आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Lonar Ponds By Ranjit Rajput, DIvya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोणारची हाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार हा केवळ डोळ्यांना सुखावणारा निसर्गाचा चमत्कार नाही, देशोदेशीच्या संशोधकांचं तीर्थस्थानही आहे. लोणार विवरातील पाणी अतीव खारट आणि सोडायुक्त असल्याने त्यात राहणारे, वाढणारे जिवाणू गुणवैशिष्ट्याने फार वेगळे दिसून आले आहेत. 2008ला झालेल्या विवरातील पाण्याच्या संशोधनातून त्यात खास लोणार येथेच सापडणारे नायट्रोजन फिक्सेशन करणारे बॅक्टेरिया सापडले आहेत, तसेच मॅग्नेटोटॅक्टिक बॅक्टेरियाही सापडले आहेत. यामध्ये प्राणवायूविरहित अवस्थेत वाढणारे अ‍ॅनारोबिक प्रकारचे आम्लारी अल्कालाईन, पर्यावरणात मिथेन खाऊन जगणारे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. येणा-या काळात ग्लोबल वर्ॉमिंगच्या संदर्भात ही बाब निश्चितच संशोधकांसाठी आव्हानात्मक अभ्यासाचा विषय आहे.
या विवरांच्या उतारावर तीन पट्ट्यांमध्ये वैविध्याने नटलेल्या सांस्कृतिक, वैज्ञानिक, नैसर्गिक घटनांचे ऐतिहासिक साक्षीदार असलेले अभयारण्य आहे. ते 384 हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. त्यात सुमारे पंचाहत्तर जातींचे पक्षी निरीक्षकांना आढळून आले आहेत. मोर, नीलकंठ, घुबड, बगळे, पारवे, ससाणा, करकोचा इत्यादी पक्ष्यांचा येथे मुक्त वावर असतो. याशिवाय चिंकारा, लांडगा, तरस, कोल्हा, घोरपड, मुंगूस, माकड, हरिण, सांबर, साप, खार, ससा इत्यादी समृद्ध प्राणिसंपदाही आहे. माकडे तर सर्वत्र दिसतात. साग, आंबा, खजूर, निंब, करवंद यांसारखी विभिन्न प्रकारची वृक्षवल्लरीही येथे आहे. गावाचे सांडपाणी या विवरात सध्या जात आहे, हे ताबडतोब थांबवले पाहिजे. शिवाय विवरात एका बाजूला एक बारमाही झरा वाहतो. मात्र त्याचा वापर सामान्य लोक कपडे धुण्यासाठी करतात. त्यामुळे साबण आणि डिटर्जंटयुक्त सांडपाणी सरोवरात जाते.

यादवांच्या काळात लोणार मोठे सांस्कृतिक केंद्र होते. यादवकालीन वास्तुशिल्पी हेमाद्रीपंताने तेथे मोठ्या प्रमाणावर शिवमंदिरशिल्पे निर्माण केली आहेत. यावरून हे सरोवर यादवकालीन शिवतीर्थ असल्याचे सिद्ध होते.

लोणार विवरातील सरोवराच्या काठावर सुमारे 1200 वर्षांपूर्वी बांधलेली, पैकी काही यादवकाळात जीर्णोद्धार झालेली, तर बरीचशी अत्यंत भग्नावस्थेतील श्रीकमळजादेवी (गावदेवी), श्रीअंबरखाना महादेव, श्रीमुंगळा महादेव, श्रीचोपडा महादेव, श्रीशंकर गणेश, श्रीरामगया, श्रीवाघा महादेव व श्रीमोर महादेव ही आठ मंदिरे पाहताना तलावाची प्रदक्षिणा पूर्ण होते. या प्रदक्षिणेला साधारण चार तास लागतात. लोणार सरोवरासमोर अगदी मोक्याच्या ठिकाणी महाराष्‍ट्र पर्यटन मंडळाची राहण्याखाण्याची सेवा उपलब्ध आहे. तेथील प्रत्येक खिडकीतून सरोवराचे दर्शन होते. तिथून सहज चालत आपण कधीही विवराच्या तोंडाशी जाऊ शकतो. लोणार गावात श्रीधारतीर्थ येथे श्रीबालविष्णूचे मंदिर व दैत्य सुदन मंदिर ही भव्य मंदिरे आहेत. दैत्य सुदन मंदिराच्या बाह्य भागावर असलेली मिथुनशिल्पे पाहताना खजुराहोची आठवण येते. रामायणातले प्रसंग, शुक्राचार्य, वटसावित्री, कृष्णलीला, शिवपार्वती तसेच चक्रपाणी व पद्मपाणी आदी कोरीव शिल्पेही इथे पाहायला मिळतात. हे मंदिर उत्तम शिल्पकामाचा नमुना आहे.

...तर लोणार नामशेष होणार! - महंमद आरिफ सरोवर परिसराच्या ‘इंजेक्ट ब्लॅकेट’मधील दुर्मिळ खनिजांचा अभ्यास करण्यासाठी येथे आलेले असून खनिजासोबत परिसरातील दगडातील चुंबकीय गुणधर्माचा अभ्यास करताना, प्रदूषण व ऋतुबदलाच्या खनिज व दगडातील चुंबकीय कणांवर होणा-या परिणामावर ते सध्या संशोधन करीत आहेत. शाश्वती सरकार सरोवरातील खा-या पाण्यातील जैविक शेवाळाचा अभ्यास करत आहेत. प्रदूषणाचा व वातावरण बदलाचा जैविक शेवाळावर यापूर्वी काही प्रमाणात परिणाम झाला होता. परंतु गेल्या काही वर्षांतील प्रदूषणवाढीमुळे जैविक शेवाळाची स्थिती गंभीर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे.

लोणार सरोवर परिसरातील वृक्षतोडीमुळे कमी सावली आणि कमी पाऊस यामुळे सरोवरातील पाण्याचे बाष्पीभवन अधिक गतीने होत आहे. याकडे लक्ष न दिल्यास येणा-या काही वर्षांत जगात प्रसिद्ध असलेले येथील खा-या पाण्याचे हे सरोवर नामशेष होण्याची चिंता मुंबई येथील भारतीय भूचुंबकीय संस्थानचे डॉ. नाथानी बसवय्या, भारतीय पुरातन चुंबकीय संशोधक डॉ. दीनदयाल कन्नन, भू-भौतिक संशोधक महंमद आरिफ आणि जर्मनीतील पोटॅडॅम युनिव्हर्सिटीचे जीवविज्ञान संशोधक शाश्वती सरकार यांनी व्यक्त केली. ते लोणार सरोवराच्या संशोधनासाठी सरोवर क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. लोणार सरोवर परिसरात फिरणारे पर्यटक गुटखा पुड्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या फेकतात व त्या वाहत सरोवराच्या पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाण्यातील प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून जैविक शेवाळही हळूहळू नष्ट होत आहे. या सर्व बाबींवर तातडीने लक्ष देऊन निर्बंध घालावे लागतील, अन्यथा लोणार सरोवर नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही, अशी साधार भीती या संशोधकांनी वर्तवली आहे.

दोन दिवस लोणारच्या सान्निध्यात राहून लोणारचे पौराणिक, वैज्ञानिक, तसेच भौगोलिक व ऐतिहासिक संदर्भ पाहणे आणि अभ्यासणे हा एक उत्कंठावर्धक अनुभव होता. निघण्याच्या दिवशी पहाटे सरोवराजवळ ऐटदार मोर दिसले. त्यांच्या दर्शनाने आमची पहाट आनंदमय झाली. शिवाय सैबेरियातून हिमालय ओलांडून शतकानुशतके आपल्याकडे येणारे कालिदासांच्या मेघदूतातले क्रौंचरंघ्र वा हंसकार ज्यांना आपण चक्रवाक व ब्राह्मणी बदक म्हणून ओळखतो, 30 ते 40 चक्रवाक सरोवरात ओळीने जलक्रीडा करताना दिसले. शेजारच्या झुडपावर एक विशालकाय शृंगी घुबड फडफडताना पाहून लोणार आजही संपन्न पक्षी अभयारण्य असल्याच्या जाणिवेने मी सुखावलो. इथे येताना माणसातलं पावित्र्य अंतर्यामी ठेवून प्रत्येक जण आला आणि तसा वागला, तर अमूर्त आश्चर्याची खाण असलेला हा ठेवा बहुउद्देशीय विज्ञानतीर्थ म्हणून नावारूपास येईल, लोणार सरोवर निश्चितच वैश्विक धरोहर होईल!

सरोवरांचे विश्व
* आफ्रिका : बोसुमत्वी
आफ्रिकेतील घाना येथील बोसुमत्वी विवर हे जगात पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे विवर असून त्याचा व्यास 10,000 मीटर आहे.
* कॅनडा : न्यू के बेक
लॅब्राडोर येथील न्यू के बेक हे विवर दुस-या क्रमांकाचे असून त्याचा व्यास 3500 मीटर आहे.
* भारत : लोणार
भारतातील लोणार सरोवर हे जगातील तिस-या क्रमांकाचे विवर असून त्याचा व्यास 2000 मीटर आहे.
* ऑरिझोन : कॅनियर डायब्लो
ऑरिझोनमधील कॅनियर डायब्लो हे विवर चौथ्या क्रमांकाचे विवर असून त्याचा व्यास 1300
मीटर आहे.

ranjitrajput5555@gmail.com