आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On K.O.Girhe By Prashant Pawar, Divya Marathi, Father

'भटक्या'काराचे यातनापर्व..!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालात महा बाप पडला होता. त्याला पाहताच त्याच्या गळ्यात गळा पडून धाय मोकडून रडू लागलो. बा मला सोडीत नव्हता. बरं झालं आता तू मह्या भेटीला आला. आता महा भरोसा नाही. शाळा शिक बाळ... बाचा आवाज खाली खाली जात होता. आता बाची वाचा बसली ती कायमचीच. सकाळ उजाली, भराभर गोपाळ जमा झाले. आता बाला पालातून बाहेर काढले. पण इतर जण बाच्या मढ्याला हात लावीत नव्हते. माय गोपाळांच्या पाया पडाया लागली, ‘म्या आता ह्या मढ्याला काय करू? तुमच्यासमोर पदर पसरते, पण कायबी करा मह्या दादल्याची मूठमाती करा.’ एक पंच उठला अन् बोलता झाला, ‘वंक-याची दाढी उतरविली नायी, त्या बदल्यात आता दोन दिस घालावे लागतीया. हाय का राजी तरच मढ्याला शिवतोय. नाय तर निघून जातोया...’ दोन दिस...जिथं खायाला पैसा नायी तिथं दोन दिस कसे घालायचे. आमच्यात चांदीच्या वस्त-याने दाढी उतरावी लागते. पंचांना बकरा मारून गाव जेवण द्यावे लागते. आता म्या बाची झोळी धरली. बाला झोळीत टाकले.

काका पुढं, मी त्याच्या मागे. एका हाताने आसू पुसीत होतो. तीन-चार मैल चालत होतो, बाला पुरायला जागा मिळत नव्हती. एका ठिकाणी जागा गावली तर गावातली माणसं धावत धावत आली. इथं पुरू नका ह्या मढ्याला नाय तर दुस-याला ह्या मुडद्याबरोबर मातीत घालीन. दिस मावळतीला जात होता, पावसाची रिमझिम सुरूच होती. अनेकांना विनवण्या केल्या; पण कुणीच मढं पुरायला जागा देत नव्हते. अखेर नदीकाठी चार हाताची जागा गावली अन् तिथंच बाची माती खंदली... ज्या हाताने त्या शाळकरी मुलाने बासाठी माती खंदली, त्याच हातात पुढे त्याने लेखणी घेतली. स्वत:च्या बापाला पुरण्यासाठी चार हात जागाही न मिळणे, इतक्या जळजळीत वास्तवाला सामोरे गेल्यानंतर साहजिकच त्याची लेखणी आसूड बनली. या आसूडाने मग पांढरपेशांच्या नि मध्यमवर्गीयांच्या विश्वावर सपासप फटके मारले. शोषितांची दु:खं किती नाना परीची असतात, याचे प्रत्ययकारी दर्शन त्याने दिले. केवळ ‘वेगळं’ म्हणून त्याची वास्तपुस्त करून भागणार नाही, तर त्यातल्या जीवघेण्या समस्यांचा, असह्य घुसमटीचा, अन्यायाचा नि छळाचा, अज्ञानाचा, निरक्षरतेचा नि अंधविश्वासांचा नि या सा-यांची परिणती म्हणून या सा-यांच्या अस्फुट, मूक वेदनेचा आलेख त्याने आपल्या लेखणीतून मांडला.


भटक्यांच्या या मूक वेदनेला वाचा फोडणारी ती व्यक्ती म्हणजे के. ओ. गि-हे. माझ्या यापूर्वीच्या स्तंभामध्ये ज्या जनाबाई गि-हेबद्दल लिहिले होते, त्या जनाबार्इंचे हे पती आणि मार्गदर्शकदेखील. त्यांनी फक्त आपल्या पत्नीलाच शिकण्यासाठी प्रोत्साहित केले नाही, तर ते स्वत:देखील एम. फिल. झाले. अनेक वर्षे कृषी खात्यात नोकरी केली. गेल्या 30-40 वर्षांपासून भटक्या-विमुक्त चळवळीमध्ये स्वत:ला झोकून दिले. समाजाला त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली. जो गोपाळ समाज शिक्षणापासून कोसो दूर राहिला, त्याच समाजाच्या गि-हे यांनी ‘गोपाळ समाज, परंपरा आणि इतिहास’, भटक्या, दोरीवरचं काळीज, यातनापर्व इतकी ग्रंथसंपदा लिहिली. ज्या गोपाळ समाजाच्या मुलांनी शाळेची पायरी पाहिली नव्हती, त्या गोपाळ समाजाच्या गि-हे यांच्या या ग्रंथसंपदेवर अनेक विद्यार्थी आज पीएच. डी. करत आहेत. महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात त्यांची पुस्तके समाविष्ट केली आहेत.


औरंगाबाद जिल्ह्यातील माटेगाव येथील गावशिवाराबाहेर अत्यंत खडतर आणि हलाखीचे जीवन जगणा-या गोपाळ समाजात गि-हेंचा जन्म झाला. जवळजवळ सर्व निरक्षर आणि अडाणी असलेल्या या समाजाच्या कपाळावर गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारला गेला होता. आज इथं तर उद्या तिथं, असे बेभरवशाचे जीवन असले तरी जिथे असतील तिथे दररोज पोलिस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक. अशा भटक्या जीवनाचा गि-हेंना कंटाळा आला होता. पालं ठोकायची, उपटायची आणि म्हशीवर बि-हाड घालायची. आईच्या हट्टाखातर त्यांनी शाळेत प्रवेश घेतला आणि मग एम. फिल. होईपर्यंत मागे वळून पाहिले नाही. आपले आजवरचे सगळ्यात मोठे काम कोणते, असे विचारल्यानंतर गि-हे आपल्या ‘गोपाळ समाज : परंपरा आणि इतिहास’ या ग्रंथाचे नाव घेतात. समाजाचा इतिहास लिहिणे आणि परंपरा सिद्ध करणे, हे तसे कठीण कार्य; परंतु स्वकुलाचा-स्वसमाजाचा इतिहास लिहिण्याची या महाराष्ट्राची परंपरा असल्याने आपणही आपल्या या गोपाळ समाजाचा इतिहास व परंपरा लिहू शकू, असा विश्वास वाटल्यानेच हे आव्हान पेलता आल्याचे गि-हे सांगतात. गोपाळ जातीच्या जात पंचायतीतील मौखिक कथांचा अभ्यास करताना या समाजाच्या काही परंपरांचे आणि इतिहासाचे संकलन करू लागले. या लोककथांमधूनच गोपाळ समाजाची परंपरा, लोकरूढी, लोकविधी, लोकविचार, लोकमानस आणि लोकप्रवाहाबरोबरच समाजदर्शन प्रतिबिंबित होत गेले. गावोगाव भटकून गोपाळ समाजाच्या पाड्यापाड्यावर जाऊन, पंचायतीत उपस्थित राहून जो काही अनुभव गाठीशी आला तो खूपच भयंकर होता. याबद्दलची एक घटना सांगताना गि-हे सांगतात, औरंगाबादमध्ये जात पंचायतीत मुलीला जातीबाहेर टाकल्यावर त्याच दिवशी मुलीच्या आईवडिलांनी व तिच्या नव-याने ती मुलगी मेली, असे समजून तिचा दिवस घातला, जमातीला पंगत दिली. काही दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला व शवाचा दफनविधी केला. हे सारे खूपच भयावह होते. या ग्रंथात गोपाळ समाजाच्या जात पंचायतीत सांगितल्या जाणा-या कथा, पंचायतींचे संकेत, संवाद आणि विशेषत: या समाजात जी गुप्त भाषा बोलली जाते-जी इतर समाजाच्या लोकांना सांगणे अतिशय आक्षेपार्ह समजले जाते-ती गुप्त भाषा या ग्रंथाद्वारे मी बाहेर आणली. गोपाळ समाजाच्या महिला जात पंचायतीमध्ये कशा टार्गेट केल्या जातात किंवा त्यांना कशी जनावरांसारखी वागणूक मिळते, हे प्रमुख उद्दिष्ट मी ग्रंथामध्ये ठेवले होते आणि त्याचाच मला खूप त्रास झाला.

‘गोपाळ समाज : परंपरा आणि इतिहास’ हा ग्रंथ जेव्हा प्रकाशित झाला, तेव्हा मात्र गोपाळ समाजात प्रचंड प्रक्षोभ उफाळला. आपल्या समाजाची पारुषी कशाला उजेडात आणली, म्हणून गि-हे आणि त्यांच्या कुटुंबाचा छळ सुरू झाला. पदोपदी मानहानी होऊ लागली. जातपंचायत दूषणे देऊ लागली. विडी-काडी बंद झाली. गि-हे नुसते एवढ्यावर थांबले नाहीत, त्यांनी हा ग्रंथ स्वत:च प्रकाशित केला आणि गेले मढीच्या यात्रेला. अहमदनगर येथे होळीनंतर मढी येथे भटक्या समाजाची खूप मोठी यात्रा भरते. मढी हे भटक्यांचे सर्वोच्च न्यायालाय. याच मढीच्या यात्रेत जातपंचायत जो निर्णय देईल तो अंतिम असतो. गि-हे जेव्हा त्यांचे हे पुस्तक घेऊन मढीला गेले, तेव्हा गोपाळ समाजाचा पाच-सहा हजारांचा जमाव गोळा झाला होता. अनेक कार्यकर्ते, पत्रकार यांनी गोपाळ समाजाला परिवर्तनाची कास धरण्यास प्रवृत्त केले. गि-हे यांनी गोपाळ समाजाचा इतिहास लिहून कसे मोलाचे कार्य केले आहे, हे त्यांना पटवून देण्यात आले आणि त्याच मढीमध्ये मग के. ओ. गि-हे आणि त्यांच्या पत्नी जनाबाई गि-हे यांचा त्याच गोपाळ समाजाने सत्कार केला.


भटक्या विमुक्तांवर संशोधनपर लेखन झालेले नाही. कथा-कादंब-या, कविता, नाटकं नाही. चिंतनाची परंपरा समाजात नाही. कुठे तरी चारदोन आत्मकथने प्रकाशित झाली तेवढेच. समूहाचा विचार हा जीवनमूल्यांपासून येत असतो. लोक विचाराने बांधले गेलेले असतात. साहित्य संस्कार घडवते. विचार रुजविण्याचे काम साहित्य करते. साहित्याने नवसमाज निर्माण होतो, या ध्येयाने आज गि-हे पछाडलेले आहेत आणि म्हणूनच भटक्यांच्या चळवळीचे काम करता करता साहित्यविश्वातही त्यांचे योगदान खूप मोठे आहे. स्वत:ला दुरुस्त करून इतरांना दुरुस्त करत राहण्याचा ध्यास उराशी बाळगून प्रत्यक्ष कृती करणारे क्वचितच असतात. कचरू गि-हे आणि जनाबाई गि-हे हे दांपत्य मात्र याला अपवाद ठरले. शिक्षणासाठी इतका खस्ता घाऊनही कचरू गि-हे बीए, एमए, एमफिल, बीजे झाले; तर जनाबाई बीए, डीएड होऊन शिक्षिका झाल्या. प्रामाणिक, मनमिळाऊ, विनम्र स्वभाव, मृदू भाषा यामुळे ते विपुल लोकसंग्रह करू शकले. त्यांच्या रक्ताचे नसतील, पण महाराष्ट्रभर त्यांचे आज अनेक चाहते तयार झाले आहेत. कारण त्यांनी आपले साहित्यरूपी जीवन, विचार गोपाळ समाजासह तमाम भटक्या विमुक्तांच्या पालापालात, पांड्यात, बेड्यात, पोळात, वाड्या-वस्तीत, घराघरांत पोहोचवले. त्यांनी वक्तृत्वापेक्षा लेखणीरूपी कर्तृत्वातून बोलणे अधिक पसंत केले.
(संदर्भ - ‘मजल दरमजल’ गौरवग्रंथ)


shivaprash@gmail.com