Home »Magazine »Madhurima» Article On Ladies Pregnancy Injuries

गर्भाशयाला होणारी इजा

डॉ. अंजली बापट मुंबई | Apr 27, 2012, 06:09 AM IST

  • गर्भाशयाला होणारी इजा

खूप वर्षांपूर्वीची एक केस मला आठवते आहे. साधारण वीस वर्षांची एक तरुणी सकाळी अत्यवस्थ स्थितीत अपघात विभागात आली होती. हातापायांवर मेंदी आणि अंगावरच्या दागिन्यांवरून लक्षात येत होते की तिचे नुकतेच लग्न झाले आहे. तिचा रक्तदाब अतिशय कमी होता आणि हृदयाचे ठोकेही खूप वेगात होते. अतिरक्तस्रावामुळे ती अत्यवस्थ होती. प्राथमिक तपासानंतर तिचे ताबडतोब ऑपरेशन करून अंतर्गत रक्तस्राव बंद केल्यावर तिची तब्येत हळूहळू सुधारली.
स्त्रियांच्या जननेंद्रियांना होणार्‍या इजा खालील कारणांमुळे होतात-

• बाळंतपणाच्या वेळी

• जबरदस्ती शरीरसंबंधांमुळे

• अपघातात पडल्यामुळे
एखाद्या वस्तूमुळे इजा
(इन्ज्युरीज ड्यू टू फॉरेन बॉडीज अँड इन्स्ट्रमेंट्स)
अनेक विचित्र गोष्टी उदा. पिन्स, पेन, पेन्सिल्स इ. योनीमार्गात घातलेल्या आढळतात. काही वेळा अशी मुले वयाने खूप लहान किंवा मतिमंद असतात. या प्रकारच्या गोष्टींमुळे इजा होतेच व कधी-कधी अशा गोष्टी आत राहिल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन जास्त अपाय होऊ शकतो. पूर्वी जेव्हा गर्भपात कायदेशीर नव्हता, तेव्हा अनेक प्रकारच्या लांब, टोकदार गोष्टी उदा. काडी, सुया इ. गर्भपात घडवण्यासाठी वापरल्या जात असत. या गोष्टींमुळे वेगवेगळ्या प्रकारची इजा झालेली आढळून येते. तपासणीअंती अशा गोष्टी आढळून आल्यास ताबडतोब काढून टाकून योग्य उपचार करणे आवश्यक असतात.
गर्भाशयाला इजा - पूर्वी जर सिझेरियन ऑपरेशन झालेले असेल तर कधी-कधी ज्या ठिकाणी गर्भाशय शिवलेले असते त्याच ठिकाणी ते उघडले जाऊ शकते. तर कधी-कधी संपूर्ण गर्भाशयच फाटू शकते. अशा वेळी पोटाच्या आत खूप जास्त रक्तस्राव होतो व बाळालाही इजा होते. प्रसंगी मृत बालक जन्माला येते व माताही दगावू शकते. म्हणूनच अशी शक्यता आढळल्यास ताबडतोब सिझेरियनचे ऑपरेशन करून बाळ बाहेर काढणे चांगले.
बाळंतपणाच्यावेळी होणार्‍या इजा - नैसर्गिक प्रसूतीच्या वेळी एपिसिओटोमी- मुद्दामहून छेद घेतल्यामुळे इजा होण्याची शक्यता खूपच कमी होते. परंतु जर बाळ मोठे असेल, प्रसूतीची जागा लहान असेल, चिमट्यांचा किंवा मशीनचा वापर केल्यास योनीमार्गाला इजा होते. ही इजा अगदी थोड्या प्रमाणात किंवा कधी-कधी खूप जास्त म्हणजे जिवाला धोका होईपर्यंतही होऊ शकते. म्हणूनच प्रसूती नेहमीच तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच करणे र्शेयस्कर असते. काही वेळा रक्तस्राव इतका जास्त होऊ शकतो की रक्त द्यावे लागते.
बाळंतपणामध्ये किंवा दुसर्‍या ऑपरेशनच्या वेळी अशा प्रकारची इजा होऊ शकते. इजा झाल्यावर ताबडतोब लक्षात आले तर टाके घालून इलाज करता येतो. पण वेळीच लक्षात न आल्यास काही दिवसांनी हे वेगवेगळे मार्ग एकत्रित चिकटू शकतात (फिस्टुल).
जूनपासून डॉ. अंजली बापट वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यासाठी वाचकांनी त्यांचे प्रश्न आमच्या औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहमदनगर येथील कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष पोचवावे, टपालाने पाठवावे, फॅक्स करावे वा ई-मेल करावे. हे प्रश्न डॉक्टरांकडे पाठवून त्यांची उत्तरे पंधरवड्यातून एकदा प्रसिद्ध केली जातील. वाचकाचे नाव प्रसिद्ध करण्यात येणार नाही. पत्रावर कृपया ‘टेक केअरसाठी प्रश्न’ असा स्पष्ट उल्लेख करावा. आपल्या प्रश्नांची आम्ही वाट पाहत आहोत. - संपादक, मधुरिमा

Next Article

Recommended