कृष्ण निरंजन सिंग या तरुणाच्या वडलांना कृष्णाने इंग्लंडला जावे, बॅरिस्टर व्हावे आणि दिल्लीच्या कोर्टामध्ये वकिली करावी, असे मनोमन वाटत होते आणि कृष्णाही लॅटिन घेऊन केंब्रिजच्या परीक्षा पास झाला होता.पण वडील स्वत: क्रिमिनल वकिली करत असताना एका खटल्यामध्ये त्यांच्या युक्तिवादामुळे एक खुनी, आरोप सिद्ध न होता सुटला. जो खरोखरीच खुनी आहे तो केवळ न्यायालयातील युक्तिवादावर मोकाट सुटतो, हे बघून कृष्णाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला. त्याने सत्याची कास धरून वकील होण्याचे नाकारले. गंमत आहे, आणि काय विरोधाभास आहे; पुढे आयुष्यभर कृष्णा पडद्यावर का होईना, पण दिवसाआड मच्छरांसारखी माणसे मारणा-या व्हिलनचे काम करू लागला.
वकिली करायची नाही म्हटल्यावर महाराज बॉडीबिल्डिंगच्या कामी लागले. वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये बाजी मारून पार बर्लिन ऑलिम्पिकच्या प्रवेश पायरीपर्यंत पोहोचले होते. नंतर आर्मीमध्ये दाखल व्हावे, मेजर, कर्नल अशा पाय-या चढत फील्डमार्शल व्हावे, अशी इच्छाही मनात घर करू लागली होती. पण तेही झाले नाही.
आर्मीचे नुकसान फिल्म इंडस्ट्रीच्या पथ्यावर पडणार होते. कृष्णा कलकत्त्याला एकदा गेला असताना फॅमिली फ्रेंड पृथ्वीराज कपूर त्याला भेटले आणि ते त्याला देवकी बोस यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी या पोराला आपल्या चित्रपटामध्ये डॉक्टरची छोटी भूमिका दिली. साल होते 1936. चित्रपट ‘सुनहरा संसार’. त्यानंतर चित्रपट येऊ लागले... हवाई डाकू, आनंद आश्रम, विद्यापती, मिलाप, एक रात्र, इशारा असे अनेक. एका चित्रपटामध्ये कृष्णाला पृथ्वीराज कपूर जे त्याच्यापेक्षा वयाने मोठे होते त्यांच्या बापाचे काम करावे लागले, तेव्हा संकोचलेल्या कृष्णाला पृथ्वीराज म्हणाले, ‘तू अभिनयात माझा बाप आहेस हे सिद्ध कर, की झाले!’
1945मध्ये आलेला ‘हुमायून’ गाजला. नंतर ए. आर. कारदारने त्याला ‘बागबान’मध्ये मुंबईमध्ये स्थिर केले. ‘फंटूश’, ‘आवारा’, ‘चलती का नाम गाडी’, ‘रेश्मा और शेरा’, नंतरच्या काळातील ‘दुश्मन’, ‘मजबूर’ हे सत्तरच्या दशकातील चित्रपट के. एन. सिंगना त्यांच्या वडलांची इच्छा पूर्ण झाल्याचे निदान पडद्यावर का होईना समाधान देणारे होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये के. एन. वकिलाच्या वेषात होते. मुळात हुशारी असल्यामुळे चार-चार पानांचे डायलॉग त्यांनी सहजी पाठ केले होते.
राज कपूरला सारी फिल्म इंडस्ट्री ‘राजसाब’ म्हणून संबोधत असे; पण के. एन. सिंग कधीच राजला ‘साब’ म्हणाले नाहीत. कारण राज कपूर त्यांच्या मांडीवर खेळत मोठा झाला होता. मोठेपणा तर के. एन.मध्ये पहिल्यापासून होता. उंचीपुरी कमावलेली शरीरयष्टी, लाकडाचा कोरून काढलेला मास्क असावा तसा उभा चेहरा, भव्य कपाळ, त्याखाली डोळ्यात भरणा-या भुवया, मोठे डोळे, भरदार आवाज, नेहमी सूट, बूट, टाय, डोक्यावर हॅट, वर ओव्हरकोट, तोंडामध्ये वाकडा पाइप, त्या पाइपमधून निघणा-या धुराच्या वलयांसारखं वाकडं बोलणं....
डायलॉग म्हणताना वर जाणा-या भुवया, आवाजाची पट्टी न उंचावता केवळ ‘अपनी बकवास बंद करो’ म्हणून समोरच्याला गप्प करण्याची अदा. अशा अवतारामध्ये के. एन. पडद्यावर आले की या माणसाच्या डोक्यात नक्कीच तिसरेच काहीतरी शिजत असावे, असे प्रेक्षकांना वाटत असे; नव्हे, खात्री असे. ‘ज्वारभाटा’ या दिलीपकुमारच्या पहिल्या चित्रपटामध्ये के. एन. होते. खरं तर या माणसाने हिंदी चित्रपटाचा सारा इतिहास पाहिला होता; नव्हे, अनुभवला होता. जवळपास 200 चित्रपट यांच्या नावावर आहेत. त्या लिस्टमध्ये कित्येक माइलस्टोन चित्रपट आहेतच. त्यामुळेच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले ‘तीसरी मंजिल’सारखे करमणूकप्रधान चित्रपट उठून दिसतात.
काही गाणी, काही प्रसंग के. एन. सिंगच्या नुसत्या असण्याने उठावदार झाले आहेत. मधुबालाचे क्लबमधील अविस्मरणीय गाणे ‘आइये मेहेरबां’... आठवा, क्लब मालक असणारा के. एन. त्या गाण्यात केवळ मालकाच्या रुबाबात फिरत असतो; पण ते ‘असणे’ आपणास वेगळ्याच गोष्टीचा विचार करण्यास भाग पाडते.
दिसते तसे नसते. किंवा या चेह-यामागे दडलंय काय, असा प्रश्न निर्माण करणारा वावर के. एन.ला त्या काळातील चित्रपटाचा अविभाज्य भाग बनवून गेला. आफ्रिकन तासलेल्या लाकडी मुखवट्याच्या मागे न जाणो काय काळेबेरे लपलेले आहे, ही उत्सुकता जशी आपल्या विचारचक्राला चालना देते, किंवा कोणत्या तरी ‘हूडू’सारख्या काळ्या जादूला घेऊन आलेली आहे, अशी मनात भीती निर्माण करते; तसे काहीसे के. एन.चे असणे गूढ होते. अगदी अलीकडच्या राजेश खन्नाच्या ‘हाथी मेरे साथी’मध्ये ‘रामू हाथीला गोळ्या घालून मारा.’ सांगणारा व्हिलन बच्चे कंपनीला भयभीत करत असे. त्या भयकारी भुवया आणि डोळे के. एन.च्या म्हातारपणामध्ये साथ देईनात. अंधत्व आलेले के. एन. माटुंग्याच्या फाइव्ह गार्डनजवळील आपल्या घराच्या गॅलरीमध्ये मी पाहिलेले आहेत. पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध व्हिलन याकूब एकदा के. एन.ला म्हणाला होता, ‘सिंग इज किंग’. याच नावाचा चित्रपटही त्यांच्या जाण्यानंतर आला.
1 सप्टेंबर 1908रोजी डेहराडूनमध्ये जन्मलेले के. एन. सिंग 31 जानेवारी 2000 रोजी मुंबईमध्ये जवळपास 92 वर्षांचा इतिहास साक्षीला घेऊन वारले. त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर कोणत्या चित्रपटामधील कोणता सीन चालू असावा? हीरोचा? की धुक्यातून चालत येणा-या, हॅट घातलेल्या, ओव्हरकोटच्या खिशामध्ये एका हाताने पिस्तूल सांभाळत आणि दुस-या हाताने तोंडातील वाकडा पाइप धरलेल्या व्हिलनचा?
त्यांच्या चित्रपटामधील गूढ अस्तित्वासारखी ही धूसर काळी धिप्पाड आकृती गूढच राहिलेली बरी...
raghuvirkul@gmail.com