ऑझ लिहितो, तेव्हा प्रास्ताविकापासून ‘त्या’ नगरीची डोकं हलवून टाकणारी कहाणी प्रकरणा-प्रकरणातून उलगडत जाते. ती वाचताना वाचक एकाच वेळी सुन्न होतो आणि ही अस्सल कहाणी त्याच्या मनात अधिकच ठसत जाते.
जेरुसलेमचा इतिहास हा एक मोठा रंगमंच आहे. एखादी सनसनाटी, चित्तथरारक कादंबरी सांगावी, त्या शैलीत मांटफिऑरी यांनी हा इतिहास सांगितला आहे. त्यामुळेच सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असते, हे म्हणणे अगदी खरे आहे. या पुस्तकात प्रेम, देशप्रेम, अध्यात्म, पराकोटीची हिंसा आणि क्रौर्य यांचे दर्शन घडते’ असे लिहितात, तेव्हा लेखकाच्या त्यामागच्या चिकाटीची आणि अमर्याद मेहनतीची साक्ष मिळते.

या पुस्तकात प्रेम, देशप्रेम, अध्यात्म, पराकोटीची हिंसा आणि क्रौर्य यांचे दर्शन घडते, जे वाचकाला एका अद‌्भुत विश्वात नेते.विचार करायला लावते. उत्कंठा वाढवते. हेच या पुस्तकाचे यश आहे, जे मराठी अनुवादातही जपले गेले आहे.
प्रास्ताविक, अनुवादिकेचं मनोगत, आभारप्रदर्शन, नावं/लिप्या/शीर्षकं इत्यादींबद्दल माहिती, ‘ज्यू धर्म’, ‘मूर्तिपूजा’ (पेगनीझम), ‘ख्रिश्चन धर्म’, ‘इस्लाम’, ‘क्रुसेड’, ‘माम्लुक’, ‘ऑटोमन’, ‘साम्राज्य’, ‘झायनवाद’ अशा नऊ प्रकरणांमध्ये (म्हणजे जवळपास ६५० पानांमध्ये) जेरुसलेमचा ‘इतिहास’ (खूपशा संदर्भासह) लिहिला गेला आहे. विंचवांनी भरलेला हा सोन्याचा चषक कसा माणसांना खात, राज्य उद्ध्वस्त करत तरीही ‘पवित्र’ होत घडत गेला आहे, हे सत्य या पुस्तकाद्वारे आपल्यासमोर येतं. यात लेखकाचं ‘यश’ मोठं आहे. कारण त्याने मनुष्यस्वभावातल्या विसंगतींवर नेमकं बोट ठेवत, कुणाचाही पक्ष न घेता अत्यंत वस्तुनिष्ठपणे हा सारा इतिहास सांगितला आहे. तसंच टिपांमधून त्याने माहितीचं खूप मोठं भांडार वाचकांसाठी खुलं केलं आहे.

जेरुसलेमची ही चरित्रकथा वाचताना माणसाची दोन मनं (त्यात एक पशूचं, एक देवाचं) जसजशी उघड होत जातात, तसतशी उपभोगात, क्रौर्यात रमणारी माणसं कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात आणि मानव जातीशी ‘क्रूर’ खेळ करत कशा प्रकारे आसुरी आनंद मिळवतात, हेही (चित्र) समोर येतं. याचबरोबर गुणी, बुद्धिमान, प्रतिभावंत माणसं प्रत्येक काळात कसा ‘इतिहास’ रचत असतात, हेही समोर येतं. डायमंड पब्लिकेशन्सने नेहमीच वेगळ्या धाटणीची पुस्तकं बाजारात आणली आहेत. त्यात जसा अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे, तसाच कोशवाङ‌्मयाचाही समावेश आहे. ‘जेरुसलेम’च्या निमित्ताने ‘डायमंड’ने पुन्हा एकदा दर्जा अधोरेखित केला आहे.

चंद्रकांत भंडारी
* पुस्तकाचे नाव : जेरुसलेम - एक चरित्रकथा
* लेखक : सायमन सीबग मांटफिऑरी
* अनुवाद : सविता दामले
* प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
* मूल्य : ८९५/- रुपये
* पृष्ठसंख्या : ७९२