आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Life Mantra By Sachin Tayade, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लेस ब्राऊन'चा धडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत लेस ब्राऊन नावाचा शब्दांचा जादूगार आहे, त्याच्या प्रत्येक वाक्यात त्याने त्याचा जीव ओतलेला असतो. लेस अत्यंत गरिबीत वाढलेला. लहान असतानाच वाट्याला अनाथ जीवन आलेलं. मग कुणीतरी दत्तक घेतलं... मात्र, रंगानं काळा अन् वंशानं गुलाम ठरवण्यात आलेल्या निग्रो आईच्या पोटी जन्म घेतलेल्या या छोक-याला त्या प्रत्येक अडचणींचा सामना करावा लागला; ज्या समस्यांना, त्याच्यासारख्या असंख्य निग्रोंना यापूर्वी सामोरं जावं लागलं होतं. लेस ब्राऊन शाळेत असतानाची गोष्ट आहे. तो अभ्यासात हुशार होता. कोणाचंही चटकन लक्ष वेधून घ्यायचा. मग वर्गात विविध विषयांची उत्तरं विचारण्यात आली, की याच पठ्ठ्याचा हात सगळ्यात आधी वर व्हायचा... मात्र त्याची ही हुशारी वर्गातल्या गो-या रंगाच्या विद्यार्थ्यांना पचायची नाही. तेव्हा या पोरांनी मिळून वर्गशिक्षक व नंतर मुख्याध्यापकांकडे तक्रार केली, की हा काळा फार जास्त हुशारी दाखवतो. मग व्हायचं तेच झालं. जे इकडं भारतात हजारो वर्षं दलितांचं झालं व काही प्रमाणात आजही होत आहे. बस्स, त्याला नाकारण्याचे सगळे पर्याय खुले करण्यात आले. त्याला सांगण्यात आलं की, यानंतर तू कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, वर्गातदेखील अगदी शेवटच्या बाकड्यावर चूपचाप बसून राहायचं. यावर आणखी जालीम उपाय म्हणून की काय, शाळा व्यवस्थापकाने त्याच्या खिशात एक कागद ठेवला आणि त्याला सांगितलं की, जर कुणी तुला काही प्रश्न वगैरे विचारलाच तर लक्षात ठेव, तू उत्तर तर द्यायचं नाहीसच; मात्र त्या वेळेला खिशातून हा कागद काढून प्रश्न विचारणा-या त्या व्यक्तीच्या हातात ठेवायचा.
झालं काय की, काही दिवसांनी या शाळेत एक नवीन तरुण शिक्षक आले. रंगाने आणि मनाने गोरेच होते. भला माणूस होता तो. वर्गात आल्यावर त्यांनी दोन-तीन दिवस सगळ्यांची ओळख वगैरे करून घेतली. नंतर आपसूकच विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारणं सुरू झालं. मात्र विशेष कुणाला या प्रश्नांचं उत्तर येत नव्हतं. शेवटच्या बाकड्यावर बसलेल्या लेसच्या चेह-यावर मात्र दिसत होतं, की त्याला या जवळपास प्रश्नांची उत्तरं येतात. मग हे शिक्षक त्याच्या जवळ गेले, त्याला विचारलं. मग लेस ठरल्याप्रमाणे ‘नाही’ म्हणाला. मात्र राहून राहून त्या हाडाच्या शिक्षकाला असं वाटायला लागलं की, हा पोरगा कोणत्या तरी दबावात आहे. मुळात याला उत्तरं माहीत आहेत, पण ती उत्तरं सांगायला हा घाबरतो. मग एक दिवस हे शिक्षक त्याच्या जवळ गेले, त्याला खडसावून विचारलं, काय भानगड आहे? मग नाइलाजाने लेसने आपल्या खिशातला कागद काढून त्या शिक्षकांच्या हातात दिला‌. जसा तो कागद त्या तरुण शिक्षकानं वाचला, त्यांना धक्काच बसला. डोळ्यात पाणी आलं. इतक्याशा छोट्या मुलासोबत अशी वागणूक... मुळात तो कागद एक सर्टिफ‍िकेट असतं, ज्यावर सूचित करण्यात आलेलं असतं की, ‘मी लेस ब्राऊन एक मेंटली रिटार्डेड मुलगा आहे, आणि म्हणून मला कोणी काहीही विचारू नये...’ मात्र शिक्षकानं ठरवलं, आता किमान माझ्या वर्गात तू सगळ्यात पुढे बसायचं.
दिवस सरले... नाकारण्यात आलेला लेस या सरांच्या मार्गदर्शनावर एक एक दिवस आनंदाने जगू लागला. खरं तर त्याच्या जीवनात येणारा प्रत्येक दिवस महोत्सव बनायला लागला. याच सरांनी त्याचं बोलण्याचं कसब हेरलं. सांगितलं, की तू यापुढे वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घे... लेसने ते ऐकलं... ज्या शाळेने आणि वर्गमित्रांनी त्याचा आवाज नाकारण्याचा, त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्याच शाळेचा त्याने नावलौकिक केला. नंतर तर काही वर्षांनी त्याने स्वत:ला एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सिद्ध केले... सुरुवातीला लहान-लहान हॉलमध्ये लेसची मोटिव्हेशनल व्याख्यानं भरू लागली. मात्र लोकांच्या प्रतिसादानंतर आयोजकांना मोठमोठे ऑडिटोरियम बुक करावे लागले... नंतर तर अशी स्थिती निर्माण झाली की, लेस ब्राऊन यांचं व्याख्यान आहे म्हटल्यानंतर संपूर्ण अमेरिकेतून श्रोतावर्ग गर्दी करू लागला. शेवटी शेवटी तर लेस ब्राऊनच्या व्याख्यानासाठी आयोजकांना फुटबॉलचे ग्राउंड बुक करावे लागले... मध्यभागी स्टेज आणि लाखो लोकांना एकदाच हसविणारे व एकदाच टाळ्या वाजवायला मजबूर करणारे लेसचे शब्द त्याच्या आयुष्याचा जणू प्रवासच सांगायचे... स्टेजवर आल्यावर यू गॉट टू बी हंग्री... यू गॉट टू बी हंग्री... या शब्दांनी त्याच्या व्याख्यानाचं टोक गाठलं जायचं. लेस नेहमीच भुकेला होता... त्याची ही भूक होती परिवर्तनाची... त्याची ही भूक होती नाकारल्यामुळं नवनिर्मिती करण्याची... ही भूक होती, अन्यायाचा आवाज बनण्याची... हीच भूक ज्याच्या-त्याच्यात निर्माण होत जाणं, म्हणजे प्रत्येक तरुणात एक लेस ब्राऊन जन्माला येणं होय.
मुळात, आपल्याकडेही शिक्षण व्यवस्थेनं ज्या पातळीवरचं आशादायी चित्र रेखाटायला हवं होतं, तसं काही फारसं झालं नाही. सर्व शिक्षा अभियान या योजनेच्या माध्यमातून शाळेत जाण्याचं वय असलेलं प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, अशी धारणा मध्यभागी ठेवून अगदी राज्यघटनेत जिथे जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेलं कलम आहे, तिथेच हे शिक्षणाचंही कलम नव्यानं जोडण्यात आलं. हे खरंय, की शिक्षणामुळे का जगायचं...कसं जगायचं...कुठे जगायचं, अशा प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. मात्र किती जगायचं वा जगायचं की नाही जगायचं, असे सवाल जर याच शिक्षण व्यवस्थेतून जन्माला येत असतील, तर हे भयंकर आहे. एक तर भारतात अगदी पूर्वीपासून शिक्षणव्यवस्था स्मरणशक्तीवर आधारित ठेवण्यात आलीय. एखाद्याला किती लक्षात राहतं, यावर त्याच्या बुद्धिमत्तेचा स्तर निश्चित करण्यात येतो. आकलन किती होतंय, यापेक्षा लक्षात किती राहतंय, हाच मुख्य निकष मानल्यामुळे शिक्षणव्यवस्थेत cooperation या शब्दापेक्षा competition हाच शब्द अधिकचा महत्त्वाचा मानला गेला. खरं तर सहकार्याची भावना ‘स्पर्धा’ या शब्दापेक्षा कधीही महत्त्वाची असतेच. या स्पर्धेच्या नादात फक्त पुढे पुढे पळणं हेच महत्त्वाचं मानलं जातं...
एकंदरीतच समाजातल्या शेवटच्या घटकाला शिक्षणाचे फायदे मिळवून द्यायचे असतील, तर सामाजिक आणि आर्थिक समतोल साधणं शासनकर्त्यांची जबाबदारी आहे. जेणेकरून, आपल्याकडचेही लाखो लेस ब्राऊन स्वतःला सिद्ध करू शकतील आणि देशाला पुढे नेऊही शकतील…
sachingtayade@gmail.com