आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तगमग झेलणारी पाऊलवाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचन आपल्या आकलनाच्या कक्षा वाढवतं. सारासार विचार करायला, अंतर्मुख व्हायला भाग पाडतं. ही प्रक्रिया घडत असताना वाचनातून सगळीच उत्तरं मिळतात, असं कधी होत नाही. किंवा एका वाचनातून आपणाला त्या मूळ लेखकाच्या विधानापर्यंत पोहोचता येत नाही. माझंही वाचनातून असंच काहीसं संभ्रमित पर्यावरण तयार होत होतं. म्हणजे, ‘कोसला’ मला जी नीट कळली ती गंगाधर पाटलांची समीक्षा वाचूनच. मग त्या धारेतल्या ‘पुत्र’, ‘काळोखाचे अंग’ यांसारख्या कादंब-या कळायला लागल्या. माझ्या सुदैवाने मी मराठी विभागात (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) अध्यापन करताना भाषाविज्ञान शिकवण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा असा झाला की, भाषेबाबतचा माझा दृष्टिकोन विस्तारला. म्हणजे असे की, भाषा म्हणते, ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल.’ उगीच कलावाद्यांसारख्या आस्वादक उड्या मारू नको. भाषा नेमकेपणाने बोलायला आणि शोधायला शिकवते. भाषाविज्ञानातीलच शैलीविज्ञान ही एक शाखा. या शाखेमुळे कवितेचे, कथेचे किंवा कादंबरीचे कलामूल्य, सौंदर्य कशात आहे, हे लक्षात यायला मदत झाली. यामुळे प्रथम अत्यंत अवघड वाटणारे मर्ढेकर, चित्रे, कोलटकर हळूहळू कळू लागले.
हळूहळू वाचनाची प्रक्रिया खोल होत गेली. यातूनच सुरुवातीला मग मी समीक्षा लिहू लागलो. पहिला लेख (खरं तर टिपणच) विजय चोरमारे याच्या ‘शहर मातीच्या शोधात’वर लिहिला. ‘सत्याग्रही’त छापून आला. मग दुसरा लेख राजन गवसच्या ‘तणकट’वरचा ‘नवभारत’मध्ये छापून आला आणि लेखनाला बळ मिळत गेलं.

या निमित्ताने मराठी समीक्षा वाचीत गेलो. पण आजही समीक्षेत भरभक्कम असं काही फार आढळत नाही. रा. भा. पाटणकर, भालचंद्र नेमाडे, विलास सारंग, हरिश्चंद्र थोरात अशी थोडीच नावं सापडतात. माझ्या पिढीच्या समीक्षेचा आणि समीक्षेच्या अभिरुचीचा विचार करतो तेव्हा पदरी निराशा येते. माझ्यासकट हे खरे आहे. नियतकालिकांसाठी दर्जेदार समीक्षा उपलब्ध होत नाही. त्यामुळे साहित्याच्या भले-बुरेपणाची चर्चा फार घडत नाही. सातत्याने कोणी या अंगाने विचार करताना व मांडताना दिसत नाही. या समस्येचे उत्तर मला आजच्या उपयुक्ततावादी उथळपणात सापडते. प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता आणि उपभोग महत्त्वाचा ठरू लागला आहे. म्हणजे घरात कोणी पुस्तकं आणली म्हणून उत्सव करीत नाही. परंतु टीव्ही, फ्रिज, मोबाइल आणला की त्याचा उत्सव होतो. साहजिकच मग जगण्याने वेग-बिग घेतलाय, माणसांना वेळ नाही, असल्या सबबी सांगून गंभीरपणा हरवून टाकला जातो. जिथं गंभीर पुस्तकांची खरेदी नाही, तिथे गंभीर वाचक कसा दिसणार? गंभीर वाचक नाही तर गंभीर समीक्षा तर लांबच. मराठीतल्या अनेक मान्यवर प्रकाशकांनी ‘समीक्षेची पुस्तके खपत नाहीत; सबब ती छापा कशाला!’ अशी सरळ-सरळ व्यवहारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे समीक्षेच्या बाबतीत सगळीकडूनच आनंदीआनंद आहे. अलीकडे एक चांगली गोष्ट होतेय. जगभरातले दर्जेदार साहित्य मराठीत अनुवाद होताना दिसतेय. पण त्यांनाही पुरेसे वाचक नाहीत.
साक्षरता वाढली, आर्थिक उंची वाढली; परंतु पुस्तके खरेदीची मानसिकता नाही तयार झाली. त्यामुळे वाचनाचा कान तयार झाला नाही. साहजिकच नव्या पिढीचं साहित्य समजून घ्यायला, त्यावर भली-बुरी प्रतिक्रिया द्यायला कोणी तयार नाही. विश्राम गुप्ते, नितीन रिंढे, श्रीधर तिळवे, रवींद्र इंगळे-चावळेकर अशी खूप थोडी नावं समीक्षेत (आजच्या) सापडतात. त्यातही पुन्हा कवितेचीच समीक्षा जास्त होतेय. सतीश तांबे, जयंत पवार, समर खडस यांची कथा दर्जेदार असूनही त्यांच्यावर फारशी समीक्षा आढळत नाही. नाटक-कादंबरी तर मग दूरच. वर्तमानपत्रातील परिचय किंवा एखाद्या नियतकालिकाच्या संपादकाने खास लिहून घेतलेले लेखन काढले तर समीक्षेमध्ये अकादमिक शिस्त अजिबात आढळत नाही.

हे सगळं निराशाजनक आहे; पण वास्तव आहे. ते नाकारून कसं चालेल? संस्कृतीच्या अंगाने कुणी नीटपणे विचार करीत नाही. जर तसा तो झाला असता तर आज जे सभोवती राजकीय अराजक दिसतेय ते दिसले नसते. नुसतं वाचून, समीक्षा लिहून चालणार नाही. वाचनाच्या मुक्तीची पळवाट किती पक्की करायची? म्हणून मी प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेत सामील झालो. चार-चार दिवस रजा टाकून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सामील झालो. रात्र-रात्र डोळे फोडले. आणि खूप दिवस सत्तेबाहेर असलेली आमची पार्टी सत्तेत आली.
या दरम्यान मला अनेकांनी वेड्यात काढलं. हे तुझं काम नव्हे, असंही स्पष्ट सुनावलं. पण तरी मागे हटलो नाही. सत्ता मिळाली. ग्रामपंचायतीच्या शिक्षण समितीच्या सभापती पदासाठी माझं नाव पुढं येण्याअगोदर मी नकार दिला. त्या क्षणी आमच्यातला एक जण म्हणाला, ‘तुला नको ना, मगं माझं नाव पुढं कर. मी पण शिकलोय. दहावी नापास असलो म्हणून काय झालं? आमालाबी कळू दी त्या पदात काय हाय ते. आम्ही गाड्या पाण्यावर पळवायच्या का?’ हा पहिला धक्का होता. खरं-खोटं काहीच कळेना. पण इतका खोल बुडत गेलाे की, वर येतानाही खूप दमछाक झाली. काही दिवस सगळं बंद केलं. पण एकदा आमची पाणबुडी मोटार बंद पडली. ती विहिरीतून काढण्यासाठी रानात शेजारीपाजारी मदतीला येईनासे झाले. राजकीय सम्मीयतेचा तो थेट बसलेला दणका होता. त्यामुळं इच्छा नसूनही पुन्हा तोंडदेखलं सक्रिय व्हावं लागलं. वेळोवेळी मी काही सांगू-सुचवू लागलो की, गावाकडची मित्रमंडळी म्हणायची, ते तुझं पुस्तकी तुझ्याजवळ ठेव. पोरांना शिकव. आमाला नको. माझी घालमेल व्हायची. आपण ‘मिसफिट’ आहोत, असं वाटायचं. या वाटण्यातून सुटका करून घेण्यासाठी मला वाचन उपयोगी पडेनासं झालं. आणि मी कागद घेऊन लिहायला बसलो. यातूनच माझी ‘धूळपावलं’ ही पहिली कादंबरी जन्माला आली. सुटण्याचा मार्ग मला लेखणीनंच दिला.

mahendrakadam27@gmail.com