स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. लतादीदींच्या स्वर्गीय स्वरांना कळीकाळाची, प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही. या स्वरांना कोंदण आहे ते केवळ उत्कटतेचे, भव्यतेचे! लता मंगेशकर हा भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग हा भारतीय
आपल्याच मायदेशात राहत असो वा विदेशात स्थायिक झालेला असो. जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय माणूस वसलेला आहे, तिथे तिथे तो लता मंगेशकर यांचा स्वर सोबत घेऊन गेला आहे. भारतात जागतिकीकरण करण्याची भाषा १९९१ पासून सुरू झाली, पण त्याच्याही चार-पाच दशके आधीपासून काही भारतीय वैशिष्ट्यांचे जागतिकीकरण आपसूकच झाले होते. त्यामागे कोणताही कायदा नव्हता, घटनादुरुस्ती नव्हती.
जर काही असेल तर होते, निव्वळ व निखळ प्रेम. त्यामध्ये लता मंगेशकरांचा स्वर अग्रभागी होता. भारतीय चित्रपटसृष्टीला ज्या वेळेपासून जगाला कवेत घ्यायचे वेध लागायला लागले, त्या वेळी तिच्याकडे अनेक नामवंत नायक, नायिका हे अग्रदूत म्हणून पाहत होतेच; पण लता मंगेशकर नावाची व्यक्ती एखाद्या विशाल छत्रासारखी या सा-यांवर मायेची सावली धरून होती.
२८ सप्टेंबर १९२९ या दिवशी इंदूरमध्ये जन्म झालेल्या लतादीदी आज वयाची ८५ वर्षे पूर्ण करून ८६व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. लतादीदींच्या आयुष्यातील सात दशके ही त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीने व्यापलेली आहेत. लता मंगेशकर यांच्या स्वराने भारून जाण्याचा काळ माझ्या आयुष्यात लहानपणापासून सुरू झाला. गिरणगावातील रंगारी बदक चाळीमध्ये मी राहत होतो. त्या वेळी आमच्या अख्ख्या चाळीमध्ये एकच रेडिओ होता.
आमच्या शेजारी बेंडखळे आडनावाचे कुटुंब राहायचे. त्यांच्याकडे असलेल्या रेडिओवर हिंदी चित्रपटगीते सतत वाजत असायची. त्या रेडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा लता मंगेशकर यांचा सुरेल आवाज माझ्या कानी पडला. सात-आठ वर्षे वयाचा असताना मला त्या गाण्यांचा अर्थ काही कळायचा नाही, पण पुढे जसजसा मोठा होत गेलो, तसतसा लतादीदींचा स्वर अधिक कान देऊन ऐकू लागलो. त्यांनी म्हटलेल्या गाण्यांतल्या शब्दछटा, भाव हळूहळू समजू लागले.
गिरणगावामध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, आंबेडकर जयंती आदी महत्त्वाच्या प्रसंगी लाऊडस्पीकरवर गाणी वाजवण्याची प्रथा होती. त्या वेळी ऐकलेली अनेक हिंदी व मराठी गाणी माझ्या रोमारोमांत भिनली. त्याशिवाय रस्त्यावर १६ एमएम चित्रपट दाखविले जायचे. त्या वेळी तिथे पाहिलेल्या मराठी, हिंदी चित्रपटांचा व त्यातील गाण्यांचा विलक्षण परिणाम मनावर बिंबला गेला.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर मी त्या वेळी करतच होतो, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखून ठेवलेला होता. ‘रसिक बलमा...’, ‘चुप चुप खडे हो जरूर कोई बात है’, असो; वा ‘देव जरी मज कधी भेटला’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’ अशी लतादीदींची एकाहून एक सरस गाणी ऐकताना माझे कान सुपाएवढे होत असत. ‘गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’ हे स्वरलतेचे गाणे ऐकताना आधी डोळ्यांसमोर वधूपिता उभा राहायचा, त्यानंतर माहेरहून सासरला चाललेली त्याची लेक दिसायला लागायची, मग वऱ्हाडी मंडळी... असा सगळा माहोल डोळ्यासमोर उभा करण्याचे सामर्थ्य आहे, लतादीदींच्या आवाजात. अशी कितीतरी गाणी सांगू शकेन, जी माझ्या मनात सातत्याने रुंजी घालत असतात. हिंदी असो वा मराठी चित्रपटसृष्टी, त्यातील प्रत्येक नायिकेचे एक वेगळे वैशिष्ट्य होते. मीनाकुमारी म्हणजे मूर्तिमंत कारुण्य, मधुबाला म्हणजे स्वर्गीय सौंदर्याचा आविष्कार, नर्गिस ही काहीशी अवखळ... पडद्यावर जी नायिका गाणे सादर करणार असेल तिची अभिनयशैली, लकबी, तिच्या बोलण्याच्या आवाजाचा पोत हे सारे लक्षात घेऊन दीदी गात. त्यामुळे पडद्यावर ती अभिनेत्री गात आहे, असे वाटावे; इतके गाणे जिवंत भासते.
रंगभूमी ही माझी पहिली आवड.
महाविद्यालयीन जीवनात एकां
किकांचे लेखन-दिग्दर्शन करता करता मी शेवटी रंगभूमीचाच झालो. आंब्यांच्या विक्रीच्या पिढीजात व्यवसायात लक्ष घालू लागल्यानंतरही रंगभूमीचे आकर्षण मला स्वस्थ बसू देत नव्हते. हिंदी, मराठी चित्रपटांतील गाण्यांचे गारूड काही उतरायला तयार नव्हते. त्यातून मिळणा-या ऊर्जेतूनच पुढे मी ‘मंगलगाणी-दंगलगाणी’, ‘आवाज की दुनिया’, ‘आझादी ५०’, ‘गंगा-जमुना’, ‘गाने-सुहाने’, ‘मराठी बाणा’, ‘मधुरबाला’ असे कार्यक्रम सादर केले. २००४मध्ये लता मंगेशकर यांनी आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करून ७६व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लतादीदींची ७५ गाणी सादर करणारा ‘अमृतलता’ हा कार्यक्रम मी माझ्या ‘चौरंग’ संस्थेतर्फे सादर करायला लागलो. ‘अमृतलता’चा पहिला प्रयोग झाला २२ जानेवारी २००४ रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियममध्ये. त्यानंतर पुढचा प्रयोग प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर येथे केला. त्यानंतर इंदूर, उज्जैन, कोलकाता, झारखंड, दिल्ली, गोवा, रायपूर, पुणे, गांधीनगर असा प्रवास करत करत अमृतलता कार्यक्रमाने आता साडेतीनशे प्रयोगांचा आकडा गाठलेला आहे. अमृतलता कार्यक्रम करायचा, असे जेव्हा ठरले; त्या वेळी कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी तसेच त्यात कोणकोणत्या गाण्यांची निवड केली आहे, याची कल्पना देण्याकरिता मी लतादीदींशी एक तास दूरध्वनीवर बोललो होतो. तो संवाद अजूनही माझ्या मनात ताजा आहे. पण स्वरसम्राज्ञीला प्रत्यक्ष भेटण्याची पहिली संधी मिळाली, तीही प्रख्यात नाट्यनिर्माते व नेपथ्यकार मोहन वाघ यांच्यामुळे. एका कार्यक्रमात मी वाघांबरोबर दीदींना भेटलो. त्या वेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने मी भारावून गेलो होते. सर्वात जास्त मला लक्षात राहिल्या, त्या लतादीदींच्या कानातील हि-याच्या कुड्या. त्या कुड्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी आली होती. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीयांपैकी एकाच्या लग्नसमारंभात स्वरलतेची भेट झाली होती. त्या वेळी मी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या.
२८ सप्टेंबर २००३ रोजी लतादीदींच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक कार्यक्रम मुंबईत सादर झाला होता. त्यानंतर मी काही विचार करायला लागलो. अमृतलता कार्यक्रमाचे बीज डोक्यात रुजले होते. त्यासाठी लता मंगेशकरांच्या जीवनाविषयी, गाण्यांविषयी जे जे उपलब्ध साहित्य होते, ते वाचून काढण्याचा व त्यातून हवी ती माहिती मिळविण्याचा सपाटा लावला. विश्वास नेरुरकर यांनी संपादित केलेल्या ‘लता मंगेशकर-गंधार’ या पुस्तकात लतादीदींची सुमारे पाच हजार गाणी दिलेली आहेत. त्यातील अडीच हजार गाणी मी वेगळी काढली. त्या गाण्यांची पुन्हा छाननी करून दीड हजार गाणी अमृतलता कार्यक्रमासाठी विचारार्थ समोर ठेवली. त्यातून सरतेशेवटी हजार गाणी निवडून ती प्रत्यक्ष वाद्यमेळासह वाजवून बघितली. अंतिम चाळणीमध्ये ७५ गाणी निवडून त्यांचा समावेश ‘अमृतलता’ कार्यक्रमामध्ये केला. अमृतलता ही लता मंगेशकरांची म्युझिकल बायोग्राफी आहे. या कार्यक्रमाच्या आजवर झालेल्या प्रयोगांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्याचे श्रेय आहे, लतादीदींच्या मूळ गाण्यांचे, तसेच या कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनाचे.
अमृतलतामध्ये जी ७५ गाणी सादर होतात, त्यामध्ये रसिकांच्या सर्वाधिक टाळ्या व वन्समोअर ज्यांना मिळतो ती काही गाणी याप्रमाणे आहेत- (१) प्यार किया तो डरना क्या (२) रसिक बलमा (३) होठों पे ऐसी बात (४) बिछुआ चढ गयो पापी बिछुआ (५) दिलबर दिलसे प्यारे (६) सावरे सावरे (७) ओ मेरे सनम (८) देर ना हो जाए...
लता मंगेशकर यांच्या प्रदीर्घ यशस्वी कारकिर्दीचे श्रेय त्यांच्या सुस्वराला आहेच; पण त्याचबरोबर त्यांचे संगीतकार, गीतकार, वाद्यवादक या सर्वांनी मिळून दिलेल्या योगदानाचेही ते सामूहिक यश आहे. खरे तर लतादीदींचा आवाज पातळ आहे. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना गाणी देण्यासाठी संगीतकार थोडेसे आढेवेढे घेत. पण लतादीदींच्या आवाजाला खरा न्याय दिला, तो स्टुडिओतील माइकने. त्या माइकने त्यांच्या आवाजातील बारकावे टिपले आणि तो आवाज सर्व वैशिष्ट्यांसह संगीत रसिकांसमोर नेऊन ठेवला. त्यानंतर हा आवाज अवघ्या भारतवर्षात लोकप्रिय झाला. असं म्हणतात की, एखाद्या दिवशी पृथ्वीवर प्रलय होईल आणि कोणीच उरणार नाही. पण खरंच, तशाही परिस्थितीत अमर राहील तो म्हणजे ‘लताचा आवाज’...!
ध्यानधारणेची अनुभूती
सांगली आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे अतूट नाते. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला. मात्र त्यांच्या भावंडांपैकी आशा भोसले, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म मात्र सांगलीचा. लता मंगेशकर सांगलीमध्ये ज्या शाळेत शिकल्या होत्या,
ती महापालिकेची मुलींची शाळा क्रमांक ११ची वास्तू काही वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होती. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी ३५ वर्षांपूर्वी सांगली येथे तेथील महानगरपालिकेने दीनानाथ नाट्यगृह बांधले. हा भावबंध लक्षात घेऊन ‘अमृतलता’ या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग २२ जानेवारी २००४ रोजी सांगलीतील तरुण भारत स्टेडियममध्ये झाला होता. हा प्रयोग झाल्यानंतर एक वृद्ध गृहस्थ माझ्यापाशी आले. त्या गृहस्थांनी मला भारावून सांगितले की, ‘अमृतलता’ हा निव्वळ कार्यक्रम नाही, तर हे मेडिटेशन आहे. या वृद्ध गृहस्थांचे उद्गार आजही माझ्या स्मरणात आहेत.
chaurang.ashokhande@gmail.com