Home »Magazine »Rasik» Article On Laden By Arvinda Gokhle

लादेननंतरचे पेच!

अरविंद व्यं. गोखले | Apr 29, 2012, 05:13 AM IST

  • लादेननंतरचे पेच!

ओसामा बिन लादेन ठार झाल्याच्या घटनेला येत्या 2 मे रोजी बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. लादेन गेला तरी त्याने जगावर लादलेले जे काही प्रश्न आहेत ते संपलेले नाहीत आणि ते संपण्याची शक्यताही नाही. उलट हे प्रश्न आणखी गुंतागुतीचे होणार आहेत. 2012 हे वर्ष त्या दृष्टीने अतिशय बिकट असल्याचे भाकीत करण्यात येत आहे. अर्थात हे भविष्य मात्र नाही. जे चित्र डोळ्यासमोर दिसते आहे ते फारसे चांगले नाही.
अल काईदा आणि तालिबान यांचे लादेनच्या पश्चात काय करायचे त्याचे आराखडे निश्चित होते, त्यानुसार त्यांचे डावपेच चालू आहेत. जगात असंख्य ठिकाणी बॉम्बस्फोट आणि मानवी बॉम्बचे हादरे सहन करावे लागणार आहेत. या दहशतवादी संघटनांच्या दृष्टीने ‘काळाच्या शेवटा’कडे नेणारी ही लढाई आहे. त्यांना लादेनचा बदला घ्यायचा तर आहेच, पण त्याबरोबरच त्यांना सार्‍या जगाला आपण कुठपर्यंत जाऊ शकतो ते दाखवून द्यायचे आहे. लादेनच्या ‘अल काईदा’मध्ये अजूनही ती रग आहे आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही टोकाला जाणारी फौज तिच्या पाठीशी आहे. अल काईदाचा आधीचा क्रमांक दोनचा आणि आताचा क्रमांक एकचा नेता डॉ. आयमन अल जवाहिरी जिवंत आहे आणि त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. लादेनप्रमाणे जवाहिरी ‘अल जझिरा’वर फार वेळा येऊन आपली दर्पोक्ती करायच्या फंदात पडत नाही. तो कुठे आहे, तो काय करतो, त्याच्यामागे कोण आहे हेही कुणाला फारसे माहीत नाही. त्याच्याकडे जगाला हिंस्र विध्वंसाने हादरवून सोडणारी ताकद आहे, हे मात्र वास्तव आहे..

वास्तविक लादेन जिवंत होता तेव्हाही असे म्हटले जात होते की 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर केल्या गेलेल्या हल्ल्याचा खरा सूत्रधार जवाहिरी हाच होता. जवाहिरीनेच लादेनच्या मनात अमेरिकेवर हल्ला करण्याचे कारस्थान भरवले. लादेनने त्याला बळ दिले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सरहद्दीवर असलेली भौगोलिक रचना अल काईदाला साह्यभूत ठरत गेली. त्यांची लपण्याची ठिकाणे शोधून काढण्याएवढे तांत्रिक बळ अमेरिकेकडे असूनही प्रत्येक वेळी पाकिस्तानकडूनच खो घातला गेला. पाच वर्षांपेक्षा जास्त काळ लादेन पाकिस्तानात राहत असताना पाकिस्तानी राज्यकर्त्यांना त्याचा शोध लागत नाही, हा प्रकारच हास्यास्पद. अमेरिकेवर हल्ला 2001 च्या सप्टेंबरमध्ये झाला आणि त्याच वर्षी डिसेंबरमध्ये ‘सीआयए’ या अमेरिकन गुप्तचर खात्याच्या गॉरी बन्र्टसेन या अधिकार्‍याने आपल्या हाती लादेनच्या आवाजाचा पुरावा आल्याचे म्हटले होते. त्या वेळी पाकिस्तानातल्या अत्यंत सुरक्षित अशा ठिकाणाहून अफगाणिस्तानात तोराबोरामध्ये असलेल्या सहकार्‍याशी सॅटेलाइट फोनवरून बोलताना लादेनचा हा आवाज पकडण्यात आला होता. लादेनला पळून जाता येऊ नये यासाठी बन्र्टसेनने तेव्हा अमेरिकेच्या मध्यवर्ती सेनादलाचे प्रमुख जनरल टॉमी फ्रँक्स यांना अफगाणिस्तान-पाकिस्तान सरहद्दीवर आठशे रेंर्जसना सज्ज ठेवण्यास सांगितले होते. त्या वेळी जनरल फ्रँक्स यांनी तसे करायला नकार दिला होता. त्याला जर तेव्हाच पकडण्यात आले असते तर अफगाणिस्तान आणि इराक या दोन देशांमध्ये अमेरिकेने पैशाची जी धूळधाण केली तीही रोखली गेली असती.

पाकिस्तानला दिली जाणारी मदत त्या काळात अमेरिकेला किती महाग पडत होती याची यादी द्यायचे म्हटले तर ती खूपच मोठी होईल. यापैकी एकच बारकावा इथे सांगण्यासारखा आहे. त्या वेळी वायव्य सरहद्द प्रांताच्या गव्हर्नरपदी अली जान ओराकझाई हे होते. उत्तर वजिरीस्तानमध्ये असलेल्या सात पाकिस्तानी तालिबानी नेत्यांसमवेत ओरकझाई यांनी एक करार केला. मात्र सरकारने हा करार तालिबानांबरोबर नव्हे, तर आदिवासी नेत्यांबरोबर झाल्याचे जाहीर केले होते. त्या करारानुसार पाकिस्तानी सैन्याने आपल्यावर होणारे हल्ले रोखून ते अमेरिकन सैन्यावर अफगाणिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानातून अमेरिकन सैन्यासाठी होणार्‍या रसदपुरवठय़ावर केले जातील हे पाहिले होते. त्यानंतरच अफगाण आणि अमेरिकन तसेच नाटोच्या सैन्यावर अफगाणिस्तानातले हल्ले वाढले. पाकिस्तानी सैन्यावरील हल्ले थांबले आणि त्या बदल्यात पाकिस्तानी सैन्याच्या त्या भागातल्या तपासणी नाक्यांना काढून घेण्यात आले. त्या वेळच्या करारानुसार अटकेत असलेल्या सर्व तालिबानांना सोडून देण्यात आले. इतकेच नव्हे, तर त्यांच्यासमवेत जप्त केलेला दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे तालिबानांच्या हवाली करण्यात आली. थोडक्यात, 2006 मध्ये दोन्ही वजिरीस्तानांवर तालिबानांचा वरचष्मा अधिकृतपणे कायम राहिला.

हे सर्व लक्षात घेतल्यावर अफगाणिस्तानमध्ये काबूलवर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांच्या शोधासाठी अमेरिकेला किंवा पाश्चात्त्य जगताला फार प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. हे हल्लेखोर कुठून आले, कुणी पाठवले आणि त्यांच्यामागचा उद्देश काय, या गोष्टी लखलखीत सूर्यप्रकाशासारख्या स्वच्छ आहेत. जॉर्ज बुश यांनी आधीच्या काळात आणि अध्यक्ष बराक ओबामा तसेच परराष्ट्रमंत्री हिलरी किं्लटन यांनी आता पाकिस्तानला दटावणीच्या स्वरात खरे तर घायकुतीला येऊन सांगितले आहे की ‘हक्कानी नेटवर्क’ला आवरा, नाहीतर आम्हाला पाकिस्तानवर कारवाई करणे भाग आहे. हक्कानी नेटवर्क म्हणजे अल काईदा आणि तालिबान या दोन्ही दहशतवादी संघटनांशी संबंध असलेला एक गट, पण तेवढय़ापुरतेच त्यांचे महत्त्व नाही. या दहशतवादी संघटनेकडे पैसा आणि मनुष्यबळ आहे. त्यांच्याकडे हजारोंची फौज आहे. त्यांचे एक दहशतवादी भरती केंद्र पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आहे याचा धोका भारताच्या दृष्टीने अधिक आहे. त्यांच्याकडे अरब, पाकिस्तानी, मध्य आशियाई आणि काश्मिरी तरुण आहेत. त्याहीपलीकडे या सर्व दहशतवाद्यांची संख्या सहा लाखांवर आहे, त्यात एक लाख आत्मघातकी आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानवर चढवलेल्या हल्ल्यानंतर ‘आयएसआय’नेच गुलबुद्दीन हिकमत्यारसह ‘हिज्ब ए इस्लामी’च्या अनेक तालिबानी नेत्यांना आर्शय दिला. गुलबुद्दीन तेव्हा इराणमधून पाकिस्तानात आला आणि वायव्य सरहद्द प्रांतात ‘आयएसआय’च्या संरक्षणाखाली खुलेआम हिंडत होता. तेव्हा त्याने पेशावरनजीक शामशाटू छावणीमध्ये अफगाणिस्तानमधून येणार्‍या निर्वासितांसाठी आर्शयस्थान उभे केले, पण ते प्रत्यक्षात दहशतवादी केंद्र बनले होते. त्याच काळात जलालुद्दीन हक्कानी याला ‘संभाव्य नेमस्त तालिबानी नेता’ म्हणून ‘आयएसआय’कडून गोंजारले जात होते. त्याने आपले अभयारण्य उत्तर वजिरीस्तानमध्ये उभारले होते..

आता तोच हक्कानी आणि त्याचे बगलबच्चे अमेरिकेच्या डोक्यावर मिरे वाटत असतात. जलालुद्दीन हक्कानीचा मुलगा सिराजुद्दीन हा अफगाणिस्तानमध्ये आधीच्या काळात असलेल्या तालिबानी सत्तेत मंत्री होता, याकडेही अमेरिकेने तेव्हा दुर्लक्ष केले होते. विशेष हे की 11 सप्टेंबरनंतर जलालुद्दीन ‘सीआयए’शी चर्चा करण्यासाठी आयएसआयच्या संरक्षणात इस्लामाबादला जात असे.

तालिबानांशी अमेरिकेची चर्चा नवी नाही. आताही अमेरिका तेच करते आहे. तालिबानांशी कतारमध्ये चर्चा केली जात आहे आणि या चच्रेसाठी तालिबानांनी कतारमध्ये आपले कार्यालय उघडले आहे. आपल्याला टाळून ही चर्चा होत असल्याचे दु:ख अर्थातच पाकिस्तानी नेत्यांना, विशेषत: ‘आयएसआय’ला आहे. त्यामुळेच काबूलला झालेल्या हल्ल्यांविषयी संशय आहे.

त्याहीपलीकडे भयावह वाटाव्यात अशा बर्‍याच गोष्टी आहेत. गेल्या वर्षी लादेनला ठार करण्यात आल्याचा बदला म्हणून अल काईदाने कराचीजवळ ‘पीएनएस मेहरान’वर हल्ला केला होता. हा हल्ला 20 मे रोजी झाला. हल्लेखोर दहशतवादी पाकिस्तानी नौदलाच्या काही अधिकार्‍यांच्या संपर्कातून तिथे आले होते, असे पाकिस्तानी पत्रकार सईद सलीम शाहजाद यांनी आपल्या ‘एशिया टाइम्स ऑनलाइन’ वृत्तपत्रात लिहिले. हा प्रकार ज्यांना आवडला नाही त्यांनी शाहजाद यांना इस्लामाबादमधील त्यांच्या घरातून बोलावून घेतले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी शाहजादचा मृतदेह इस्लामाबादपासून दीडशे किलोमीटर अंतरावर सापडला. शाहजाद यांच्या मृत्यूमागे ‘आयएसआय’चा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

शेवटची बाब त्याहून गंभीर आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार ‘पीएनएस मेहरान’वर पाकिस्तानी अण्वस्त्रे आहेत. महंमद इलियास काश्मिरी याला अलीकडेच ठार करण्यात आले तरी आयमन अल जवाहिरी जिवंत आहे. तालिबानी नेता मुल्ला उमर बलुचिस्तानात ‘कुठेतरी’ आहे, म्हणजे तो सध्या तरी सुरक्षित आहे. म्हणजेच, लादेन गेला तरी लादेनची पिलावळ शाबूत आहे आणि ती फोफावते आहे, हाच त्याचा सरळ अर्थ आहे!

arvindgokhale@gmail.com

Next Article

Recommended