आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Life Mantra By Sachin Tayade, Divya Marathi

जगण्‍याचे मोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यंतरी व्याख्यानाच्या निमित्ताने पुणे येथे होतो. व्याख्यान झाल्यावर एका तरुणीने प्रश्न विचारला, आपण आत्महत्या का करतो? मी लगेच प्रतिप्रश्न केला, हे ‘आपण’ म्हणजे नेमके कोण? उत्तरादाखल ती म्हणाली, खरे तर माझी एक मैत्रीण आहे, तिला आत्महत्या करायची आहे. मी म्हटलं, मग काय झालं, आत्महत्येची अपॉइंटमेंट मिळत नाहीए का? सभागृहात एकच हशा झाला. मात्र माझ्या त्या प्रतिक्रियेमुळे त्या मुलीच्या चेह-यावर मात्र प्रचंड राग साचला होता. माझे ते वक्तव्य गमतीचेच होते. खरे तर मला तिच्या प्रश्नाची हवा काढून घ्यायची होती. नंतर मात्र त्या मुलीला स्वतंत्र भेटलोही. सोबत चहाही घेतला. आत्महत्येची निरर्थकता आणि जीवनाची सार्थकता पटवून दिली. खरे तर मैत्रिणीचे नाव घेऊन स्वत:च्याच आत्महत्येबद्दल तिने तो सवाल विचारला होता.

परवाच तिचा फोन आला. मस्त जगतेय आता ती. जीवनावर पूर्वीइतकेच प्रेम करतेय, असे बरेच काही अगदी न थांबता सांगत होती ती. तिच्या त्या प्रश्नावर त्या वेळी माझे मत मात्र मी व्यक्त केले होते. मी म्हणालो होतो, ‘ज्या कालावधीत माणसाच्या जीवनाच्या उत्सुकतेचे विषय पुसट व्हायला लागतात, त्याच वेळेस त्याला मृत्यूचे आकर्षण वाटू लागते.’

प्रत्येकाचे दु:ख वेगळे असते, हे कबूल आहे मला. प्रत्येकाला त्याचे दु:ख हे जगातले सर्वात मोठे दु:ख वाटत असते, हेसुद्धा मला जाणवत आले आहे. पण प्रत्येकाचा आजार वेगळा म्हणूनच त्यावर इलाजही वेगळाच झाला पाहिजे. सगळ्यांना एकच औषध देऊन कसे जमेल? आपणही असे करू नये. इतक्या सहजतेने घेऊ नये, अशा व्यक्तीला. चेहरा सगळे सांगत नसतो. सकाळचा नाष्टा सोबत घेणारे, दुपारचे जेवण एकत्रित करणारे, संध्याकाळी गप्पा मारणारे रात्रीच्या जेवणाआधीच जग सोडून जातात... मग ज्याच्या-त्याच्या तोंडी फक्त एवढीच वाक्ये उरतात की, असे वाटलेच नव्हते की हा किंवा ही असे पाऊल उचलेल म्हणून. म्हणूनच तुटलेल्या कुठल्याही व्यक्तीला ‘क्वालिटी टाइम’ देणे गरजेचे असते. तो दिलाच गेला पाहिजे. जेव्हा त्याला गरज आहे आपल्या सहवासाची, तेव्हा ती वेळ उपलब्ध करून देण्यासाठी धडपडले पाहिजे. असे न केल्यास, आपण त्या व्यक्तीला गमावून बसण्याचीच शक्यता असते.

मी मागेही माझ्या एका लेखात एका मुद्द्याचा उल्लेख केला होता. आजही या लेखात जाणीवपूर्वक त्या मुद्द्याचा उल्लेख पुन्हा करू इच्छितो. अनेकदा होते काय की, समाजाच्या भीतीने आपण आपले अमूल्य जीवन संपवण्याचा निर्णय घेतो. मुळात कोणत्या समाजाला आपण असे घाबरत असतो? समाज म्हणावा असा प्रकार अस्तित्वात आहे का? चला, मी समाजाला भेटून येतो असे म्हटल्यावर आपण नेमके कुणाला भेटायला जातो? जसा ‘गर्दी’ नावाचा शब्द आहे, ‘कळप’ नावाचा शब्द आहे, तसाच ‘समाज’ नावाचाही शब्द आहे, हे लक्षात ठेवा. समाज अशी गोष्ट नसतेच. असतात ती फक्त सुटी सुटी माणसे... आपण या माणसांच्या गर्दीलाच समाज म्हणायला लागतो. परीक्षेत मुलाला कमी मार्क्स पडले, किंवा मुलीसोबत काही वाईट घडले की, आता मला ‘समाज’ काय म्हणेल... असे वाटणा-या बापाला त्याच्या स्टाफमधील चार माणसे काय म्हणतील, याचीच भीती अधिक असते. तीच चार माणसे त्याचा समाज असतो. जर हे असे असेल तर प्रत्येकाच्या बाबतीत विनाकारण प्रभाव पाडणारी अशी चार-दोन माणसे आपले इतक्या वर्षांचे जीवन नेस्तनाबूत करायला कशी कारणीभूत ठरू शकतात? ‘समाज काय म्हणेल’ हा विचार किमान अशा वेळी तरी उखडून फेकायला हवा. लक्षात ठेवा, तुमच्याशिवाय हा समाज नाही... आणि उद्या तुम्हीच नसाल, तर असा समाज काय कामाचा?

मनात जेव्हा-केव्हा निराशेचे विचार डोकावतील, तेव्हा ज्या जागेवर सध्या आहात, त्या जागेपासून सर्वप्रथम दूर व्हा. जवळच्या व्यक्तीसोबत वाद सुरू असेल तर काहीही करून तो वाद थांबवण्याचा प्रयत्न करा. फोनवर वाद सुरू झाला असेल तर शक्य असेल तर प्रत्यक्ष समोरासमोर येऊन तो वाद निवळण्याचा प्रयत्न करा. स्वत:तले सगळे इगो संपवून जीवन अधिक मोलाचे मानायला शिका.

दोस्तहो, स्वत:च्या जगाची व्याख्या अधिक व्यापक करणे आवश्यक आहे. कुठल्या तरी घटनेमुळे जीवन संपवण्याचा विचार सपशेल चूकच. लक्षात ठेवा, केवळ एक घटना म्हणजे आयुष्य नसते, तर घटना-घटनांनी आयुष्य बनत असते. आपल्या जीवनात अनेकांना स्थान द्या. नवी ध्येये जीवनात जन्माला घाला. नवी नवी माणसे जोडा. वाटल्यास दुख-या आठवणींनी भरलेला तो प्रदेश सोडा. मात्र जीव सोडण्याचा विचार काहीही करून डोक्यातून काढा... ऊठा, लढा. वेळ घ्या. वेळ द्या. लक्षात ठेवा, ‘जिंदगी बहोत खूबसूरत और बडी है...!’